रुपये शंभर फक्त

 

रुपये शंभर फक्त


त्यात काय होतंय...मी देतोय ना...तू फक्त ते पार्सल घे आणि दोघींनी छान गप्पा मारत ती डिश एन्जॉय करा...अनघाचा प्रसाद हा छानसा डायलॉग मारत घराबाहेर पडला आणि आम्ही दोघीही त्याच्याकडे तोंडाचा आ करुन बघत राहिलो. झालं असं की, ब-याच दिवसांपासून अनघाचा घरी ये, म्हणून आग्रह होता. दोन दिवसांपूर्वी तिच्याकडे दुपारी तीनच्या सुमारास गेले. तेव्हा नेमकी तिच्या लेकानं, प्रसादनं काही कामानिमित्त सुट्टी घेतली होती. मी जेव्हा अनघाकडे गेले, तेव्हाच तो बाहेर पडत होता. मला बघितल्यावर थोडा थांबला आणि गप्पा मारु लागला. तेवढ्यात अनघा काहीतरी करते, म्हणून स्वयंपाकघरात गेली. मी नको म्हणेपर्यंत प्रसादही उठला, काहीही करु नको, मी बाहेरुन काहीतरी मागवतो, तुम्ही दोघी मैत्रिणी छान गप्पा मारा, म्हणून फोनवरुन ऑर्डर करु लागला. तेव्हा आम्ही दोघीही एकदम ओरडलो, अरे बाहेरुन काहीही नको, पण तो कशाला ऐकतोय. त्यानं भराभर पदार्थांची नावं घ्यायला सुरुवात केली. मी काहीही नको, कॉफी घेईन म्हणून सांगितलं. अनघा म्हणाली, असे बोलता बोलता कांदेपोहे होतील, उगाच बाहेरचं कशाला. पण तो प्रसाद काही ऐकेना. रोज कशाला ते पोहे...मी छान केक ऑर्डर केलाय, त्यासोबत कोल्ड कॉफी येईल. तुम्ही दोघी बसा, पंधरा वीस मिनीटात येईल सर्व...म्हणून प्रसाद निघायची तयारी करु लागला. उगाच एवढा खर्च कशाला, म्हणून मी कुरबूर करु लागले, तर निघतांना म्हणाला, त्यात काय, फक्त


शंभर रुपये, घेतात, होम डिलिव्हरीचे....एवढ्यानं काय होतंय...म्हणत प्रसाद आम्हा दोघींना टाटा करुन घराबाहेर गेला.

त्याचा तो, फक्त शंभर रुपये...एवढ्यानं काय होतंय...हा डायलॉग पकडून आम्ही दोघी बसलो. तो गेल्यावर दोघींनीही त्याच्याच स्टाईलमध्ये पुन्हा तो डायलॉग मारला आणि डोक्यावर हात मारुन घेतला. अर्थात पुढचा सर्व गप्पांचा रोख या शंभर रुपयांवरच होता. अनघाचा लेक प्रसाद मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला आहे. कंपनीप्रमाणे पगारही मोठा आहे. अठ्ठावीस वर्षाच्या प्रसादच्या लग्नाची तयारी अनघा करतेय. त्याच्यासाठी मुली बघतेय, हे सांगतांना ती प्रसादच्या खर्चाबद्दल मात्र नाराजी व्यक्त करतेय. बचतीचं काही नावच नाही ग. नको तेवढे कपडे आहेत, तरीही बाहेर पडला तर एखादा नवी टीशर्ट घेऊनच येतो. ऑनलाईन शॉपिंगमध्ये सेल महोत्सव सुरु झाला की घरामध्ये रोज चार तरी वस्तू येतात. आठवड्यातून एकदा तरी हॉटेलिंग. खरंच काय गरज आहे ग याची, म्हणत, अनघानं सर्व गप्पांचा रोख याच नको त्या खरेदीकडे वळवला.  अनघाची लिस्ट संपत नव्हती. लेकाचा मोठा पगार ऐकून आम्हाला फार बरं वाटलं.  आता त्याच्या पगारातील एक टप्पा राखीव ठेवला तर त्याच्या लग्नाची तयारी करता येईल असा अनघाचा अंदाज होता. पण प्रसादनं पगार सुरु झाल्यापासून मोठ्या खरेदीची लिस्ट चालू केली आहे ती थांबायची नाव घेत नाही. पहिल्या पगाराचे कौतुक भारी, त्यामुळे पहिले काही महिने पार्टी आणि खरेदीमध्ये गेले. अनघाला आणि तिच्या पतीला हे


सुरुवातीचे दिवस फार चांगले वाटले. कारण तेव्हा भरपूर खरेदी होऊ लागली. तिच्यासाठी नव्या साड्या, वडिलांसाठी नवीन कपडे.  ट्रीप. असं सर्व होऊ लागलं. पहिल्या महिन्यात याचं अप्रूव वाटलं. मुलगा करतोय, याचंही कौतुक होतं. पण नंतर अनघानं आता काही घेऊ नको, तू पैसे साठव म्हणून प्रसादला सल्ला दिला. तोपर्यंत त्यानं नवा आयफोन घेतला होता. ऑफीसला जायला ट्रेनचा त्रास नको, गाडीनंच जातो, म्हणून त्यानं नवी चारचाकी घेतली. त्याचे हफ्ते पगारातून कट होऊ लागले. त्यानंतर तो त्या चारचाकीच्या मागे लागला. त्यात नको नको त्या सुविधा, त्याचा स्पिकर, लाईट आदी सर्वात त्याचा पगार सहज खर्च होऊ लागला. या सर्वात मग ऑफीसची पार्टी, कॉलेजच्या मित्रांचे आऊटींग असे सर्व सुरु झाले. अर्थात या सगळ्यात त्याचा भलामोठा पगार कुठल्याकुठे गायब होऊ लागला हे त्याला आणि अनघालाही कळत नाही.

