अण्णांचा गणपती
मंदिरात गेल्यावर पहिल्यांदा नजर गेली ती अण्णांकडे. अण्णांचा चेहरा आनंदानं फुलला होता. मंदिरात त्यांची बसायची एक ठरलेली जागा होती, अण्णा तिथेच बसले होते आणि आसपासच्या मुलांना पेढे वाटत होते. आम्हाला बघितलं आणि अण्णांनी हसत आवाज दिला. मिठाईच्या बॉक्समधील पेढा आमच्या हाती दिला. देवाचे दर्शन नंतर घ्या, आधी हा प्रसाद घ्या...अण्णांच्या चेह-यावरील आनंदच सगळं सांगत होता. छान...अण्णांना हवे तसे बाप्पा शेवटी मिळाले...हो ना अण्णा....हा प्रश्न हसत विचारल्यावर अण्णा म्हणाले, मिळाले नाही, मी माझ्या नातवंडांनी हातांनी बाप्पांना तयार केलंय. मातीपासून...छान...छोटेसे बाप्पा तयार झालेत. तुम्ही दोघंही लक्षात ठेवा. बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आठवणीनं घरी या...असं म्हणत, अण्णांनी पुन्हा एक पेढा आग्रहानं दिला.
अण्णा. आमच्यासाठी एवढीच त्यांची आधी ओळख होती. आमच्या रोजच्या चालण्याच्या वाटेवर एक मंदिर आहे. त्याच मंदिरात आमची आणि अण्णांची ओळख झाली. अण्णा त्या मंदिरातील प्रमुख कार्यकर्ते. भाविकांची गर्दी वाढली की, त्यांची व्यवस्थित रांग लावणारे. देवाच्या गाभा-यात ठराविक भाविकांना सोडून सावकाश दर्शन घ्या, म्हणून सांगणारे. वयाची सत्तरी पार केलेले अण्णा मंदिरात सकाळी दहाच्या सुमारास येतात ते दुपारी एक वाजेपर्यंत असतात. नंतर चार वाजता अण्णा हजर होतात, ते अगदी नऊ, साडेनऊ पर्यंत ते मंदिरात असतात. गेल्या काही वर्षापासून आम्ही रोज मंदिरात जात असल्यामुळे अण्णांची आणि आमची ओळख झाली. सुरुवातीला अण्णा ओळखीचं हसायचे. मग आमची वेळ जरा चुकली की, विचारायला लागले. एखाद दिवस आम्ही गेलो नाही तर आवर्जून चौकशी करु लागले. असं होता होता, मंदिराच्या अन्य भाविकांसारखे ते आमचे लाडके अण्णा झाले. मंदिरात गेल्यावर पहिल्यांदा भिरभिरत्या नजरेनं त्यांना शोधायचे, आणि अण्णा दिसले की त्यांना हाक मारायची आणि मग देवाचे दर्शन घ्यायचे.
अण्णा बॅंकेत कामाला होते. तिथून निवृत्त झाल्यावर त्यांनी पाच वर्ष एका पतपेढीमध्ये काम केलं. अण्णांना दोन मुलं आहेत, आणि हे सगळं कुटुंब अजूनही एकत्र रहातं. अण्णा, नेहमी या भरल्या कुटुंबाचे कौतुक करतात. त्यांची पत्नी कायम तिच्या लाडक्या नातवंडांसोबत असते. अशात अण्णांनी या मंदिराच्या कार्याला स्वतःला वाहून दिलंय. अण्णांच्या भाषेत बोलायचं तर एवढी वर्ष नोकरी केली. कुटुंबाच्या गरजेसाठी घरातूनही सोसायट्यांची कामं केली. कधी सुट्टी घेतली नाही, की चारधाम केलं नाही. आता मात्र मुलांनी ही सर्व जबाबदारी घेतली आहे. मुलं चारधाम करा, तिर्थयात्रा करा...फारकाय युरोप फिरा...म्हणून मागे लागली आहेत. पण अण्णांचे मन आता कशातही नाही.
