तुला शिकवीन चांगलाच धडा
डोक्यावर बर्फ ठेवणे...हा वाक्प्रचार मनात सतत घोटत मी शारदासह तिच्या मुलीला आणि नातील निरोप दिला. काहीवेळा आपल्याला असे अनुभव येतात की त्यात आपला शब्दांचा खजिना नकळत कुलूपबंद होतो. तसाच हा अनुभव. दुपारी, मुलगी आणि नातीसह आलेली शारदा रात्री आठच्या सुमारास आता निघतो, म्हणत उठली तेव्हा घरात शांतता होती. सर्व बोलून झालं होतं, समजावून झालं होतं. पण त्यातून काहीही साध्य न झाल्यानं बोलणी आटपली आणि त्या तिघी आपल्या घरी निघून गेल्या. शारदा, माझी परिचित आहे. तिच्या मुलीला, निधीला, घटस्फोट घ्यायचा आहे. घटस्फोटासाठी दोघांनीही कोर्टामध्ये अर्ज केला आहे. या सर्वात किमान दोन वर्षाचा कालावधी जाईल, असं त्यांना सांगण्यात आलं आहे. पण निधी आणि तिचा नवरा एकमेकांसोबत जसे वागत आहेत, त्यामुळे हा कालावधी वाढण्याचीही शक्यता असल्याचे वकीलांनी स्पष्ट केले आहे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलेल्या निधीची फक्त एकच इच्छा आहे, तिला तिच्या नव-याला घटस्फोट द्यायचा आहे, पण त्यापूर्वी त्याला चांगला धडा शिकवायचाय. धडा म्हणजे, ती त्याच्यावर उठता-बसता सोशल मिडियावर मेसेज टाकत आहे. अर्थात, ती जेवढी सोशल मिडिया फ्रेंडली आहे, तेवढाच तिचा नवराही....निधीनं त्याला उपदेश करणारी सोशल मिडिया पोस्ट टाकली की, तो सुद्धा त्याला उत्तर देतो. मग या उत्तरावर निधीचे प्रत्युत्तर...असा सगळा खेळ चालू आहे. त्याला शिकवीन चांगलाच धडा....असा घोषा लावलेल्या निधीला शारदा समजावून थकली आणि माझ्याकडे तिला घेऊन आली. मी मग या निधीसाठी चांगले पाच तास
पणाला लावले...पण उलट्या घड्यावर पाणी...मला त्याचा बदला घ्यायचाय...या वाक्यावर निधी कायम....शेवटी मी हात जोडले आणि शारदा आपल्या तीन वर्षाच्या नातीला घेऊन निघाली.
समाजातील बदलत्या परिस्थितीची भयाण जाणीव करुन देणारे काही अनुभव
येतात. अशा अनुभवांनी मन खच्ची होतं, आणि आपण कुठे कमी पडत आहोत का, हा प्रश्न
आपल्याच मनाचा ताबा घेतो. असाच अनुभव मला शारदाच्या भेटीनंतर आला. शारदा माझी
परिचित आहे. तिला एकच, निधी नावाची मुलगी. निधीनं इंजिनिअरिंग, एमबीए अशा पदव्या
घेतल्या आहेत. वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी तिचं लग्न झालं. मुलगा तिच्या ओळखीचा होता. दोन वर्षाच्या प्रेमसंबंधानंतर
निधीनं त्याच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांची बोलणी झाली. जात
एकच...त्यामुळे लग्नाचे सोपस्कार अधिक चांगले झाले. दोघंही एकुलते एक. त्यामुळे
लग्नावर हात मोकळे ठेवून खर्च झाला. अगदी प्रीवेडिंग फोटोशूट ते आऊटडोअर
मॅरेज...अशा सगळ्या थीमचा वापर झाला. लग्नानंतर निधी आणि तिचा नवरा, यांनी स्वतःचा
वेगळा फ्लॅट घेतला. दोघांचाही राजा-राणीचा संसार सुखात चालत होता. याचा पुरावा
अर्थातच सोशल मिडियावर रोज येत असे. रोजचा सकाळचा ब्रेकफास्ट ते रात्रीचं
आईस्क्रीम किंवा पान खाण्याचा बेत...असे सर्व फोटे त्यावर पडत असत. पण प्रेमाचा हा
चढता आलेख जेवढ्या वेळात वर गेला, त्यापेक्षा कमी वेळात खाली उतरला.
