मिसेस परफेक्ट
काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी तेव्हा गांवकरी या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम करत होते. तेव्हा बातमीसाठी डोंबिवलीमधील सुवर्णमंगल महिला सहकारी बँकेमध्ये गेले. या बॅंकेत ललिता छेडा या पदाधिकारी होत्या. ललिला छेडा, या माझ्या सुरुवातीपासून मार्गदर्शक आणि उत्तम मैत्रिण. मी सुवर्णमंगल बॅंकेत गेल्यावर त्यांनी मला हवी ती सगळी माहिती दिली. सोबतच बॅंकेच्या संचालिकांना भेटून जा, म्हणून आग्रह केला. मी त्यांना भेटायला गेले. कॉटनची एक कडक साडी घातलेल्या एक बाई खुर्चीवर बसल्या होत्या. कपाळावर गोल टिकली आणि केसांचा घट्ट आंबाडा. मी त्यांना माझा येण्याचा उद्देश सांगितला. त्यावर त्यांची प्रतिक्रिया अगदी जुजबी. अगदी मोजक्या शब्दात त्यांनी चौकशी केली. त्यातही इंग्रजीचा अधिक प्रभाव. आमचा हा संवाद अगदी काही क्षणात झाला, आणि मी माघारी आले. ही व्यक्ती म्हणजे, सीए जयश्री कर्वे. माझी आणि त्यांची पहिली भेट झाली, त्यात त्यांच्याबद्दल माझी झालेली धारणा एकदम वेगळी होती. या बाईंना फारसं बोलायला आवडत नाही, असा माझा पहिल्याच भेटीत समज झाला. त्यानंतर काही वर्षानंतर या सीए जयश्री कर्वे यांची पुन्हा भेट झाली. पहिल्या भेटीतील अनुभवाला पार स्वच्छ करणारी ही दुसरी भेट होती. त्यानंतर जयश्री कर्वे यांच्यासोबत डोंबिवली महिला महासंघामध्ये काम करण्याची संधी मिळाली. मग एका शिस्तबद्ध कार्यकर्तीची ओळख होऊ लागली. या व्यक्तिमत्वाला कितीतरी आयाम आहेत, हे आयाम उलगडू लागले. त्यांची उकल होऊ लागल्यावर मी त्यांचे नामकरण मिसेस परफेक्ट, असे केले. याच परफेक्ट व्यक्तिमत्वाची आज ओळख करुन देत आहे.
जयश्री कर्वे या
माहेरच्या पडवळ. आई, शुभलक्ष्मी पडवळ आणि
वडील श्रीधर पडवळ. ठाण्याच्या चरई येथे हे
पडवळ कुटुंब रहात होतं. शुभलक्ष्मी पडवळ
यांच्या आईची, म्हणजे, जयश्री यांच्या आजी, कोकणातून मुंबईत शिकायला येणा-या
मुलांसाठी आधारवड होत्या. कोकणातील तरुण
मुले मुंबईत रहायला आल्यावर त्यांच्या जेवणाची सोय या आजी करायच्या, तेही कुठलेही
शुल्क न घेता. या मुलांना नोकरी लागली,
त्यांची आर्थिक गाडी रुळावर आली, की मग आजींना डब्याचे पैसे मिळायचे. या कुटुंबाची आर्थिक स्थिती उत्तम, नातेवाईकांना 10 वी पर्यंत मुलांनी शिक्षण घेतलं
म्हणजे खूप झालं, असं वाटायचं. त्यानंतर
मुलींनी नर्सिंगच्या कोर्सला प्रवेश घेतला, की पुढचा मार्ग सुकर, असं त्याचं मत
होतं. पण जयश्री यांच्या आजी कायम
नातवंडांनी भरपूर शिकावं म्हणून प्रयत्नशील होत्या. त्यामुळेच आई, शुभलक्ष्मी पडवळ यांनी आपल्या
मुलांना पाचवीपासून ठाण्याच्या प्रसिद्ध श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलमध्ये
दाखल केलं. जयश्री यांच्या व्यक्तिमत्वाला
घडवण्यात या शाळेचा मोठा वाटा आहे. शाळेत
जयश्री यांचा अन्य विषयांसोबत चित्रकला हा विषय आवडता. दहावीनंतर जे. जे स्कूल ऑफ आर्टसमध्ये
प्रवेश घेण्याचा त्यांचा मानस होता. मात्र
वडीलांची आपल्या मुलीला सीए करण्याची ईच्छा होती.
