दुधाची आमटी
साबुदाणा नको...अँसिडीटी वाढते. ते सोडून काही करत असलीस तर उपवास करतो. नाही तर नाही. नव-यानं दोन दिवसापूर्वी रोखठोक उत्तर दिलं. नवरात्रीमध्ये एक दिवस तरी उपवास करुया का, म्हणून मी त्याच्यापुढे प्रस्ताव दिला होता. त्याचं उत्तर देतांना त्यानं साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाणा वडे अजिबात नको, हे ठासून सांगितलच शिवाय जे काही करणार आहेस, ते मला आधी करुन दाखव म्हणून ऑर्डरही सोडली. ही ऑर्डर देतांना, त्यानं नेहमी तू काहीतरी प्रयोग करतेस ना...मग उपवासाला काय प्रयोग करतेस बघू, म्हणून नवं आव्हानंही दिलं. मग काय, त्याचं हे आव्हान मी हातोहात स्विकारलं, आणि त्याला प्रती आव्हान दिलं. मी एक वेगळा पदार्थ बनवते तू फक्त ओळखून दाखव. अर्थात या सगळ्यात एक नाही तर दोन दिवस उपवास करायचा, या वाक्यावर आमची ही चर्चा संपली आणि मी तयारीला लागले.
गुरुवारी माझी परीक्षा होती. आदल्या रात्री एक वाटीभर शेंगदाणे भिजत घातले . हे शेंगदाणे सकाळी चांगले टम्म...फुगून आले. मग त्या शेंगदाण्याची सालं काढून टाकली. त्यामध्ये अगदी अर्धा चमचा जिरं आणि तेवढंच ओलं खोबरं घालून चांगलं वाटून घेतलं. हे मिश्रण अगदी मऊसूत वाटलं पाहिजे. त्यामध्ये मग दोन ग्लास भरुन पाणी घालून गाळणीतून गाळून घेतलं. अगदी दुधासारखं हे शेंगदाण्याचं दूध तयार होतं. या दुधाला थोडावेळ बाजुला ठेऊन चांगली कोवळी रताळी शिजवून घेतली. त्यांची सालं काढून घेतली आणि आपल्या चकलीच्या सो-यातील चकती बदलून चांगली जाड असलेली शेवेची चकती त्यात टाकली. इडलीच्या पात्रामध्ये या रताळ्याच्या शेवया पाडून घेतल्या आणि अगदी मिनीटभर वाफवल्या. आधीच रताळी चांगली वाफवून मऊसूत झाली होती. त्यामुळे त्या रताळ्याच्या शेवया वाफवून घेतल्या नसत्या तरी चालल्या असत्या, पण इडलीच्या पात्रात त्या मिनीटभर वाफवून घेतल्यामुळे छान सेट झाल्या आणि त्यामुळे त्या वाढायलाही सोप्प्या पडल्या. आता त्या शेंगदाण्याच्या दुधाचा नंबर लागला. एव्हाना हे शेंगदाण्याचे दूध छान थंडगार झाले होते. त्यातील अर्धे दूध बाजुला काढून त्यात मग अगदी चवीपुरता गुळ, सेंदव मीठ आणि अर्था चमचा वेलची पावडर घालून छान मिसळलं. माझ्याकडे थोडा मसाला दुधाचा मसाला होता. तो मसालाही चमचाभर टाकला आणि हे शेंगदाण्यापासून तयार केलेले दूध छान मिसळून घेतलं. मग दोन छान डिश घेऊन त्याच रताळ्याच्या शेवया ठेवल्या आणि त्यावर हे शेंगदाण्याचं दूध घातलं. वरुन माझी आवडती जायफळ पावडर भुरभुरून नव-याला हाक मारली. चक्क शेवया...म्हणून नव-यानं पहिल्यांदा माझ्याकडे आश्चर्यानं बघितलं. कारण शेवयांची खीर हा माझा काही आवडता पदार्थ नाही. त्यामुळे आमच्या घरी फारच आग्रह झाला तर मी शेवयांची खीर करते. पण आज न सांगता बायकोनं शेवयांची खीर कशी केली, म्हणून त्याला आश्चर्य वाटलं. पण ते
क्षणभरच. उपवासाला खीर कशी चालेल, म्हणत त्यानं त्या पदार्थाचं न खाताच पोस्टमार्टम सुरु केलं. हे काय रस शिरवाळे केलेस...म्हणत पुन्हा चौकशी सुरु केली. कारण कोकणातील नारळाच्या दुधातील शेवया अर्थात रस शिरवाळे हा पदार्थही नव-याला आवडता आणि माझ्यासाठी न आवडता. तो पदार्थही अगदी क्वचित आमच्याकडे होतो. असा न आवडता पदार्थ, न मागताही बायकोनं कसा बनवला, या कोड्यात पडलेल्या नव-याला मी आधी खाऊन तर बघ, म्हणून त्याच्या पुढे ती डिश सरकवली. त्यानं त्या रताळ्याच्या शेवया आणि शेंगदाण्याचे दूध घातलेल्या पदार्थाचा पहिला घास घेतला. रताळ्याची चव त्यानं बरोबर पकडली. पण त्यावर दूध कसलं आहे, याबाबत मात्र तो साशंक होता. शेवटी मी फोड करुन दिल्यावर त्यानं व्वा...म्हणून शाबासकी दिली आणि एकापाठोपाठ एक, अशा दोन डिश फस्त केल्या.
