आमचे प्रभू....

 

आमचे प्रभू....


तुम्हाला लिहायला आवडतं ना...मग प्रभू कापसेंना जाऊन भेटा...ते काम देतील...म्हणून मला काही वर्षापूर्वी एका परिचितांनी एका कागदावर प्रभू कापसे, डोंबिवलीकर आणि फोन नंबर लिहून दिला. डोंबिवलीकर, एक सांस्कृतिक परिवार नावाच्या मासिकाचे हे प्रभू कापसे कार्यकारी संपादक असल्याची माहितीही त्या परिचितांनी दिली होती. तेव्हा डोंबिवलीकरचे कार्यालय, डोंबिवलीतील मंजूनाथ शाळेच्या बाजुला असलेल्या इमारतीमध्ये होते.  थेट भेटायला कसे जायचे, म्हणून मी प्रभूंना फोन केला, माझा परिचय सांगितला...भेटायला कधी येऊ म्हणून विचारले, तेव्हा पलिकडून प्रभूंनी कधीही या...एवढ्याच शब्दांवर विषय संपवला आणि मला कार्यालयात यायला सांगितले. मी सकाळी अकराच्या सुमारास गेले तेव्हा कार्यालयात प्रभूंचा पत्ता नव्हता. पण तिथे एक आगळी लगबग चालू होती. प्राची गडकरी आणि वैदैही जांदे या दोघी खाऊचे डबे पॅक करत होत्या. प्रभूंचा वाढदिवस...प्रभूंचा वाढदिवस...असा घोषा चालू होता. प्रभूंच्या वाढदिवसानिमित्त कुठल्यातरी अनाथआश्रमाला कार्यालयातील सर्वजणं जाणार होते. तिथेच हे प्रभू त्यांचा वाढदिवस साजरा करणार होते. त्या मुलांसाठी प्राचीनं भरपूर खाऊ करुन घेतला होता. हे सर्व पाहून मला प्रभू म्हणजे पन्नाशी पार केलेले गृहस्थ असतील असं वाटलं. कार्यालयातील ही प्रभूंच्या वाढदिवसाची तयारी पहात मी बसून होते, तितक्यात एक तरुण तिथे आला. कंम्प्युटरवर बसून काहीतरी


काम करु लागला. थोड्यावेळानं कोणीतरी विचारलं, प्रभूंना भेटलात का....म्हणून मी आजूबाजुला बघू लागले. तेव्हा त्यांनी अहो, हेच प्रभू आहेत, म्हणून त्या तरुणाकडे बोट दाखवलं. ही पहिली भेट अशी गडबडीत झाली असली तरी, तेव्हा प्रभूंच्या वागण्यानं डोंबिवलीकर....परिवारामध्ये मी सामावून गेले. प्रभूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आमच्यासोबत वाढदिवस साजरा करायला या, म्हणून आमंत्रण दिले. या पहिल्याच भेटीत रंगाबरोबर खेळणारा आणि स्पष्टवक्ता असलेल्या प्रभूंच्या स्वभावानं भारावून गेले. या भेटीला किती वर्ष झाली हे माहित नाही. पण प्रत्येक भेटीमध्ये प्रभूंच्या स्वभावाला असलेले एखादे कोंदण समोर येते, आणि त्यांच्याप्रती असलेल्या आदरामध्ये भर पडते...

