ती रोजची देवी

 

 ती रोजची देवी


नवरात्री सुरु होण्यासाठी आठ दिवस तरी होते, तेव्हाची गोष्ट.  रोज सायंकाळी आम्हा दोघांची एक फेरी ठरलेली.  किमान तासभराचा फेरफटका.  रोजचा रस्ता.  ठरलेली वेळ.  यामुळे रस्तात चार-दोन माणसं तरी ओळखीची भेटतातच.  अशीच एक फळवाली मावशी ओळखीची झाली आहे.  तिची फळांची हातगाडी आहे.  दोन दिवसाआड तिच्याकडून थोडी खरेदी आणि भरपूर गप्पा ठरलेल्या.  मात्र नवरात्र सुरु होण्याआधी आठ दिवस मावशी बैचेन दिसली.  फार गप्पा मारण्याच्या मूडमध्ये नव्हती.  आम्हीही गुमान खरेदी करून आमच्या कामाला निघालो.  परत दोन दिवसांनी ती तशीच बैचेन.  आता मला रहावेना.  काय ग, काय झालं, म्हणून तिला सहज विचारलं.  तर तिनं वर बोट दाखवलं.  आम्ही तिच्या बोटाची अँगल पकडून वर बघितलं, तर नवरात्रीची तयारी सुरु होती.  लायटिंग सुरु होती.   आमच्या वाटेवर असलेल्या मैदानात पुढचे नऊ दिवस दांडिया रंगणार होता, त्याची तयारी सुरु होती.  हा दांडियाचा कार्यक्रम सुरु झाला की, या मावशीची गाडी कुठे आत उभी करावी लागणार होती.  त्यामुळे ऐन नवरात्रात आपल्या धंद्यावर होणारा परिणाम ती मोजत होती.  नवरात्रात फळांना मागणी चांगली असते, त्यामुळे ती जस्त घ्यायची की, गाडी कुठल्यातरी कोप-यात उभी करावी लागणार म्हणून नेहमीपेक्षाही फळं कमी संपणार, यामुळे त्यांची मूळ खरेदी कमी करायची का याचा हिशोब ती करत होती, हा हिशोब वारंवार चुकत असल्यानं मावशी बैचेन झाली होती. 


नवरात्रौत्सव हा शक्तीचा उत्सव.  देवीचा उत्सव.  माझ्यामते हा महिलेच्या स्त्रीत्वाचा उत्सव असतो.  आपल्या आसपास अशा अनेक महिला असतात, ज्या स्वतःची ओळख तयार करतात.  आदर्श तयार करतात.  समाजातल्या सर्वच थरात अशा अनेक महिला आहेत.  माझ्यासाठी या महिलाही देवीच्या रुपापेक्षा कमी नाहीत.  आमच्या नेहमीच्या रस्त्यावर फळविक्रेत्या मावशी या अशा महिलांपैकी एक आहेत.  मी जवळपास पंधरा वर्ष त्यांना ओळखते.  सुरुवातीला एका कोप-यात टोपलीत फळं घेऊन त्या विक्री करायच्या.  नंतर या मावशीनं हातगाडी घेतली आणि गाडीवरुन आता त्या फळांची विक्री करतात.  या त्यांच्या छोट्याश्या व्यवसायातून त्यांनी त्यांच्या दोन मुलींचे शिक्षण पूर्ण केले आणि लग्नही लावून दिले आहे.  दोन्ही मुलींपैकी मोठी मुलगी संभाजीनगरला तर धाकटी मुलगी पुण्यात असते.  मावशी फार अभिमानानं या मुलींच्या संसाराच्या गोष्टी सांगतात.  दोन्हीही मुली आईला आता ही फळांची गाडी बंद कर म्हणून सांगतात.  दिवसभर मावशी उभ्या असतात.  दुपारी दोन ते चार गाडी बंद असते.  पुन्हा सायंकाळी चार ते रात्री आठ-साडेआठपर्यंत त्या उभ्या असतात.  ब-याचवेळा पाय दुखतात, सुजतात पण या सर्व शारीरिक दुखण्यावर मात करुन मावशी कणखर झाल्या आहेत.  फक्त शारीरिक नाही, तर मानसिक त्रासही बराच असतो,  रोज फळे आणण्यासाठी मोठ्या बाजारात भल्या सकाळी जावे लागते.  काही वेळा सगळी फळं संपतात, तर काहीवेळा ती तशीच पडून रहातात.  फायदा आणि नुकसान या दोन्ही गोष्टी सहन कराव्या लागतात.  मावशींचे पती वायरमनचे काम करतात.  सायंकाळी ते सातच्या सुमारास घरी येतात.  आपली बॅग घरी ठेवली की थोडं फ्रेश होऊन मग ते मावशींच्या गाडीवर हजर होतात.  त्यानंतर मावशींची सुट्टी होते, त्या घरी जाऊन स्वयंपाक करतात. 

