ती आणि तो फिरायला जातात

 

ती आणि तो फिरायला जातात


सध्या पावसाचे दिवस आहेत....मुसळधार पावसाचे....दिवसभर सूर्याचा पत्ता नाही....अशाच अंधारलेल्या दिवसाला खिडकीतून बघत असतांना बेल वाजली.  दुपारचे दोन वाजले होते. जेवणं आटोपली होती, त्यानंतर सुरु झालेला मुसळधार पाऊस आणि तो पावसाचा अंधार मी भारावलेल्या स्थितीत पहात असतांनाच त्या बेलच्या आवाजानं आसपासचं थोडं भान आलं. एवढ्या धो-धो पावसात कोण येणार...हा पहिला प्रश्न मनात आला. दरवाजा उघडला, तर समोर मनाली उभी होती. मनाली, माझी एक मैत्रिणी. मोजून सत्तावीस वर्षाची मैत्री. मनाली साठीची. तिच्या लेकाचं, नीलयचं लग्न ठरल्याची बातमी तिनं मला काही दिवसांपूर्वी फोनवरुन सांगितली होती. एवढ्या पावसात मनाली पुन्हा हीच बातमी सांगण्यासाठी आली बहुतेक, असा कयास करत मी दरवाजा उघडला आणि मनालीला ओरडतच घरात घेतलं. पावसाचा जोर एवढा होता की, मनाली पूर्णपणे भिजली होती. एकीकडे माझा आरडाओरडा चालू होता, एवढ्या पावसात कशाला आलीस, फोन केला असतास ना. दुसरीकडे मी तिच्यासमोर गरम पाण्याचा ग्लास पुढे केला आणि बदलण्यासाठी कपडे दिले. अवघ्या पाच-सात मिनीटात मनाली कपडे बदलून आली, तेव्हा मी कॉफी करत


होते. ती तशीच हॉलमध्ये जाऊन बसली. इथे गडबड होती. कारण मनाली म्हणजे, धूम. आल्याआल्या गोंधळ घालणारी. पावसात भिजल्यामुळे बहुधा मनाली शांत असेल, म्हणून मी बाहेर कॉफीचे मग घेऊन गेले, तेव्हा बाई कोचाला डोकं टेकून डोळे मिटून बसल्या होत्या.

मनाली माझ्यापेक्षा वयानं मोठी. पण आमची मैत्री झाली ती एकाच अटीवर, उगा ताई...वहिनी...अशा नात्यांची लेबल लावून हाक नाही मारायची. तू मला सरळ माझ्या नावानं हाक मार. आपली मैत्री आहे. या मैत्रीच्या नात्यात सर्व नाती समावून जातात. या एका अटीवर झालेली आमची मैत्री आज पंचवीस वर्षांनी एका परिपक्व वळणावर आहे. मनाली सिंगल मदर. एकल आई. वयाच्या पंचवीशीमध्ये तिचं लग्न झालं आणि तिशीमध्ये घटस्फोट. नव-याचं ऑफीसमधल्या एका महिलेसोबतचं अफेअर मनालीनं पुराव्यासकट पकडलं, तेव्हा तिचा लेक, नीलय दोन वर्षाचा होता. त्यानंतरची तीन वर्ष मनालीसाठी कठीण होती. ती नव-यापासून घटस्फोट घेण्यावर ठाम राहिली. सासर आणि माहेर...दोन्हीकडून एकट्या बाईचं कठीण असतं...अशी व्याख्यानं तिला देण्यात आली. त्यात मुलाचा सांभाळ करणं अजून अवघड असल्याची भीती तिला दाखवण्यात आली. नव-यानंही माफी मागितली. पण मनालीच्या मनातून संसार नावाचा शब्द पुसला गेला होता. तिनं घटस्फोट घेतला, तेव्हा नीलय पाच वर्षाचा झाला. तेव्हापासून त्याची शाळा, तिची नोकरी, घराची सर्व जबाबदारी, दोघांचीही आजारपणं हे सक्षमपणे मनालीनं सांभाळलं.

