कंटोळ फेस्टिवल

 

कंटोळ फेस्टिवल


तुमच्यामध्ये संयम, धीर, सहनशीलता किती आहे, याची तपासणी करायची असेल, तर त्यासाठी एक साधा, सोप्पा उपाय आहे. त्यासाठी बाजारात जायचं आणि कंटोळ भाजी विकत घ्यायची. मुळात कंटोळ भाजी घ्यायची, हीच एक संयम ठेवण्याची गोष्ट आहे. साधारण शंभर रुपये पाव किलो असा भाव असलेली ही भाजी घरी आणून साफ करुन, आपल्या ताटात पडेपर्यंत जो सर्व कालावधी असतो ना, तिच आपली परीक्षा असते. कंटोळ्याला साफ करतांना आपली सहनशीलता संपत आली तर या भाजीसाठी जी किंमत दिली आहे, ती आठवते. मग अगदी बारीकसंही कंटूळं का असेना ते मोलाचं ठरतं. अशीच कंटूळी घरात एकाचवेळी किलोभर आली तर या सहनशीलतेवर किती ताण येईल...आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नवरा त्याच्या मिटींगसाठी अंबरनाथला गेला होता. तिथून येतांना त्याची नजर या कंटोळ्यांवर पडली. त्यानं हौशेनं दहा वाटे घेतले. बरं मी काय कमी आहे. सोमवारीच मी सुद्धा सकाळी भाजी घेण्यासाठी बाहेर पडले, तेव्हा बाजारात कंटोळ पाहून माझीही कळी खुलली


होती. नव-याला सरप्राईज देऊया म्हणून मी सुद्धा कंटोळ घेतली. मात्र दोन्ही वाटांनी घरात आलेल्या या कंटोळांची संख्या पाहून संयम, धीर, सहनशीलता या प्रवर्गातील सर्वच शब्दांची माझ्या मनात गर्दी झाली. शेवटी आम्ही दोघांनी मिळून एक तह केला, रोज एकच भाजी का...हा प्रश्न विचारुन चिडचिड करायची नाही...मग या तहानुसार आठवडाभर कंटोळ फेस्टीवल साजरा झाला. त्याच कंटोळ फेस्टिवलचा हा आढावा....

सोमवारी कंटोळ साफ करण्यात सगळा वेळ गेला. त्यामुळे सायंकाळी अगदी छोटी कंटोळ निवडून त्यांची भाजी केली. ही अशी अतीकोवळी कंटोळ असेल तर ती आतून साफ करुन घ्यायची गरज भासत नाही. फक्त मध्ये चिरुन बारीक कापायची.  भाजीची अन्य तयारी करतांना ही कापलेली कंटोळ एका कढईमध्ये अगदी चमचाभर तेल टाकून वाफवायला ठेवायची. दुसरीकडे भरपूर लसूण, कडीपत्ता आणि मिरची यांची झणझणीत फोडणी करायची. त्यात कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा. भिजवलेली चणा किंवा मूगाची डाळ टाकायची. अगदी अख्खे भिजवलेले मूग टाकले तरी चालतात. कांदा चांगला मऊसूत झाला की त्यात हळद आणि मिठ टाकून परतून घ्यायचे. मग दुस-या कढईमध्ये वाफवण्यासाठी ठेवलेली कंटोळ,  या फोडणीमध्ये टाकून चांगले परतायचे. पाच मिनिटांनी गॅस बंद करायचा. त्यानंतर पाच-दहा मिनिटं भाजी तशीच वाफावायला ठेवायची. त्यात वाफ चांगली मुरली की मग खोबरं आणि


कोथिंबीर टाकून पुन्हा परतून घ्यायची. अशी भाजी आणि भाकरी, सोबत तळेलेल्या अळूवड्या....माझ्याकडे सोमवारी तर असाच बेत झाला. मंगळवारी सायंकाळी उपवास सोडतांना पुन्हा कंटोळ. यावेळी कंटोळ अगदी बारीक न चिरता, त्याच्या चार फोडी करुन घेतल्या. त्या साफ करुन पुन्हा वाफेला लावल्या. या वाफवलेल्या कंटोळच्या फोडी सोललेल्या मूगाच्या भाजीत घातल्या. या भाजीमध्ये कांदा, लसूण नाही. फक्त खोबरं आणि जि-याचं वाटण. या रस्सा भाजीमध्ये ही कंटोळ भाजाचा स्वाद अधिक वाढवून जातात. बुधवारी पुन्हा कंटोळ.

यावेळी जरा वेगळी करुया म्हणून भरपूर कांदा आणि टोमॅटोचा आधार घेतला. कंटोळ साफ करुन त्याचे चार-चार तुकडे करुन त्यातील बिया साफ करुन घेतल्या. कांद्या, लसूणाची फोडणी चांगली लाल झाल्यावर त्यात टोमॅटो टाकला. थोडावेळ टोमॅटो परतल्यावर त्यात अर्धा तास भिजवलेली वाटीभर तूरडाळ टाकली. हे मिश्रण वाफेला ठेवतांना झाकणावर पाणी ठेवलं. पाच मिनिटांनी झाकणावरचं पाणी त्या मिश्रणात टाकून चांगले मिक्स करुन घेतले. त्यात हळद आणि आमचा मालवणी मसाला टाकून पुन्हा चांगले परतले. आता त्यात कापलेली कंटोळ भाजी टाकली आणि पुन्हा झाकणावर पाणी ठेऊन भाजी शिजायला ठेवली. पाच मिनीटांनी गॅस बंद करायचा आणि तशीच भाजी थंड होऊ द्यायची. अर्थात छान मिळून आलेल्या या भाजीमध्ये मग भरपूर खोबरं आणि कोथिंबीर घालायची. सोबत अगदी थोडा गूळ घालायचा. ना रस्सा ना सुकी...अशी ही थपथपी भाजी. अशापद्धतीनं बुधवार पर्यंत थोड्या लहान


आकाराची, कोवळी कंटोळ संपली.