आपल्या घराजवळ राम आहे, तिथेच मला आराम आहे, असं त्यांचं बोधवाक्य आहे. त्यानुसार ते रोज मंदिरात येतात. मंदिराची साफसफाई करतात. पूजा करतात. आलेल्या भाविकांच्या रांगा लावतात. प्रसाद वाटतात. मंदिरात आलेल्या लहान मुलांना सांभळण्याची जबाबदारीही घेतात. त्यामुळेच अण्णा म्हणजे, मंदिरात येणा-या प्रत्येक भाविकाचा हक्काचा माणूस. हेच हसतमुख अण्णा गेल्या काही दिवसापासून नाराज होते. येणा-या जाणा-यांकडे चौकशी करत होते. तशीच आमच्याकडेही त्यांनी चौकशी केली, कुठे फक्त मातीचा गणपती बाप्पा मिळेल काय...या प्रश्नावर आम्ही आश्चर्यानं त्यांच्याकडे बघितलं. अहो अण्णा, हल्ली सर्व गणपती बाप्पा मातीचेच असतात, सर्व दुकानांत बोर्डही लिहिलेत तसे...पण अण्णांचे त्यावर समाधान झाले नाही. ते म्हणाले, तुम्ही निट बघत नाहीत. हल्ली गणपती बाप्पांना सजवण्याच्या नावावर ते पितांबर नेसवलं जातं. त्यांच्यावर हिरे, मोती आणि टिकल्या लावल्या जातात...तसे बाप्पा नको. मला अगदी साधे बाप्पा हवे आहेत. आमच्या नेहमीच्या मूर्तीकाराकडेही असेच सजवलेले बाप्पा आहेत. सगळ्यांना असेच बाप्पा आवडतात, असं त्यांनी सांगितलं. पण आम्हाला असे बाप्पा नको. साधेसे बाप्पा हवे आहेत, ते कुठे असतील तर नक्की सांगा. अण्णांनी हे सांगितल्यावर आम्ही पुन्हा आश्चर्यचकीत झालो. अहो अण्णा, आपल्या घरी येणारा बाप्पा छान, सजवलेला असावा, असं सर्वांनाच वाटतं, म्हणून त्यांना पितांबर नेसवलं जातं. त्यांच्यावर हि-यांच्या दागिन्यांची सजावट करण्यात येते. तुम्हाला असे छान बाप्पा का नको, असा प्रश्न विचारल्यावर अण्णांनी आम्हाला हात धरुन एका बाजुला बसवले आणि पहिला प्रश्न विचारला, सांगा गणपती बाप्पाची स्थापना आपण का करतो. अर्थातच आपल्या घरातील सुख समृद्धीसाठी, हे आमचं उत्तर. बरोबर. अण्णांनी शाबासकी दिली. पण फक्त आपल्या घरातील सुख समृद्धीसाठी बाप्पा आपल्या घरी येतो का...हा प्रश्न विचारुन अण्णांनी त्यांच्या नजरोतील गणेशोत्सवाचे आम्हाला दर्शन घडवले.
गणपती बाप्पा हा आपल्या घरी पाहुणा म्हणून येतो, आणि आपल्या घरासह निसर्गाला भरभराटीचा आशीर्वाद देऊन जातो. बाप्पा घरी आले की पाहुणे, मित्रपरिवार यांचा गोतावळा जमतो. घरी गोडधोडाचे प्रकार होतात. एकत्र आरती म्हटली जाते. गप्पा होतात. कुटुंब भेटते. आत्ताच्या युगात कुटुंबाला एकत्र आणण्याचे असे प्रसंग फार कमी झाले असतांना बाप्पाच्या निमित्तानं ही एकी साधली जाते. मग येतो तो बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस. या दिवशी सगळे बाप्पांचे तलावात, नदीमध्ये विसर्जन करतात. या बाप्पांना ज्या मातींनं घडवलं असतं, ती माती मग काही दिवसांनी नदीच्या काठाला लागते, आणि तिचा उपयोग शेतीसाठी होतो. हेच तर गणपती उत्सवाचे खरे गमक आहे. गणपती बाप्पा हा निसर्गाचा देव आहे. तो मातीपासून तयार होतो, आणि मातीमध्ये सहज मिसळला जातो. पण आत्ता बाप्पा तसे तयार होतात का....बाप्पाला सजवण्यासाठी त्याच्यावर काय काय कलाकृती होत आहेत. बाप्पांना अलिकडे पितांबर नेसवले जाते. तसेच त्यांच्या अंगावर हि-यांची नक्षी काढली जाते. हे सर्व बाप्पांचे विसर्जन करतांना त्या पाण्याच्या प्रवाहात जाते. त्याचे विघटन होत नाही, तर तो कचरा ठरतो, आणि त्याचा निसर्गाला त्रास होतो. ही साधी गोष्ट बाप्पाची पूजा करणा-यांना आणि त्यांना घडवणा-यांना कळत का नाही....