वयाच्या पन्नाशीमध्ये येत असलेल्या प्रभू कापसे यांचे अवघे जीवन अनोखे आहे. जळगावमधील प्राथमिक विद्यामंदिर, जामनेर पुरा येथून त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. कापसे कुटुंबाची परिस्थिती सामान्य होती. पण मुलाची बुद्धीमत्ता ओळखून शिक्षकांनी त्यांना मदतीचा हात दिला. इंदिराबाई लालवाणी माध्यमिक विद्यालयात त्यांनी पुढच्या शिक्षणासाठी याच शिक्षकांच्या मदतीनं आणि प्रोत्साहनानं प्रवेश घेतला. प्रभू कापसे यांच्यासोबत ही शाळेचीही परिक्षा होती. कारण शाळा सुरुवातीला ५वी ते ७वी अशा तीन वर्गासाठी सुरु झाली. दरवर्षी एक वर्ग वाढायचा. शाळेचा निकाल ९५ टक्के, पण शाळेला ग्रँण्ट नव्हती. १९९१ मध्ये एका व्याख्यानमालेच्या दरम्यान शाळेचा विद्यार्थी मेरीटमध्ये आला तर शाळेला १०० टक्के ग्रँण्ट मिळणार,


असे आश्वासन तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी दिले. तेव्हा शाळेच्या शिक्षकांनी प्रभू कापसे या विद्यार्थ्याकडे बोट दाखवून, हा विद्यार्थी दहावीमध्ये मेरीटमध्ये येणार, असा विश्वास दाखवला. शिक्षकांचा हा विश्वास सार्थ ठरवत २४ जून १९९२ रोजी प्रभू कापसे दहावीमध्ये मेरीटनं उत्तीर्ण झाले. शाळेचे नाव झालं. ग्रँण्ट मिळाली. या सर्वात प्रभूंनी आपल्या शिक्षकांचे योगदान कायम स्मरणात ठेवले. त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या मोठ्या बहिणींनं आपलं शिक्षण थांबवलं होतं. घरी अगदी सारवणापासून ते स्वयंपाकापर्यंतची सर्व कामं प्रभू करायचे. अशात दहावीच्या निकालानं त्यांच्या प्रगतीची दारं खुली झाली. दहा हजार रुपये त्यांना बक्षीस स्वरुपात मिळाले, शिवाय सर्व शिक्षकांचे भरभरुन आशीर्वाद. या जोरावर त्यांनी ११ वीसाठी पुण्याच्या गरवारे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण कॉलेजचा खर्च आणि पुण्यातील रहाण्याचा खर्च यांचे गणित साधता आले नाही. मग प्रभूंनी अवघ्या सहा महिन्यात कॉलेज सोडलं. त्यांच्यासारख्या हुशार विद्यार्थ्यासाठी हा मोठा मानसिक धक्का होता. पण प्रभूंचा स्वभाव असा निराशेच्या गर्तेत जाणारा नव्हता. त्यांनी ही गोष्ट सकारात्मकरित्या घेतली आणि पुढच्याच वर्षी मुंबईतील नामांकित 'सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट' येथे मेरिटमधून प्रवेश मिळवला. शिवाय शासकीय वसतिगृहातही प्रवेश मिळाला. जे. जे. मध्ये प्रवेश हा प्रभूंच्या जीवनातील सुवर्णक्षण ठरला. एका हि-याला पैलू पाडले गेले. हिऱ्यासारखे त्यांचे कर्तृत्व पैलू पडताच लखलखले आणि त्यांनी आपल्या तेजाने अनेक क्षेत्र व्यापून टाकले.

जामनेरसारख्या गावातून आलेल्या प्रभू कापसे यांनी आता स्वतःचे एक वलय तयार केले आहे. प्रख्यात कमर्शियल आर्टिस्ट, पोर्ट्रेट, कॉन्सेप्ट आणि स्टोरीबोर्ड आर्टिस्ट म्हणून ते ओळखले जातात. कला आणि प्रसारमाध्यम क्षेत्रात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार या मासिकाचे ते कार्यकारी संपादक आहेत. या मासिकाच्या विविध विशेषांकांचे शिवाय दरवर्षाच्या दिनदर्शिकांचे संपादन आणि डिझायनिंग ते करत आहेत. डिजिटल पोर्ट्रेट, पुस्तके आणि मासिकांची मुखपृष्ठे करण्यात


प्रभूंचा हात कोणीही धरु शकत नाही. डोंबिवलीतील विविध सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. 2017 मध्ये डोंबिवलीतील चित्रकारांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी डोंबिवलीकर आर्ट सोसायटीसारखा उपक्रम राबवला. हा माणूस जेवढा कुंचल्यामध्ये रमतो, तेवढाच समाजातील प्रश्नांसाठी सजग असतो. कोविडसारख्या कठिण काळात त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून गोळा केलेले पैसे विशेष मुलांच्या शाळेला देऊन सामाजिक बांधिकलकीही जपली आहे.

