रताळे पार्ट २
गेल्या आठवड्यात शेंगदाण्याच्या दुधाची आमटी आणि रताळ्याच्या शेवया करुन झाल्या. या दोन्ही रेसिपीला फार उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक मैत्रिणींनी फोन करुन पुन्हा पुन्हा शेवया कशा केल्या, हे विचारुन घेतले. काहींनी त्याच्या पुढे एक पाऊल टाकले. शेवयांच्या पुढे काय...हा त्यांचा प्रश्न होता. अर्थात तो प्रश्न आमच्याही घरुन विचारला जात होता. आता पुढच्या उपवासालाही मागचे पदार्थ रिपीट होणार की नवी काही रेसिपी आहे, असा प्रश्न नवरा सारखा विचारु लागला, तेव्हा मी एका बाबतीत सूट मागितली. यावेळच्या रेसिपीमध्ये थोडेफार साबुदाणे वापरणार म्हणून आधीच जाहीर केले. अर्थात गेल्या आठवड्यात झालेल्या रताळ्याच्या शेवया आणि त्यावरचे शेंगदाण्याचे दूध हा पदार्थ स्टार ठरला. त्यामुळे त्याचीही मागणी वाढली होती. पण या पदार्थामध्येही यावेळी थोडाफार बदल करण्याचा मी प्रयत्न केला, आणि तो यशस्वी ठरला. या सर्व पदार्थांसाठी साहित्य हे अगदी मोजकंच होतं. रताळी, शेंदगाणे हे दोन मुख्य घटक. त्याला जोड म्हणून यावेळी ओलं खोबरं आणि साबुदाणे यांची भर घातली.
नवरात्रीच्या उपवासाला काहीतरी नवा पदार्थ हवा म्हणून गेल्या आठवड्यात नव-याचा आग्रह झाला आणि शेंगदाणे, रताळे वापरुन दोन नवीन पदार्थ केले. आता नवरात्रीच्या दुस-या उपवासाला याचाच वापर करत आणखी एक पदार्थ तयार केला. सोबतच रताळ्याच्या शेवयांना थोडं नवं रुपही दिलं. पहिल्या पदार्थासाठी नेहमीप्रमाणे तयारी करुन घेतली. वाटीभर शेंगदाणे रात्री भिजत घातले. दुस-या दिवशी सकाळी रताळी स्वच्छ करुन चांगली मऊसर शिजवून घेतली. थंड झाल्यावर त्यांच्यावरची साल काढून त्याला बारीक करुन एक गोळा करुन घेतला. दरम्यान रताळी शिजत असतांना अर्धा वाटी साबुदाणे भाजून घेतले. अगदी साबुदाण्याचा रंग थोडासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत साबुदाणे भाजले आणि गार झाल्यावर ते मिक्सरमधून बारीक करुन घेतले. बारीक झालेली ही साबुदाण्याची पिठी त्या रताळ्याच्या गोळ्यात मिसळली. वरुन सैंधव मीठ घातलं. शिवाय अगदी अर्धा चमचा जि-याची पावडर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. हे सगळं मिश्रण हलक्या हातानं चांगलं एकजीव करुन घेतलं आणि पाच मिनीटं तसच ठेवून दिलं. त्यावेळात मोदकपात्र तयार करुन घेतलं. ज्यांच्याकडे मोदकपात्र नाही त्यांनी एका मोठ्या कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवले तरी चालेल. मग पाच मिनिटांनी हाताला थोडं तेल लावून या मिश्रणाचे गोळे तयार करायला घेतले. साधारण गुलाबजामसाठी आपण जेवढे गोळे तयार करतो, तसे गोळे करुन घ्यायचे. एकसारखे हे गोळे तयार झाले की पाणी गरम करण्यासाठी जी कढई ठेवली आहे, त्यावर चाळणी ठेवून गोळे वाफवून घ्यायचे. मी मोदकपात्रामध्ये हे गोळे वाफवायला ठेवले. इथे लक्षात
घेतलं पाहिजे की, रताळी शिजलेली आहेत, मात्र त्यासोबतीला असलेला साबुदाणा थोडा शिजण्याची गरज असते. बरोबर दहा मिनीटात हे रताळी आणि साबुदाण्याचे गोळे तयार होतात. साबुदाणे शिजल्यावर त्याचा रंग जसा पारदर्शी होतो, तसाच या गोळ्यांचा रंग होतो. अशा शिजलेल्या गोळ्यांवर ठेवलेले झाक काढून ठेवायचे. अन्यथा हे गोळे खाली चाळणीला चिकटून रहातात.
