आणखी एक पायरी
राहूदे...एवढं काय त्यात...पुढचे दोन तास हे टेबल आपल्या नावावर आहे. तुला पाहिजे तसं जेव...अगदी आरामात...शेजारी बसलेल्या लेकाच्या या चार वाक्यांनी मला केवढा धीर मिळाला हे सांगू शकत नाही. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर मी नेमका त्या मसाला पापडाचा घास घ्यायला आणि तो खाली पडायला एकच वेळ झाली. पापडाचे बारीक तुकडे आणि त्याच्यावर टाकलेली शेव,कांदा सगळीकडे पसरलं. मला कमालीचा संकोच वाटला. पण ते बघून लेकानं ही आधाराची चार वाक्य पुढे केली. त्याचे बोल ऐकल्यावर क्षणभर डोळ्यात पाणी आलं. एक-एक पायरी चढणा-या लेकाचं कौतुक वाटलं. कधीकाळी त्याला आम्ही घेऊन हॉटेलमध्ये जात होतो, तेव्हाचा सीन आठवला. तेव्हा असं काही त्याच्याकडून पडलं की, नीट खा बाळा, हे पहिलं वाक्य असायचं. आता सीन उलटा झाला आहे. आता तो आईच्या भूमिकेत जातोय आणि मी त्याच्या भूमिकेत येतेय. या परिवर्तनाच्या काळात आपलं लेकरु आपल्यापेक्षा अधिक समजूतदार आहे, ही भावना मात्र सुखावून जातेय.
गेली चार वर्ष तो गणपतीबाप्पांच्या स्वागताला नव्हता. त्यामुळे यावेळीही गणरायाचे स्वागत आणि पूजाअर्चा त्याच्या आठवणीत करावी लागणार हे जाणून मी तयारीला लागले होते. पण अचानक त्याचा फोन आला, माझी सुट्टी मॅनेज होतेय. मी येतोय. बस्स एवढाच संवाद. मग मी कशाला धीर धरतेय, पुन्हा त्याला फोन लावला. कधी येतोस, किती दिवस रहाशील, कसा येणार वगैरे वगैरे प्रश्नांच्या फैरी सुरु झाल्या. पण तो कमालीचा शांत...किंबहुना माझ्या या फैरींची त्याला प्रतीक्षा असावी. पुन्हा तेवढाच संवाद. आता कामात आहे, रात्री फोन करतो. फोन बंद. पण माझी इकडे यादीची सुरुवातही झाली. लेक येणार. त्याच्या आवडीच्या पदार्थांची यादी, त्याला काय घेऊन द्यायचे, ही वेगळी यादी. दहा महिन्यांनी येणा-या लेकासाठी काय करु आणि काय नको. त्याचा पुन्हा फोन येईपर्यंत थालीपीठाची भाजणी भाजूनही घेतली. रात्री सावकाश त्याचा फोन आला. आता सविस्तर संवाद. गणपतीच्या पहिल्याच दिवशी येणार. तेही मध्यरात्री. आल्याचा पहिला दिवस वर्क फ्रॉम होम, नंतरचा दिवस मामाकडे गणपती बाप्पाचे दर्शन, त्यानंतरचा दिवस मित्रांचे गणपती बाप्पा. चौथा दिवस आरामाचा. पाचव्या दिवशी निघणार. बस्स. पाच दिवस. ते तर असे बघता बघता जाणार. मग पुन्हा माझ्या प्रश्नांच्या फैरी. पण या सर्वातून मार्ग काढत त्यानं त्याची यादी पुढे केली. पाच दिवसांचा सर्व मेनू त्यात होता. अगदी खिचडीपासून ते पुरणपोळीपर्यंत. मग काय पडत्या फळाची आज्ञा.
आमची गाडी ठरलेल्या वेळेप्रमाणे दाखल झाली आणि माझी कळी खुलली. मध्यरात्री बरोबर अडीच वाजता लेक आला आणि माझा
आनंदाचा दिवस सुरु झाला. गेल्या पाच
वर्षापासून तो कुटुंबापासून वेगळा रहात आहे.
शिक्षणाच्या निमित्तानं आलेला हा दुरावा आता नोकरीच्या कारणानं वाढलाय. पण त्यातही त्याचं मोठं होणं हा आमच्यासाठी कौतुकाचा
विषय ठरला आहे. लेकरांच्या आयुष्यातला
प्रत्येक टप्पा त्यांच्या आईसमोर उभा असतो.
त्यासाठी कुठल्याही फ्लॅशबॅकची गरज लागत नाही. तसाच टप्पा माझ्याही समोर उभा आहे. अगदी साधे कांदा बटाटे आणण्यासाठी घरासमोरच्या
दुकानातही मी याला कधी पाठवलं नाही, असं एकेकाळी मी अभिमानानं सांगायची. आता त्याच लेकानं बाहेर कपड्यांच्या इस्त्रीचे पैसे
फार घेतात, म्हणून स्वतः इस्त्री करायला सुरुवात केली, तेव्हाच त्याच्यातील बदल
समोर आला. आता एवढ्या महिन्यानंतर आलेला
लेक त्याच बदलत्या टप्प्यात होता.
आता त्याच्या स्वभावात एक आगळी शिस्त येतेय. त्यात आर्थिक शिस्त
मुख्य आहेच सोबतच आहाराचीही. आल्या दिवसापासून घरच्या पदार्थांवर गाडी घसरली होती. तिथं हे सगळं मिळत नाही....हे कारण चारवेळा पुढे करुन झालं. शिवाय तिथल्या मित्रांना आपल्या चवीचे पदार्थ खायचे आहेत, त्याची यादीही सांगून झाली. अर्थात त्यानं जी यादी केली होती, ती आणि माझी यादी सारखीच होती, त्यामुळे या पाच दिवसात घरात खाद्यपदार्थांची चंगळ झाली. सर्व प्लॅन त्याचा होता. कुठे जाणार, कधी जाणार, कधी येणार हे अगदी घड्याळानुसार ठरवून आलेला. हा प्लॅन त्यानं तंतोतंत पाळला. फक्त चौथ्या दिवसाची संध्याकाळ मोकळी होती. ती त्याच्या खास प्लॅनमधील. मी जेवणाच्या तयारीला लागले तेव्हा म्हणाला, चार दिवस तुझी खूप धावपळ झालीय, आपण बाहेर जेवायला जाऊ. जाऊ या का...नाही थेट जाऊ...मी नव-याकडे बघितलं, तोही हसला, आणि तयारी सुरु झाली. इथेच जाणीव व्हायला लागली, लेकरु जबाबदार झालंय. आम्ही तयार होईपर्यंत रिक्षा बोलवून ठेवली होती. पाऊस आहे, तुला त्रास नको, हे आधाराचे वाक्य सोबतीला. जेवायला गेल्यावर तुला काय हवंय हा पहिला प्रश्न. फ्रेम तिच होती, फक्त पात्रांनी आपापली भूमिका बदलली होती. काही वर्षापूर्वी आम्ही त्याला हा प्रश्न विचारायचो, आणि त्याच्या आवडीचा मेनू घ्यायचो. आता तो, तोच प्रश्न आम्हाला विचारत होता. जेवण सावकाश झाले आणि बील समोर आले. आता पुन्हा तो मुख्य भूमिकेत आला. बिलाचा तो डबा त्यानं आपल्या हातात घेतला. त्यातली रंगीबेरंगी बडीशेप काढून माझ्या हातात दिली आणि त्यानं बिलाचा ताबा घेतला. नव-यानं ते बघून बील मागण्याचा प्रयत्न केला, पण मी देतोय, असं सांगून स्वारी बील देऊन मोकळीही झाली. आम्ही दोघांनीही एकमेकांकडे बघितले. दोघंही हसलो. त्यात तोही मोकळेपणानं सामील होतो. बाहेर धो-धो पाऊस सुरु होता. त्यानं पुन्हा फ्रेममधील जागा बदलली होती. माझा हात पकडून तो चालू लागला. सावकाश, तू कायम धडपडतेस, हे त्याचं वाक्य ऐकून मी पुन्हा त्याच्या बालपणात हरवले.
पाचव्या दिवशी आमचा लाडका बाप्पा त्याची जाण्याची तयारी करु
लागला. आता बॅग भरायलाही आईची मदत लागत
नाही. पण माझी लगबग संपत नाही. तिकीट कुठे आहे, सोबत पैसे किती आहेत, प्रवासात भूक लागली तर काय खाणार या
प्रश्नांच्या फैरी सुरु असतात. मग तो हळूच
जवळ येतो. ती व्यवस्थित भरलेली बॅग
दाखवतो. सॅकमध्ये असलेले खाऊचे पॅकेट आणि
पाण्याची बाटली दाखवतो. तिकीट आणि पैसे मोबाईलमध्ये
सेफ असल्याचे सांगतो. मग मी थोडी शांत
झाल्यासारखी होते. तो जाणार म्हणून
अस्वस्थ झालेल्या मनाची समजूत काढत असते.
निघतांना तो पुन्हा जवळ येतो, मी
ठिक आहे. काळजी करु नकोस...मी व्यवस्थित रहतोय...तू हल्ली फार काळजी करतेस....म्हणून
घट्ट मिठी मारतो...मग काय डोळ्यात गंगा-जमुना येऊ लागतात. त्यांना लपवण्याचा प्रयत्न करत त्याला निरोप
देते....आणि तो परत कधी येणार म्हणून कॅलेंडरची पानं चाळू लागते....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
मन की बात..आईही आईच असते,तिचं कोकरू मोठं झालं तरी ही...
ReplyDeleteहो ना...
Deleteखूप सुंदर लिहिता तुम्ही सई. सध्या मी पण ह्याच अनुभवातून जात आहे.
ReplyDeleteमस्त!
ReplyDeleteफारचं सुंदर लिहिलंयस सई, माझा नातू पण असाच गणपतीसाठी चार दिवस आला होता. सगळं अगदी असंच घडलं आणि मला त्याच्या फेवरिट हाॅटेलमध्ये गेल्यावर तुला काय आवडेल ते मला माहित आहे मी मागवतो असं म्हणाला. डोळे भरून आले.ललिता छेडा
ReplyDeleteलिखाण अतिशय उत्तम आहे. मनाला खूप भावल.
ReplyDeleteखूप छान लिहिले आहे.आई हि आईचं असते मुलं किती मोठी झाली तरी तिच्यासाठी लहान असतात.
ReplyDeleteसुंदर लिहिलंय !!
ReplyDeleteVery nice
ReplyDelete