बोलून तर बघा..

 

बोलून तर बघा..


दोन आठवड्यापूर्वीचा एक किस्सा सांगते.  दुपारचे जेवण झाले, आणि जरावेळ हातात क्रोशाची सुई धरली.  तितक्यात बेल वाजली.  दारात सुमन उभी होती.  दुपारच्यावेळी ही गाडी इकडे कुठे आली, म्हणत मी दरवाजा उघडला.  सुमन आणि मी बहुधा फोनवरुन गप्पा मारतो, अगदी क्वचित प्रसंगी आम्ही एकमेकींच्या घरी जातो.  कारण जेव्हा सुमनला मोकळा वेळ असतो, तेव्हा माझी गडबड आणि जेव्हा मी मोकळी असते, तेव्हा तिची गडबड.  नुकतीच तिच्या मोठ्या मुलाचे पोस्टग्रॅज्युएशनसाठी अँडमिशन झाले होते, तेव्हा मात्र वेळ काढून ती आली होती.  तेव्हाच भरपूर गप्पा मारुन गणपतीला भेटूया, म्हणत आम्ही एकमेकींचा निरोप घेतला होता.  त्यानंतर काही दिवसातच सुमन आली होती.  गाडी आज इकडे कशी, एवढं वाक्य सुमननं ऐकलं, आणि दारात पहिलं पाऊल टाकताच प्रचंड चिडली.  आता जाऊ का परत, तुझी कामं चालू आहेत का, म्हणून मला दम भरला.  मी गुमान तिला हात पकडून आत आणलं, आणि कोचावर बसवलं.  बसल्या बसल्या सुमननं मागे टेकून आपले डोळे मिटून घेतले.  ते बघताच पाणी आणण्यासाठी मी आत गेले. 


पाण्याचा ग्लास समोर ठेवेपर्यंत सुमन अशीच डोळे बंद करुन शांत बसली होती.  मी तिला पाण्याचा हात हातात दिला आणि तिनंही तो एका दमात संपवला.  बरं नाही का ग...म्हणत मी तिच्या डोक्याला हात लावला.  डोकं तर थंड होतं, सुमन माझा हात झटकून म्हणाली, बाहेर थंड आहे, आत तापलंय.  खूप त्रास होतोय, म्हणून तुझ्याकडे आलेय.  घरी सर्व माझ्यावरच उठलेत.  मी चमकून तिच्याकडे पाहिलं.  सुमन आणि माझी ओळख गेल्या पंचवीस वर्षाची.  तिला दोन मुलं.  मोठा मुलगा आणि धाकटी लेक.  दोन्ही मुलं माझ्यासमोरच मोठी झाली.  या दोन मुलांशिवाय तिचं दुसरं विश्वच नव्हतं.  तिचा नवराही चांगला परिचयाचा.  तोही सुमनसारखाच शांत स्वभावाचा.  तशीच त्यांची दोन्ही मुलंही.   तिचा मोठा मुलगा पोस्टग्रॅज्युएशन करत नोकरी करणार होता, तेव्हा सुमन आता मोठं घर घेण्याच्या विचारात असल्याचे समजले होते.  पुढच्या पाच-सहा वर्षात मुलाचं लग्न करुन देणार होती,  तोपर्यंत तिचा नवराही निवृत्त होणार होता.  त्यानंतर महिनाभर तरी कुठेतरी शांत जागी जाऊन बसेन असं, ती बोलली होती.  मात्र गप्पा संपल्यावर कसली शांत जागा, आपल्या किचनच्या ओट्याशिवाय फार कुठेही थांबता येणार नाही, असंही खेळकरपणे बोलून तिनं माझा निरोप घेतला होता.  पण आता आलेल्या सुमनचा सगळा नूरच वेगळा होता. 

ती बरचं असंबंध बोलत होती.  रोज सकाळी उठा, डबे भरा, मग घरचं आवरा, भाजी आणा, कपडे बघा, घरची साफसफाई, पाहुणे, झालंच तर बॅंकांची कामं, वैताग आलाय या सगळ्याचा, असं भडभडून सुमन मला सांगू लागली.  तेव्हा


माझा माझ्यावरच विश्वास बसला नाही.  ही सुमनच आहे का, हे मला कळत नव्हतं.  कारण यापूर्वी मी हजारवेळा तिला ओरडले होते.  सगळं मी करते, मी करते...हे सांगू नये, आणि करुही नये.  पण सुमन भारी उत्साही.   कधीही चिडचिड नाही की, मला कंटाळा आला हा शब्द तिच्या तोंडात नाही.  तिच्या मुलांच्या शाळेतील डब्याची आठवण अजूनही त्यांचा मित्रपरिवार काढतो.  नवरा तर दर महिन्याला तिच्या हातच्या पुरणपोळ्या ऑफीसमध्ये डबा भरुन घेऊन जातो.  सुमन हे सर्व करतांना थकत असणार.  पण तिनं कधीही त्याबाबत साधा उल्लेखही केला नव्हता.  उलट, असे डबे पाठवले की ती आवर्जून फोन करणार.  मी आज इतकी धावपळ केली, हे सांगताना तिचा स्वर एवढा आनंदी असायचा की, मी तिला काही वेळा रोबोट वूमन म्हणून हाक मारायचे.  आज तिच रोबोट वूमन माझ्यासमोर हताशपणे बसली होती, आणि मला सगळ्यांचा वैताग आलाय म्हणत, तिनं पुन्हा डोकं मागे टेकून डोळे बंद केले. 

