आजीच्या बटव्याला रिलचे चॅलेंज

 

आजीच्या बटव्याला रिलचे चॅलेंज


सकाळची आवराआवर करत असतानाच सविताचा फोन आला.  जरावेळासाठी घरी येऊन जा.  लगेच का,  हा माझा प्रश्न.  तेव्हा फक्त हो, म्हणत तिनं फोन ठेवला.  सविता, ही माझी मैत्रिण दोन महिन्यापूर्वी आजी झालीय.  घरात नात आलीय.  सविता आता पूर्णपणे त्या नातीमध्ये असते.  अधीमधी सुनेला काय करुन देऊ, म्हणून तिचे फोन असतात.  सुनेला सातवा महिना लागला तेव्हापासून बाई कामाला लागल्या होत्या.  सुनेची खोली चारवेळा तरी साफ करुन घेतली होती.  कितीतरी दुपटी तयार करुन घेतली.  बाळंतपणीला योग्यवेळी जेवण देणे गरजेचे असते, म्हणून हयगय नको, म्हणून मदतीला एका मावशींनाही ठेवलं होतं.  मध्येच काही लागलं तर सविता हक्कानं फोन करायची.  तेव्हा ती भरभरून बोलायची.  त्यात त्या दोन महिन्याच्या छकुलीच्या कौतुकाचा भाग अधिक असायचा.  पण आता आलेला फोन वेगळा होता,  अगदी मोजक्या शब्दांचा.  त्यामुळे या शब्दांची उकल करण्यासाठी मी फोन नंतर अवघ्या काही मिनिटात तिच्या घरी दाखल झाले. 


सविताची सून पूर्णिमा.  तिच्या माहेरचं घर लहान आहे, त्यामुळे पूर्णिमानं बाळतंपण सासरी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सविता काय खूष झाली होती.  फोनबिनच्या फंदात न पडता तिनं थेट घर गाठलं.  कायकाय करायला लागेल, यासाठी तिनं एक वहीच तयार केली होती.  बाळंतिणीला काय खाऊ देतात, याची ती लिस्ट तयार करत होती.  तिला माहित असलेल्या सर्व पदार्थांची तिनं त्यात नावं लिहून ठेवली होती.  शिवाय पूर्णिमाच्या आईलाही विचारुन घेतलं होतं.  त्यानुसार सर्व सामान आधीच भरुन ठेवलं.  झालच तर बाळ आणि बाळंतिणीसाठी खास तेलही तिनं बनवून घेतलं.  दोघांच्याही मॉलिशसाठी एका मावशींना सांगून ठेवलं.  पूर्णिमाचे डोहाळजेवण झालं आणि तिनं तिच्या कामाच्या ठिकाणी रजा टाकली.  तेव्हापासून दोघी सासू-सूना सकाळी आणि सायंकाळी नित्यनेमानं चालायला जात असत.  पूर्णिमानं जरा काही खायची इच्छा व्यक्त करायची, सविता लगेच तो पदार्थ बनवून तिच्यासमोर हजर करणार.  दोन महिन्यापूर्वी जेव्हा पूर्णिमाला कळा सुरु झाल्या, तेव्हा या सविताची खरी परीक्षा सुरु झाली.  पण तिनं आधी केलेल्या नियोजनामुळे सर्वकाही सुरळीत पार पडलं.  नात घरी आल्यावर महिनाभर तिनं पूर्णिमाला उठूही दिलं नव्हतं. 

बारशासाठी पूर्णिमाची आई भेटली, तेव्हा ती सविताचं खूप कौतुक करत होती.  एवढं मी सुद्धा माझ्या मुलीचं केलं नसतं, असं प्रशस्तीपत्रक तिनं दिलं तेव्हा पूर्णिमा सासूच्या गळ्यात पडली होती.  पण तिच सासू सुनेची जोडी मी घरी गेले तेव्हा दुरावल्यासारखी झाली होती.  काय झालं हे मला कळत नव्हतं.  मी गेले तेव्हा त्या मालिशवाल्या मावशी एका कोप-यात बसल्या होत्या.  सविता आणि पूर्णिमा दोघीही शांतपणे त्यांच्या समोर बसल्या होत्या.  त्यांच्या चेह-यावरुन काहीतरी बिनसलं आहे, याची कल्पना येत


