स्टिंगरे...निसर्गाच्या कुशीतील निवांत कोपरा

 

स्टिंगरे...निसर्गाच्या कुशीतील निवांत कोपरा


गेल्या आठवड्यात किमान चार महिन्यांसाठीचे टॉनिक मिळाले. निमित्त झाले ते आमच्या हम पाच या ग्रुपच्या पिकनीकचे. मी, अंजली, निर्मिती, कुंतल आणि उमा असा आमचा पाचजणींचा ग्रुप. मुलांच्या खेळाच्या निमित्तानं आम्ही एकमेकींना भेटलो आणि पक्क्या मैत्रिणी झालो. आता आमची मुलं शिक्षणाच्या आणि नोकरीच्या निमित्तानं दूर गावी आहेत. आणि इकडे आम्हा आयांची मैत्री अधिक पक्की झाली. ठराविक महिन्यांची आम्ही एकमेकींना भटतो, भरपूर गप्पा मारतो, सुख-दुःखाच्या गोष्टी करतो...दिवसभराचा हा कार्यक्रम. दोन किंवा तीन महिन्यांनी होणारी ही भेट कोणाच्यातरी घरी किंवा एखाद्या फार्महाऊसवर होते. यावळेची आमच्या होणा-या भेटीची तारीख आणि स्थल दोन महिन्यापूर्वी निश्चित झालं होतं. अंजलीने एक स्थळ सुचवलं, आणि आम्ही त्याला लगेच होकार दिला.  आम्हाला फार लांब नसलेले फार्म हाऊस हवे होते. शिवाय तिथे जाण्यासाठी ट्रेनचा पर्याय हवा होता. अर्थातच या सर्वात सुंदर निसर्ग आणि आमच्यासाठी निवांत जागा. या सर्वासाठी Stingray Woods, अवसरे, नेरळ हे अगदी परफेक्ट असल्याची खात्री या फार्महाऊसचे, विकास मोरे यांनी दिली. डोंबिवली स्टेशनपासून अगदी तासाभरनं स्टिंग रे वर पोहचलो आणि या फार्महाऊस बांधणीतील कल्पकता बघून हरखून गेलो. झाडांचा ताळमेळ साधत बांधलेल्या या फार्महाऊमागे विकास मोरे यांचे आणि निसर्गाचे घनिष्ट नाते आहे. फार्महाऊस बघतांना मोरे यांच्या या नात्याची माहितीही होत गेली.


महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू झाला. या तारखेनं आणि कोरोनानं अनेकांच्या जीवनात उलथापालथ केली. विकास मोरे यांच्याही आयुष्यात या कोरोनानं मोठा बदल घडवून आणला. मुळ साता-याचे असलेले विकास मोरे बी. कॉम केल्या वर मुंबईला आले. तळोजा येथील एका केमिकल कंपनीमध्ये त्यांना नोकरी मिळाली. सुरुवातीला ते वरळीला रहात होते. शिक्षिका असलेल्या विजया मोरे यांच्याबरोबर लग्न झाल्यावर ते डोंबिवलीत आले. लग्नानंतर २५ वर्ष डोंबिवलीमध्ये ते मुक्कामी होते. नवरा बायको आणि दोन मुली, अशा चौकोनी कुटुंबातील विकास मोरे यांना त्यांच्या गावाची आठवण कायम यायची. गावमध्ये रहाण्यासारखा अनुभव घेता यावा आणि तो पर्याय रहात्या घराजवळ असावा, या उद्देशानं त्यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येणा-या नेरळमध्ये एक फ्लॅट घेतला. नेरळ डोंबिवलीपासूनही जवळ. प्रवासासाठी ट्रेनचा पर्याय. शिवाय नेरळ हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार आहे. माथेरानला जाणारी टॉय ट्रेन सुद्धा नेरळ रेल्वेस्थानकातूनच सुटते. नेरळलाही निसर्गाचे वरदान लाभलेले. त्यामुळे सेकंड होम असलेल्या नेरळमधील हा फ्लॅटवर मोरे कुटुंबासह सुट्टीमध्ये वास्तव्यास जात असत. पण कोरोनामध्ये लॉकडाऊन लागला, आणि अवघं जग आपापल्या घरात कैद झालं. इथे मोरेंची घुसमट सुरु झाली. सिमेंटच्या चार भिंतीमध्ये चोवीस तास आपण राहू शकत नाही, याची त्यांना जाणीव झाली. अशावेळी आपल्या सेकंड होमचा पर्याय त्यांना योग्य वाटला

