तो देव आहे....
तो कोण आहे....अर्थात गणपती बाप्पा कोण आहे....त्याला अनंत नावं आहेत. चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या या गणरायाच्या या अनंत रुपांची रोज नव्यानं ओळख होते. तशीच ओळख मलाही झाली. गणपती बाप्पांचे आता घरोघरी आगमन झाले आहे. दरवर्षी या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आमची एक फेरी होते. गेल्या अनेक वर्षाचा हा शिरस्ता आहे. दरवर्षी कुठल्या बाप्पाचे पहिले दर्शन घ्यायचे, हे ठरलेले असते. त्यात काही नव्या बाप्पांची भर पडते. तशीच यावर्षी एक नवं घर आमच्या या यादीमध्ये सामील झाले. दुपारी उशीरा या काकांच्या घरी गेलो. काका-काकू दोघंही सत्तरीच्या घरातील. पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेल्यानं बाप्पा कुठे आहेत, ही चौकशी केली, तर त्यांनी एक छोटासा सजवलेला कोपरा दाखवला. त्यात अगदी तळहाताएवढी बाप्पांची मूर्ती होती. अगबाई, किती छोटे बाप्पा आहेत, तुमच्याकडे. अशी माझी स्वाभाविक प्रतिक्रीया होती. यावर ते काका-काकू मनमुराद हसले, म्हणाले, आमच्याकडेही चांगले मोठे बाप्पा होते हो. पण आता त्या मोठ्या बाप्पांना उचलतांना त्रास होतो, त्यामुळे हे छोटुसे बाप्पा आणले. ब-याचवेळा आपल्या देवाच्या बाबत काही चौकनात बसतील अशा भ्रामक कल्पना असतात. माझ्याही होत्या, मी त्यांना सहजपणे विचारलं, पण अशी बाप्पांची मूर्ती छोटी करता येत नाही ना...ती मोठी करायची असते. त्यावर ते काका पुन्हा हसले, म्हणाले, अग तो देव आहे....देव...आपल्यापासून खूप मोठा, वेगळा, आणि समजुतदार. त्याला सर्व माहित असतं, सर्व दिसतं. म्हणून आपण त्याला मखरात बसवतो ना...काकांच्या या प्रश्नानं मी निरुत्तर झाले. पुढचा अर्धा पाऊण तास बाप्पांचा होता....
गणपती बाप्पांच्या निमित्तानं तरी यावर्षी घरी ये, असं आग्रहाचं आमंत्रण सुधा काकांनी दिलं. गेली काही वर्ष सुधा काका आणि त्यांची पत्नी निर्मला यांना मी ओळखत आहे. लेक शाळेत जायचा तेव्हा आमच्या सकाळच्या वॉकींग पॉईंटमध्ये त्यांची ओळख झालेली. नंतर काका-काकू कुठेही भेटले तरी अर्धातास गप्पा ठरलेल्या. यातूनच ओळख अधिक दृढ झाली. तेव्हा काकूंची मुलं महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. नंतर त्यांचे शिक्षण पूर्ण झाले, नोकरी लागली. लग्न झाली. दोघंही मुलं सध्या परदेशात आहेत. या सर्वात आमची ओळख झाल्यावर त्यांच्या घरी एक-दोन वेळा जाणं झालं. तेही आमच्या घरी आले. पण नंतर काका-काकू फारसे दिसायचे नाहीत. मुलांसोबत रहाण्यासाठी तेही वर्षातून काही महिने परदेशात जाऊ लागले. त्यात कोरोना आला, आणि सगळचं चक्र बदललं. अचानक काही महिन्यांपूर्वी सुधा काका दिसले, आणि आम्हा दोघांनाही आनंद झाला. काका थोडे थकले होते, पण तसेच उत्साही होते. काही महिने मुलाकडे राहिल्यावर ते परत आले होते. त्यानंतर कुठल्याश्या नातेवाईकांकडे रहाण्यासाठी हैद्राबादला गेले होते. तिथे दोन वर्ष राहिले. आता मात्र पुन्हा आपल्या घरी परत आले होते. काकांनी यावेळी नंबर घेतला, आणि संध्याकाळी काकूंचा फोन आला. पहिल्या वाक्यातच त्यांनी यावेळी काहीही करुन गणपतीसाठी ये, म्हणून आग्रहाचे आमंत्रण दिले.
गणपती बाप्पांचे आगमन होण्यापूर्वीही दोन वेळा काका-काकूंचा फोन आला. त्यामुळे आमच्या ठरलेल्या यादीमध्ये त्यांच्या नावापुढे स्टार जोडले आणि गणपतीच्या दिवशी दुपारी त्यांच्या घरी दाखल झालो. तिथे गेल्यावर त्यांच्या छोट्या बाप्पांबाबत मी केलेल्या प्रश्नामुळे काका त्यांचे अनुभव सांगू लागले. काका-काकूंची मुलं त्यांच्यासोबत रहात होती तेव्हा त्यांच्याकडेही बाप्पांची मूर्ती मोठी होती. मुलं सोबतीला होती, नातेवाईक, मित्रपरिवारही होता. सर्व मिळून गणपती उत्सव साजरा करायचे. पण नंतर मुलं मोठी झाली आणि नोकरीला लागली. मुलांचं लग्न झाल्यावर सुनांच्या सोबतीनं काकूंनी गणरायाचे स्वागत खूप उत्साहात केले. पाहुणे मंडळी वाढली, गोतावळा
वाढला. घर भरुन गेलं. पण मुलांनी नंतर नोकरीमुळे परदेशात जाणे पसंत केले. सुनाही सोबतीनं गेल्या. घरं खाली झालं. त्यानंतर झालेल्या गणेशोत्सवात काकांना आपण थकल्याची जाणीव झाली. मुलांनी परदेशात गणेशोत्सव साजरा करतो, असेही सांगितले. पण ते काकांना पटेना. त्यांनी मला झेपेल तोपर्यंत मी करतो, नंतर तुम्ही करा, असा शब्द मुलांना दिला. तेव्हाच काका-काकूंनी स्वतःसाठी नियम बनवून घेतले. आता आपल्याला झेपेल, एवढाच व्याप करायचा. देव आपलाच आहे, तो आपल्याला समजून घेईल, हे दोघांनीही पक्के ठरवले. त्यात बाप्पांची मूर्ती लहान करण्याबाबतही निर्णय घेतला. मुलांनी हा निर्णय ऐकल्यावर थोडी नाराजी व्यक्त केली, पुन्हा आम्ही परदेशात गणेशोत्सव साजरा करतो, तुम्ही दोघंही या, म्हणून आग्रह धरला. पण काका-काकू ठाम राहिले. पण त्या दरम्यान त्यांच्या एका बहिणीकडे त्यांना जावे लागले. हैद्राबादला रहाणार ही बहिण गंभीर आजारी पडली, आणि तिच्यासोबतीला कोणीही नसल्यामुळे काका-काकू तिथे दोन वर्ष राहिले. इथे पहिल्यांदा गणपती बाप्पांचे काय, हा प्रश्न पडला. पण जिथे आम्ही तिथे बाप्पा, म्हणत काकांनी बहिणीच्या घरी गणपती आणला. छोटी मूर्ती तिथे मिळेना, तेव्हा काकांनी चक्क युट्यूब बघून गणपती बाप्पा स्वतः तयार केले. दोन वर्ष बहिणीकडे काका राहीले, आणि तिथेच त्यांचे हे बाप्पाही आले. आता बहिणीची तब्बेत सुधारली. त्यामुळे काका, या बहिणीला घेऊन आपल्या घरी आले. आम्ही गेलो, तेव्हा त्यांची बहिण काकूंच्या हातच्या मोदकाचा स्वाद घेत होती. काका हे सर्व सांगत असतांना म्हणाली, हे बाप्पापण तुमच्या या काकांनीच केलेत. हैद्राबादमध्ये म्हणे काकांनी गणपती बाप्पा
करण्याचा एवढा सराव केला की, आजुबाजूच्या लहान मुलांकडूनही त्यांनी मूर्ती घडवून घेतल्या.
आता काका येथे परत आल्यावर त्यांनी सर्व
पाहुण्यांना आग्रहाचे आमंत्रण दिले. आमच्यासारख्याच
मित्रपरिवारालाही दिले आहे. सर्व येणा-या
पाहुण्यांची माझ्यासारखीच प्रतिक्रीया आहे.
एवढे छोटे बाप्पा...आणि सर्वांनाच काका हेच सांगत आहेत, तो देव आहे, तो
समजून घेतो, आपणही घेऊयात...बाप्पा कधीही
छोट्या किंवा मोठ्या मूर्तीमध्ये वेगळा नसतो.
तो सारखा असतो. तो फक्त आपला भाव
बघतो, आणि आपण आमचा बाप्पा किती मोठा, आमचं डेकोरेशन किती महागडं, म्हणून भाव
खातो....काकांच्या या भावपूर्ण निवेदनापुढे आम्ही मात्र नम्रभावानं हात जोडले....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
बाप्पा मोरया
ReplyDeleteखर आहे. भाव महत्त्वाचा. देव तर अणू रेणूत आहे.
ReplyDeleteजिथे भाव तिथे देव... बाप्पा मोरया 🌹
ReplyDelete🙏🏼🌺🙏🏼
ReplyDeleteअगदी खरे भाव तेथे देव.आपल्या कडे टोकाच्या भुमिका असतात परंपरा आहे आमच्या कडे असे नाही केले तर देव कोपेल म्हणून होत नसले तरी तसेच करायचा अट्टाहास नाहीतर दुसरीकडे असे की ऑफिस,काम याच्या नावाखाली टाळणे ही वृत्ती तर त्यात समतोल हवा असे मला वाटते.सई तू छान विषय घेतेस नेहमी.
ReplyDeleteअगदी खरं आहे.गणपती बाप्पा मोरया
ReplyDeleteखूप छान लेख
ReplyDeleteसध्या शो करण्यावर भर असतो. घरगुती गणेश उत्सव असला तरी..धार्मिकता कमी होत चालली आहे. गौरींना सोन्याने मढवून ते बघण्यासाठी हळदी कुंकूवाचे निमित्त करून बोलवतात.
ReplyDelete