याच प्रश्नांने अण्णांना त्रस्त केलं होतं. ते दरवर्षी ज्या ठराविक कलाकाराकडून बाप्पा घेत होते, त्यांनीही यावर्षी सगळ्यांची मागणी अशाच सजवलेल्या गणेशमुर्तींची आहे, असं सांगून हिरे, मोती यांनी सजवलेल्या गणेशाला घडवलं होतं. त्यामुळे अण्णा अस्वस्थ झाले होते. माझ्या घरातील बाप्पांमुळे निसर्गाची हानी झाली, हे मला सहन होणार नाही, हा अण्णांचा सरळ आणि साधा मुद्दा होता. यावर तुमच्याकडे काही उपाय आहे का, हा प्रश्न विचारल्यावर मी अण्णांना एका कलाकाराचा नंबर दिला. मातीचे गणपती घडवण्याची कार्यशाळा हा कलाकार आयोजित करत होता. अण्णांना नंबर देऊन आम्ही मंदिराबाहेर पडलो आणि डोळस झालो. आजुबाजुला असलेल्या गणपती मुर्तींकडे त्याच डोळसपणानं पाहू लागलो, तेव्हा
अण्णा का त्रस्त झाले आहेत, हे जाणवलं, कारण बहुतांशी गणपती मुर्तींना पितांबर नेसवण्यात आलं होतं, आणि त्यांना सजवण्यासाठी कितीतरी हिरे, आणि रंगीत काचा लावण्यात आल्या होत्या. आता या सर्वांचे बाप्पांसोबतच विसर्जन होणार होते. एकूण काय, गणेशोत्सवाच्या मुळ उद्देशापासून आपण दूर होत होतो.
इकडे अण्णांना जो फोन नंबर दिला होता, त्या
कलाकारासोबत अण्णांनी लगेच संपर्क साधला. त्यांना त्यांच्या मनातील गणेशाची
प्रतिमा सांगितली. त्या कलाकारांनी त्यांना आनंदानं त्यांच्या कार्यशाळेत बोलावलं.
अण्णा एकटेच गेले नाहीत, तर सोबत नातवंडांना घेऊन गेले. चार नातवंडं आणि अण्णा अशा
पाच जणांनी मिळून मातीचे गणपती बाप्पा घडवले आणि त्यांना आनंदानं घरी आणलं. आता
सर्वजण याच बाप्पांची स्थापना करण्यासाठी घर सजवत होते. अण्णांनी ही सर्व गम्मत
सांगून आम्हाला गणपती बाप्पांच्या उत्सवासाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले.
मंदिरातून निघत असतांना पुन्हा अण्णा मागे आले, आता काय झालं अण्णा, असं
विचारल्यावर म्हणाले, तुला माहित आहे ना...आमच्याकडे बाप्पांना ती कुठलिही प्लॅस्टिकची
फुलं आणायची नाहीत. आणलीस तर खरी फुलं आण, नाही आणलीस तरी चालतील...आणि मिठाई पण
नको....आम्ही खिरापत करतो....अण्णांच्या या प्रेमळ सुचनेवर आम्ही दोघांनीही
त्यांना हसत नमस्कार केला...आणि मंदिराच्या बाहेर पडलो.
घराकडे येतांना आसपासच्या दुकानांवर नजर टाकली. ही दुकानं पुजेच्या सामानानं सजली होती. प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा होत्या. त्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालणा-या वायर्सची जास्वंद आणि चाफ्यांची फुलं तर सर्वत्र डोकावत होती. हे सर्व बघतांना आमच्या मनात अण्णांचे वाक्य पुन्हा पुन्हा येत होतं...आपले सर्व सण हे निसर्गाचे आहेत....निसर्गाला जोपासणारे आहेत....आत्ता हेच सण साजरे करण्याची पद्धत बदलत आहे....यामुळे आपण निसर्गाला ओरबडायला सुरुवात केली आहे....आत्ताच जागे झालो नाही तर आपल्या पुढच्या पिढीला आपण वाळवंटात लोटणार आहेत....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Comments
Post a Comment