पिठलं...नातं जुळलं...

 

पिठलं...नातं जुळलं...


घरात कामांची जंत्री सुरु झाली की एका मुख्य बाजुचे नियोजन करतांना अगदी तारांबळ उडून जाते.  तशीच तारांबळ माझीही होत आहे.  अशावेळी स्वयंपाकघरात शॉर्टकट मारला जातो. पण हा शॉर्टकट मारतांना तो शॉर्टकट आहे, हे भासवून न देणं हे खरं कसब असतं.  एखादाच पदार्थ करायचा पण तो अस्सा....की बस्स....अशा भन्नाट पदार्थांची मोठी यादी असली तरी ती ऋतुमानानुसार वापरावी लागते.  या पावसाळी दिवसात अशा यादीमध्ये पहिला मानाचा क्रमांक मिळतो, तो कुळीथाच्या आमटीला.  अर्थात नव्वद टक्के लोकांना कुळीथाचं पिठलं माहित असतं.  पण या पिठल्याचं आणि माझं कधी जमलचं नाही.  तसंच असतं ते.  एकतर त्याचं रंगरुपही वेगळं.  पण या रंगरुपाला आणि मुळ कुळीथाच्या पिठाला थोडा मॉर्डन पर्याय वापरला तर या कुळीथाच्या पिठल्यासारखा खमंग पदार्थ दुसरा नाही, याचा प्रत्यय येतो.  अर्थात असे करतांना त्याचे नावही बदलणं गरजेचं आहे.  मी कुळीथाची चांगली आमटी करते.  सध्या अशाच कुळीथाच्या आमटीवर माझी मदार आहे. 


लग्न झाल्यावर सुरवातीचे काही महिने कसरतीचे होते.  मुळात ऑफीसवरुन घरी आल्यावर स्वंयपाक काय करायचा हे विचार करण्यात तासभर जायचा.  मग जो गोंधळ व्हायचा त्यातून जेवायला दहा वाजून जायचे.  ही सर्व कसरत वाचण्यासाठी नव-यानं कुळीथ पिठल्याचा पर्याय पुढे केला.  त्याला कुळीथाचं पिठलं फार प्रिय.  पण माझा छत्तीसचा आकडा.  सुरुवातीला हो ला हो म्हणत पिठलं केलंही, पण माझ्या गळ्याखाली घास जाईना.  अशावेळी दोन-चार मैत्रिणींसमोर हा प्रश्न ठेवला आणि त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनानं जेवणाचं वेळापत्रक बनवून मोठा प्रश्न सोडवला.  पण या सर्वात त्या पिठल्यानं मात्र माझी कधी पाठ सोडली नाही.  आठवड्यातून नाही पण पंधरा दिवसातून एकदा तरी घरी पिठलं झालं पाहिजे, यावर नवरा ठाम राहिला.  त्यामुळे या कुळीथाच्या पिठल्यावरुन आमच्यामध्ये नेहमी तू आणि मी असा वाद ठरलेला असायचा.  पण मध्यंतरी रत्नागिरीला गेले आणि या वादावरचं औषध सापडलं.  रत्नागिरीच्या बाजारात हौशेनं फिरले तेव्हा अख्खे कुळीथ दिसले.  एक मावशी हे कुळीथ आणि पांढरे वाल विकायला घेऊन बसली होती.  मी पांढरे वाल खरेदी केले, पण कुळीथाकडे पाठ फिरवली.  तेव्हा ती म्हणाली, या कुळीथासारखं पौष्टीक खाद्य नाही.  नुसतं कुळीथाचं पिठलं आणि भात खाल्लास तरी बदाम-काजू खाल्लासारखी ताकद येईल.  या तिच्या वाक्यावर आम्ही दोघंही हसलो होतो.  नव-यानं तत्परतेनं तिला सांगितलं की, माझ्या बायकोला पिठलं आवडत नाही, त्यामुळे आमच्याकडे ते फारसं होत नाही. शिवाय, काय करणार, बायको बनवेल तेच मला खायला लागतं, हे आभूषणही त्यानं मारलं होतं.  त्यावर ती मावशीही हसली, आणि म्हणाली, पाव किलो कुळीथ घे, मी तुला अशी आमटी सांगते, ती कर.  म्हणत, त्या मावशीनं कुळीथ मापून पिशवीत भरलेही.  नाही नाही, म्हणत, तिनं बाजूला असलेल्या एका पायरीवर बसायला सांगितलं.  नव-याचा यात स्वार्थ होता, त्यामुळे त्यानं ऐकायला काय जातंय, तुला पटलं तर कर, नाही तर मी कुठे

आग्रह करणार आहे, म्हणत आपली बाजू मांडली. 

