अण्णांचे बाप्पा आणि जेन अल्फा
गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करीत आम्ही अण्णांच्या घरच्या बाप्पाला नमस्कार केला. अण्णा आणि त्यांच्या नातवंडांनी बनवलेल्या त्या बाप्पाचे रुप अगदी साजीरे होते. गणरायाला जास्वंदीच्या फुलांचा हार घातला होता, तर त्याच्या डोक्यावर दुर्वांची जुडी होती. अण्णांचे अवघं कुटुंब गणरायाच्या सेवेत व्यस्त होतं. त्यांच्या सुना नैवेद्याचे मोदक तयार करीत होत्या. नातू आणि मुलं आल्या-गेल्या पाहुण्यांचे स्वागत करुन त्यांना प्रसाद देत होते. अण्णा आणि त्यांच्या पत्नी या सर्वात कुटुंबप्रमुखांची जबाबदारी पार पाडत होते. आपल्या नातवंडांनी गणपती बाप्पा कसे तयार केले, त्यांची प्राणप्रतिष्ठा कशी केली याचं भरभरून कौतुक करत होते. आमच्या हाती प्रसादाचा लाडू देत अण्णांनी हळूच एक लिफाफा सरकवला. त्या लिफाफ्याकडे पाहून अण्णांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. तर त्यांनी तो लिफाफा उघडून तर बघ, म्हणून सांगितलं. बहुधा त्यांच्या नातवंडांनी आणि अण्णांनी घरीच केलेला तो लिफाफा होता. त्यामध्ये एका कागदावर एक आमंत्रण पत्र लिहिलं होतं. आता हे काय नवीन म्हणून ते आमंत्रण वाचलं. वाचल्यावर पुन्हा प्रश्नार्थक नजरेनं अण्णा आणि त्यांच्या पत्नीकडे बघितलं. एव्हाना त्यांच्या नातवंडांनी आम्हाला गराडा घातला होता. अण्णा म्हणाले, बघ, शक्य झालं तर नक्की ये....आपण नेहमी या पिढीला दोष देतो ना...पण त्यांना या उत्सवाचं महत्त्व आपण सांगितलं आहे का...मग तो दोष त्यांचा नाही तर आपला आहे...आता या दोन पिढ्या
एकत्र येऊन यावर उपाय करायला पाहिजे, म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. अगदी घरची मंडळी आणि मित्रपरिवार आहे, तुम्ही दोघांनी नक्की यावं असं आम्हाला वाटतं. असा अर्जव अण्णांनी केल्यावर आम्ही एकमेकांकडे पाहिलं, आणि पुढच्या क्षणी अण्णांचे आमंत्रण स्विकारलं.
गणपती बाप्पाच्या उत्सवाचा पहिला दिवस म्हणजे अगदी गडबडीचा. ज्यांच्या घरी दीड दिवस बाप्पांचा मुक्काम असतो
त्यांची एक मोठी लिस्ट घेऊन आम्ही सकाळीच घराबाहेर पडलो. दुपारी दोन अडीच नंतर घरी आल्यावर घरच्या
बापाला नैवेद्य आणि थोडा आराम करून पुन्हा संध्याकाळी सोसायटी मधील गणपती
बाप्पांचे दर्शन. हे सगळं करून घरी साडेआठ ते नऊ च्या
सुमारास आलो. अगदी घाई घाईनं जेवण करून रात्री
साडेदहाच्या सुमारास अण्णांच्या घरी गेलो.
सकाळी अण्णांच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांनी एक आमंत्रण दिलं होतं. सोबत अण्णा आणि त्यांच्या पत्नीने प्रेमळ आग्रह करत अगदी थोडा वेळ
काढा आणि या आमच्या अनोख्या उपक्रमात सहभागी व्हा म्हणून आग्रह केला होता. तुम्हाला उत्सुकता वाटली असेल ना, की त्या आमंत्रणात काय होतं, ते आमंत्रण म्हणजे, गणपती उत्सव आपण नेमका का साजरा करतो हे सांगणाऱ्या व्याख्यानाला ऐकण्याचा एक सोहळा होता. गणपती उत्सव का साजरा करतो, हे शास्त्रीय पद्धतीने सांगणाऱ्या काही व्याख्यात्यांची व्याख्याने, अण्णांनी ऐकली होती. तीच व्याख्याने अण्णा youtube च्या माध्यमातून आपल्या नातवंडांपर्यंत पोहचवत होते. पण फक्त आपल्या नातवंडांनाच का, आपल्या स्नेहीजनांच्या मुलांना, नातवंडांनाही ही माहिती मिळाली पाहिजे, म्हणून अण्णांनी घरी एक छोटासा जागरणाचा कार्यक्रम ठेवला. या जागरणामध्ये हे सगळे माहिती देणारे व्हिडिओ अण्णा सर्वांसोबत पुन्हा बघणार होते. त्यानिमित्ताने घरी बालगोपाळ येणार होते. अगदी दोन तासांचा हा छोटासा कार्यक्रम होता. हे माहितीपर व्हिडिओ सगळ्यांनी एकत्र बघायचे आणि मग त्याच्यावर चर्चा करायची असे स्वरूप अण्णांनी ठेवले होते. त्यानंतर भेळ आणि मसाला दूध.