वडीलांनी या क्षेत्राची सर्व माहिती दिल्यावर जयश्री यांनी सीए करणार, हे
पक्क केलं. मग जयश्री यांनी
दहावीनंतर वाणिज्यशाखेत प्रवेश घेतला.
बीकॉम झाले. सीएचा अभ्यास सुरु
असतांना त्या ठाण्याच्या एका सीए फर्ममध्ये आर्टीकलशीप करु लागल्या. येथेच त्यांचा उदय कर्वे यांच्याबरोबर परिचय
झाला. या परिचयाचे रुपातंर मैत्रीमध्ये
झाले. आणि नंतर लग्नात. 1986 मध्ये ठाण्याच्या जयश्री पडवळ या सौ. जयश्री
उदय कर्वे म्हणून डोंबिवलीमध्ये दाखल झाल्या.
डोंबिवलीमध्ये कर्वे कुटुंब हे प्रतिष्ठित. सासरे मधुसुदन कर्वे आणि सासूबाई
मनिषा कर्वे. सासरे मधुसुदन हे भाऊ नावानं परिचित होते. त्याकाळी ते बुद्धिबळाचे राज्य पातळीवरचे चॅम्पियन होते. जयश्री यांच्या सासरचे वातावरण शिक्षणाला पोषक होते. सासूबाईंची तब्बेत काहीशी अस्वस्थ असायची, पण त्यांनी कधीही जयश्री यांच्या शिक्षणाला आडकाठी केली नाही. लग्न झाल्यावर त्यांनी एलएलबी पदवी प्राप्त केली. ही बातमी ऐकून त्यांच्या सासूबाईंनी त्यांना स्वतःच्या सोन्याच्या कुड्या काढून दिल्या. एमकॉमही झाले. या सर्वात जयश्री यांची संसाराचीही लगबग होतीच. माहेरी असतांना स्वयंपाकघराचा कुठलाही अनुभव त्यांनी घेतला नव्हता. त्यामुळे सासरी आल्यावर अगदी भाजी कापण्यापासून सुरुवात करावी लागली. यासाठी त्यांची नणंद कायम मदतीसाठी पुढे असायची. सासूबाईंच्या हाताखाली स्वयंपाकाचे धडे गिरवतांना त्यांची कायम शाबासकी मिळायची. सासूबाई या सुनेच्या शिक्षणावर आणि तिच्या कामातील टापटीपणावर कायम खुश असायच्या. या सर्वात जयश्री यांनी सीएच्या परीक्षेची तयारी सुरु केली. यात त्यांच्या सास-यांचा, मधुसुदन कर्वे यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या सुनेच्या अभ्यासात कुठलाही व्यत्यय नको, म्हणून त्यांनी दीड महिन्यासाठी घरची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. सुनेवर जेवणाची जबाबदारी नको, म्हणून जेवण करण्यासाठी एका मावशींना नेमलं. कुटुंबाच्या सहकार्यामुळे जयश्री कर्वे यांच्यापुढे सीए ही पदवी लागली. तेव्हा सर्वात जास्त आनंद सास-यांना झाला होता.
1993 मध्ये बाबरी मशिद पाडली आणि लालकृष्ण अडवाणी यांना अटक झाली. या अटकेच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. या घटनेनं जयश्री कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाला वेगळी ओळख मिळाली. डोंबिवलीमध्येही मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाचा एक भाग म्हणून त्यांनी रेलरोको आंदोलनात भाग घेतला. त्यांना अटक झाली. पोलीस कोठडीत रवानगी झाली. मग कोर्टात हजेरी लावावी लागली. हा सगळा अनुभव खूप मोठा होता. यात समाजात कसे वागायचे, याची शिकवण त्यांना मिळाली. शिवाय त्यांच्यामध्ये दडलेल्या उत्तम कार्यकर्तीची ओळखही झाली. याच घटनेनंतर त्यांच्या सामाजिक कार्याचा पाया रचला गेला. यानंतर सुवर्णमंगल महिला सहकारी बँकेमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली.