मग त्या मावशीनं एक सोप्पी रेसिपी सांगितली.  अख्खे कुळीथ चांगले धुवून आठ तास भिजायला घालायचे.  मग हे भिजलेले कुळीथ एका चाळणीमध्ये किंवा कपड्यात गुंडाळून मोड आणायला ठेवायचे.  चांगले दोन दिवस झाले की कुळीथाला लांब मोड येतात.  असे कुळीत सरळ कुकरमध्ये वाफवून घ्यायचे.  अशावेळी या कुळीथासोबत बारीक कांदा आणि चांगलं मुठभर खोबरं घालायचं.  चारपाच कडीपत्त्याची पानं आणि चिमुटभर हिंगही घालून कुळीथ वाफेला लावायचे.  त्यानंतर एका भांड्यात  लसूणाच्या पाकळ्या ठेचून फोडणीला घालायच्या.  इथे दोन प्रकारात या आमटीची विभागण होते.  हिरव्या मिरचीची आमटी हवी असले तर हिरवी मिरची याच लसणार फोडणीला घालायची.  त्यावर पुन्हा कडीपत्ता घालायचा.  आणि नेहमीचे जिरे, राई, हळद.  सगळं छान खरपूस झालं, की त्यात नावाला कांदा घालायचा.  तोपर्यंत कुकरमध्ये छान गरगट्ट शिजलेले कुळीथ बाहेर येतात.  त्यांना पहिल्यांदा घोटून घ्यायचं.  घाई असेल तर त्यायले अर्धे कुळीथ सरळ मिक्सरला लावायचे.  मग हे शिजलेले कुळीथ या फोडणीवर घालायचे.  त्यातच एक-दोन आमसूलं घालायची.  चांगली उकळी आली की, त्यावर कोथिंबीर आणि थोडं खोबरं घालायचं.  हिरव्या मिरचीची कुळीथाची आमटी तयार.  आणि हिलाच जर लालेलाल करायचं असेल तर मात्र फोडणी जर सावकाश द्यायची.  फोडणी न देताच कुळीथाच्या मिश्रणात मिठ, कोथिंबीर, खोबरं आणि आमसूलं घालून चांगली उकळी द्यायची.  दुस-या गॅसवर फोडणीचे भांडे तापवून घ्यायचे.  त्यात पहिला लसूण फोडणीला घालायचा.  तो छान करपल्यावर त्यात कडीपत्ता, फोडणीचे जिन्नस, हळद आणि मग सगळं तडतडू लागलं की आपल्या आवडीनुसार तिखंट त्या फोडणीत घालायचं.  ही फोडणी मग त्या उकळत्या कुळीथाच्या आमटीमध्ये घालायची.  फोडणी कुळीथाच्या आमटीत टाकल्यावर चांगल्या दोन-चार शिंका आल्या की समजायचं दमदार आमटी झालीच.  त्या मावशीनं हे सर्व एवढ्या खुबीनं सांगितलं की विचारता सोयच नाही. 


तिनं दिलेल्या या रेसिपीमुळे मी तेव्हा एवढी खूष झाले होते की, तिच्याकडूनच मग फणसाचे भाजीचे गरे आणि आमसूलं घेतली होती.  या रत्नागिरी ट्रीपमधून घरी आल्यावर पहिलं काम केलं असेल तर ते कुळीथ भिजायला टाकले होते.  नंतर त्याचे मोड काढले आणि त्या मावशीनं सांगितल्यासारखी आमटी केली.  त्या दिवसापासून आमच्याकडे कुळीथाची आमटी हा आवडीचा पर्याय ठरला आहे.  एखाद्यादिवशी फार धावपळ होणार असेल, तर दोन दिवस आधीच नियोजन करुन मोड आलेले कुळीथ तयार ठेवायचे.  अशा कुळीथ आमटीसोबत फक्त भात आणि पोह्याचा पापड किंवा एखादी नाचणीची भाकरी असेल तरी मेजवानीचा बेत केल्यासारखेच भासते. 

फक्त ही आमटी करतांना एक छोटीशी पण महत्त्वाची टीप.  अख्खे कुळीथ वापरतांना चांगले दोन वेळा तरी निवडून घ्यावेत.  ब-याचवेळा त्यात त्याच्या आकाराचे बारीक दगड असतात.  याशिवाय कुळीथात चाडेही असतात.  म्हणजेच न शिजणारे कुळीथ.  त्यामुळे मोड आलेले कुळीथही एकदा मोठ्या ताटात घेऊन निवडावे.  या चाडे आणि दगडांचा आवज पटकन येतो, आणि त्यात ते ओळखले जातात.  या दोन्हीही गोष्टी आमटीत राहिल्या तर जेवण ऐन रंगात आल्यावर दाताखाली खाडकन आवज येतो, आणि जेवणाची सगळी चव निघून जाते.  एवढी काळजी घेतली तर या कुळीथाच्या आमटीची चव भन्नाटचं लागते.  शिवाय पावसाळी दिवसात ही चव अधिक खुलते.  कधी  कुळीथाच्या पिठल्याचं नाव जरी ऐकलं तरी आमच्यात तू तू मै व्हायची...पण आता या आमटीनं दोघांच्याही चेह-यावर कळी खुलतेय... 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

  

Comments

  1. कुळथाचं पिठलं मला अतिशय आवडतं आणि आता कुळथाचीआमटीपण करणार! स्वैपाकातलं नाविन्य हे तुझ्या सुगरणपणातल कौशल्य आहे... ललिता छेडा

    ReplyDelete
  2. मग तू आमटी स्पेशालिस्ट झाली तर...😊

    ReplyDelete
  3. खूप छान कुळीथ आमटी ची रेसिपी.

    ReplyDelete
  4. khup chhan lekh

    ReplyDelete
  5. सुनंदा6 August 2025 at 15:56

    कुळीथाची आमटी रेसिपी छान आहे.नाविन्यपूर्ण रेसिपी.मलाही कुळीत पिठलं आवडत नाही.आता खरचं बनवणार आमटी.उकळत्या कुळतामधे फोडणीच्या चरचरीत वासानेचआमटीची चव घ्यावी वाटली.आणि लेखनाची ओढही खमंग आमटीसारखीच! मनाला तृप्ततेचा ढेकर देण्यासारखेच.पुढील कथेसाठी खूप शुभेच्छा!

    ReplyDelete
  6. महेश टिल्लू8 August 2025 at 21:12

    कुळीथाचे पिठले माझा विक पॉईंट आहे,जास्त करून कोकणस्थ समाजात आवडीने आणि नेहमीच केले जाते, आंबेमोहोर भात आणि कुळीथाचे पिठले म्हणजे सोने पे सुहागा....

    ReplyDelete

Post a Comment