माझा oxygen
धो धो पडणारा पाऊस आणि मध्येच दिसणारी सूर्याची झलक... असा खेळ सुरू झाला की मन अस्वस्थ होतं. त्यातच श्रावण महिना जवळ येत असेल तर या अस्वस्थ मनामध्ये एकच विचार सुरू होतो आता गावानं हिरवी चादर ओढली असेल....रामेश्वराची पोखरण ओसंडून वाहत असेल.... श्रावण महिन्यासाठी गावातील मंदिरांची सजावट सुरू झाली असेल..... अर्थात अस्वस्थ मन गावच्या दिशेने धावू लागतं....चौल रेवदंडा हे आमचे गाव अत्यंत देखणे आणि निसर्गाचा वरदहस्त लागलेले....अशा गावाची आठवण यायला लागली की मन कशातच लागत नाही...यावेळी माझ्या अशा अस्वस्थ मनाचा ठाव नवऱ्याने अचूक घेतला आणि या तारखेला गावी जाऊया, म्हणून तारीख जाहीर केली. पण पावसाचं काय...पाऊस जास्त झाला तर....ही माझी शंका त्यानं, आला तर तेव्हा बघू. जायचं हे नक्की... या शब्दाच्या सिक्सरने उडवून लावली आणि माझे मन तरंगत आधीच गावी जाऊन पोहोचले...
रेवदंडा आणि चौल, या दोन गावांमध्ये माझे अवघे बालपण आनंदाने साजरे झाले....हा आनंद एवढा आहे की, आता तीस-पस्तीस वर्षापूर्वी गावापासून दूर झाले, तरीही एकही दिवस या गावच्या आठवणी आल्याशिवाय जात नाहीत. प्रत्येक सण समारंभ गावी कसा साजरा करत होतो ही आठवणी काढत साजरा होतो. प्रत्येक सणाच्या दिवशी गावी जसा बेत असायचा त्याचीच कॉपी करण्याचा प्रयत्न होतो....यातूनच मनातील गाव कायम हिरवेगार आहे. अशाच मनात श्रावण महिना जवळ आला की चलबिचल सुरू होते. कारण श्रावणामध्ये या गावांच्या सौंदर्याला अधिक बहर येतो. हिरव्यागार वनराई मध्ये रंगीबेरंगी फुलांची पेरणी होते. पावलोपावली असलेल्या मंदिरांमधून धुप अगरबत्तीच्या सुगंधामध्ये चाफ्याचा सुगंध मिसळून जातो...मंदिरासमोरच्या पोखरणी ओसंडून व्हायला लागतात... गावापासून चार तास लांब राहत असले तरी हे चित्र डोळ्यासमोर नेहमी तरंगत रहाते...अशाच माझ्या चित्राचा वेध घेत नवऱ्याने गाव जायचा बेत जाहीर केल्यावर मी हरखून गेले. गावी गेल्यावर चार ठिकाण तर हक्काचीच असतात. त्यातील पहिले घर म्हणजे आमच्या वार्डे गुरुजींचे. आता गुरुजी नसले तरी त्यांची उणीव कधीही न भासू देणारी पुढची पिढी आमच्यासाठी तेवढीच वंदनीय आहे. रमेश वार्डे म्हणजेच आमचा नाना आणि त्याची पत्नी हे आदर्श जोडपं. या घरात गेल्यावर कायम आपल्या हक्काच्या घरी आल्याचा भास होतो. दत्तमहाराज आणि वार्डे गुरुजींचे दर्शन झाल्यावर या दोघांबरोबर भरपूर गप्पा. जुन्या आठवणींची नव्यानं उजळणी. आमच्या प्रेमळ नानीचा जेवणाचा आग्रह आणि आमची घड्याळाकडे पाहून निघण्याची घाई. तासाभराच्या गप्पा आणि आशीर्वाद घेऊन मग आमचा मोर्चा वळला तो रामेश्वराच्या मंदिराकडे. रामेश्वर मंदिरासमोरची पोखरण काठोकाठ भरलेली. श्री रामेश्वर मंदिर हे पांडवकालीन. हे मंदिर जिथे आहे, ते चौल गाव प्राचीन काळी चंपावती नगरी म्हणून प्रसिद्ध होते. इथे सर्वत्र चाफ्याच्या फुलांची झाडे होती. त्यावरुनच चंपावती नगरी हे नाव या गावाला मिळाले. आता त्याचे चौल असे नवीन नामकरण झाले आहे. या गावाचे श्री रामेश्वर मंदिर म्हणजे वैभव आहे. मंदिराला ऐतिहासीक वारसा आहे.
