तीळ आहेत म्हणून...

 

तीळ आहेत म्हणून...


अलिबाबा आणि चाळीस चोर ही कथा माहित नाही, असा व्यक्ती सापडणार नाही.  तसेच त्या कथेतील चार जादुई शब्दही...तिळा तिळा दार उघड.  अलिबाबाला या चार जादुच्या शब्दांनी मोठा खजिना मिळतो, आणि त्याचे अवघे आयुष्यच बदलून जाते. या कथेतील अर्थ जाणण्यापेक्षा या तीळ शब्दाभोवती मी ब-याचवेळा पिंगा घातला आहे.  त्यातही थंडीचे जे चार महिने आपल्याकडे सांगितले आहेत, त्यामध्ये थंडी पडो वा न पडो, अलिबाबानं जशी तिळा तिळा दार उघड, ही साद घातली होती, तशीच साद आमच्या घरात घातली जाते.  या सर्वात संक्रातीच्या निमित्तानं होणारे तिळाचे लाडू, चटणी, तिळपोळ्या आदी पदार्थ आहेतच.  पण सोबतीला मी आणखी काही नव्या पदार्थांची भर घातली आहे.  खरंतर भारतीय स्वयंपाकघर हा आरोग्याचा खजिना आहे.  आपल्या ऋतुमानानुसार पदार्थ या स्वयंपाकघरात तयार झाले की, कुठल्याही आजाराला आपल्या घरात, कुटुंबात, प्रवेश मिळवता येणार नाही.  समजा चुकून चोरवाटेनं असा कुठलाही आजार घरात दाखल झाला तरी रोजच्या फोडणीच्या डब्यात एवढी ताकद आहे की, हा आजार सहज परतून लावता येतो.  याच फोडणीच्या डब्यातील सर्वात छोटा, वजनानं हलक असलेला तीळ हा असाच बहुगुणी आहे. फक्त त्याचा वापर व्हायला पाहिजे.


महिन्याचे सामान भरतांना, हिंग, जिरे, राई, मेथी आणि तीळ या पंचतंत्राचा पहिला नंबर माझ्या यादीमध्ये असतो.  रोजच्या भाजीची फोडणी थोडी बदलली तर त्यांची चव बदलते, आणि नेहमीच्या आहारात नविन्य रहाते.  असाच प्रयोग या तिळाच्या वापरानं करता येतो. मी बाराही महिने जेवणात तीळ वापरते.  थंडीचे चार महिने या तिळांचा मारा जोरात असतो.  पण एरवीच्या महिन्यातही अगदी चमचाभर तरी तीळ जेवणामध्ये असतात.  पांढरे आणि काळे तीळ हे सुरुवातीला मी अक्षरशः सजावटीसाठी वापरायला सुरुवात केली.  उकलडेले काबुली चणे, शिंगाडे आणि अननस यांचे एक सॅलेड मी नेहमी करते.  एरवी छोले हा प्रकार तेवढासा मला आवडत नाही, पण त्याचे ते काबुली चणे कायम आव्हान देत असतात.  हे उकडलेले काबुली चणे, त्याच्यासोबत उकडलेले शिंगाडे यांच्यासोबत अननसाचे मोठे तुकडे हलकेसे परतून मी हे सॅलेड तयार करते.  त्यात वरुन चवीला फक्त काळं मिठ आणि काळीमिरीची पावडर टाकली की या सॅलेडची चव अधिक खुलून येते.  काबुली चणे आणि शिंगाडे या दोन जड पदार्थांसोबत रसिल्या अननसाच्या फोडी हे परफेक्ट समिकरण ठरतं.  एकदा या सॅलेडवर मी सजावट म्हणून काळे तीळ भाजून टाकले.  हलके फुगलेल्या या तिळांनी हे सॅलेड दिसायला छान झाले, पण त्याचा स्वादही अधिक वाढला.  त्यानंतर पांढ-या तिळापेक्षा काळ्या रंगाचे तीळ सर्रास वापर सुरु झाला. 