महिलांसाठी असलेल्या या बॅंकेत सीए जयश्री या तब्बल पंधरा वर्षे संचालक म्हणून होत्या आणि सहा वर्ष अध्यक्ष. या काळात त्यांचा परिचय, नेत्रा फडके, ललिता छेडा, सुनिती रायकर या कतृत्ववान महिलांसोबत झाला. हा महिलांचा एक चांगला गट तयार झाला. सुवर्णमंगल महिला सहकारी बँकेच्या माध्यमातून या महिलांनी किती महिलांच्या जीवनात आनंद पेरला आहे, याची गणती नाही. अगदी रस्त्यावर भाजी विक्री करणा-या महिलांनाही या बॅंकेत खातेदार करुन घेण्यात आलं. त्यातून त्यांना बचतीचं महत्त्व सांगण्यात आलं. घरात काम करणा-या बायका, रिक्षा चालक, लघुउद्योजक असे अनेक या सुवर्णमंगल महिला सहकारी बँकेला जोडले गेले. महिलांसाठी असलेल्या या बॅंकेला फायद्यात आणण्यासाठी जयश्री कर्वे यांच्या ध्येयधोरणाचा मोठा वाटा होता. त्यांच्या सर्वसहकारी मैत्रिणींनी या बॅंकेसाठी स्वतःचे आयुष्य वाहून घेतले होते. मात्र काही वर्षांनी या बॅंकेला डोंबिवली नागरी सहकारी बॅंकेमध्ये विलिन करावे लागले. यात कुठल्याही खातेदाराचे नुकसान झाले नाही. मात्र या बॅंकेच्या उत्कर्षासाठी लढणा-या या मैत्रिणी निराश झाल्या. सुवर्णमंगल महिला सहकारी बँक, हेच त्यांचं आयुष्य होतं. आपल्या लेकरास आपल्यापासून दूर केल्यावर जशी एक आई दुखावते, तसेच या महिलांचे झाले होते. जयश्री सांगतात, की हा सर्व काळ त्यांच्यासाठी एखाद्या डिप्रेशनसारखा होता. मात्र डिप्रेशनमध्येच स्वतःची नव्यानं ओळख होते, आणि आपल्या कार्याचा विस्तार करता येतो. तसेच जयश्री आणि त्यांच्या सहकार्यांच्या बाबतीत झाले.
जयश्री कर्वे, नेत्रा फडके, ललिता छेडा, सुनिती रायकर या सर्वजणी नित्यनेमानं भेटायला लागल्या. सुवर्ण मंगल बॅंकेच्या माध्यमातून जयश्री कर्वे यांच्या कामाची पद्धत ललिता छेडा यांनी पाहिली होती. त्या जयश्री यांच्या मागे उभ्या राहिल्या. तू जे करशील ते चांगलंच असेल, पण काहीतर कर. म्हणून त्यांनी जयश्री यांना प्रोत्साहन दिले. मग समाजासाठी, विशेषतः महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, या विचारानं पछाडलेल्या या महिलांनी 2014 मध्ये डोंबिवली महिला महासंघाची मुहूर्तमेढ रोवली. महिलांच्या संरक्षण आणि विकासासाठी समर्पित अशा या संस्थेची स्थापना झाल्यावर जयश्री कर्वे यांच्या पुढाकारानं यामध्ये संयुक्त महिला मंडळ; परिवर्तन महिला संस्था; राष्ट्र सेविका समिति डोंबिवली नगर; ज्ञानदीप स्त्री जागृति मंच, डोंबिवली; रोटरी क्लब ऑफ डोंबिवली - सौदामिनी; स्वरुपिणी भगिनी मंडळ; मानिनी महिला मंडळ; पर्यावरण दक्षता मंडळ या समर्थक महिला संस्थाही सामिल झाल्या. जयश्री कर्वे या सीए आणि एलएलबीही. या त्यांच्या ज्ञानाचा फायदा डोंबिवली
महिला महासंघाच्या कार्याला झाला. ज्योतीताई पाटकर आणि विंदा भुस्कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी डोंबिवली महिला महासंघाच्या कार्याची दिशा निश्चित केली. चाईल्ड पॉलिसीचा अभ्यास केला. पॉक्सो, पॉश कायदे म्हणजे काय हे जाणून घेतले. आणि त्यातूनच डोंबिवली महिला महासंघाच्या कार्याची पायाभरणी झाली. बरं हे सगळं होत असतांना जयश्री कर्वे यांचे कार्य व्यापकपणे सुरु होते. अगदी स्वतःच्या घराचे फर्निचर डिझाईन करण्यापासून के.वि. पेंढरकर कॉलेज डोंबिवली मध्ये Bachelor of Management Studies डिपार्टमेंट साठी कॉर्डिनेटर म्हणून त्या जबाबदारी पार पाडत होत्या.