डिजिटल पोर्ट्रेट, वॉटर कलर, अँक्रेलिक करल, ऑईल कलर या सर्व माध्यमामध्ये सहजपणे वावरणा-या प्रभू कापसे यांच्या कुंचल्यातून अनेक कलाकृती तयार झाल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक पु. भा. भावे, शन्ना नवरे, सुरेंद्र वाजपेयी, पं. जसराज, आशा भोसले, बाळासाहेब ठाकरे या मान्यवरांची तैलचित्र त्यांच्या कुंचल्यातून साकारली आहेत. या सोबत स्वामी समर्थ, नाना महाराज, श्रीकृष्ण, गजानन महाराज, साईबाबा यांच्या प्रभू कापसे यांनी साकारलेल्या कलाकृती कलाक्षेत्रात गाजल्याच शिवाय सर्वसामान्यांसाठी वंदनीयही ठरल्या आहेत. संजय लीला भन्साळी, आदेश श्रीवास्तव, अमिताभ बच्चन, गोविंदा, सचिन तेंडुलकर, रोहित शेट्टी अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत सिनेमा स्टोरी बोर्ड आणि एडवर्टाइज च्या माध्यमातून त्यांनी काम केले आहे. यासोबत अनेक ब्रँडच्या जाहिरातींचे प्रभू कापसे यांनी स्टोरी बोर्ड केलेले आहेत. प्रभू कापसे ज्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार या मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत, त्याच मासिकाचा दिवाळी अंक हा वाचनप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी देणारा असतो. तसेच कलाकार आणि डिझायनिंग क्षेत्रात काम करणा-यांसाठी ज्ञानात भर घालणारा असतो. अत्यंत दर्जेदार असलेल्या या अंकाला दरवर्षी उत्कृष्ठ दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळाला आहे, या सर्वांमागे प्रभू कापसे यांची धडपड आहेच, पण आपल्या वाचकाला सर्वोत्तम देण्याचा त्यांचा अट्टहासही आहे. 