आता हेच काळे तीळ कधी भाकरीवर कधी थालिपीठावर तर कधी वेगवेगळ्या पराठ्यांवर पेरायला सुरुवात केली.  यामुळे या सर्वांचं रुप बदललं. खायला त्या अधिक रुचकर लागू लागल्या.  बरं या सगळ्यात तिळाचा सढळ हातानं वापर सुरु होतो ती थंडीची चाहूल लागल्यावर.  थंडीची सुरुवात झाल्यावर डिंकाचे


लाडू होतात, पण त्यासोबत तिळाचेही लाडू, वड्या होतात.  जेवणात फार कमी प्रमाणात तेल असल्यावर शरीराला आवश्यक असा तेलाची गरज या तिळातून नैसर्गिक पद्धतीनं पूर्ण होते, असे मी मानते.  जगातल्या सर्वात सोप्या पदार्थांमध्ये एक पदार्थ म्हणजे, या तिळाच्या वड्या.  या वड्या करण्यासाठी कुठलेही प्रमाण नाही, हेच त्या वड्यांचे मोठे गमक आहेत.  मी तिळाच्या वड्यांची दोन वर्गात विभागणी केली आहे.  एक साध्या वड्या, आणि दुस-या राजसी वड्या.  साध्या वड्या म्हणजे, तीळ, गुळ, खोबरं आणि शेंगदाणे यांचा वापर होतो.  अलिकडे मी यातच मखाण्याची बारीक पावडरी करुन टाकते.  तिळाडी वडी म्हणून दोन वाट्या तीळ मंद गॅसवर भाजून घ्यायचे, तसेच एकवाटी खोबरं आणि एक वाटी शेंगदाणेही भाजून घ्यायचे.  मखाने मात्र दोन वाट्या घ्यायचे.  कारण त्यांची पावडर केली तर अगदी अर्धी वाटीही हाती लागत नाही.  बाकीचे सर्व जिन्नसही गार झाल्यावर बारीक करायचे.  हे सर्व झाल्यावर दोनवाटी चिरलेला गुळ आणि दोन मोठे चमचे तूप टाकून हलका पाक करुन घ्यायचा.  हा पाक झाल्यावर त्यात सर्व बारीक केलेले जिन्नस आणि वेलचीपावडर टाकायची.  त्यानंतर हे सर्व मिश्रण तेल लावलेल्या ताटावर थापलं, की वड्या तयार.  बरं या सर्वातील जिन्नस, याच प्रमाणात वापरायला हवेत आणि सर्वच वापरले पाहिजेच असंही नाही.  पण या सर्वांतून जी तीळ वडी तयार होते, तिची चव आणि गुण दोन्हीही भन्नाट अशीच असते.  अर्थात चव कितीही चांगली असली तरी, दिवसभरात एक किंवा दोन असं बंधन

आधीच घातलं की कुठल्याही डायटचा नियम तुटत नाही.  आता त्या राजसी वड्यांकडे वळूया.  या नावाप्रमाणे राजसी, त्या करायच्या आधी एक दिवस तयारी करावी लागते.  दूध आणि साखर आटवून ठेवायचे.  हा खवा तयार झाला की तो एक दिवस फ्रिजमध्ये ठेवायचा.  यामागचं गणित काय ते मला अद्याप कळलं नाही, पण मी जिथून या वड्या शिकले, तिथून हे असंच करा म्हणून बाजवलं होतं. दुस-या दिवशी वड्या करतांना दोन कप तीळ भाजून घ्यायचे.  सोबत थोडे काजू, बदामही भाजून घ्यायचे.  या सर्वांची बारीक पूड करायची.  मग तयार खवा काढायचा.  त्यात चमचाभर तूप टाकून पुन्हा तो गॅसवर परतायला ठेवायचा.  खवा पातळ होऊ लागला की त्यात ही बारीक केलेली पावडर आणि वेलची पूड टाकायची.  हे मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये काढायचं आणि अगदी पातळ वड्या थापायच्या.  वड्या राजसी आहेत, हे लक्षात घेतलं, की अगदी पातळ होतात, आणि दिवसाला ते एक किंवा दोनचं बंधन इथेही पाळलं की बाकी सर्व पथ्य आपोआप साधली जातात. 