त्याबद्दल अनेक कथा येथे सांगितल्या जातात. मंदिरातील पर्जन्य कुंड बघायला आणि त्याची कथा आजही ऐकली तरी अंगावर काटा येतो. या श्री रामेश्वर मंदिराला वैभव का म्हणतात, हे बघायचं असेल तर पावसाळ्यात मंदिराला नक्की भेट द्यायला हवी. काठोकाठ भरलेल्या पोखरणीत पोहणारे अबालवृद्ध आणि लाल-पांढ-या रंगात रंगलेले मंदिर. त्याच्या भोवताली हिरव्या रंगाची वेलबुट्टी. हे वर्णन कधीही शब्दात सांगता येणार नाही. या मंदिराच्या आवारात गेल्यावर आधी पोखरणीच्या समोरुन मंदिर डोळेभरुन बघून घ्यायचे. मग पोखरणीमध्ये उतरुन पाण्याशी खेळत मनातील सर्व निर्माल्य स्वच्छ करायचं आणि त्या धुतल्या मनानं मंदिरासमोरील भल्यामोठ्या नंदी महाराजांना नमस्कार करायचा, हा नेहमीचा क्रम. त्यानंतर तुळशी वृंदावनाजवळ डोकं टेकलं की मंदिरात प्रवेश करायचा. श्री रामेश्वराला वंदन केल्यावर मंदिरात थोडा वेळ शांत बसायचं. या मंदिराच्या वास्तुशास्त्राबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पावसाळ्यातच काय, पण भर उन्हाळ्यातही मंदिराच्या सभामंडपात बसल्यावर चांगलाच गारवा जाणवतो. हा गारवा अनुभवल्यावर मग बाहेर पोखरणीच्या काठावर असलेल्या दगडी बैठकांवर बसायचे. मंदिर परिसरातील दीपमाळांचे सौदर्य बघायचे की, पोखरणीतील माशांच्या गम्मती बघायच्या यात मी मग्न असतांना नव-यानं घड्याळ पुढे केलं. आता नाईलाज होता, पुन्हा एकदा त्या पोखरणीतील पाण्याचा थंडगार स्पर्श अनुभवून पुढच्या मुक्कामाला निघालो.
पुढचं ठिकाण म्हणजे, माझ्या प्रिय मैत्रिणीचे, डॉ. सीमा केदार ओक. वास्तविक डॉक्टर केदार ओक हा माझा वर्गमित्र. शाळेत असतांना आम्ही कधी बोलल्याचे आठवत नाही. पण शाळा सुटल्यावर आमची मैत्री अधिक पक्की झाली. आमच्या शाळेच्या दहावीच्या वर्गाचा ग्रुप तयार झाला आणि बालपणीचे खरे मित्र आणि मैत्रिणी नव्यानं मिळाल्या. केदार आणि सीमा हे दोघंही प्रसिद्ध डॉक्टर. दोघंही जेवढे प्रसिद्ध तेवढेच जमिनीशी घट्ट नाते ठेवणारे.