होती.  मालिशवाल्या मावशी माझ्या ओळखीने सविताकडे गेल्या होत्या.  त्यामुळे त्या पहिल्या बोलायला लागल्या. हे बघा ताई, या फार कटकट करतात, म्हणून तिनं या दोघी बसल्या होत्या, तिथं बोट दाखवलं.  मी सविताकडे बघितलं, तेव्हा तिनं मी नाही, पूर्णिमा, असं सांगून पूर्णिमाकडे बोट दाखवलं.  मी पूर्णिमाकडे बघत, त्या मावशीला विचारलं ही कटकट करते.  कशाला.  त्यावर त्या मावशींनी मोठी यादीच सांगितली.  बाळाला मालिश करतांना आणि आंघोळ घालतांना पूर्णिमा पहिला महिना काही सूचना देत नव्हती.  पण आता ती त्या मावशी आल्या, की लगेच तिच्या सूचना चालू होतात.  बाळाला, किती तेल लावायचे,  ते त्या आधी किती गरम करुन घ्यायचे, बाळाला कसे मालिश करायचे, किती वेळ त्याला आंघोळ घालायची, कशी घालायची, झालंच तर आंघोळ घातल्यावर बाळाला कसे गुंडाळायचे, आदी बारीक सारीक सूचना पूर्णिमा त्या मावशींना देऊ लागली होती.  सुरुवातीला तिच्या या सूचनांचे सवितालाही खूप कौतुक वाटायचे.  आई झाल्यावर बदललेली पूर्णिमा म्हणून तिनं तिचं कौतुक केलं.  पण नंतर या सूचना वाढू लागल्यावर तिनंही तिला मावशी चांगल्या अनुभवी आहेत, तू फार काळजी करतेस म्हणून समजावून सांगितलं.  पण पूर्णिमा ऐकेना.  तेव्हा तिचे आणि त्या मावशींचे चक्के खटके उडायला लागले.  हा वाद एवढा वाढला की, त्या मावशींनी आता पूर्णिमाला तूच घाल बाळाला आंघोळ, आणि मला शिकव कशी घालतात ते, असं सांगून त्या छोटीला आंघोळ घालायला नकार दिला होता.  मग पूर्णिमा सासूच्या आश्रयाला गेली.  तेव्हा सवितानेही त्या मावशींची बाजू घेतली.  तू नको त्या बाबीत लक्ष नको घालूस म्हणून तिनं पूर्णिमाला सांगितलं.  तेव्हा ती माझी मुलगी आहे, मला तिची काळजी आहे, सांगून पूर्णिमा रुसून बसली. 

मी हे सर्व रामायण ऐकल्यावर पहिल्यांदा डोक्याला हात लावला.  ज्या मावशी पूर्णिमाच्या बाळाला आंघोळ घालत होत्या, त्यांनी वयाची साठी पार केली होती.  वयाच्या चोविसाव्या वर्षापासून बाळ-बाळंतिणीला मालिश आणि आंघोळ घालण्याचे काम त्या करत होत्या.  त्यामुळे त्यांच्याकडे अनुभवाचे गाठोडे मोठे होते.  या कालपरवाच्या पोरीनं आम्हाला शिकवावं म्हणत


सविताच्या घरातलं काम त्यांनी आवरतं घेतलं होतं.  बाळ वर्षाचं होईपर्यंत त्याला आंघोळ घालण्याची बोली झाली होती.  पण आता दोन महिन्यात एवढी कटकट तर पुढे किती होईल, म्हणून मावशींनी काम करण्यास नकार दिला.  मावशी पूर्णिमावर खूप नाराज होत्या.  कारण बाळगुटी कशी द्यायची, त्यात काय घालायचं, कशाचे किती फेरे फिरवायचे, हेही पूर्णिमा त्यांना सांगत होती.  त्यामुळे मावशी जाम वैतागल्या होत्या.  मला म्हणाल्या, ही मला शिकवते, ते पण ते व्हिडिओ बघून.  त्या व्हिडिओतल्या मुली सांगतात, ते ही मला दाखवते, आणि असं करा म्हणून हट्ट धरुन बसते.  आता ते व्हिडिओ बघून बाळाला गुटी कुणी दिली होती का, तूच सांग.  हे सर्व प्रकार माझ्या डोक्यावरुन जात होते.  अजूनही काय चालू आहे, ते मला कळत नव्हतं.  वास्तविक पूर्णिमा ही गोड मुलगी.  पण अचानक असं काय झालं, की ती बदलली हे मला कळेना.  मी पूर्णिमाच्या बाजुला बसले.  तिला विचारलं काय झालं, तेव्हा तिनं मला काही रिल दाखवायला सुरुवात केली.  बाळाला मालिश कशी करायची यात त्यातील मुलगीवजा महिला माहिती सांगत होती.  बाळाला गुटी देऊ की देऊ नये, त्याच्या डोळ्यात काजळ घालाले का, टाळूवर तेल घालावे की नाही घालावे, बाळाला मालिश करतांना कुठलं पिठ लावावं, बाळाला धुरी द्यायची की नाही आदी सर्वावर असलेली रिल पूर्णिमानं तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह केली होती.  मावशी बाळाला आंघोळ घालायला आल्या, की ती या रिल त्यांना दाखवायची.  माझ्यासमोरही याच रिल दाखवून पूर्णिमा म्हणली, माझं काय चुकलं, मी हे बघून तर सांगतेय.  मी पून्हा एकदा डोक्यावर हात मारला.  चांगली बी. टेक इंजिनिअर असलेल्या पूर्णिमासारखी मुलगीही या रिलच्या प्रेमात वाहावत गेली तर माझ्यासारखीचं ते काय, म्हणत, मी त्या रिल करणा-या मुलीची माहिती काढायला सुरुवात केली.  या सर्वात मावशींची चुळबूळ सुरु झाली, मी काय करु ते सांगा, म्हटल्यावर मी त्यांना बाळीला आंघोळ घाला, म्हणून सविता आणि त्यांना आत पाठवून दिले. 