संसार...प्रपंच हे शब्द जेवढे सोप्पे वाटतात, तेवढीच व्यापकता त्यामागे आहे. हिच व्यापकता निधी आणि तिच्या नव-याला सांभळता आली नाही. लव्हबर्ड म्हणून लग्नाआधी फिरतांना कोणी खर्च केला याचा हिशोब लावला जात नव्हता. तेव्हा कोण, कोणाला, किती महागडी भेटवस्तू देणार याची गोड स्पर्धा लागायची. सर्वात चांगलं हॉटेल आणि त्यातली महागडी डीश...अशी निवड
असायची. पण संसार सुरु झाला, आणि घरखर्चाच्या मर्यादा समजू लागल्या. सुरुवातीच्या सहा महिन्यात लग्नापूर्वी जसा सढळ हातानं खर्च केला होता, तसा करुन झाला. शनिवार-रविवार तर मॉलशिवाय दुसरं ठिकाण नव्हतं. शॉपिंगच्या बॅगांनी घर भरलं. लग्नापूर्वी घरासंदर्भातील सर्व बिलं वडिलांच्या खिशातून जायची. आता ती स्वतःच्या खिशातून जायला लागली, मग तू घराचं भाडं दे, मी लाईटचं बील देतो. तू घरकामासाठी असलेल्या बाईचे पैसे दे, मी किराणा सामानाचं बघतो...अशी विभागणी झाली. काही महिने हे ठिक चाललं, पण मग त्याचीही पिसं निघायला झाला. दोघांनीही एकमेकांवर जास्त खर्च करीत असल्याचा आरोप केला. भांडणं व्हायला लागली. ती एवढी वाढली की, दोघांच्याही आई-बाबांनी मध्यस्थी केली. निधीच्या सासूबाईंनी आपण एकत्र राहूया, तुम्ही आपल्या घरी परत या, म्हणून आग्रह केला. पण नको. का...तर ती प्रायव्हसी. मग दोघांचीही समजूत काढण्यात आली. खर्चाची विभागणी कशी करायची, याच्या टिप्स, आई-वडीलरुपी जाणकारांनी दिल्या. पुन्हा काही महिने ठिक चाललं. पण तेरड्याचा रंग तीन दिवस. छोट्यामोठ्या कुरबुरी पुन्हा सुरु झाल्यात. यामध्ये निधीला दिवस गेले. आता खर्चाचा हिशोब पुन्हा गडबडला. आपल्या घरात बाळ येणार म्हणून आनंदी व्हायचं की, अवांतर खर्चावर आपल्याला मर्यादा येणार, याची काळजी करायची, या विचारांनी दोघांना कैचीत पकडलं. शेवटी दोघांचेही आईवडील पुन्हा मदतीस आले. मग निधी आणि तिच्या नव-यानं बाळ येणार म्हणून खरेदी सुरु केली. घराचं डेकोरेशन बदललं. खर्चावर नियंत्रण ठेवा, उगाच वस्तू खरेदी करु नका, असा सल्ला धुडकावून आम्ही आमच्या बाळाला प्रिन्स-प्रिन्सेंसारखं वाढवणार...असं प्रेमात सांगू लागले. घरच्यांना त्यातही कौतुक दिसू लागलं. बाळ झाल्यावर सगळं सुरुळीत होणार...या आशेवर शारदानं बाळतंपणाचा सगळा खर्च केला. निधी तिच्याकडे चार महिने राहिल्यावर मग तिची सासू काही दिवस त्यांच्याकडे रहायला आली. आता बाळ झाल्यावर खर्चाचे फाटे अधिक फुटायला लागले. गाडी, फ्लॅट यांचे हफ्ते भरतांना होणारी तारांबळ वाढली. पण खर्चात कुठेही काटकसर होत नव्हती. याचा परिणाम म्हणजे पहिले पाढे पंचावन्न.
आता होणा-या भांडणांची तीव्रता वाढली. बाळाला सांभाळतांना दोघांनी एकमेकांना मदत करायला पाहिजे, यावर निधी ठाम होती. पण माझी आई, तुला मदत करत आहे, मग मी कशाला हवा, मला ऑफीसचं काम आहे, असं निधीच्या नव-याचं मत. या भांडणात निधी तिच्या नव-याला ज्या शब्दात सुनवायची, ते शब्द तिच्या सासूला लागले. तुमचं तुम्ही बघून घ्या, म्हणत तिनं आपला मुक्काम हलवला. काही महिन्यात शब्दाला-शब्द...असं वाढत गेलेलं भांडण मोठ्या रुसव्यात झालं, आणि निधी आपल्या सात महिन्याच्या बाळाला घेऊन माहेरी आली. आता तिची मुलगी तीन वर्षाची झाली आहे. निधी मुलीला घेऊन आईकडे परत आल्यावर तिच्या नव-यानं फ्लँट सोडणार असं सांगितलं, मग निधी एकदा तिथे गेली. तिचे कपडे आणि तिनं घेतलेल्या सर्व वस्तू मोजून घेऊन परत आली. मग नव-यानंही तसंच केलं. त्यानं घेतलेल्या वस्तू घेत त्यानं त्या फ्लॅटला टाळं ठोकलं आणि तो त्याच्या आईवडिलांच्या घरी रहायला आला. निधीला या सर्वात तिच्या आईनं आणि सासूनंही समजावलं, तसंच तिच्या नव-यालाही. पण वेगळं झाल्यावर बहुधा दोघांनाही एकमेकांचे दोष अधिक दिसू लागले. त्यात कोण किती वायफळ खर्च करतं ते कोणाचे मित्र मैत्रिणी नको एवढे जवळ आहेत, याचा उद्धार झाला. माझ्या मुलीचं आणि माझं करायला मी समर्थ आहे, असा निधीचा रोख...तर दुसरी बायको सहज मिळेल...असं डिवचत निधीच्या नव-यानं घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.