तिच्या या वागण्यानं मी सुद्धा काही वेळ चक्रावले होते.  मग सुमनबरोबर झालेला गेल्या महिन्यातील संवाद आठवण्याचा प्रयत्न केला.  आणि माझी ट्यूब पेटली.  मी सुमनला जागं केलं.  सुमन तुला पिरियड बरोबर येतात का, तू म्हणाली होतीस, आत्ता महिना चुकतोय.  पिरियड जाणार म्हणून.  तू डॉक्टरांकडे गेली होतीस का तपासणीला.   माझ्या या प्रश्नांमुळे सुमन केवढी वैतागली.  आत्ता मध्येच काय हे.  माझ्या वैतागण्याचा आणि पिरियडचा काय संबंध म्हणून तिनं मलाच परत प्रश्न केला.  पण मला तिच्या चिडण्याचं कारण समजलं होतं, हे बघ सुमन, मला वाटतं तू गायनिककडे जाऊन तपासणी करुन घ्यावीस.  तुला वाटत असेल तर मी सोबत येते, पण तपासणी गरजेची आहे.  तुला मेनोपॉज सुरु झाले आहेत बहुधा.  म्हणून तू एवढी चिडचिड करतेस.  हे माझं स्पष्टीकरण ऐकून घेईल तर ती सुमन कुठली.  काहीतरीच तुझं.  मी वाचलंय सर्व मेनोपॉजबद्दल.  आणि पिरियड काय आता जाणारच आहेत, त्यांच्यामुळे एवढं काही होत नाही, एवढं बोलून बाई पुन्हा कोचाला टेकून डोळंबंद करुन बसल्या.  पण मी या बाबतीत चांगली अनुभवी होते.  माझ्या या मेनोपॉजच्या काळातला अनुभव तरी  काहीसा असाच होता.  कधी प्रचंड चिडचिड, कधी प्रचंड एकाकीपणाची भावना आणि कधी अगदी पान पडलं तरी भडभडून येणारं रडू.  पण या सर्वात माझ्यासोबत नवरा आणि लेक उभे होते.  मेनोपॉजची लक्षणं दिलायला लागल्यावर मी माझ्या हक्काच्या दोन माणसांना त्याची कल्पना दिली आणि मी मानसिकरित्या काय परिस्थितीतून जात आहे, हे समजून सांगितलं.  एवढ्याश्या गोष्टीनं पुढचं सगळं सुकर झालं.  या व्यतिरिक्तही अन्य त्रास काही वर्ष झाला, आणि त्यातून मला दोघांनी अलगद बाहेर काढलं.  माझ्यासमोर डोळे बंद करुन बसलेल्या सुमनला बघून मला ते दिवस आठवले.  तिला तसंच आराम करु देत, मी स्वयंकपाकघरात गेले.  कॉफी केली आणि रव्याच्या केकचे तुकडे एका डिशमध्ये घेतले.  सर्व मांडून सुमनला उठवलं.  तिला हट्टानं खाली बसयाला लावलं.  मग पिरियड कधी आलेत, ही चौकशी केली.  माझा अंदाज बरोबर होता.  तीन महिन्याच्या अंतरानं बाईंचे पिरियड येत होते, डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाणार जाणार म्हणून तिची टाळाटाळ सुरु होती.  मी सुमनला माझा अनुभव सांगितला.  घरी बोल, मुलं आणि नव-याला कल्पना दे.  अचानक शांत असलेली आई एकदम चिडचिड करायला लागली तर ती मुलं सुद्धा गोंधळून जातील.  नव-याचीही तिच अवस्था होईल.  त्यापेक्षा तूच का नाही त्यांना स्वतःच्या मनाची अवस्था सांगत, म्हणून तिला गळ घातली.  त्यावर ते मला समजून घेतील का, हा सुमनचा प्रश्न होता.  अर्थातच आजची पिढी याबाबत समजुतदार आहे, हा माझा अनुभव आहे.  फक्त बोलून तर बघ.  त्यांनाही जाणीव होईल,  मुलंच तुला दवाखान्यात नेतील बघ.  आणि तुझ्या आरामाची काळजी घेतील म्हणून