इकडे पूर्णिमा चुळबूळ करु लागली.  पण शांतपणे त्या रिलवालीची माहिती काढण्यास सुरुवात केली.  सोशल मिडिया जिंदाबाद.  नाव, वय, शिक्षण...आदी सर्वसर्व माहिती मिळाली.  बाई, जेमतेम बीएच्या शेवटच्या


वर्षाला पोहचल्या होत्या.  पण नंतर कंटाळा आला म्हणून चक्क कॉलेज सोडून दिले.  टाईमपास म्हणून रिल बनवायला सुरुवात केली, आणि लॉटरी लागली.  पूर्णिमासारख्या आया तिला लाईक करु लागल्या.  आता ती त्यातच पूर्णपणे बूडून गेलेली.  तिचा तो बायोटेडा मी पूर्णिमासमोर ठेवला.  तो वाचून तिही खजिल झाली बहुधा.  फार बोलण्याची गरजही आली नाही.  तिचा हात हातात धरुन मी म्टटलं, या मावशी पासष्टीला आल्यात, वयाच्या चोवीस वर्षापासून हे मालिशचं काम करत आहेत, त्यांचा अनुभव किती आहे, याचा हिशोब तूच कर.  फक्त त्यांना हे रिल बनवता येत नाही.  यातच त्या मागे आहेत, बाकी त्यांच्यासारखी प्रेमळ आणि अनुभवी मावशी मिळणं कठिण आहे.  तू तुझा निर्णय घे, शेवटी तू आई आहेस.  पूर्णिमा शांतपणे बसून राहिली.   आता आतून आवाज येत होते,  मावशी तिच्या छकुलीला आंघोळ घालत होत्या.  तिच्याबरोबर बोलत, तिला हसवत त्यांचं काम चालू होतं.  मावशींनी मग तिला स्वच्छ पुसलं, पावडर, टिक लावली आणि छानशी गुंडाळली.  ते छोटं गोड गाठोडं हं, तेल गुटी देऊ की नको, ते सांगा....म्हणत मग पूर्णिमाच्या हातात दिलं.  बिचारी पूर्णिमा...आई झाल्यावर खरंच असं मन हळवं होतं.  कधीकधी नको त्या गोष्टीचा विचार करत वाहवत जातं....तिचंही तसंच झालं होतं.  पण ते आता टाळ्यावर आलं होतं.  तिनं ते गाठोडं परत मावशींच्या हातात दिलं.  तूमचं तुम्ही बघा....असं कसंबंस बोलून तिनं अश्रूंवाटे मन मोकळं केलं.  मग काय आम्ही चार बायका मनमोकळ्या हसू चागलो...आणि तो छोटं गाठोडं, भोकाड पसरुन रडू लागलं....

 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. आजकालच्या मुली .नावं ठेवायची नाहीत म्हटलं तरी सुद्धा तोंडात शब्द येतात .त्यांना वाटतं युट्युब रील गुगल सगळं मेरे मुट्ठी में है .मला कोणाचीच गरज नाही, पण शेवटी अनुभव हा वेगळा असतो .जेव्हा त्यांना अनुभव येईल तेव्हा खरं ..
    मला तर पुढे त्यांच्या पुढच्या पिढीचा प्रश्न पडतो .त्यांची मुलं या नवीन आयांना काय म्हणतील

    ReplyDelete
  2. खूप छान

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिले आहे अनुभवा चे बोल अगदी खरं आहे.

    ReplyDelete
  4. खुप छान👍👍👌👌

    ReplyDelete
  5. सोशल मीडिया मुळे शिकलेले खुळे झाले आहेत. नेहेमी प्रमाणेच छान लिहिलंय सई

    ReplyDelete

Post a Comment