या सर्वात निधी ऑफीसला गेल्यावर तिचा नवरा
तिच्या आईच्या घरी येऊन मुलीला बघायला येतो. पण सोबतच निधीसोबत संसार शक्य
नसल्याचे ठामपणे सांगतो. दोघंही घटस्फोट घेऊन दुसरा संसार करणार असं सांगतात. पण
एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. कुठलाही सण असो की कोणाचाही
वाढदिवस...सोशल मिडियावर पोस्ट टाकतांना एकमेकांचे बाभाडे काढणा-या पोस्ट
टाकल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे कशाला, आता वेगळं व्हायचंय ना...मग सर्व
पाश बंद करा...असं शारदानं निधीला समजावलं. पण ती ऐकायला तयार नाही. मला त्याचा
बदला घ्यायचाय....लग्नापूर्वी त्यांनी मला मोठी आश्वासनं दिली होती, नंतर फसवलं...ही
निधीची भूमिका आहे. तिचा नवरा, यासर्वांसाठी तिच्या खर्चाला जबाबदार धरतो. नको
एवढी शॉपिंग आणि हॉटेलचा खर्च याचं बिल त्यानं निधीवर फाडलं आहे....एकूण दोघांनाही
एक पाऊस मागे यायचं नाही. दोघंही एकमेकांना, तुला दाखवतोच....म्हणून धमक्या देत
आहेत. लग्न झाल्यावर पहिल्या सहा महिन्यात त्यांचे जसे फोटो यायचे, तशा आता
एकमेकांना डिवचणारे मेसेज येत आहेत. शारदा दोघांनाही, हे सर्व थांबवा...म्हणून
सांगून थकली आहे. पण ते ऐकायला तयार होत नाहीत. आता ती निधीला जे ओळखतात, त्यांच्या विनवण्या
करत आहेत, माझ्या लेकीला समजवा....तशीच ती माझ्याकडे निधीला आणि त्या तीन
वर्षाच्या निरागस मुलीला घेऊन आली होती...
निधीबरोबर मी बराचवेळ चर्चा केली. काय करता येईल...म्हणून तिला
विचारलं. पण तिचा मुद्दा कायम. घटस्फोट घेणारच...पण त्याला चांगला नमवल्यावर...माझी मी समर्थ आहे...माझ्या मुलीला त्याचा एकही पैसा न घेता मोठ करेन....वगैरे वगैरे...यातून काय साध्य होणार...या माझ्या प्रश्नावर तिचं तेवढ्याच ठाम शब्दातलं उत्तर....बदला...माझ्या आय़ुष्यातील पाच वर्ष त्या माणसांनी खराब केली, त्याचा बदला....अग बाई, पण या तुमच्या बदल्याच्या खेळामध्ये पुढची किती वर्ष वाया जाणार आहेत....तुमच्यासोबत त्या मुलीच्याही आय़ुष्याचा खेळ होणार आहे....तिनं पुढे जाऊन अशीच बदल्याची भाषा केली तर....असे सर्व जर-तर झाले. पण परिणाम शून्य. शेवटी आईला माझा त्रास होत असेल तर मी माझ्या मुलीसह वेगळं राहीन, हे बोलल्यावर शारदा त्या मुलीला घेऊन उठली. राहूदे, तूला हवं तसं कर...त्यात या पोरीची उगा हेळसांड नको...म्हणत तिनं हात जोडले. घरातून बाहेर पडणा-या या तीन पिढ्यांकडे मी मूकपणे बघत होते. एका पिढीला समाजाला काय वाटेल याची चिंता...दुसरी पिढी कसला समाज, मला काही फरक पडत नाही, हे गुर्मीत सांगणारी....याच गुर्मीमुळे तिस-या पिढीची समाजाची व्याख्याच नकारात्मक झाली नाही म्हणजे मिळवलं....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
The reality of today's couples have been well.narrated
ReplyDelete