या मुलांचा पगार एवढा आहे, म्हणून त्यांना पैशाची किंमत नाही का ग....हा तिचा प्रश्न माझ्या मनाचा ठाव घेऊन गेला. मध्यंतरी आम्ही लेकाकडे, गुरगांवला गेलो होतो, तेव्हाही हा नव्यापिढीचा अनुभव आम्हाला आलेला. काहीही हवं असेल तर त्याची ऑर्डर करायची. अगदी मिरच्या, कोथिंबीर ते पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याही. अरे राहूदे, आम्ही खाली जाऊन आणतो, हे सांगितलं तर, कशाला, सर्व घरपोच येतंय, त्यासाठी खाली जायची काय गरज, हे त्याचं उत्तर. या घरपोच वस्तूंसाठी दोनचार रुपये अधिक खर्च होतात, हे सांगितलं तर, तेवढ्यानं काही होत नाही, हे त्याचं स्पष्टीकरण. शेवटी दोन दिवसांनी आम्ही आमच्या नेहमीच्या पद्धतीनं सामानाची यादी आणि पिशव्या घेऊन बाजारात गेलो. आसपास असलेली दुकानं शोधून काढली आणि खरेदी करुन घरी आलो. अनघाला आमचा हा अनुभव सांगितला, तोपर्यंत प्रसादनं


आमच्यासाठी मागवलेला केक आणि कोल्ड कॉफी आली.  सहाशे रुपयांचं बील होतं, पाचशे रुपये खाद्यपदार्थांचे आणि शंभर रुपये होमडिलव्हरीचे. ते बील पाहून आम्ही दोघींनीही हसत डोक्याला हात लावला. या शंभर रुपयांमध्ये आठवडाभर पोहे करुन खाल्ले असते. म्हणत आम्ही परत गप्पांची बैठक जमवली. या सर्व गप्पांचा रोख त्या शंभर रुपयांवरच होता. पैशांची किम्मत हे शब्दच मजेशीर आहेत. हेच शब्द आम्ही दोघी एकावर एक अनुभव सांगतांना बोलत होतो. जेवढा पैसा आता हाती येत आहे, त्याहून अधिक मार्ग ते पैसे खर्च करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. क्रेडिट, डेबिट कार्ड सारखा भूलभुल्लैया हातात आहे, कधीही, केव्हाही, काहीही हे त्रिदेव ऑनलाईन खरेदीनं शक्य झाले आहे. यासर्वांचा विळखा या पिढीला कधी बसला आहे, हे त्यांनाही कळलेले नाही.

ही सर्व चर्चा करतांना ती कोल्ड कॉफी कधी संपली ते कळलं नाही, पण आमची दोघींचीही तगमग काही कमी झाली नव्हती. शेवटी अनघानं अगदी आलं टाकलेली अगदी घोटभर स्ट्रॉंग कॉफी केली, तेव्हा कुठे डोकं शांत झालं.  दर महिन्याला घरात ठराविक रक्कम द्यायलाच हवी, हे अनघा आता प्रसादला सांगणार होती. थोड्या जबाबदा-या टाकल्याच पाहिजेत, या वाक्यावर आम्ही दोघींनी आमची गप्पांची बैठक संपवली. आता तू माझ्या घरी ये, म्हणून मी अनघाचा निरोप घेतला, आणि लेकाला घरी गेल्यावर फोन करायला हवा, म्हणत माझ्या मनात खूणगाठ बांधली. 

 

 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. हल्ली ची मुलं खूप प्रॅक्टिकल आहेत. जगायचं फक्त आजच्या दिवसासाठी हे त्यांचं ध्येय वाक्य आहे. त्यांच्या परीने ते बचतही करतात .नाही असं नाही. मात्र आपल्या चष्म्यातून त्यांना न पाहणे उत्तम. म्हणजे ते सुखी आपण सुखी

    ReplyDelete
  2. खरं आहे. अलीकडे मुलांना काळानुसार बदलला पगार जास्त असल्यामुळे ते मनसोक्त खर्च करतातं पण बचतीचे महत्व त्यांना सांगायला हवे. विशेषतः मोबाईलच्या बाबतीत ही मुलं हयगय करत नाही.शॉपिंग कसलाही होते. पैशांची किंमत कमी होत चालली आहे.

    ReplyDelete
  3. आज सगळीकडे हीच parishthitee आहे . काळाचा महिमा. खुप सूंदर मांडणी

    ReplyDelete

Post a Comment