गुरुवारी उपवास. त्यासाठी कांदा, लसूण विरहीत भाजी. शेंगदाणे, तीळ, खोबरं हे हलकेच भाजून घेतलं, त्यात कोथिंबीर, चार हिरव्या मिरच्या आणि थोडं आलं टाकून मिक्सरमधून बारीक करुन घेतलं, या मिश्रणात अगदी चमचाभर भाजलेलं चण्याचं पीठ, थोडा लिंबाचा रस आणि मीठ घालून एकत्र केलं. मग सर्व कसब लावून ती कंटूळी प्रेमानं साफ केली. दोन भाग केलेल्या कंटोळला आतून साफ करुन घेतलं.  त्यात हे मिश्रण चांगले भरले. आणि हो, चण्याचं पिठ नसेलच तर थोड्या शेवगाठी किंवा फुटाणे वाटणात टाकले तरी चालतात. शेंगदाणा, तीळ, खोबरं वाटतांना त्यांनाही बारीक करुन घ्यायचं. ही भरलेली कंटोळ, कढईमध्ये तेल टाकून आधी वाफवून घ्यायची.  अगदी पाच मिनीटांनी याच कढईमध्ये वाफवलेली कंटोळ बाजुला करुन मध्ये गोल जागा करायची. यातच मग आणखी थोड तेल टाकून जि-याची फोडणी करायची.  त्यावर बारीक चिरलेला टोमॅटो, मिठ, हळद आणि कंटोळसाठी जे वाटण केलं आहे, त्यातलं राहिलेलं सगळं वाटण टाकायचं. या छोट्या जागेत बाजुला असलेल्या कंटोळला सांभाळत हे मिश्रम परतायचे, आणि त्यावर अर्धा पेला गरम पाणी टाकायचे.  फोडणीचा एक चांगला ठसका बसला, की समजायचे भाजी मस्तच होणार. मग त्यात ती बाजुला केलेली कंटोळ मिसळायची. सर्व एकदा परतायचे आणि अगदी एक-दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं. असंच मी केल्यावर भाजी थंड झाल्यावर यात भरपूर कोथिंबीर घालून घेतली. चौथ्या दिवसाची ही कंटोळ रेसिपी झाल्यावर आम्ही दोघांनीही किती कंटोळ राहिली आहे, याची मोजदाद केली. आता टोपलीमध्ये मोजून सात कंटोळ होत्या, त्याही आकारानं थोड्या मोठ्या.

शुक्रवारी, म्हणजेच, कंटोळ फेस्टिवल सुरु झाल्यावर पाचव्या दिवशी, अगदी साधी, मिरचीची कंटोळ केली. ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरं बारीक करुन घेतलं. त्यात लिंबाचा रस आणि मीठ घालून हे मिश्रण दोन


तुकडे करुन साफ केलेल्या कंटोळमध्ये भरले. एअरफ्रायमध्ये हे भरले कंटोळ ठेऊन वरुन ब्रशनं नावाला तेल लावलं, आणि सर्व त्या एअरफ्रायवर सोडून दिलं. दहा मिनीटांनी त्याची बीप बीप व्हायला लागली आणि मी ते एअरफ्रायरचं भांडं बाहेर काढलं. तेव्हा अगदी मऊसूत भाजलेल्या भरल्या कंटोळ समोर बघून माझी कळी खुलली. ही भरली कंटोळ आणि टोमेटोचं सार....

एकूण आमच्या घरातील हा पाच दिवसांचा कंटोळ फेस्टिवल अगदी चवदार झाला. अर्थात त्याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एकतर कंटोळ. आणि दुसरं म्हणजे, ओलं खोबरं. कंटोळभाजीसाठी जे ओलं खोबरं वापरलं होतं, ते थेट माझ्या माहेरचं, रेवदंड्याचं. या सर्व कंटोळ भाज्यांमध्ये मी सढळ हातानं खोब-याचा वापर केला होता. गेल्या आठड्यात रेवदंडा-चौल दौ-यात माझ्या दक्षा वहिनीनं एक पिशवी भरुन नारळ दिले. आता माहेरच्या नारळांची गोडी काही खास असते, हे सांगायला नकोच. या सर्वात आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, जी काही कंटोळ घरात आली होती, ती मी एका टोपलीमध्ये भरुन ठेवली होती. फ्रिजमध्ये पावसाळी भाजी ठेवली, की त्याच्या चवीमध्ये फरक येतो, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे कंटोळ फ्रिजमध्ये न ठेवता बाहेरच


टोपलीमध्ये ठेवलेली ही भाजी फ्रेश राहिली. असा हा कंटोळ फेस्टिवल कंटाळा न याता या आठवड्यात झाला. हा फेस्टिवल सफल, संपूर्ण झाल्यावर नव-यानं आता पुन्हा येत्या सोमवारी अंबरनाथला मिटींगला जाणार असल्याचं  जाहीर केलं. यावेळी कंटोळ आणणार नाही, पण गाभोळीची भाजी दिसली तर घेऊ का...म्हणून त्यानं साळसूदपणे विचारलं. आता या प्रश्नाला माझं उत्तर काय असणार...

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. न कंटाळता केलेल्या कंट्रोल सप्ताहाला आणि तुझ्या सहनशक्तीला आणि चिकाटीला खरंच सलाम..
    छान रेसिपी मिळाल्या कंटोलच्या.

    ReplyDelete

Post a Comment