मुलांकडून आश्वासनही तिला दिलं.  त्यानंतर पुढचे दोन तास आम्ही दोघी त्या मेनोपॉज नावाच्या प्रकाराबद्दल गप्पा मारत होतो.  सुरुवातीला या शब्दालाच मी खूप घाबरले होते.  मान्य आहे, थोडा त्रास होतो, पण कुटुंबाला याची कल्पना असेल तर हा मेनोपॉजचा काळही अगदी सुखाचा ठरतो, हा माझा अनुभव आहे.  उलट या काळात आपण आपल्याला ओळखायला लागतो, याचीही जाणीव झाली आहे.  त्यामुळेच या अनुभवाच्या गोष्टी हक्कानं सुमनला सांगितल्या.  सायंकाळचे चार वाजल्यावर सुमन जायची घाई करु लागली.  रात्रीच्या जेवणाची गडबड होती.  पण मी पुन्हा तिला थांबवलं.  आजपासून नाही, आत्तापासून सुरुवात कर, म्हणून तिला परत बसवून घेतलं.  त्रास होतोय ना, मग थोडा आराम कर.  संध्याकाळी ऑफीसवरुन येतांना नव-याला पोळीभाजी केंद्रावरुन पार्सल घेऊन यायला सांग.  पण आमच्याकडे अशी सवयच नाही ग.  म्हणत पुन्हा सुमन मान खाली घालून बसली.  रोज थोडीच आहे, आज गरज आहे, सुविधा उपलब्ध आहे, अशावेळी उगा आपली फरफट कशाला करुन घ्यायची, या माझ्या युक्तीवादावर मात्र गाडी शांत झाली.  रात्री जेवण झाल्यावर सगळ्यांना मेनोपॉजबाबत कल्पाना देणार असं सुमनकडून आश्वासन घेतलं आणि मी तिला जाऊ दिलं. 

दुस-या दिवशी दुपारची जेवणं झाल्यावर सुमन नाही पण तिचा फोन आला.  माझ्या मनात थोडं धस्स झालं, पण तिचा आवाज ऐकला आणि सगळं सुखरुप असल्याची पावती मिळाली.  रात्रीच जेवतांना सुमननं तिला होत असलेला त्रास मुलांना आणि नव-याला सांगितला.  यावर तिचा लेकच खूप भडकला, तू एवढे दिवस का सांगितलं नाहीस म्हणून त्यानं आरडाओरडा केला.  आता थोडे दिवस डबा नको, म्हणून रात्रीच्या जेवणाची सगळी भांडी त्यानं आवरली.  नव-यानं आठवड्याची सुट्टी काढली आणि तिला पहिलं डॉक्टरकडे घेऊन गेला.  मला फोन केला तेव्हा ती नुकतीच डॉक्टरकडून घरी आली होती.  घरी लेकीनं पुलाव केला होता.  जेवल्यावर बाकीची आवराआवरही तिनंच केली.  मला हे सांगतांना सुमनला भरुन येत होतं.  तिनं थॅक्स म्हटलं, पण ते थॅक्स तिचं तिला परत केलं.  कारण मी फक्त तिला बोलून बघ, येवढंच सांगतिलं होतं.  बाकी प्रत्येकीनं आपल्या कुटुंबावर विश्वास ठेवला आणि त्यांच्यापुढे मन मोकळं केलं, तर तो मेनोपॉज येऊदे नाहीतर आणखी काही, आम्ही खंबीरपणे लढा द्यायला तयार असतो. 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. खूप छान लेख आहे

    ReplyDelete
  2. स्त्रियांच्या आयुष्यातला न टाळता येणारा हा काळ. मात्र आपण कशाकशात मन गुंतवून घेतलं तर हा काळ नक्की सुसह्य होतो .शिवाय रेग्युलर योगासन ध्यानधारणा करत असू तर त्याचा त्रासही आपल्याला जाणवत नाही

    ReplyDelete
  3. महिलांना योग्य जाणीव करून देणारा लेख

    ReplyDelete
  4. खुप छान बोलून बरेच प्रश्न सुटतात, पण आपणच घाबरतो समोरचा काय म्हणेल म्हणून, पण 👌परिस्थिती हाताळली 👍👍बोलून मोकळे व्हावं. साठवल्याने त्रासच वाढतो हे खरं

    ReplyDelete
  5. महिलांच्या मोठया प्रश्नावर उपयुक्त भाष्य

    ReplyDelete
  6. महेश टिल्लू17 August 2025 at 12:48

    प्रामाणिकपणे व्यक्त होणे हा खरेच उत्तम उपाय आहे.गप्प राहिल्याने प्रश्न न सुटता ,गुंतागुंतीचे बनत जातात.मोकळे राहिल्यावर विश्वास वाढतो., मार्गदर्शनपर लेख

    ReplyDelete
  7. खूप छान लिहिले, शिल्पा

    ReplyDelete

Post a Comment