अर्थात ही प्रभू कापसे यांची सर्वश्रृत असलेली माहिती आहे. गेली काही वर्ष


डोंबिवलीकर परिवाराच्या सोबत मी प्रभू कापसे यांचा प्रवास पहात आहे. या माणसाच्या स्वभावाला किती कांगोरे आहेत, हे माहित नाही. पण प्रत्येक भेटीत त्यांच्याबद्दलची नवी माहिती समोर येते. रंगासोबत खेळणारा आणि कुंचल्यात हरवणारे प्रभू कराटेमध्येही माहीर आहेत. अगदी ब्लॅकबेल्टपर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. रंगासोबत सुरांवरही त्यांचे तेवढेच प्रेम आहे. विशेषतः रफीची गाणी गायला त्यांना फार आवडतात. काहीतरी कायम शिकले पाहिजे, हे वाक्य त्यांच्यासाठी प्रमाण आहे, त्यामुळेच आता ते वाद्यवादनाची साधना करत आहेत. यासर्वात प्रभू कापसे म्हणजे, अनेकांसाठी हक्काचे मदतीचे स्थान आहे. स्वतःची पदरमोड करुन या माणसानं कितीजणांना मदत केली असेल याची गणती नाही. प्रभू अशा मदतीचा कधीही गवगवा करत नाहीत. अगदी समोरचा आपल्या ओळखीचा असो वा नसो, त्यांच्याकडे मदत मागायला आलेला माणूस कधीही रिकाम्या हातानं परत जात नाही. मध्यंतरी आम्ही डोंबिवलीकर परिवाराच्या एका कार्यक्रमाची तयारी करत होतो.  मात्र तेव्हा प्रभूंचा पत्ता नव्हता. चौकशी केली तेव्हा समजलं की हा माणूस रात्री एका परिचिताची तब्बेत बिघडली म्हणून रात्री, हॉस्पिटलमध्ये गेला होता.  रात्रभर त्या माणसासोबत प्रभू थांबले, आजारी व्यक्तिच्या कुटुंबाला पैशांसोबत मानसिक आधार देऊन ते सकाळी आपल्या कार्यालयाच्या कार्यक्रमाला आले. असे त्यांचे अनेक किस्से सहकार्याकडून ऐकायला मिळतात, पण एवढ्या वर्षात प्रभूंनी आपल्या स्वभावातील या कांगो-याबद्दल कधीही काहीही सांगितलेले नाही.  अर्थात असे असले तरी प्रभूंसारखा गप्पिष्ठ माणूस दुसरा नाही. डोंबिवलीकर कार्यालयात गेल्यावर प्रभूंकडून प्रभूंचे किस्से ऐकणे हे मी, प्राची आणि वैदेहीचा आवडता कार्यक्रम. यामध्ये त्यांनी घेतलेल्या मान्यवरांच्या भेटी, त्यांचे जे. जे. मधील अनुभव, दिवाळी अंकाची डेडलाईन आल्यावर होणारी धावपळ अशा अनेक किस्स्यांचा समावेश आहे. 

गाव, गप्पा आणि चूल या माझ्या पुस्तकाचे प्रकाशनाचा सर्व भार त्यांनी सांभाळला होता. अवघ्या आठवड्यात हे पुस्तक तयार करुन प्रभू यांनी मला माझ्या वाढदिवसाला सर्वोत्तम भेट दिली होती. मा. आमदार आणि भाजपा प्रदेशादध्य रविंद्र चव्हाण हे प्रभूंचे श्रद्धास्थान. आपण ज्या डोंबिवलीकर मासिकाचे कार्यकारी संपादक आहोत, त्या मासिकाचे संपादक दादा अर्थात मा. रविंद्र चव्हाण आहेत. त्यांच्या कतृत्वाला साजेसे डोंबिवलीकर मासिक असावे यासाठी प्रभू रात्रंदिवस झटत असतात. डोंबिवलीकर मासिकाचा दिवाळी अंकाचे प्रकाशन म्हणजे, प्रभूंसाठी परीक्षेचा दिवस असतो. या परीक्षेसाठी प्रभू


कितीतरी रात्र आणि दिवस एक करतात. त्यांच्या डायबिटीजचे शेड्यूल सांभाळत, आपल्या या दिवाळी अंकासाठी आपले सर्वोत्तम देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रभूंची ही तळमळ आपण करत असलेल्या कामाप्रती आहे. आपल्यासोबत जी नावं जोडली आहेत, त्या नावांना आपल्यामुळे कुठलाही कमीपणा वाटू नये, यासाठी त्यांची ही धडपड असते.