या गोडाच्या पदार्थांसोबत तिळाची चटणी हा सुद्धा या या महिन्यांमध्ये होणारा हक्काचा जोड पदार्थ.  थंडीमध्ये बहुधा सर्दीचा त्रास जाणवतो.  अशावेळी तीळ, काळंमिरी आणि लसूण यांची सुकी चटणी मी तयार करते.  थंडीच्या दिवसात चमचाभर ही चटणी पुरेशी पडते.  याशिवाय सॅलेडच्या


माझ्या वेगवेगळ्या प्रकारात या तीळाच्या दुधापासून तयार होणारं पनीरही फायदेशीर ठरलं आहे.  सोयाबिन पासून तयार होणारा टोफू हा प्रचलित प्रकार.  पण डिसेंबर, जानेवारी या महिन्यात सोयाबिनसोबत तीळ आणि चार-पाच बदाम भिजायला ठेवते.  पाच तासानंतर हे मिश्रण चांगले बारीक करुन त्यातून दूध काढून घ्यायचे.  दूध वस्त्रगाळ करून कढईमध्ये तापायला ढेवायचे.  त्याला उकळी आली की त्यामध्ये लिंबू पिळायचे.  हे दूध फाटल्यावर चव आवडत असल्यास त्यात पुदिना आणि कोथिंबिरीची पानं टाकायची आणि पनीर, टोफू करतात तसे पनीर तयार करायचे.  अत्यंत पोषक असे हे तीळ पनीर नुसत्या सॅलेडसोबत खाल्लं तरी पोट भरुन जातं.  तसं पाहिलं तर तीळ केवढासा. पण त्याचे पोषक तत्व हे त्याच्या आकारापेक्षा कितीतरी अधिक आहेत.  त्यामुळेच अशा तिळाला फक्त संक्राती पुरतं मर्यादित करण्यापेक्षा वर्षाच्या आहारात सामावून घेतलं, तर आपल्या आरोग्याचा खजिनाही खुला होणार आहे. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

Comments

  1. थंडीचे आगमन झालेले आहे.तिळगुळ घ्या,गोड गोड बोला,मकरसंक्रांत सण जवळ येत आहे.म्हणुनच योग्य वेळी योग्य लेख,खुप छान,मनःपुर्वक अभिनंदन !!

    ReplyDelete
  2. मस्त! तिळाची चटणी तर भन्नाट असते 👌

    ReplyDelete
  3. मस्तच प्रकार सर्व . वड्या दरवर्षी होतातच.पण राजसी वड्या प्रथमच पाहिल्या.त्यात गुळ साखर नसते का?आणि तिळ घालून टोफू पण मस्तच.

    ReplyDelete
  4. सई तूसी ग्रेट हो..
    काय पण करतेस बाई.
    करून बघेन एकदा चटणी आणि राजसी वड्या

    ReplyDelete
  5. व्वा कित्ती सुंदर 👌🏻👌🏻शिवाय एक नवीन राजसी वड्या पण समजल्या 👍🏻👍🏻शाब्बास सई 🌹🌹

    ReplyDelete
  6. सई तुझ्या सुगरणपणाचं किती कौतुक करावं तितकं थोडं!! राजसी वड्या नक्की करून पहाणार

    ReplyDelete
  7. महेश टिल्लू30 December 2025 at 12:59

    लेखाची सुरुवात अगदी लेखाला समर्पक केली आहे, तिळगुळ आवडत नाही असा मराठी माणूस नाही.राजसी वड्या हा नवीन प्रकार समजला.आजही तिळगुळ केले की येता जाता खाणे होत असते.खूप सुंदर लेख.

    ReplyDelete

Post a Comment