आम्हा दोघांनाही संकल्पना खूप आवडली. त्यामुळेच दिवसभर बरीच धावपळ झाली असली तरी रात्री साडेदहाच्या सुमारास अण्णांच्या घरी गेलो तेव्हा अवघे घर पाहुण्यांनी भरलं होतं. बहुदा आम्ही शेवटचे आमंत्रित होतो. आम्ही गेल्यावर अण्णांनी लगेच थोडक्यात हा सोहळा का ठेवला आहे याची माहिती दिली. गणपती बाप्पाची पूजा का केली जाते, कशी केली जाते, बाप्पाला कुठल्या पत्री का वाहतात, बाप्पाला मोदक का आवडतात, ऋषिपंचमी म्हणजे काय, गौराई कोण आहे, गणपती उत्सव आणि शेती याचे काय नाते आहे....अशा सगळ्या विषयांची माहिती देणारे छोटे छोटे व्हिडिओ अण्णांनी एकत्र केले होते. तासभराचे हे व्हिडिओ बघताना अण्णांनी सगळ्यांना आपले मोबाईल बाजूला ठेवण्याची विनंती केली. सुरुवातीला काही मुलांनी कुरबुर केली पण
अण्णांनी पुन्हा एकदा प्रेमाने विनंती केली आणि सगळ्यांचे मोबाईल एका मोठ्या परातीमध्ये जमा झाले. मग पुढचा सव्वा तास हे माहितीपर व्हिडिओ आम्ही सगळ्यांनी एकत्र बघितले. व्हिडिओ बघितल्यावर आता खरी गंमत सुरू झाली. आलेल्या तरुण मुलांनी या माहितीबद्दल आश्चर्य व्यक्त केले, आम्हाला गणेशोत्सवाचा हा खरा हेतू माहितीच नव्हता. गणपती बाप्पाची पत्री एवढी महत्त्वाची का आहे, त्याचे आरोग्यदायी किती फायदे आहेत हे माहिती नसल्याचे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले. त्यांच्या पालकांनीही मग एक पाऊल पुढे टाकले. आमच्या मुलांना माहिती नाही, कारण आम्ही त्यांना अशी माहिती दिली नाही, पण आता हा अण्णांनी केलेला उपक्रम आम्ही आमच्याही घरी करणार, म्हणत त्यांनी अण्णांचे मनापासून धन्यवाद मानले. त्यानंतरच पुढचा तासभर या सगळ्या व्हिडिओवर चर्चा झाली. चर्चा रंगलेली असतानाच अण्णांच्या सुनांनी आत भेळ तयार केली आणि मसाला दुधाचे ग्लास भरले. हा खाऊ पुढे आला तेव्हा कुठे आम्हाला रात्रीचे सव्वा बारा वाजले असल्याची जाणीव झाली.
मसाला दुधाचा आस्वाद घेता घेता अण्णांनी आलेल्या सगळ्यांचे आभार मानले. त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गणेशोत्सवाच्या आठवणी सांगितल्या. तेव्हा सार्वजनिक गणपती उत्सवामध्ये मान्यवरांची व्याख्याने होत असत. अण्णांचे वडील त्या व्याख्यानाला आवर्जून घरातील सगळ्यांना घेऊन जात. गणपती उत्सव म्हणजे मान्यवरांची व्याख्याने ऐकण्याची संधी असायची. पण हळूहळू गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत गेले आणि या उत्सवाच्या आयोजनामागचा खरा हेतू हरवल्याची खंत अण्णांना जाणवत होती. घरात नातवंड बागडू लागली तेव्हा ही खंत अधिक वाढली. आपल्या संस्कृतीची माहिती या नव्या पिढीला कशी देता येईल याची शोधाशोध मग त्यांनी सुरू
केली. त्यातून काही मान्यवरांची व्याख्याने त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली. मग आपल्या नातवंडांना ही व्याख्याने अण्णा ऐकवू लागले. अशात गणपती उत्सवात आपल्या नातवंडांच्या मित्रांनाही ही माहिती मिळाल्यास अजून जागरूकता निर्माण होईल, हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्याने आम्हा सगळ्यांना एकत्र केलं होतं.