डोंबिवली महिला महासंघाची स्थापना झाली, आणि जयश्री कर्वे यांचे क्षेत्र अधिक व्यापक झाले. हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी पॉक्सो कायद्याची माहिती करुन दिली आहे. शाळांमध्ये पॉक्सो कमिटीची स्थापन करुन दिली आहे. शाळा, कॉलेज आणि इतर संस्थांमध्ये पॉश कमिटीची स्थापना करुन दिली आहे. याशिवाय बालविवाह प्रतिबंध कायद्यासोबत महिलांमध्ये कायदेविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. सरकारी योजना जनजागृतीबाबत त्या काम करतात. डोंबिवली महिला महासंघाच्या माध्यमातून त्यांनी संपर्क डायरी प्रकाशीत करुन त्यातून महिला, बालक आणि ज्येष्ठ नागरिक संबंधित कायदे, सरकारी योजना आणि सुरक्षा पुरवणाऱ्या सरकारी विभागांची माहिती दिली आहे. कोविड काळात त्यांनी जांभूळपाड्यातील पाच महाविद्यालयीन मुलींचा ऑनलाईन क्लास घेतला आहे. याशिवाय समाजात जनजागृती करण्यासाठी डोंबिवली महिला महिसंघाच्या माध्यमातून त्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करतात. अर्थात हे सर्व सोप्पं नसतं. एखादा कार्यक्रम करतांना त्यांच्या आयोजनापासून ते नियोजनापर्यंतचा व्याप खूप मोठा असतो. पण येथे जयश्री कर्वे या व्यक्तिमत्वासाठी मी परफेक्ट हे विशेषण का वापरते, याचे उत्तर मिळते. एखादा कार्यक्रम ठरला की त्याची संपूर्ण आखणी, त्या कार्यक्रमाचे स्वरुप, त्यासाठी देण्यात आलेली अन्य मैत्रिणींवरची जबाबदारी, असा बराच काही हिशोब त्यांच्याकडे असतो. कार्यक्रमाची अचूकवेळ, त्याचा अवधी याचा मिनिटा-मिनीटाचा हिशोब त्या ठेवतात. यात आपल्या उद्दीष्टापासून
कार्यक्रम दूर जात नाही ना, यासाठी कायम सजग. बरं या सर्वात आपण संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आहोत, असा तोरा कुठेही नाही. कार्यक्रमाचे बॅनर लावण्यापासून ते कार्यक्रम संपल्यावर खुर्चा आवरण्यापर्यंतच्या कार्यकर्त्याच्या भूमिकेतच त्या असतात. या सर्वांसाठी त्या आपल्या सास-यांच्या, मधुसुदन कर्वे यांच्या कायम ऋणी आहेत. सास-यांनी अनेकांना बुद्धिबळ शिकवले, आणि त्या विद्यार्थ्यांनी नंतर पुढे स्वतःचे बुद्धिबळ शिकवण्याचे क्लास चालू केले. यावरुन जयश्री यांनी सास-यांना, तुम्ही या सर्वांतून पैसे का घेत नाही, अशा प्रश्न केला होता. त्यावर मधुसुदुन कर्वे यांनी दिलेला संदेश, जयश्री यांनी कायम आपल्या सोबत ठेवला आहे. कुठलेही काम पैशाच्या अपेक्षेनं केलं, तर त्यातील सेवेचा भाव निघून जातो. सास-यांचा हा संदेश कायम जपणा-या या सुनेच्या कार्याची व्याप्ती तिच्या मेहनतीमुळे चांगलीच व्यापक झाली आहे. अगदी महाराष्ट्र राज्य महिला आयोग व महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या कार्यक्रमांना सुद्धा सीए जयश्री कर्वे यांना आमंत्रण असतं. म्हणजेच तिथपर्यंत त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.
या सर्व सामाजिक कार्याव्यतिरिक्त सीए असलेल्या जयश्री कर्वे त्यांचे पती, सीए
आणि अर्थविषयक सल्लागार उदय कर्वे यांच्यासह ASKA & CO Chartered Accountants मध्ये सीनियर पार्टनर आहेत.
सहकारी आणि सरकारी बँक ऑडिट्स मध्ये त्या स्पेशलिस्ट आहेत. कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन मध्ये
महिला कक्षाची Convenor म्हणून काम पाहिले आहे.