आणि त्यांनी नेरळमधील फ्लॅटवर कुटुंबाला नेले. अर्थात सर्व जग घरी असलं तरी स्वतः मोरे आपल्या नोकरीनिमित्त तळोजाला जात होते. त्यांची केमिकल कंपनी होती, त्यामध्ये सॅनिटायझर बनवण्याचा काम होतं. कोरोनामध्ये सॅनिटायझर हे दुस-या औषधासारखे झाले होते, त्यामुळे मोरे यांची कंपनी चालू होती. नेरळ-तळोजा-नेरळ या प्रवासाठी त्यांना चार तास लागलायचे. या सर्व प्रवासात त्यांनी यापुढे नेरळमध्ये कायमचे रहायचे हे पक्कं केलंच शिवाय एखादी छोटीशी जमिन घेऊन त्यावर फार्महाऊस बांधायचे आणि भाज्यांची लागवड करायचा विचार त्यांना आला. त्यासाठी मग त्यांनी नेरळमध्ये पायपीट सुरु केली. सकाळी लवकर उठून अवघं नेरळ त्यांनी पालथं घालायला सुरुवात केली. अशातच त्यांना अवसरे गावातील जागा आवडली. येथेच अवसरे हे छोटं धरणही आहे. शेतीची जागाही चांगली होती. मोरे यांनी ही जागा विकत घेतली.

जागा विकत घेतल्यावर सुरुवातीला अगदी छोटे घर बांधले. जागेची स्वच्छता केली. झाडाझुडपांची काटछाट केली. त्यानंतर या जागेच्या सौदर्यात अधिक भर पडली. पावसाळ्यात हिरवाईची चादर तर थंडीमध्ये धुक्याचे पांघरुण...उन्हाळ्यामध्ये घराच्या आसपास असलेल्या जांभळाच्या आणि आंब्याच्या झाडावरची दौलत एवढी की गरमीच्या झळाही अंगाला कधी लागल्या नाहीत. अगदी सुरुवातीला या घरामध्ये लाईटची सोयही नव्हती. तेव्हा मोरे सकाळी नऊ वाजता तेथे यायचे आणि संध्याकाळी पुन्हा आपल्या फ्लॅटवर परतायचे. लाईटची सोय झाल्यावर आपल्या मित्रांना त्यांनी या फार्महाऊसवर बोलवायला सुरुवात केली. मित्रांना ही जागा आणि आजुबाजुची निसर्ग संपदा आवडायला लागली. त्यांनी पसंतीची पावती दिल्यावर विकास मोरे यांनी आपल्या साध्या घराचे फार्महाऊसमध्ये रुपांतर करायला सुरुवात केली. हे करतांना या जागेतील कुठल्याही वृक्षाला पाडायचे नाही, हे त्यांनी निश्चित केले. त्यामुळे या फार्महाऊसमधील अनेक भागांमध्ये अगदी सहजपणे एखाद्या मोठ्या आंब्याच्या वृक्षाचा भाग दिसून येतो.  कोरोनाचा काळ हा


आपल्या सर्वाधिक सुखाच्या दिवसांपैकी एक होता, असे विकास मोरे सांगतात. कारण त्याच दरम्यान त्यांच्या स्टिंग रे या फार्म हाऊसची उभारणी झाली. आपल्या फार्महाऊसमध्ये येणा-या पाहुण्यांना निसर्गाचा सहवास लाभला पाहिजे, यासाठी त्यांनी अभ्यास सुरु केला. मुळात ते एक खेळाडू आहेत, अनेक मॅरोथाँनचे त्यांनी आयोजन केले आहे. त्याचा फायदा त्यांना या फार्म हाऊसच्या उभारणीत झाला. सकाळी लवकर उठून त्यांनी या फार्महाऊसच्या आसपास फेरफटका सुरु केला. अगदी माथेरानच्या डोंगरापर्यंत ते चालत जात. स्टिंग रे वर आलेल्या पाहुण्याला ट्रेकींगचा आनंद घेता यावा म्हणून अनेक नव्या वाटा शोधल्या. स्टिंग रे पासून माथेरानच्या कड्यावरच्या गणपतीचा त्यांचा अनोखा ट्रेक हा याच शोधाचे फलित. सोबत आसपासच्या आदिवासी पाड्यांमध्येही ते आपल्या पाहुण्यांना नेऊ लागले. या सर्वात मोरे यांच्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे, फार्महाऊसमध्ये येणा-या पाहुण्यांना मिळणारे जेवण हे शहरी जेवणापेक्षा वेगळं हवं. यासाठी त्यांनी आसपासची शेतजमिन घ्यायला सुरुवात केली. भातशेती झाल्यावर खाली होणारी जमिन विकास मोरे घेतात. या जमिनीवर वांगी, भेडी, पालक, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो यासह सर्व प्रकारच्या फळभाज्यांची, कलिंगड, काकडी यांची लागवड करायला सुरुवात केली. फार्मवर येणा-या पाहुण्यांनी शेतीतून थेट ताटात येणा-या या भाज्यांची चव आवडायला लागली. सर्व जेवण चुलीवर होत असल्यामुळे त्याच्या चवीत भर पडली. अशाप्रकारे स्टिंग रे फार्महाऊस स्थापित होत असतांना मोरे यांच्यापुढे नोकरी करायची की पूर्णवेळ या फार्महाऊससाठी द्यायचा हा प्रश्न उभा राहिला. त्यांनी आपल्या मित्रपरिवाराचा सल्ला घेतला. जाणकारांना विचारले. यातून त्यांनी एक निष्कर्ष काढला, तो म्हणजे, आपण आता निसर्गाशिवाय राहू शकत नाही. पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण आयुष्यात समाधान मोठं आहे, आणि हे समाधान निसर्गाच्या सानिध्याशिवाय कुठेही मिळू शकत नाही, याची जाणीव झाल्यावर त्यांनी आठ वर्ष आधी नोकरीचा राजीनामा दिला.

