नात्यातील रियालीटीला रिलचा विळखा
काय ग कशी आहेस....तू माझ्यावर रागवली आहेस का....मी किती रील टाकते....माझ्या एकाही रीलला तुझं लाईक किंवा शेअर नसतं....हे काय बरोबर नाही...आता सुद्धा एक रील करणार आहे, तू पण चल सोबत... काही नाही थोडे हात पाय हलवायचे की डान्स होतो...एका नातेवाईकांच्या लग्नात गेल्यावर एक परिचित महिला अक्षरशः अंगावर धावून आली आणि हे डायलॉग मारत माझा हात तिने गच्च धरला. क्षणभर काय चालू आहे हेच मला कळलं नाही. नंतर भानावर आले, तेव्हा तिला नको नको म्हणण्यात बराच वेळ गेला. आजूबाजूला असलेले सगळे नेमकं काय चालू आहे ते बघत होते. जिथे मलाच पूर्ण कळलं नव्हतं तिथे त्यांना काय सांगणार....अशा परिस्थितीत नवरा मदतीला धावून आला. आम्ही आत्ताच आलोय, जरा बाकीच्यांना भेटून घेतो, मग तुमच्या रील मध्ये येतो, म्हणत त्यांनी माझी सुटका केली, आणि आम्ही दोघांनीही कितीतरी मोकळा निश्वास सोडला....
सध्या लग्नाचा सिझन चालू आहे. अशाच एका लग्नामध्ये गेल्यावर, तिथे आलेल्या एका महिलेने मला सुरुवातील अक्षरशः फैलावर घेतले आणि नंतर तिच्या नृत्याच्या रीलमध्ये मला येण्याचा नकोसा आग्रह केला. कारण काय, तर ती जी रील शेअर करते त्याला मी कधीच लाईक करत नाही. अलीकडे या रील प्रकरणाचा आणि रील करणाऱ्यांचा संसर्ग एवढा वाढला आहे की, कोरोना पेक्षा हा घातक रोग आहे अशी आता माझी ठाम खात्री झाली आहे.
सोशल मीडियावरील रील आणि रियालिटी याबाबत अनेक वेळा बोललं जातं. मी यापूर्वी मला आलेल्या काही अनुभव बद्दल लिहिलं आहे. मात्र अलीकडे या रील बहाद्दरांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. महिला समानता म्हणून की काय, पण यामध्ये महिलांचे प्रमाण मोठ्याप्रमाणात आहे. लग्न समारंभात गेल्यावर माझ्यावर ज्या महिलेने झडप घातली, ती सध्या मराठी आणि हिंदी गाण्यावर रील बनवत आहे. संबंधित महिला चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे. तिला दोन मुली, एक यावर्षी दहावीला तर दुसरी आठवीला. गेल्या वर्षभरापासून हे रीलचे खुळ तिच्या डोक्यात शिरले. घरापासून रीलची सुरुवात झाली. आता या बाई कुठेही गेल्या तरी रील बनवत असतात. अगदी ऑफिसचे गार्डनही सोडलेले नाही. आता तर आपल्या दोन मुलींनाही सोबत घेऊन नृत्याचे रील करण्यात या बाई मश्गुल असतात. अलीकडे या सर्वांचा परिणाम तिच्या संसारावरही पडू लागलेला आहे. कारण प्रत्येक रीलसाठी नवे
कपडे, नव्या चपला...अगदी ज्या फिल्मी गाण्यावर नृत्य करायचे आहे त्यातील अभिनेत्रीने घातलेल्या कपड्यांसारखेच कपडे.... या सर्वांमुळे आता या महिलेच्या घरात वादविवाद सुरू झाले आहेत. या सर्वात तिच्या दोन मुली ही भरडल्या जात आहेत. रील मधून येणाऱ्या तात्पुरत्या प्रसिद्धीचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरही होऊ लागला आहे. अर्थात रीलमुळे एका कुटुंबाची होत असलेली ओढाताण आम्ही समोरून बघत होतो. ज्या महिलेने मी गेल्या गेल्या मला पकडले होते, ती आता तिच्या मुली आणि अन्य काही महिलांसोबत एका गाण्यावर नृत्य करण्यात दंग झाली होती...अन्य दोघी त्यांचे नृत्य शूट करत होत्या. तर लग्नाला आलेली मंडळी नवरा-नवरी आवरुन परत येईपर्यंत काहीतरी हवं, म्हणून हे सर्व बघत होती. दुसरीकडे तिचा नवरा मात्र हॉलच्या एका कोपऱ्यात बसून हताशपणे आपल्या पत्नी आणि मुलींकडे बघत होता. एका कुटुंबात पडलेल्या या अंतरामुळे मन अस्वस्थ झालं.