साबुदाणा आणि रताळ्याचे हे गोळे तयार होत असतांना या गोळ्यांची आमची
तयार करुन घ्यायची. त्यासाठी भिजवलेले शेंगदाणे वाटून घ्यायचे. हे शेंगदाणे थोडे
जाडसर वाटतांना त्यामध्ये चमचाभर ओलं खोबरं, आणि जिरं घालावं. वाटून झालं, की
जि-याच्या फोडणीवर थोडं तिखट टाकून हे शेंगदाण्याचं वाटण घालायचं. यात सैंदव मीठ,
गूळ घालून या आमटीला चांगला कढ काढून घ्यायचा. नंतर त्यामध्ये रताळी आणि
साबुदाण्याचे केलेले गोळे टाकायचे. हे गोळे टाकले की आमटी थोडी घट्ट होते.
त्यामुळे सुरुवातीला त्यात पाणी ब-यापैकी ठेवायचे. पाच ते दहा मिनीट रताळ्याचे
गोळे चांगले आमटीमध्ये उकळले की गॅस बंद करायचा आणि मग यावर झाकण ठेवायचे.
अशाप्रकारे ही रताळ्याची गोळा आमटी डिशमध्ये वाढतांना मी त्यावर मूठभर डाळींबाचे दाणे टाकले होते, शिवाय अगदी थोडी बटाट्याची शेव आणि वर लिंबाची फोड. एकवेळचे पूर्ण भोजन झाल्याचा अनुभव आम्हा दोघांनाही आला. अर्थात या पदार्थाची चव भन्नाटच झाली. पण एकदा पदार्थ तयार केला, की त्यात आणखी काय बदल होऊ शकतात, या बद्दल माझा विचार सुरु होतो.
ही गोळ्याची आमटी तयार केल्यावरही असाच विचार सुरु झाला, त्यात पुढच्यावेळी रताळ्याची गोळा आमटी तयार करतांना त्यात हिरव्या मिरची ऐवजी लाल मिरची बारीक घालून बघणार आहे, चव आणखी वेगळी येईल शिवाय हा लाल रंगही छान दिसणार आहे. यातच हे गोळे करतांना त्यामध्ये भाजलेला काजूचा तुकडा घालण्याची सूचना नवरोबाकडून आली. मग ती शाही रताळा आमटी होईल, अशी कोपरखळीही त्यानं मारली. एकूण काय, एक पदार्थ करुन झाल्यावर त्याच्यावर होणारे पुढचे प्रयोग सुरु झाले.
असाच एक सुधारीत पदार्थ यावेळी नव्यानं केला. तो म्हणजे, रताळ्याच्या
शेवया. गेल्यावेळी जशा शेवया केल्या तशाच शेवया यावेळीही केल्या. फक्त यावेळी या
शेवयांवर जे दूध घातले जाते, ते बदलले. यावेळी ओल्या नारळापासून दूध काढले,
त्यामध्ये काजू आणि बदाम बाकीक करुन टाकले. सोबतीला वेलची पावडर, गूळ आणि अगदी
नावाला सैंदव मीठ. असं दूध तयार करुन ते फ्रिजमध्ये ठेवलं. सायंकाळी याच
रताळ्याच्या शेवयांवर आम्ही ताव मारला. सगळंच गोड नको, म्हणून सोबत बटाट्याचे पापड
तळले होते. फार तामझाम नाही, पण चव अफाट. मग पोट भरल्यावर काम काय....तर शेंगदाण्याच्या
दूधातील रताळ्याच्या शेवया छान झाल्या, की नारळाच्या दूधातील शेवया छान
लागल्या....या नव्या गोड वादाची सुरुवात झाली....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा




छान रेसिपी दिली.
ReplyDeleteपाककलेचे यूट्यूब चॅनेल सुरू करायला हरकत नाही तुम्ही!!खूप छान प्रतिसाद मिळेल !!
ReplyDeleteKhup chhan lekh
ReplyDelete