या त्यांच्या स्वभावामुळेच आमची मैत्री आता अधिक दृढ झाली आहे. ब-याचवेळा केदारला बाजुला ठेऊन मी आणि सीमा तासंनसास गप्पा मारत बसतो. याच दोघांना भेटायला जायचं म्हणजे, खास वेळ हवा, हे जाणून नव-याची घाई चालली होती. अर्थात तिथे आलेला अनुभव तसाच होता. केदारची ओपीडीला जाण्याची घाई होती. तरीही आम्ही आल्यावर त्यानं तासभराचा वेळ काढलाच. भरपूर गप्पा झाल्या. मग सीमाकडे सर्व सूत्र सोपवून केदार रवाना झाला आणि दुपारी साडेतीन वाजता आता निघतो, पुन्हा भेटूया म्हणून जड मनानं तिला निरोप दिला. काही माणसं ही मोठी असतात. त्यात पैशांच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती अधिक सरस असते. केदार आणि सीमा ही जोडी तशीच आहे. त्यांच्या प्रेमळ आग्रहापुढे नतमस्तक होत निरोप घेणं मोठ अवघड असतं. पण वेळेचं आणि प्रवासाचं गणित साधायच असतं. त्यामुळे तिथून निघून मग आमच्या भाऊचे घर गाठले. प्रकाश शेलार हा माझा मोठा भाऊ. दक्षा वहिनी आणि भाऊचे घर म्हणजे, माझ्या लहानपणीच्या आठवणींचा मोठा खजिना आहे. इथेच माझे बालपण गेले. या घरातील झोपाळ्यावर बसून कितीवेळा झोका घेतला असेल याची नोंद नाही. इथेच गणपती बाप्पाची आराधना केली आणि नवरात्रीमध्ये मोठ्यानं जोगवा म्हणत, देवीची पूजा केली. या भल्यामोठ्या घरासारखे भाऊ आणि वहिनीचे मनही मोठं. घरी गेल्यावर काय करु आणि काय नको, अशी वहिनीची धडपड. खाऊच्या डिश भरतांना थोडं तरी जेव म्हणून तिचा प्रेमळ आग्रह. खाऊच्या दोन पिशव्या भरुन ठेवल्यावरही तिचं समाधान नाहीच. अळू देते, लिंब घेऊन जा. पातीचहा घे, कडीपत्त्याची पानं घे, शमी हवी का....अशा तिच्या ऑफरवर ऑफर चालू असतात. मधूनच अशा घाईत कशाला येतेस, दोन दिवसांसाठी रहायला तरी ये, म्हणून प्रेमाचा आग्रहही होत असतो. या प्रेमाला निरोप देतांना मन जड होतं, पण कुठेतरी थांबायचंय...निघाचंय...ही जाणीव होत असते, आणि मग निघायची तयारी. निरोप देतांना वहिनी आणि भाऊचे आता पुन्हा कधी येणार हे शब्द मनात ठेऊन त्यांना निरोप देत आम्ही निघालो.
रेवदंड्याहून निघालो तेव्हा सायंकाळ झाली होती. मध्येच येणारा पाऊस आणि
हिरव्या वनराईनं नटलेला निसर्ग बघत परतीचा प्रवास झाला. वाटेत दोनवेळा ट्रॅफीक जाममुळे तासभर तरी थांबावं लागलं. पण त्याबद्दल कुठलीही तक्रार नव्हती. मन आता तृप्त झालं होतं. गावाहून परत येतांना सोबत वहिनीनं दिलेला खाऊ होता. नारळ होते. जायफळं होती. पण या सर्व भेटीपेक्षा मन अधिक सुखावलं होतं, ते आपल्या माणसांनी दिलेल्या भरभरुन प्रेमानं. त्यांच्या आगत्यानं आणि प्रेमानं एका वेगळ्या सुखाची जाणीव होत होती. हे सुख कधीही पैशानं विकत घेता येत नाही. त्यासाठी एक प्रेमळ गाव लागते, आणि त्यामध्ये आपल्याला जाणणारी, जपणारी आपली माणसं लागतात. देवाच्या कृपेनं असे माझे गाव आहे आणि त्यामध्ये श्रीमंत मनाची माणसं आहेत....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
मी 3 वर्ष गुहागरात होते.त्याची आठवण झाली.
ReplyDeleteगावाचे प्रेम, बालपणीच्या आठवणी, निसर्गरम्य लेखातील वर्णनामुळे चौल रेवदंडा व रामेश्वराची पोखरण कधी जाण्याचा योग येईल असे झाले आहे.
ReplyDeleteगावाचे प्रेम, बालपणीच्या आठवणी, निसर्गरम्य लेखातील वर्णनामुळे चौल रेवदंडा व रामेश्वराची पोखरण कधी जाण्याचा योग येईल असे झाले आहे.
ReplyDeleteNostalgic.
ReplyDeleteमाझा आवडतं ठिकाण. जाऊ पुन्हा एकदा
माझी मैत्रीण प्रांजली म्हात्रे चौलला रहाते. त्यामुळे २/३ वेळा तिथं जाणं रहाणं झालं आहे. तुझ्या लेखानी आठवणी मनात जाग्या झाल्या - ललिता छेडा
ReplyDeleteखूप छान लेख
ReplyDelete