मध्यंतरी याच रील संदर्भात झालेल्या एका घटनेने मी तर प्रचंड हादरले होते. एक जोडपं त्यांच्या पाच-सहा वर्षाच्या मुलीसोबत घरी आलं होतं. त्यांनी माझी ओळख त्यांच्या लहान मुलीला करून देताना, तुझी आत्या आहे बरं का, असं सांगायची खोटी, त्या मुलींनी लगेच प्रतिप्रश्न केला..... ही चांगली आत्या की वाईट आत्या. या तिच्या प्रश्नावर तिचे आई-वडील खळखळून हसले आणि आम्ही दोघं मात्र कावरेबावरे होऊन एकमेकांकडे बघत राहिलो. नंतर त्या दाम्पत्यांनी त्यांच्या मुलीच्या बोलण्याचा अर्थ आम्हाला सांगितला. हल्ली रील मध्ये आत्या कशी आहे हे दाखवतात. त्या रील बघूनच त्या मुलीने तिच्या मनातील आत्याची प्रतिमा रंगवली होती. एवढं कमी की काय, आलेल्या त्या पाहुण्यांनी आम्हाला अशा स्वरूपाच्या काही रीलही दाखवल्या. त्यामध्ये नणंद घरी आल्यावर वैतागणारी वहिनी, माहेरी आल्यावर फक्त संपत्तीचा वाटा मागणारी आत्या, सासू फक्त सुनेची कागाळीच करणारी....आदी अनेक प्रकारच्या रील आम्हाला दाखवण्यात आल्या. अर्थात हे करत असताना त्या दांपत्याची मुलगी दुसरा मोबाईल घेऊन अशाच रीलच्या दुनियेमध्ये व्यस्त झाली होती. आम्ही दोघांनी डोक्याला हात लावला. त्या निष्पाप मुलीकडे
बघितल्यावर तिची किव वाटली. नात्याचे महत्व किती असतं हे त्या मुलीला रीलचा आधार घ्यावा लागत होता. आणि त्या रील मधून सुद्धा तिच्या बालमनावर नात्याचा ओलावा जपण्यापेक्षा त्यातील काट्यांचे अधिक संस्कार होत होते. कुटुंबामधील हा दुरावा आत्तासा अदृष्य आहे. पण भविष्यात त्यातून गंभीर परिणाम होणार आहेत.
रील किंवा सोशल मिडियामधील व्यस्ततेबद्दल टीका नक्कीच नाही. पण याचा
परिणाम आपल्या कुटुंबावर अदृष्यपणे होत आहे, याचे भान ठेवण्याची नक्कीच गरज निर्माण
झाली आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये एक सीमा
असते, ती सीमा ओलांडली की ती गोष्ट व्यसन होते, आणि त्या व्यसनाचा विळखा आपल्याला
कधी बसतो, याचे भानच हरपून जाते. सध्या
रीलच्या नावानं जे मनोरंजन चालू आहे, तेही तसंच आहे. या रीलच्या अतिरेकानं एका वयोवृद्ध दाम्पत्यांनं
आत्महत्या केल्याची बातमी आली आहे. रील करत असतांना त्यांची सून अंगप्रदर्शन होईल असा
पेहराव करीत होती, या दाम्पत्यानं त्याबाबत आक्षेप घेतला, सूनेला समजावलं. पण तिला
तिच्या सासू-सास-यांपेक्षा तिच्या रीलला मिळणा-या लाईक आणि शेअरचा मोह अधिक होता.
परिणामी तिनं त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं. यामुळे दुखावलेल्या या
वृद्धांनी आत्महत्या करण्याचा पर्याय स्विकारला. 'इथपासून इथपर्यंत' होत
असलेला हा रीलचा प्रवास नक्कीच आवरावा लागणार आहे. नाहीतर अवघ्या कुटुंबसंस्थेची
रियालीटी अस्थिरतेच्या मार्गावर जाणार आहे.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
सई खूपच छान वास्तवदर्शी लिहिलस, मुलं मोठी माणसं या रील च्या पायी वेडी होत चाललीत. काय दाखवावं याच भान राहीलच नाही.
ReplyDeleteघराघरात जास्त करून महिला ज्यांना सिनेमा व नाटकात काम करण्याची इच्छा व आकर्षण होते त्यांना आयती संधी मिळाल्यासारखे वाटते. कोणताही खर्च नाही छोटे छोटे reels बनवून अपलोड करायचे. पण हळूहळू हे व्यसन कधी लागते आणि आपण त्याच्या आहारी कधी जातो हेच त्यांना कळत नाही.
ReplyDeleteCorrect aahe
ReplyDeleteKhup chhan lekh
ReplyDeleteअगदी खरं आहे.
ReplyDeleteसमाजात रील स्तोम महिलांमध्ये वाढले व्यसन झाले आहे. स ईनेछान विचार व्यक्त केलेत .
ReplyDeleteकटू आहे पण आजची सोशल मीडियावरील परिस्थिती बघितल्यावर तेच योग्य आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे. उगीचच नाही जुने लोक महिलांना डोक्यावर पदर व उंबऱ्याच्या हात ठेवायचे
ReplyDeleteबरोबर आहे
ReplyDelete