मूग ए विक
गेल्या आठवड्यात एक निरोप आला, आम्ही दुपारी तुमच्याकडे जेवायला येतो. आठ जणं आहोत, दुपारी बारा वाजता येऊ, जेवल्यावर लगेच निघू. काही अडचण तर नाही ना...असा हक्काचा निरोप देणारे, चांगले परिचित. नात्यातले, आणि नात्यापेक्षा मैत्रीचे नाते अधिक जपणारे. त्यामुळे त्यांना, तुमचे कधीही स्वागत आहे, असं निरोपाचं उत्तर देऊन मी जेवणाचा मेनू ठरवला. पावसाळ्यात झणझणीत उसळी ब-या लागतात, म्हणून पाहुणे येण्याआधी चार दिवस आधी एक डबाभर मूग भिजायला टाकले. मेनूच्या बाकीच्या लिस्टप्रमाणे थोडी आधी तयारी करुन घेतली. या सर्वात धो-धो पाऊस सुरु झाला आणि येणा-या पाहुण्यांचा बेत या पावसात वाहून गेला. आता रागवू कोणावर, पाहुण्यांवर की पावसावर...दोघांवरही शक्य नाही. पण त्या मुगाचं करायचं काय...हा प्रश्न मात्र माझ्यासमोर होता. अर्थात या प्रश्नाचं उत्तर म्हणजे, अख्खा आठवडा आमच्याकडे मूग ए विक साजरा झाला. त्याचीच ही थोडक्यात झलक.
हिरवे मूग, हे कडधान्य माझ्या भारी आवडीचे. किराणा सामान भरतांना महिन्याला एक ते दोन किले मूगाची खरेदी प्रथम करुन घेते. लेकाला याच मूगाच्या पिठाचे लाडू लागतात. शिवाय चकली, थालिपीठ, डोसे, फार काय काहीवेळा मूगाच्या पुरण पोळ्याही आमच्याकडे होतात. पण या सर्वात मोड आलेल्या मूगाची उसळ फार लाडकी. त्यातही सोललेल्या मूगाचा डबा आमच्या फ्रिजमध्ये कायमस्वरुपी असावा असा आहे. या सोललेल्या मूगाची चव न्यारी लागते. त्यामुळेच पाहुणे येणार असतील, तर मोड आलेल्या आणि सोललेल्या मूगाची उसळ हा माझा फिक्स मेनू असतो. आमच्याकडे येणा-या पाहुण्यांची संख्या पाहून मी चांगले डबाभर मूग भिजायला टाकले होते. मोड आल्यावर हे मूग दुप्पट झाले. आता या मूगांचे करायचे काय...हा प्रश्न होता. पण बाहेर पडत असलेल्या धुंवाधार पावसानं या प्रश्नाचं आपसूक उत्तर देऊन टाकलं. पहिलं काम म्हणजे, हे मूग सोलणं. हे सर्वात सोप्प काम असतं. रात्री ब-यापैकी मोठ्या भांड्यात मोड आलेले मूग ठेवायचे, त्यावर भरपूर पाणी घालायचं, आणि झाकण घालून रात्रभर हे मगू तसेच ठेऊन द्यायचे. दुस-यादिवशी मूगाची हिरवी सालं, पाण्यावर आलेली असतात, आणि छान पांढरे स्वच्छ मूग तळाला बसून रहातात. अशा साल काढलेल्या मूगांना थोडं कोरडं करुन डब्यांमध्ये भरुन फ्रिजमध्ये ठेवलं, की ते पंधरा दिवस तरी तसेच रहातात.
या सोललेल्या मूगाचा पहिली हक्काची भाजी म्हणजे, मूगाचे बिरडे. या भाजीला फार तामझाम नाही. अगदी तेलावर जिरं, राई, हिंग, भरपूर कडीपत्ता टाकायचं. तिखट मसाला किंवा हिरवी मिरची, आपल्याला जे आवडेल त्याची साथ या फोडणीला द्यायची. नावाला हळद. या सर्व फोडणीवर सोललेल्या पांढरे मूग पेरायचे. एकदा हलकेच ढवळून घेतलं, की वरुन चांगलं मूठभर
खोबरं आणि थोडासा गूळ. झाकणावर पाणी ठेवून दिल्यावर अगदी दहा मिनीटात मूगाच्या बिरड्याचा घमघमाट घरभर पसरतो. यासोबत आंबट वरण आणि एक पोह्याचा पापड असला की जेवण अगदी फर्मास. बाहेर मुसळधार पाऊस पडत असतांना या मूगाच्या बिरड्याचा बेत अगदी परफेक्ट होतो. आठवड्याच्या पहिल्या वाराला मूगाचे बिरडे झाल्यावर आता दुस-या दिवशी सकाळी नव-याला नाष्ट्याला मूग आणि साबुदाण्याची खिचडी करुन दिली. खिचडीची पद्धत आपली नेहमीचीच. फक्त त्यात मूठभर वाफवलेले मूग टाकायचे आणि थोडी फोडणी झणझणीत करायची. वरुन लिंब पिळल्यावर या मूग, साबुदाणा खिचडीची चव अगदी बहारदार. संध्याकाळी मूगाचे सूप झाले. हा त्या बिरड्यापेक्षा एकदम सोप्पा प्रकार. मूग शिजवून घ्यायचे आणि मिक्सरमधून बारीक करायचे. मग त्याला एक उकळी काढायची. ही उकळ येत असतातंनाच त्यामध्ये काळीमिरीची पूड, जिरं पूड आणि मीठ घालायचे. सूप पिण्यापूर्वी अगदी चमचाभर तुपाची धार वरुन टाकळी, तर चव अजून बहारदार होते. मंगळवार बहुधा या मूगाच्या सुपाचा आमच्या घरचा वार आहे, तसाच तो साजरा झाल्यावर नव-यानं आता लगेच दुस-या दिवशी पुन्हा मूगाची भीजीबिजी नको...म्हणून त्याच्या निर्णय जाहीर केला. पण माझ्यापुढे ते मूग भरलेले चार डबे होते. त्यामुळे बुधवारी रात्री सलॅड डे साजरा झाला. त्यात नेहमीच्या भाज्यांसोबत नुसत्या वाफवलेल्या मूगांचाही समावेश केला. मूग फक्त वाफवून घेतले. वरुन त्यावर काळं मिठ आणि काळीमिरी पावडर टाकली. सोबत चीजचे बारीक तुकडे टाकले. एरवी मी सॅलेडमध्ये फक्त मोड आलेले मूग वापरते, पण यावेळी सोललेल्या मूगाचे सॅलेड आणि त्याच्यावर त्याच रंगाचे चीज, हे समीकरण त्याहून छान लागले. मग पुढच्या दिवसाची तयारी. गुरुवारी दिवसभर पावसाचा जोर चांगला होता. अशा वातावरणात सोललेल्या मूगाच्या झणझणीत मिसळीचा बेत केला.
नाजणीची भाकरी आणि अगदी साधी खिचडी, पावसाळ्याचं शास्त्र म्हणून कांदा भजी. आता शुक्रवारची तयारी. शुक्रवारी या सोललेले मूग टाकून मसाले भात केला. खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिबींर याचं हिरवं वाटण आणि मूगाला सोबत म्हणून त्यात बटाटे घातले. सोबतीला वांग्याच्या कापा आणि तांदळाची भाकरी. पावसाळी वातावऱणातला हा फाईव्हस्टार मेनू. या सर्व मेनूमध्ये मूगाचे दोन डबे संपले.
आता पुढच्या आठवड्यात बघू काय करायचं ते, म्हणून मी म्हणायला आणि
त्या पाहुण्यांचा फोन यायला, एकच गाठ पडली. पुढच्या आठवड्यात पाऊस थोडा कमी
होण्याचा अंदाज आहे, तेव्हा आम्ही येतो. आठजण आहोत, जेवायला येऊ, पण फार थांबणार
नाही. लगेच चार वाजता निघणार...असा त्यांचा आधीच्या मेसेजची कॉपी करणारा, त्यांचा निरोप
पुन्हा आलाय. या पाहुण्यांचा फोन आल्यावर नव-यानं पहिल्यांदा माझ्याकडे बघितलं.
आता काय पुन्हा मूग का....आता आठवडाभर नको...लगेच काही करु नकोस...थोडं
थांब...पाऊस काय म्हणतोय, ते बघ आणि मग भिजणं घाल...नाहीतर पुन्हा पुढचा आठवडा मूग
ए विक साजरा करायला लागेल....त्याच्या या बोलण्यावर मी काय बोलणार...मूग गिळून
गप्प बसले ना...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Mind-blowing dear
ReplyDeleteVery Nice
ReplyDeleteKhup chhan lekh
ReplyDeleteखूप छान लेख आहे.
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteसई, मुगाचं बिरडं फार पूर्वी खाल्लं होतं तुझ्या मुग ए विक लेखामुळे नक्की करणार. मस्त लेख!! ललिता छेडा
ReplyDeleteमूग ए विक भारीच
ReplyDeleteFantastic
ReplyDelete