या सर्व व्यापक कार्यात जयश्री कर्वे यांचा खंबीरपणा कायम दिसतो. एखादे कार्य हाती घेतले की त्या ते कार्य जिददीनं पूर्ण करतात. पण महिलांच्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी धडपडणा-या या जयश्री कर्वेंसमोर कधी दुःख उभे राहिलं नाही का. अर्थात ते कोणालाही चुकत नाही. दुःख नाही, तर दुःखाचा डोंगर उभा राहिला. आपल्या जवळच्या व्यक्तिंना अगदी नको त्या वयात दूर जातांना बघावं लागलं, आणि त्या दुःखाच्या डोहात उडी माराविशी वाटली. मात्र या दुःखातूनच त्यावर कशी मात करायची याचे धडे जयश्री यांनी गिरवले. दुःख, ही घटना समजायची, त्याच्यावरचं दुःखाचं लेबल काढायचं आणि परिस्थिती स्विकारायची, हे सूत्र त्यांनी स्विकारलं. नेहमीच्या आनंदी चेह-यामागे हे दुःख दडपून टाकायचं आणि दुस-याच्या आनंदासाठी झटायचं. या सर्वातून परिपक्व असं व्यक्तिमत्व घडत गेलं. जयश्री सांगतात, याच सर्व अनुभवातून एकेकाळची जयश्री ज्या रस्त्यावरुन कधी चालण्याच्या विचारही करणार नाही, अशा रस्तातून आत्ताची जयश्री वाट काढत एखाद्या वस्तीपर्यंत पोहचते. तिथे उघडी गटारं असतात, कचरा असतो, दुर्गंधी असते. पण या सर्वात तिथे रहात असलेल्या महिलांना त्यांच्यासाठी असलेल्या कायद्याची जाणीव करुन देणं महत्त्वाचं असतं. समाजासाठी काहीतरी आपण देणं
लागतो, ही भावना जापोसतांना आपण सतत अभ्यास करत राहणं, अपडेट होत रहाणंही महत्त्वाचं असतं. त्याबाबतीतही जयश्री कर्वे परफेक्ट आहेत. महिलांविषयक नवीन कायदे, नियम, यांचा त्या सातत्यानं अभ्यास करत असतात. त्यांच्या या समाजसेवेसाठी आणि अभ्यासूवृत्तीसाठी त्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महिला सन्मान पुरस्कार आणि महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना आणि सह्याद्री सामाजिक संस्थे तर्फे सन्मानित करण्यात आले आहे.
एकूणच या परफेक्ट व्यक्तिमत्वाचे कतृत्व खूप मोठं आहे. आपल्या कामाचा कुठलाही गाजावाजा न करता, ते
नेटानं करणारे फार कमी असतात. या मोजक्या
मंडळींमध्ये सीए जयश्री कर्वे यांच स्थान वरंच आहे. वेळेचं व्यवस्थापन आणि अभ्यासातील सातत्य या
त्यांच्या गुणांचेही कोणी अनुकरण केले, तरी आयुष्यात शंभर टक्के यश संपादन करता येईल. येत्या 29 ऑगस्टला हेच परफेक्ट व्यक्तिमत्व
वयाच्या 64 व्या वर्षात पदार्पण करत आहे. कार्याच्या
या ज्योतीचा प्रकाश दाही दिशांमधील महिलांपर्यंत पोहचावा, हिच सदिच्छा....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
छान कार्य परीचय ! ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
ReplyDeleteमिसेस परफेक्ट वर्णन अगदी परफेक्ट केलं आहे सई तू.
ReplyDeleteखूप छान झालाय लेख..
ReplyDeleteखुप छान लेखन
ReplyDeleteपरफेक्ट परिचय !
ReplyDeleteजयश्रीचा अगदी योग्य परिचय दिलास सई! ललिता छेडा
ReplyDeleteखूप सुंदर लिहिलं आहे .
ReplyDeleteखूप सुंदर लिहिलं आहे .
ReplyDeleteएकदम परफेक्ट वर्णन मॅडमचे !!
ReplyDeleteखूप छान लेख आहे
ReplyDeleteउगवत्या भाषेत जयश्रीताईंचा खूपच छान परिचय करून दिला. जयश्री ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
ReplyDeleteसई तुला खूप खूप धन्यवाद - माझा इंटरव्यू घ्यावासा वाटला त्यासाठी😊. आणि तुझ्या छान लेखन शैलीसाठी खास कौतुक🌷🍫🤝
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete