ज जात्याचा....
दुपारी तीनच्या सुमारास सुनिताचा फोन आला. काय करतेस, तुझं काम चालू असेल, पण सगळं काम सोडून दे, ताबडतोब माझ्या घरी ये. येवढं बोलून बाईंनी फोन ठेऊनही दिला. काही मैत्रिणी या वा-यासारख्या असतात. हे सुनिता प्रकरणही त्यातलंच. आत्ताही ही चार वाक्य बोलली आणि फोन ठेऊन दिला. कशाला ये, काय काम आहे, किती वेळ लागेल, काहीही नाही. बरं एक फोन करुन गप्प बसेल तर ती सुनिता नाहीच. अगदी पाच मिनीटात तसाच फोन परत आला. यावेळी लगेच निघ, पाच मिनिटात माझ्या घरी पाहिजेस, अशी धमकीही होती. त्यामुळे हातातील काम बाजूला ठेवलं, आणि तिच्या घरी निघाले. आमच्या घरापासून मोजून दहा मिनिटाच्या अतंरावर तिचं घर. सुनिताच्या घरी जाईपर्यंत माझ्या मनात कोण शंका. कशाला बोलवलं असेल, काय झालं असेल, एक ना दोन. फक्त बोलतांना सुनिताचा आवाज उत्साही होता, त्यामुळे नको त्या शंका आल्या नाहीत, एवढंच. तिच्या घरी पोहचले तर अगदी बेल वाजवायची गरजही पडली नाही. लिफ्टचा आवाज ऐकून तिनं दरवाजा उघडला. मी चप्पल बाहेर काढेपर्यंत तिनं माझा हात पकडला, आणि सरळ किचनमध्ये घेऊन गेली. तिथे एक वस्तू ठेवली होती, त्याकडे हात दाखवून म्हणाली, हे बघ, काय घेतलंय ते. त्यासाठीच तुला बोलावलं. मी आश्चर्यानं त्या वस्तूकडे बघत राहिले. ते एक जाते होते. आपल्या आज्या-पणज्यांनी ज्या जात्याचा वापर केला होता, ते जाते, आता हद्दपार झालेलं. तेच जाते या सुनिताच्या किचनच्या ओट्यावर मांडून ठेवलं होतं. मी आश्चर्यानं त्याच्याकडे बघत राहिल्यावर सुनिता म्हणाली, तुला आवडलं ना. वाटलंच होतं मला, म्हणूनच तुला ताबडतोब बोलवून घेतलं. मग ती बराचवेळ त्या जात्याचं कौतुक करत होती. माझ्या मनात मात्र हजारो प्रश्नांचा गुंता सुरु झाला.
सुनिता ही माझ्या मैत्रिणींच्या परिवारातील एक हौशी मैत्रिण. कधी काय करेल याचा पत्ता नाही. तिचा लेक आणि माझा लेक एकाच वर्गातील. त्यामुळे आमची मैत्री अधिक घट्ट. आता तिचा लेकही नोकरीला लागलेला. धाकटी मुलगी कॉलेजमध्ये. नव-याचे ऑफीस. या सर्वांच्या डब्याच्या चक्रात सुनिता पार अडकलेली आहे. पहाटे पाचला तिचा दिवस सुरु होतो. तिन डबे नऊ वाजेपर्यंत होतात, आणि सर्व आपापल्या कामाला गेले की या बाईंना थोडा वेळ मिळतो. पण आता तिचीही पन्नाशी ओलांडलेली. नाही म्हणायला या धावपळीचा तिला त्रास व्हायला लागलाय. थकवा येतो. मध्यंतरी दुपारी माझ्या घरी आली होती तेव्हा याच सगळ्यांवर चर्चा झाली. घरातील सर्वांनी तिला निदान चपाती भाजीसाठी कोणी मावशी ठेऊया, म्हणून सांगून झालं होतं, पण बाई ऐकचनात. माझ्याकडे आल्यावर मी सुद्धा असाच आग्रह धरला. तेव्हा माझ्याकडे व्यायामाला वेळ नाही, या सर्वातूनच माझा व्यायाम होतो, असा तर्क मला समजावून सांगितला. पण नंतर एकदा ती आजारी पडली, आणि मग नाईलाजानं का होईना, चपाती भाजी बनवण्यासाठी घरी एक मावशींना सांगितलं आहे. त्यानंतर मी तिचा मुद्दा परत तिच्याकडे टाकला. त्या व्यायामाचं काय, थोडा तरी व्यायाम कर, म्हणून माझा आग्रह सुरु ठेवला. त्यावर सुनितांनी किती तर्क सांगितले असतील, याची यादी सांगितली तर या लेखाची सर्व जागाच भरून जाईल. असो. अर्थात तिनं माझं अजिबात ऐकलं नव्हतं. वरुन व्यायामासारखी सर्व घरकामं मी स्वतः करते,
हे ऐकवून पण दाखवलं होतं.
आता त्याच सुनितानं घरात जाते घेतलं होतं. मोबाईलवर रिल बघतांना तिला या जात्याची रिल मिळाली. कुठल्याश्या ऑनलाईन साईटवर दगडाचे जाते, वाटा वरवंटा, खलबत्ता मिळत होतं. मुलाच्या मागे लागून तिनं ही खरेदी केली. ते जाते आल्यावर बाईंनी पहिलं मला बोलवून घेतलं. हे बघ जाते घरात आलंय, आता मी दळन घरात दळेन असं म्हणतेय. तू सांगतेस तसा व्यायामही होईल. आता याला सुरु कसं करायचं हे तू सांग, अशी प्रस्तावना तिनं केली आणि मी डोक्यावर हात मारून घेतला. नंतरचा तासभर तिच्या जात्यांनी घेतला. सुनिता ओट्यावरच जाते ठेवण्यासाठी आग्रही होती. पण जात्यावरचं दळन कधीही उभ्यानं होत नाही. त्यासाठी खाली बैठकच मारावी लागते, हे पंधरा मिनिटं पटवून दिल्यावर बाई तयार झाल्या. मग फ्रिजच्या कोप-यात एक जागा केली. त्यावर त्या जात्याची स्थापना झाली. आत्ता आपण तांदूळ दळूया म्हणून सुनितानं माझ्या पुढ्यात तांदळाची पिशवी ठेवली. मी त्या जात्यासोबत आलेलं एक माहिती पुस्तक उचललं. त्यावर सगळ्या सूचना व्यवस्थित लिहिल्या होत्या. सुरुवातीला तीन वेळा तरी त्यांनी नुसतं धान्य दळण्याच्या सूचना दिल्या होत्या. शिवाय ते दळन न वापरण्याच्याही सूचना होत्या. सुनिताला त्या सूचना दाखवल्या. यावर तिनं मान डोलावली, आणि, मी तर उद्याच्या इडलीसाठी यावरच तांदळाची भरड करणार होते, असं सांगून मलाच सुरुवात करण्याची खूण केली. मी कधीकाळी आमच्या आजोळी या जात्यावर दळऩ केलेलं. आता खूप वर्षानी पुन्हा सुनितामुळे जात्यावर दळन दळत बसले होते. अर्थात सुनिताबाई हाती मोबाईल घेऊन, या सर्वाचे फोटो काढण्यात दंग झाल्या. तीनवेळा ती भरड दळून झाली. बारीक पिठ झालं. मग त्या जात्याची वरची चकती काढून ती साफ केली. खालच्या चकतीवर लागलेलं पिठ आणि भरड साफ करण्यासाठी केसांना मेहंदी लावलात तसा ब्रश घेतला. आता तू सुरुवात कर, म्हणत मी त्या जात्याची जबाबदारी तिच्याकडे सोपवली. अर्थात या सर्वात बराचवेळ होऊन गेला. चार वाजून गेले होते. अग बाई, आता तर लेक यायची वेळ झाली. परत तिचा लगेच क्लास आहे, तिला काहीतरी खायला करायला लागेल, राहूदे, मी नतंर या जात्यावर बसते, म्हणत सुनितानं
त्याला एका ओढणीनं झाकून ठेवलं.
त्या झाकलेल्या जात्याकडे बघत मी सुनिताच्या धावपळीचा विचार करत
होते. एरवीही बाई पायाला भिंगरी
बांधल्यासारखी धावपळ करत होती. या सर्व
धावपळीत तिला या जात्यावर दळायला वेळ कधी मिळणार.
आणि ती काय काय दळणार या प्रश्नांची मालिक माझ्या डोक्यात सुरु झाली
होती. जाते काही वाईट नाही. पण आताच्या धावपळीच्या काळात त्याच्यावर दळन
दळायला वेळ मिळेल का, ही शंका माझ्या मनात नक्की आली. सुनितानं कॉफी केली. आणि सोबत मला त्या साईडचा पत्ता दिला. तू पण असंच जातं घे, पाटा वरवंटा पण मिळतो, तो
पण बघ, म्हणून ती सांगू लागली. पण मी तिला
स्पष्टपणे नाहीच सांगितलं. अर्थात
जात्यावरचं दळन चांगलच. पण आत्ता तेवढा
वेळ नाही, हे मी जाणून आहे. नाही म्हणायला
माझ्याघरीही जाते आहे. मध्यंतरी
कोल्हापूरला गेले होते, तेव्हा अगदी तळहातावर मावेल एवढं मातीचं जाते घेतलं
होतं. घरच्या टिपॉयवर हेच जाते मी आता
रंगवून ठेवलं आहे. त्यामुळे मी सुनिताला
नाही सांगतांना तू मात्र चांगलं जाते वापर.
मी सुद्धा तुझ्याकडे माझं दळन आणून देते, म्हणून एक प्रस्ताव ठेऊन
आलेय, आता ती मला दळन घेऊन कधी बोलवते,
याचीच वाट बघतेय.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
.jpg)
.jpg)

.jpg)
आदरणीय सई जी साष्टांग नमस्कार
ReplyDeleteजात्याच वर्णन आपण अतिशय छान केलेले आहे.
आजही भरगड,जातं,उखळ,वराठा-पाटा,लोणी घुसळायचे भांडे ह्या जुन्या पारंपारिक गोष्टी यांचे जतन करून ठेवणारे आणि त्यांचा वापर करणारे लोक आहेत! जरी ह्या गोष्टी कालबाह्य झालेले असतील तरी आजही याचा वापर होतो आहे हे वाचुन आनंद झाला.
पूर्वीच्या काळी थोडेफार आठवते जात्यावर दळलेले पीठाच्या भाकरीची चव,वराठ्या पाटावर तयार केलेल्या मसाल्याची चव चुलीवर भाजलेली भाकर आणि भाजी याची चव ही वेगळीच होती.
जून ते सोनं.. या साहित्यातून मिळणाऱ्या सकस अन्नाची आता सर येत नाही. घरी अशी साहित्य ठेवायची नाही किंवा अडगळीत टाकायची आणि मग चुलीवरील भाकरी पिठलं अशी जाहिरात करणाऱ्या हॉटेल मध्ये जायचं असं सध्या सुरू आहे.छान मांडलय सई. अशा व्यक्तींचा उत्साह वाढवला पाहिजे.
ReplyDeleteमस्त सई
ReplyDeleteलेख वाचून मला आधी हसायला आलं. जुना जपायला पाहिजेच पण ते आधुनिकतेची सांगड घालत आपल्या वयाचा ताकदीचा विचार करत. तुझ्या या मैत्रिणीला जाते वापरण्यासाठी खूप खूप शुभेच्छा
ReplyDeleteखूप छान 👍
ReplyDeleteजाते आणि दळण दळताना सहज , उत्स्फूर्त सुचणाऱ्या ' जात्यावरच्या ओव्या ' हि एक समृध्द संस्कृती होती.परंतु आज धावपळीच्या जगात वेळ कमी आहे. तंत्रज्ञान विकसित होत आहे,आता जाते वापरणे कष्टाचे आहे.प्रत्येक गोष्टीत काळानुरूप बदल होत असतात.या बदलांना आपण सामोरे जात आहोत.
ReplyDeleteखूप छान लेख आहे.
ReplyDeleteखूप छान 👌
ReplyDeleteमस्तच
ReplyDelete