अण्णांचा हा विचार एवढा फलदायी ठरला की पुढच्या अगदी पंधरा ते वीस
मिनिटात असेच छोटे छोटे कार्यक्रम आता पुढे कोणाच्या घरी होणार याची लिस्ट तयार
झाली. येणारी नवरात्र ते अगदी कोजागिरी
पौर्णिमा सुद्धा बुक झाली.
ही चर्चा होत असताना मी अण्णांच्या
चेहऱ्याकडे बघत होते, अण्णा आणि त्यांची पत्नी एका बाजूला
बसून सगळं ऐकत होते.
एक आगळे समाधान त्या दोघांच्याही
चेहऱ्यावर होते. कुठलिही पिढी वाईट किंवा चांगली आहे, हे
तराजूतमध्ये तोलता येत नाही. आपण
आपल्या भावी पिढीच्या हातात काय वारसा देतो यातूनच ती पिढी घडते. हा वारसा देताना आपल्या मध्ये आपण किती सजग
आहोत हे जाणणं गरजेचं आहे हेच आम्ही त्या दिवशी अण्णांकडे शिकलो...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
नवीन पिढीला खूप प्रेरणादायी आणि छान शिकवणारा उपक्रम अण्णांनी केला आहे तू तो वारसा तुझ्या लिखाणामुळे निश्चित उल्लेखनीय झाला आहे.... ललिता छेडा
ReplyDeleteखूपच छान विचार या कथेतून मांडला आहे!! दोष देण्या ऐवजी,खंत करण्याऐवजी आपल्या हातात आहे ते करणे,हीच खरी संस्कृती,हाच खरा विवेक!!
ReplyDeleteआण्णा व त्यांच्या धर्मपत्नी हे गृहस्थ पुढच्या पिढीसाठी टिळक आहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही. धर्म, संस्कृती, परंपरा, एकोप्पा, सर्व जाती-धर्माचे एकत्रीकरण व बंधुभाव यातून निश्चितच वृंदीगत होईल. आण्णाचा उद्दिष्ट आपण आपल्या लेखणीतून इतरांपर्यंत पोहोचवून निश्चितच या उद्देशाला हातभार लावला आहे.
ReplyDeleteआण्णा व त्यांच्या धर्मपत्नी हे गृहस्थ पुढच्या पिढीसाठी टिळक आहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही. धर्म, संस्कृती, परंपरा, एकोप्पा, सर्व जाती-धर्माचे एकत्रीकरण व बंधुभाव यातून निश्चितच वृंदीगत होईल. आण्णाचा उद्दिष्ट आपण आपल्या लेखणीतून इतरांपर्यंत पोहोचवून निश्चितच या उद्देशाला हातभार लावला आहे.
ReplyDelete* सईताई, अप्रतिम लेख! अण्णांनी मोबाईलच्या जमान्यात संस्कारांचं हे जे जागरण केलं, ते खरंच कौतुकास्पद आहे. आपण नवी पिढी वाईट आहे असं म्हणण्यापेक्षा आपण त्यांना काय दिलं, हा विचार करायला लावणारा लेख आहे. गणपती बाप्पाच्या पत्रीमागचं शास्त्र आणि उत्सवाचा मूळ उद्देश आजच्या मुलांपर्यंत पोहोचवणं हीच खरी सेवा. शेवटचं वाक्य मनात घर करून गेलं - वारसा कसा देतो यावरच पिढी घडते. खूप काही शिकायला मिळालं.*
ReplyDeleteस्तुत्य उपक्रम. ज्ञान सैनिक संघातर्फे ही आम्ही असा उपक्रम करत असतो. ज्यांच्याकडे जातो त्यांच्याकडे गणेशोत्सव कसा साजरा करायचा ..त्याची संकल्पना काय ..ज्ञान कर्म भक्ती ने तो कसा साजरा करायचा हे सांगत असतो.
ReplyDeleteआदरणीय हरिदास यशवंत गुरुजी खूप छान माहिती सांगतात याबद्दल
हो हो अगदी अशीच मजा असायची
ReplyDelete