पूर्णवेळ फार्महाऊसचा विकास करतांना त्यांनी देशभरातील फार्महाऊसचा


अभ्यास सुरु केला. त्यातून केरळ राज्यातील वायनाडमध्ये जंगलातीला टेन्ट नाईटचा प्रयोग त्यांना आवडला. मोरे यांनीही हा प्रयोग आवडला. त्यांनी आपल्या फार्महाऊसच्या आसपास असलेल्या जंगलामध्ये असे टेन्ट उभारायला सुरुवात केली. परदेशातील नावाजलेल्या कंपनीचे टेन्ट घेतले. उंच झाडावर हे टेन्ट बांधण्यात येतात. रात्रीच्या वेळी ज्यांना जंगलाचे निरिक्षण करायचे आहे, अशा जंगलवेड्या ट्रेकर्ससाठी ही टेन्ट नाईट एक सुवर्णसंधी ठरली. या भागात ससे, रान डुक्कर यांचा वावर आहे. रात्रीच्या वेळी टेन्टमधून या प्राण्यांचा वावर बघता येतोच शिवाय टेन्टमधून आकाशातील ता-यांचे विलोभनीय दर्शनही घडतं.

स्टिंग रे फार्महाऊसचा विकास असाच एकएक टप्प्यातून मोरे यांनी केला आहे. त्यासाठी आसपास रहाणा-या आदिवासी बांधवांचीही मदत घेतली आहे. त्यांच्या मदतीनं त्यांनी फार्महाऊसच्या आजूबाजूला पायवाटा शोधून काढल्या. त्यातून फार्महाऊसवर आलेल्या पाहुण्यांना डॅमजवळील गावांचाही फेरफटका मारता येतो. पावसाळ्यात येथील धबधब्यामध्येही मनसोक्त भिजता येते. डॅममध्ये बोटींगचा आनंद घेता येतो. फार्महाऊसवर आलेल्या शहरी पाहुण्यांना असं फिरायचं नसेल तर अशा पाहुण्यांसाठी फार्महाऊसवर मोठा स्विमींग पूल बांधला आहे. शिवाय खेळाची विविध साधने उपलब्ध करुन दिली आहेत. सकाळी नाष्टा, दुपारा जेवण आणि संध्याकाळी चहानाष्टा असा दिवसभराचा मेनू असतो. ज्या पाहुण्यांना रात्री रहायचे आहे, अशांसाठी कॅम्पफायरही ठेवले जाते. काही अस्सल खवय्ये असतात. पावसाळ्यात अशा खवय्यांना रात्री घेऊन मोरे खेकडे पकडतात. मग याच खेकड्यांची मेजवानी पाहुण्यांना चाखता येते.


एकूण काय जेव्हा अवघं जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं होतं, तेव्हा काहीजणं स्वतःचं स्वप्न पूर्ण करीत होते. या मुठभर लोकांमध्ये विकास मोरे या निसर्गप्रेमींचा समावेश होता.  शहरातील बंद घरात रहायला नको, म्हणून त्यांनी गावातील शांतता निवडली. या शांततेत अवघं जग सामावलं होतं. मोकळं आकाश होतं. भाताची दूरवर पसरलेली शेतं होती. पहाटे होणारी कोंबड्याची बांग आणि त्यासोबत असंख्य पक्षांचा किलबिलाट होता. डोळ्याला सुखावणारी असंख्य फुलझाडं होती, आणि त्यावर  बागडणारी फुलपाखरं होती. मोरे यांना या शांततेचा मोह पडला. त्यात त्यांना त्यांचं बालपण मिळालं. आणि मग आपलं हे सुख त्यांनी इतरांनाही सहभागी करायला सुरुवात केली. त्यालाच त्यांनी Stingray Woods - An Eco Camp असे नाव दिले आहे. विकास मोरे यांच्या मते, या फार्महाऊसमधील जीवन म्हणजे, निसर्गानं दिलेलं वरदान आहे. हे वरदान किती लाभदायी आहे, याचा अनुभव आम्ही पाच मैत्रिणींनी घेतला आहे. तुम्हीही जेव्हा शक्य होईल तेव्हा जरुन घ्या....त्यासाठी अधिक माहितीसाठी विकास मोरेStingray Woods, अवसरे, नेरळ, 7977875816 येथे संपर्क साधावा.

 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. संकट ही "विकासा"ची संधी असते असे गीतेत सांगितले आहे,त्याचे प्रत्यंतर आले!! अर्थात तसे विवेकी मन असायला हवे!!
    खूप छान माहिती,जायलाच हवे एकदा!!

    ReplyDelete

Post a Comment