आज मला विचारले, प्रभू कापसे तुमच्यासाठी कोण आहेत, तर त्यांचं वय बाजूला सारुन मी त्यांना मदतीला धावणारा मोठा भाऊ, मार्गदर्शक म्हणून त्यांचे नाव प्रथम घेईन. आनंदाच्या क्षणामध्ये सामील होणारा मित्र म्हणून प्रभू आहेत. तर दुःखामध्ये आधार देणारा कुटुंबप्रमुख म्हणून प्रभू आहेत. डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार या माध्यमातून आज प्रभू कापसे यांनी कलाकारांची एक न संपणारी साखळी तयार केली आहे. दिवसागणीक यात नव्या कलाकाराची जोड मिळत आहे आणि मग ही साखळी प्रभू नावाच्या मायाजालामध्ये माझ्यासारख्या सामान्यांना जोडून घेत आहे.  आज याच प्रभूंचा पन्नासावा वाढदिवस आहे. सामान्य घरातून पुढे आलेला हा तरुण आपल्या ज्ञानाच्या, सचोटीच्या, मेहनतीच्या आणि लाघवी स्वभावाच्या जोरावर अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलेला आहे. पन्नाशीचा हा टप्पा केवळ एका वयाचा आकडा नाही, तर अनुभवांचे सोनेरी पान आहे. त्यांचा पुढील प्रवास 'सोने पे सुहागा' ठरावा, याच मनापासून शुभेच्छा....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

Comments

  1. खूपच सुंदर लेख! मी स्वतः फारसा वाचणाऱ्यांपैकी नाही, पण हा लेख मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत अतिशय उत्सुकतेने वाचला. प्रत्येक ओळ मनाला भिडणारी होती. इतका सुंदर आणि हृदयस्पर्शी लेख लिहिल्याबद्दल मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद! 🙏

    ReplyDelete
  2. क्या बात ! खूप मनापासून लिहिलेला लेख नाही तर ह्या एका सरकारी मित्राबद्दल आपुलकीने लिहिलेला प्रवास आहे. मनापासून धन्यवाद !

    ReplyDelete
  3. छान माहिती मिळाली प्रभुजींबद्दल

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर लेख
    अगदी बरोबर वर्णन केलं आहेस
    वाढदिवसाच्या प्रभू कापसेना खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  5. Inspirational and motivation is important in life, they are like angle who inspires us,but the thing is you did it, that's your greatness. Proud of you my friend. Thanks for sharing.

    ReplyDelete
  6. प्रभूजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
    लेख आवडला नेहमीप्रमाणे उत्तम!!
    ललिता छेडा!

    ReplyDelete
  7. मस्त लिहिले आहे.👍

    ReplyDelete
  8. सर्वप्रथम प्रभुजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. काळोख कितीही आणि परिस्थिती कशी पण असली तरी ज्याला चमकायचे आहे, ज्याच्या मनात स्वच्छता व मदतीचा भाव आहे तो तेच करतो. जे आजकालच्या जगात सहसा कोणी करायला तयार होत नाही. डोंबिवलीकर परिवार फक्त शंभर रुपये परिवार ना ठेवता त्याला खऱ्या अर्थाने त्यांनी कुटुंब बनवले आहे.

    ReplyDelete
  9. सर्वप्रथम प्रभुजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. काळोख कितीही आणि परिस्थिती कशी पण असली तरी ज्याला चमकायचे आहे, ज्याच्या मनात स्वच्छता व मदतीचा भाव आहे तो तेच करतो. जे आजकालच्या जगात सहसा कोणी करायला तयार होत नाही. डोंबिवलीकर परिवार फक्त शंभर रुपये परिवार ना ठेवता त्याला खऱ्या अर्थाने त्यांनी कुटुंब बनवले आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. सर्वप्रथम प्रभुजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. काळोख कितीही आणि परिस्थिती कशी पण असली तरी ज्याला चमकायचे आहे, ज्याच्या मनात स्वच्छता व मदतीचा भाव आहे तो तेच करतो. जे आजकालच्या जगात सहसा कोणी करायला तयार होत नाही. डोंबिवलीकर परिवार फक्त शब्दरूपी परिवार ना ठेवता त्याला खऱ्या अर्थाने त्यांनी कुटुंब बनवले आहे

      Delete
  10. प्रभूंचे प्रभावी व्यक्तिचित्र !! त्यांचा कुंचला,तशी तुमची लेखणी!! खूप छान!!

    ReplyDelete
  11. अगदी हुबेहूब वर्णन आहे 👍👍🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment