ते आले....
सध्या कडक ऑक्टोबर महिना चालू आहे. कडक म्हणजे सकाळी सात-आठ वाजताच घामाच्या धारा चालू होतात...या घामाच्या धारांमुळे दैंनदिन क्रम-उपक्रम बदलावा लागला आहे. त्यातलाच एक म्हणजे, सकाळी होणारी बाजारातील फेरी. आठवड्यातील एखाद्या दिवशी, व्यायामाला सुट्टी देत बाजारात मनसोक्त फिरणं हा माझा आवडता छंद. त्यातही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे महिने अधिक प्रिय. कारण याच महिन्यात भाजीचा बाजार बहरुन येतो. माझ्यासारख्या खवय्यीसाठी ही सोनसंधी असते. ब-याचवेळी फ्रिज भाज्यांनी टम्म फुगला असला तरी, बाजारात मी आठवड्यातून दोनवेळा तरी फेरी मारते. ते विंडो शॉपिंगचे जे सुख मिळते, तेच सुख...आनंद मला अशावेळी भाज्यांच्या विंडो शॉपिंगमधून मिळतो. सध्या तरी या सुखापासून कडक उन्हामुळे दुरावा घेतला आहे. मनात ही रुखरुख असतांना दोन दिवसांपूर्वी रात्री एक गोड धक्का बसला. बाजारात फेरफटका मारत असतांना एका भाजीवाल्याच्या टोपलीमध्ये एक काळसर रंगाचा छोटा डोंगर दिसला. सहज म्हणून मी डोकावून बघितलं, तर ते शिंगाडे. थंडीची चाहूल लागल्यावर बाजारात हे शिंगाडे दाखल होतात. मग अख्खा हिवाळा या शिंगाड्यांच्या आधारानं निघतो. पण यंदाचं वातावरण काही वेगळंच आहे. त्या एल निनोनं सगळंच बिघडवलं असतांना हे शिंगाडे मात्र त्याच्या वेळेनुसार बाजारात दाखल झाले. त्या भाजीवाल्याकडे जेवढे शिंगाडे बाकी होती, तेवढे त्यानं माझ्या पिशवीत टाकले आणि मी कोण आनंदी झाले. शिंगाड्यांची संख्या पाहून नव-यानंही मान हलवली, त्यामध्ये पुढचे दोन-तीन दिवस घरात शिंगाडे उत्सव
असणार हे त्यानं गृहीत धरलं होतं.
मौसमातले पहिले शिंगाडे घरी आणले आणि त्यांचं कौतुक सुरु झालं. पण यावेळी सगळी गणित बदललं होतं. एरवी मी अगदी सकाळी शिंगाडे आणते. सकाळी ते दहा-अकरापर्यंत उकडून झाले, की दिवस त्यांच्यावरच निघतो. पण यावेळी पहिल्यांदा शिंगाडे रात्री आणले होते. त्यातही बरचसे शिंगाडे बारीक होते. त्यामुळे पहिल्यांदा ते स्वच्छ करुन घेतले. शिंगाडे चांगले आहेत, की खराब हे पहाण्यासाठी सोप्पी पद्धत आहे. त्याच्या पोटावर अंगठा जोरात दाबायचा. जर शिंगाडे आतून खराब असतील तर अशानं त्यातून पाणी येतं. हे शिंगाडे टाकून द्यायचे. चुकून असे शिंगाडे शिजवले गेले आणि खाण्यात आले तर ते आंबट लागतात. रात्री मी असे चांगले शिंगाडे निवडून साफ केले आणि पंख्याखाली ठेऊन दिले. सकाळी यातील अर्धे शिंगाडे शिजण्यासाठी ठेवले. त्यासाठी कढईमध्ये पाणी उकळण्यास ठेवले आणि त्यात अगदी थोडे मिठ टाकले. याच उकळत्या पाण्यात शिंगाडे टाकून वर झाकण लावले. पाच मिनीटानंतर गॅस बंद केला आणि कढईवरील झाकण काढून ठेवले. आणखी पाच मिनीटभर शिंगाडे या गरम पाण्यात राहिल्यावर आपसूक शिजले. त्यातील लहान आकाराचे शिंगाडे नुसतेच खाण्यासाठी वेगळे करुन ठेवले आणि मोठ्या शिंगाड्याची मथुरा स्टाईल रस्सा भाजी करायला घेतली.
मध्यंतरी मथुरा, वृंदावन, वाराणसी येथे केलेल्या दौ-यात शिंगाड्याची रस्सा
भाजी खाण्यात आली होती. एरवी मी शिंगाड्याला अशा रश्यात बुडवून खाण्याच्या विरोधात होते. मिठाच्या पाण्यात उकडलेले शिंगाडे मला भारी प्रिय. पण एकदा त्याची रस्सा भाजी खाल्यावर आता हा पदार्थही आवडीचा झाला आहे. त्यासाठी लागणारी सामुग्रीही अगदी माफक आहे. यासाठी सुरुवातीला या शिजलेल्या शिंगाड्यांवरचे साल काढून टाकले. मग त्याला अगदी हलक्या हातानं काट्याच्या सहाय्यानं दोन तीन ठिकाणी टोचण मारुन घेतले. मग त्यांना तेलाचा एक हात लावून फ्रायरमध्ये ते कुरकुरीत करण्यासाठी ठेवले. भाजीचा रस्सा करण्यासाठी एक मोठा टोमॅटो, चार काजू, आलं, अर्धा चमचा जिरं, एक हिरवी वेलची आणि अगदी छोटा दालचिनीचा तुकडा हे सर्व चमचाभर तुपावर परतून घेतले. थंड झाल्यावर हे मिश्रण बारीक वाटून घेतले, आणि मग पुन्हा चमचाभर तेलावर या वाटणाची फोडणी टाकली. हे टोमॅटोचे वाटण छान शिजत आले की तेल सुटू लागते, यावेळी त्यात चवीपुरते मिठ, हळद, तिखट आणि कसुरी मेथी टाकली. पुन्हा चांगले परतल्यावर त्यामध्ये पेलाभर गरम पाणी टाकायचे. या रश्याला उकळी यायला लागली की त्यामध्ये कुरकुरीत झालेले शिंगाडे टाकायचे, पाच मिनीट मंद गॅसवर सर्व एकजीव झालं की भाजी तयार असे समजा. मी मथुरामध्ये ही भाजी दोन प्रकारची खाल्ली होती. एकामध्ये फक्त दह्याच्या मिश्रणात शिंगाडे परतले होते. त्यासाठी त्यांनी मिरची, आलं आणि कोथिंबीरचं वाटण करुन घेतलं होतं. म्हणजेच, मिक्सरमध्ये मिरची आणि आलं बारीक करुन मग त्यावर वाटीभर दही घालून तेही मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. फोडणीसाठी मात्र इथे जरा तेलाचा चांगलाच वापर होता. सुरुवातीला तेलावर जीर, कडीपत्ता आणि लाल तिखट घालायचं. दह्याच्या वाटणातही मिरचीचा वापर केला आहे, हे लक्षात ठेऊनच या लाल तिखटाचा वापर करायचा. मग यावर दह्याचं वाटण घालून अवघे दोन मिनिट परतून घ्यायचं. नंतर त्यात शिंगाडे आणि वरुन अगदी
गरजेपुरतं पाणी घालायचं. दोन मिनीटामध्ये भाजी तयार. गॅस बंद करण्याआधी त्यामध्ये मिठ, साखर आणि कसुरी मेथी घालायची. या दोन्हीही प्रकारामध्ये कांदा आणि लसूण यांचा वापर केलेला नव्हता. आता मी सुद्धा या भाज्या घरी रिपीट करतांना कांदा आणि लसूण यांचा वापर करत नाही.
शिंगाड्याची रस्सा भाजी झाल्यावर रात्रीच्या जेवणामध्ये शिंगाड्याचे
सॅलेड केले. त्यासाठी थोडे शिंगाडे शिजवून मग सालापासून वेगळे केले. मक्याच्या
कणसाचे चार तुकडेही अशाच प्रकारे शिजवून घेतले. शिंगाडे आणि हे मक्याच्या कणसाचे
तुकडे कढईमध्ये अगदी चमचाभर तेलावर परतले. त्यात मिठ टाकून वर मोठा चमचा बारबेक्यू
सॉस घालून सर्व निट मिसळून घेतले. चवीला अतिशय चटपटीत, किंचित तिखट, गोड आणि आंबट असलेल्या या सॉसनं या शिंगाडा-मका सॅलेडची चव अधिक
वाढवली. या सॅलेडच्या सोबतीला एवोकाडो स्मूदी.
यावर आमचे रात्रीचे जेवण झाले आणि शिंगाड्याचा एक दिवस पार पडला. अजूनही
दहा-बारा शिंगाडे शिल्लकीमध्ये होते. याचे
काय करायचे हा विचार चालू असतांनाच नव-यानं जाहीर केलं. भाजी झाली, सॅलेड झालंय
आता उरलेले शिंगाडे त्या पेरी पेरी मसाल्यात परतून दे उद्याला...चला...शिंगाड्यांचा
विषय संपला...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा




शिंगाडे पुराण आवडलं
ReplyDeleteHo khup Chan
Deleteशिंगाडे पुराण आवडलं
ReplyDeleteचला शिंगाड्याच्या रेसिपीने माझ्याही किचनमध्ये एन्ट्री केली....... रेसिपी झकास आणि लेख ही खास आहे.
ReplyDeleteशिंगाड्याचे वेगवेगळे प्रकार समजले
ReplyDeleteata banwu bhaji.
ReplyDeleteमस्त आहे .भाजी बघेन करून
ReplyDeleteखुप सूंदर माहिती.
ReplyDelete