खरं सांगायचं तर हे उपवासाचे रस शिरवाळे अगदी सहज आणि सोप्प्या पद्धतीनं झाले. करायला फारशी झंझट नाही, की फार पसारा नाही. शिवाय पोटभर आणि पचण्यासाठीही त्रास नाही. आता एक डिश यशस्वी झाल्यामुळे मी दुस-या दिवशी राहिलेल्या शेंगदाण्याच्या दूधापासून अगदी वेगळा पदार्थ केला. पहिल्या दिवशी गोड पदार्थ झाल्यानं आता झणझणीत पदार्थ करणे भाग होते. शुक्रवारचा नाष्टा असाच झणझणीत झाला. मोजून एक रताळे मी बाकी ठेवले होते. हे रताळे चांगले जाडजूड होते. त्याला सोलून घेऊन त्याच्या जाडसर कापा केल्या. या कापा पाण्यामध्ये बुडवून ठेवल्या. त्याचा स्टार्च गेल्यावर मग त्यावर तिखट, मिठ, लिंबाचा रस लावून त्याला दहा मिनीटे मुरवत ठेवलं. दहा मिनीटानंतर या कापांना पाणीही सुटलं होतं. त्यातच अगदी अर्धा चमचा चण्याचं पिठ टाकलं. सगळा मसाला मिळून आल्यासारखा आल्यावर या कापा रव्यात घोळवल्या आणि तव्यावर तेल टाकून त्यावर वाफायला ठेवल्या. या रताळ्याच्या कापा तयार होत असतांनाच शेंगदाण्याचे दूध हाती घेतलं. चमचाभर तेल तापवून त्यावर फक्त जि-याची फोडणी दिली. त्यात तिखट, मिठ टाकून त्यावर हे शेंगदाण्याचे दूध घातलं. फोडणीचा ठसका बसला म्हणजे, पदार्थ पक्का झाला ही खूण. ती खूण मिळाल्यावर मग हे दूध ढवळतांना त्यात अगदी नावाला गूुळाचा खडा टाकला. एक उकळी आली आणि
गॅस बंद केला. एवढ्यात त्या रताळ्याच्या कापाही छान खरपूस तयार झाल्या होत्या. आणि हो....जर उपवासाला अशा रताळ्याच्या कापा करायच्या असतील तर चण्याचं पीठ न टाकताही त्या करता येतात. हे सर्व झाल्यावर आता पुन्हा सर्विंग डिश. त्यामध्ये तळाला या रताळ्याच्या कापा ठेवल्या आणि वरुन शेंगदाण्याचे दूध. या दूधाला, फोडणी दिल्यामुळे त्याच्यावर छानशी लाल रंगाची तर्री आली होती. ही शेंगदाण्याची आमटी या कापांवर टाकून त्यावर अगदी थोडी बटाट्याची शेव भुरभुरली. वरुन एक लिंबाची फोड. बस्स. नव-यानं या तिखट पदार्थाचा पहिला घास घेतला, आणि झकास...म्हणत मला शाबासकी दिली. हा पदार्थ चांगलाच ठसकेदार झाला होता. त्यामुळे मध्येच ठसका आणि मग पाण्याचा घोट असा क्रम ठेवत नव-यानं आणि मी सगळ्या कापा आणि ती झणझणीत दुधाची आमटी फस्त केली. अर्थात या दोन पदार्थांमुळे नवरात्रीमधील माझ्या आणि नव-याच्या उपवासाचे गणित सुटले होते. तुम्हाला सुद्धा नवरात्रीमध्ये उपवासासाठी वेगळा पदार्थ हवा असल्यास हे दोन पदार्थ नक्की करा....आणि कसे झाले तेही सांगा...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा




Mind blowing recipes 😋 and explanations dear.
ReplyDeleteWaa farch chhan. Hatke 👍
ReplyDelete