बिस्किटांची दुनिया

 

बिस्किटांची दुनिया


कुटुंबातल्या एका छोट्याला भेटायला जायचे होते.  अशावेळी मोठा प्रश्न समोर येतो, तो म्हणजे, सोबत काय न्यावे.  माझ्यासमोर हा प्रश्न आल्यावर मी आधारासाठी लेकाला फोन केला.  अर्थात त्यानं गाड्यांची एक रेंज सांगितली, वरुन मलासुद्धा एक गाडी खरेदी करुन ठेव, म्हणून सल्ला दिला.  मी डोक्याला हात लावत त्याचा फोन बंद केला.  अशावेळी कायम नव-याचा सल्ला उपयोगी येतो, म्हणून त्याच्याकडे आशेनं बघितलं.  त्यानं अगदी मोजक्या शब्दात योग्य उत्तर दिलं.  बिस्किटं कर.  ती घेऊन जाऊयात.  झालं.  विषय संपला.  बिस्किट, हा प्रकार आमच्याकडे अगदी नेहमीचा.  दर दहा-बारा दिवसांनी वेगवेगळ्या चवीची बिस्किटं तयार होतात.  त्यामुळे वेगळं काही सामान आणावं लागेल असंही काही नव्हतं.  लगेच मोठा टोप  कपाटातून बाहेर काढला आणि तयारी सुरु केली. 


लग्न झाल्यावर आमच्यात चहा-कॉफी वरुन जसा वाद सुरु झाला, तसाच तो बिस्किटांवरुनही होऊ लागला.  नवरा यात मारीच्या सोबत तर मी पार्लेची फॅन.  मग काय तूझं तू, माझं मी...असं सुरु झालं.  त्याचा चहा त्यानं करुन घ्यावा, माझी कॉफी मी करणार.  तेव्हा रुजू झालेला नियम आज पंचवीस वर्ष होऊन गेली तरी आमच्या घरात लागू आहे, आता तर तो अंगवळणी पडलाय.  पण यात त्या बिस्किटांचं समिकरण बदललं.  या दोन्ही बिस्किटांऐवजी घरगुती बिस्किटं करायला सुरुवात केली.  अगदी सुरुवातीला थोडी गडबड झाली.  पण नंतर हात बसला.  माझ्या स्वभावाप्रमाणे मी या बिस्किटांमध्ये कितीतरी प्रयोग केले आहेत, आणि अजूनही करतेय.  तूप, साखर, गूळ हे नेहमचे जिन्नस सोडले तर बाकी सर्व जिन्नस अनेकवेळा बदलेले आहेत.  त्यांची सरमिसळ केली आहे. गव्हाचे पिठ, ज्वारी, बाजरी, नाचणीचे पिठ, तीळ, जवस, जिरं, सुंठ पावडर, कोको पावडर, कॉफी, मखाना, ओटस, सुकं खोबरं, सिडस्  असं बरचं काही या बिस्किटांमध्ये टाकून झालं आहे.  या सर्वांच्या एकमेकांबरोबर जोड्या जोडल्या आहेत, तर कधी चार-पाच जणांची भेळ केली आहे.  प्रत्येकवेळा नवरा हे छान आहे, पुढच्यावेळी अशीच कर, असा शेरा देतो, आणि पुढच्यावेळी माझा आणखी एक प्रयोग होतो. 

एवढ्या वर्षाच्या अनुभवानुसार सांगते, बिस्किट करण्यासाठी फक्त एक सूत्र परफेक्ट पाळलं तर पुढचा सगळा डोलारा व्यवस्थित सांभाळला जातो.  एक वाटी तूप आणि तेवढीच बारिक साखर घ्यायची.  अर्थात पांढ-या सारखरेऐवजी


मी ब्राऊन शुगर वापरते, किंवा कधीतरी गुळाची पावडरही.  तूप आणि साखरेचे हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं.  एवढं की अगदी डबल होईपर्यंत.  ब्राऊन शुगर वापरली असेल, तर असं फेटतांना होणा-या मिश्रणाचा रंगही बदलतो.  पांढ-या रंगाचे अगदी कापसासारखे हे मिश्रण तयार झाले की मग गॅसवर मोठा टोप तापायला ठेवायचा.  ज्यांना ओव्हन चालवता येतो, त्यांना प्रणाम.  त्यांनी त्यात बिस्किटं करावीत.  माझं आणि ओव्हनचं कधीही जमलं नाही.  पण अलिकडे एअरफ्रायचा वापर सहज होऊ लागला आहे.  पण एकदम तीस बिस्किटं त्यात होत नाहीत.  त्यासाठी मला माझा मोठा टोप सोयिस्कर वाटतो.  त्यामुळे तूप, साखर फेटून झालं की हा टोप गॅसवर गरम करण्यासाठी ठेऊन देते.  इकडे त्या मिश्रणात एक टीस्पून बेकींग पावडर आणि जायफळ किंवा वेलचीची पूड घालायची.  मग आपल्याला ज्याची बिस्किटं करायची आहेत, ते जन्नास घालायचे.  शक्यतो मी एक कप तरी खपली गव्हाचे पिठ वापरतेच.  खपली गव्हाची बिस्किटं ही अधिक खुसखुशीत होतात, हा माझा अनुभव आहे.  त्या जोडीला, सुकं खोबरं, ओटस् किंवा मखान्याची अगदी बारीक पावडर असं घालायचं.  एक वाटी गव्हाचं पिठ आणि आणखी एक वाटी अन्य काही मिश्रण या पिठात सहज मावून जातं.  हे सर्व चांगलं मळतांना नेहमीचा चपातीचा गोळा असतो, तसाच एक गोळा तयार करायचाय, हे ध्यानात ठेवायचं.  त्यानुसार त्यातील जिन्नस कमी जास्त करता येतात.  हा गोळा चांगला तयार झाला की मग एका ताटात बिस्किटं करायला घ्यायची.  हा सर्व प्रकार एवढा परफेक्ट असतो की, या मी एवढ्या वर्षात ज्याच्यावर बिस्किटं शेकायला ठेवते, त्या ताटाला तूप किंवा तेल यापैकी काहीही लावत नाही.  अगदी छोटे गोळे करायचे आणि हाताच्या तळव्याच्या मधोमध ठेऊन त्यावर थोडासा दाब द्यायचा.  माझ्या नेहमीच्या प्रमाणात अशी पंचवीस ते सव्वीस बिस्किटं तयार होतात.  थोडी लहान केली तर तीसही होतात.  बिस्किटांनी ताट सजलं की मग त्या गरम करायला ठेवलेल्या टोपावरचं झाकण हळूवर काढायचं.  त्यात एक रिंग ठेऊन द्यायची आणि त्याच्यावर आपलं बिस्किटांचं ताट.  झालं.  पुढच्या अर्धा तासांनी त्या बिस्किटांचा घमघमाटच सांगतो, आम्ही तयार आहोत.  अगदी खात्री करायची असेल तर सुरीच्या टोकांनी एखादं बिस्किट हलकेच वर करायचं.  त्याची खालची बाजू खरपूस भाजली असली की बिस्कीट तयार.  हे बिस्किटांचं ताट अगदी गार झालं की ती आपोआप त्या ताटापासून सुटतात.  मग एखादं तोंडात टाकून बाकीची नेहमीच्या बरणीत भरली की संध्याकाळच्या चहा-

कॉफीची रंगत अधिक वाढते. 

या बिस्किटांमध्ये मी अनेक प्रयोग केले आहेत, ते आमच्याकडे आलेल्या डायट या शब्दामुळे.  सुरुवातीला अगदी साधी गव्हाच्या पिठाची बिस्किटं तयार व्हायची.  मग त्यात गव्हाच्या पिठाबरोबर मखाना आणि ओटसचे पिठ जाऊ लागले.  कधी ड्रायफूटचा वापर केला.  थंडीच्या दिवसात सुंठ आणि खोब-याच्या बिस्किटांचा प्रयोग करते.  कधीतरी नाचणी, कोको पावडरची जोडी जमवते.  मध्यंतरी लेकाला बिस्किटं पाठवली तेव्हा,  गव्हाच्या सोबत फक्त ड्रायफ्रूटची पावडर घातली होती.  जोडीला त्याला आवडतं असलेल्या जायफळाची पूड वापरली.  एकूण काय, आमच्या घरात सुरुवातीला बिस्किटांचे पुडे हौशीनं यायचे.  आता ही खरेदी बंद झाली आहे.   डिमार्ट किंवा अन्य ठिकाणी घराचे किराणा सामान खरेदी करायला गेल्यावर कधीतरी नवरा उगाच कळ काढायची म्हणून विचारतो, बिस्किट घेऊया, यावर सूट आहे.  अर्थात तेव्हा मी ते बिस्किटांचे पुडे नक्की हाताळते.  त्याच्या मागे जो  लहान अक्षरात लिहिलेला मजकूर असते, तो वाचण्याचा प्रयत्न करते.  त्यात काय नवीन जिन्नस घातले आहेत, याची माहिती करुन घेते.  ते पाहून मग नवरा मान डोलावतो,  कारण माझ्या नवीन प्रयोगाची सुरुवात झाली आहे, याची जाणीव त्याला झालेली असते. 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

 

Comments

  1. किती सुगरण आहेस सई तू.
    दर वेळेला वेगवेगळे प्रयोग.
    कोरोना काळामध्ये मी असंख्य प्रयोग केले त्यात हा बिस्किटांचाही प्रयोग होता सुंदर जमली पण.
    नंतर कंटाळा यायला लागला.
    तुला कंटाळा कसा तो माहितीच नाही .
    तुझ्याकडं शिकण्याचा गुण आहे हा

    ReplyDelete
  2. देखणी ,दिसायला आकर्षक आणि तब्बेतीसाठी चांगली असलेली बिस्किटांची मांदीयाळी छान वाटली.सोबत प्रेमाच्या ओलाव्याने खूष करणारी ही बिस्किटे सर्वांच्याच आवडीची न होतील तरच नवल .लेख वाचून खूप आनंद झाला.जे करेन ते एक नंबरच करणार हे तुमचे ठाम मत आहे वाटते.तुमच्याकडून प्रेरणादायी लेखना सोबतच अनोखे पदार्थांची रेसीपीही छानच असते.तुमच्यातील सुगरणीला खूप शुभेच्छा !

    ReplyDelete
  3. Khup chhan lekh

    ReplyDelete

Post a Comment