छोट्या नीलयला बाबा आपल्यासोबत रहाणार नाहीत, हे सुरुवातीला समजवतांना ती ब-याचवेळा स्वतःला प्रश्न विचारायची. आपण केलं ते बरोबर आहे का...या प्रश्नाचं उत्तर तिला काही वर्षातच मिळालं. तिच्या नव-यानं घटस्फोटानंतर त्या ऑफीसमधल्या महिलेसोबत दुसरा विवाह केला, आणि तो दुस-या शहरात रवाना झाला. त्यानं नीलयला बघण्यासही आपण येणार नाही, असे मनालीला सांगितलं, आणि ती अधिक खंबीर झाली. पुढे नीलय मोठा झाल्यावर समजुतदार होत गेला. आपल्या आईचा संघर्ष बघतांना घरातील अनेक जबाबदा-या त्यानं स्विकारल्या. मनाली ब-याचवेळा नीलयच्या या स्वभावाचं खूप कौतुक करते. छोटा नीलय बघता बघता मोठा झाला. अगदी पंचवीस वर्षाचा. इंजिनिअरिंग केल्यावर त्यानं एमबीए केलं, आणि आता एका मोठ्या कंपनीमध्ये उच्चपदावर कामाला आहे. या सर्वात त्याच्यापुढे परदेशी


जाऊन शिक्षण घेण्याचा प्रस्तावही मनालीनं नीलयपुढे ठेवला होता. पण तुला सोडून नाही...असं सांगून त्यानं स्थानिक महाविद्यालयातच शिक्षण घेतलं. नीलयची एक मैत्रिणही आहे, त्यानं तिला लग्नाची रितसर मागणी घातली, तिच्या पालकांना भेटून आपल्या आईनं केलेला संघर्ष सांगितला. त्यांचा होकार आल्यावर मग आईला बातमी सांगितली. मनालीला हा गोड धक्का होता. दोन्ही कुटुंब भेटली. मनाली, नीलय आणि मनालीचा मोठा भाऊ, अशी सुरुवातीची बैठक झाली. लग्नाला दोन्ही घरांचा होकार होता. मनालीची साठी सुहानी झाली. पुढच्या वर्षीची लग्नाची तारीख काढली आणि बाई तयारीला लागल्या.

याच सर्वात नीलयनं तिला बाहेर फिरायला जाऊया म्हणून आग्रह केला. एवढ्या वर्षात बाहेर फिरायला जाणं, म्हणजे, दोघांसाठी मामाच्या घरी जाणं, किंवा शहरातल्या पार्कमध्ये किंवा अगदी एखाद्या हॉटेलमध्ये इथपर्यंतच होतं. काहीवेळा मैत्रिणींच्या ग्रुपसोबत नीलयला घेऊन मीनलनं पिकनीकचा आनंद लुटला आहे. पण आता नीलय फक्त तू आणि मी...यावर अडून बसला.  फार लांब नको...फार दिवस नको...असं करत चार दिवस गोव्याला ही माय लेकाची जोडी गेली. पण तिथे आलेल्या काही अनुभवांनी मनाली खचली. आई आणि मुलाच्या या जोडीकडे तिथे अनेकांनी विचित्र नजरेनं बघितलं. एवढ्या मोठ्या वयाची बाई, एक तरुणाबरोबर मजा मारतेय...असे डायलॉग ऐकल्यावर मनालीच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना फक्त ती आणि तो दिसत होते. त्यांच्यातील आई, मुलाच्या नात्याला बघण्यासाठी त्यांची नजर तयारच झाली नव्हती. आजकल कुछ भी हो सकता है...म्हणणा-या एकाला नीलयनं सुनावलंही. पण या सर्वांमुळे मनालीला फार वाईट वाटलं.  दोघंही गोव्याहून परत आल्यावर नीलय आपल्या नोकरीमध्ये व्यस्त झाला, पण मनालीच्या मनातून हा विषय काही जाईना.

अशा लोकांचं काय करायचं, हा प्रश्न घेऊन ती भरपावसात माझ्याकडे आली होती. खड्डात जाऊदे अशा लोकांना, आपल्याला काय करायचंय...अशा लोकांच्या विचारांचं ओझं घेत आपले दिवस कशाला खराब करायचे. या कोत्या वृत्तीच्या माणसांना किंमतच नाही...तू सर्व बाजूला ठेव...लग्नाला सहा महिने आहेत, आपण ते साड्या खरेदीचं प्रकऱण आधी संपवूया....येवल्याला जाऊया


का...माझी ओळख आहे...म्हणत मी मनाली समोर एक प्रस्ताव ठेवला. मनालीनं एक-दोन सेकंदच माझ्याकडे बघितलं, आणि हात जोडले. अग मी काय बोलतेय...आणि तूझं काय चालू आहे...मनाली, अग या सगळ्यांच्या नकारात्मक विचारांपेक्षा तुझा नीलय किती परिपक्व झाला आहे, याचा विचार कर.  या वयातील मुलं क्वचित आपल्या आईला घेऊन फिरायचा विचार करतात. तुझ्या कष्टांची जाणीव असलेला तुझा मुलगा आहे, याचा अभिमान ठेव. ज्या लोकांना आपण कधी बघितलं नाही, त्यांनी आपल्यावर केलेल्या टीकेला किती दिवस डोक्यात ठेवायचं, असं म्हणत, तिच्या हातात पोह्यांची डीश दिली. त्या पोह्यांवरच्या खोब-यामुळे बहुधा मनालीची कळी खुलली...मान्य आहे...चल सोडले सगळे विचार...आता लग्नाच्या खरेदीचं पाहूया...म्हणत बाईंन पोह्यांवर आणखी एक कॉफीचा मग रिचवला. 

समाजातून नात्याची विण इतकी विरळ होत चालल्याचं मनालीला आलेल्या अनुभवातून समोर आलं आहे. जे समोर दिसतं त्यावरच व्यक्त होण्यासाठी सर्वांची धडपड चालू आहे. जरा थांबून, जरासा श्वास घेऊन आपलं मत व्यक्त करायला हवं, याचं भान हरपत चाचलं आहे.  त्याऐवजी पहिल्यांदा कोण व्यक्त होतं, याची अनोखी स्पर्धा लागली आहे. यामध्ये नात्याच्या भावबंधाला आपण तिलांजली देत आहोत, याचं भानही रहात नाहीत....अशा स्पर्धांमुळे कितीतरी मनाली मनातून खचत असतील. ती आणि तो फिरायला जातात. यातील ती ही आई असू शकते, आणि तो हा तिचा लेक असू शकतो....पण हे समजण्यासाठी बघणा-याची नजर परिपक्व असायला लागते, आणि अशा परिपक्वतेसाठी, बघा, विचार करा आणि मगच व्यक्त व्हा...या सूत्राची गरज असते. 

 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. खूपच छान....
    मनालीला तुमच्यासारखी मैत्रीण मिळाली हे तिचं मोठं भाग्य, किती सहज तुम्ही तिला विकृत विचारांपासून अलिप्त केलंत.....

    ReplyDelete
  2. खूप वास्तव मांडलय. सध्या मोबाइलवरील अश्लील कंटेन आणि वेबसरीज मधील नात्याला काळिमा फासणारे प्रकार दाखवले जातात. ते बघणाऱ्यांची दृष्टी दूषित होते. त्यामुळे समोर स्त्री आणि पुरुष आहेत एवढं च बघणारे संकुचित लोक झालेत. भावली धरणावर पर्यटकांवर हल्ला झाला कारण आईच्या वयाच्या पर्यटक महिलेची दोघा अल्पवयीन मुलांनी छेड काढली हे निमित्त झालं. कुठं चाललाय समाज आपला असा प्रश्न पडतो.

    ReplyDelete
  3. Khup chhan lekh

    ReplyDelete
  4. खूप छान लेख आहे 🤙👌

    ReplyDelete

Post a Comment