बरं या स्वयंपाकाचीही त-हा न्यारी असते.  मावशी अनेकवेळा ही गोष्ट




कौतुकानं सांगातात, आणि मी त्यांना किती करता म्हणून ओरडते.  सकाळी नाष्टा आणि जेवण हे एकच असते.  भाकरी आणि भाजी.  मात्र रात्रीचे जेवण साग्रसंगीत असते.  डाळ-भात, दोन भाज्या, चपात्या, कोशिंबीर आणि गोडाचा पदार्थ.  रात्री साडेआठला घरी गेल्यावर दिवसभर फळविक्रीसाठी गाडीवर उभ्या असलेल्या मावशी हे सर्व स्वतः तयार करतात.  रात्री दहाच्या सुमारास गाडी आवरुन काका घरी येतात, आणि मग हे दोघंही नवराबायको सावकाश जेवणाचा आस्वाद घेतात.  मावशींना या त्यांच्या सवयीवरुन त्यांच्या लेकी आणि आता मी सुद्धा ब-याचवेळा ओरडते.  सकाळी थोडी जास्तीची भाजी करुन ठेवा, तीच रात्रीच्या जेवणात घ्या.  गोडाचा पदार्थ बाहेरुन विकत न्या.  तेवढाच आराम.  झालचं तर दुपारी घरी असतांनाच रात्रीच्या जेवणाचा डाळ भाताचा कुकर लावा, तेवढा वेळ वाचेल.  पण यावर मावशींचं उत्तर एकच, आपण हे सर्व कशासाठी करतो.  पोटासाठीच ना.  मग त्याला जसं हवं तसं करायचं.  दगदग होते, मान्य आहे, पण त्याला पर्याय नाही, हे माहित आहे, मग कशाला उगा रडत बसायचं, हे मावशीचं तत्वज्ञान.  त्यामुळेच कितीही कष्ट करणारी ही माऊली सदैव हसत असते.  पण याच हसतमुख माऊलींना ऐन नवरात्रीच्या दिवसांमध्ये मलूल झालेली बघितली आणि माझ्या जीवत कालवाकालव झाली. 


नवरात्रीमध्ये त्यांची फळाची गाडी आहे, त्याच्या जवळच मैदानावर दांडिया असल्यानं सायंकाळी पाच वाजल्यापासून हा भाग जणू पोलीसांच्या ताब्यात जातो.  सकाळी गाडी नेहमीच्या ठिकाणी उभी असते.  पण संध्याकाळी गाडी अगदी आडभागात उभी करावी लागते.  रस्त्यावर नवारात्रीनिमित्त सर्वत्र दिव्यांची रोषणाई आहे.  मात्र मावशींची फळांची गाडी सायंकाळी जिथे उभी रहाते तिथे काळोख आहे.  एरवी रोज ऑफीसहून घरी पतरणारे अनेकजण मावशींच्या या फळांच्या गाडीवरुन खरेदी करतात.  मात्र आता गाडी आत उभी केल्यामुळे ही रोजची गि-हाईकं दूर झाली आहेत.  नवरात्रीसाठी रोषणाई सुरु झाली, तेव्हापासून मावशींनी त्यांच्या रोजच्या गि-हाईकांना गाडी कुठल्या कोप-यात उभी रहाणार हे सांगायला सुरुवात केली होती, मात्र तिथे काळोख असल्यानं हे नेहमीचे गि-हाईक तुटण्याची भीती मावशीला आहे.  या सर्वात मी तिला नऊ दिवस आराम करा, लेकींकडे जाऊन या, असा सल्ला दिला.  अर्थात सल्ला देणं सोप्प असतं, पण प्रत्येकाच्या खिशाचा आकार त्यालाच माहित असतो.  मावशी माझ्या या सल्ल्यावर हसल्या.  म्हणाल्या, आराम वाटतो करावासा.  लेकींना, नातवांना भेटायला जावसंही वाटतं.  पण जातांना चार गोष्टी घेऊन जाव्या लागतात.  प्रवासाचा खर्च आहे.  शिवाय पंधरा दिवसांनी दिवाळी येईल, मग ती मंडळी घरी येतील, तेव्हाच काय...ताई...काही खरं नसतं ग...आपण उभं तर जग उभं...मावशीच्या या वाक्यावर मी हात जोडले. आता मंडपात बसलेली देवी सायंकाळ झाली की दिव्यांच्या रोषणाईमध्ये न्हाऊन निघते, आणि आमची रोजची ही फळवाली मावशी सायंकाळ झाली की या दिव्यांच्या आड झाकली जातेय. 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. Jay Mataji ❤️🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. खर आहे सणांच्या झगमगाटात अनेक छोटे कोपरे अंधारातच राहतात.

    ReplyDelete
  3. अनेक दुर्लक्षित महिला असतात ज्यांना प्रसिद्धी कधीच मिळत नाही आपण यानिमित्ताने त्यांना नक्कीच प्रसिद्धी देऊ शकतो.

    ReplyDelete
  4. खूप छान लिहिले आहे.

    ReplyDelete
  5. खूपच छान, एका स्त्री ची दुसऱ्या स्त्री साठी असलेली काळजी 🙏फार कमी पाहायला मिळते.

    ReplyDelete
  6. अगदी खरं आहे.खूप छान लिहिले आहे

    ReplyDelete
  7. मला तर अशा लोकांशी बोलायला आवडत. ढीगभर philosophy ची पुस्तके वाचून जे मिळणार नाही ते यांच्या बोलण्यातून कळते.कठीण परिस्थितीशी दोन हात करून अनुभवातून मिळालेले शहाणपण असते.

    ReplyDelete

Post a Comment