बस्ता....आपला आणि त्यांचा....

 

बस्ता....आपला आणि त्यांचा....


दिवाळीचा फराळ घेऊन आलेली अपर्णा भलतीच आनंदी होती.  असणार का नाही. तिच्या एकुलत्या एका लेकाचं लग्न ठरलं होतं. लग्न पुढच्या वर्षी. अजून आठ महिने लग्नाला आहेत, पण हे आठ महिने अपर्णाच्या मते तयारीसाठी फारच कमी आहेत. त्यामुळे तिची सध्या ही.....धावपळ सुरु आहे. या लग्नाच्या खरेदीमधील सर्वात मोठी खरेदी ही कपड्यांची. दिवाळीला माझ्या घरी फराळ द्यायला आलेली अपर्णा, या खरेदीबाबतची यादीच करुन घेऊन गेली, शिवाय साड्या खरेदीसाठी मी नक्की येणार हे आश्वासनही....तिनं आत्ता दोन दिवसांपूर्वीचा मुहूर्त काढला. मला सकाळी दहा वाजेपर्यंत घरी ये, तिथूनच आपण जाऊया, म्हणून आदेश दिला होता. अपर्णाच्या आदेशानुसार दोन दिवसापूर्वी मी पावणेदहाच्या ठोक्याला तिच्या घरी हजर झाले. अपर्णा उत्साहानं स्वागत करेल असं वाटलं होतं, पण माझे स्वागत झाले, ते त्यांच्या घरातील चढ्या आवाजाच्या संवादानं. अर्चित, अपर्णाचा लेक आणि तिचे पती हे तिघंही आपापसात एवढ्या मोठ्यानं बोलत होते की, दरवाज्याबाहेरही त्यांचा आवाज येत होता. अशाप्रसंगी बेल वाजवावी की नाही, या संभ्रमात मी होते. मात्र दरवाज्याच्या बाहेर लावलेल्या कॅमे-यानं माझी छबी टिपली आणि अर्चितनं दरवाजा उघडला. मावशी तू आलीस बरं झालं. इथे महाभारत सुरु झालंय. खरेदी राहीली बाजूला. आता तूच काय ते बघं म्हणत, तो तणतणत आत गेला. मी आवंढा गिळत पाठमो-या अर्चितकडे आणि त्याच्या आई-वडिलांकडे बघत, आपली यायची वेळ चुकली म्हणत परत


जाण्याचा विचार करु लागले.

माझ्या मनातले विचार बहुधा ओळखून अपर्णा पुढे आली. माझा हात पकडून तिनं कोचावर बसवलं, आणि महाभारत नेमकं कशावरुन सुरु झालं आहे, हे सांगितलं. प्रश्न सोप्पा आणि अवघडही होता. अर्चित आणि त्याची होणारी पत्नी, हे दोघंही आज खरेदीसाठी सोबत येणार होते. सुरुवातीला मला धरुन सातजणं खरेदीला जाणार होते. पण नंतर ही यादी वाढत गेली. लग्नाचा बस्ता आहे, आपल्या कुटुंबातलं पहिलं लग्न, .....यांना सोबत घ्यायला हवं, .....हे सुद्धा खरेदीला हवेतच, म्हणत अपर्णाच्या नव-यानं कुटुंबातल्या सदस्यांनाही खरेदीला सोबत येण्याचे आमंत्रण दिले. मग अपर्णा वैतागली. त्यांच्या घरात लग्न झाली, तेव्हा त्यांनी कुठे आपल्याला बोलवलं. त्यामुळे आता आपल्या कुटुंबातील लग्नासाठी त्यांना कशाला बोलवाचयं, यावर वाद सुरु झाला. पण तोपर्यंत खरेदीला सोबत या....म्हणून आमंत्रण देऊन झाले होत. अपर्णा मागे कशाला येईल, तिनं तिच्या माहेरच्या कुटुंबातील आणखी चारजणांना आमच्यासोबत लग्नाच्या खरेदीला या....म्हणून आमंत्रण दिलं. मग हा आला तर त्याला राग येईल, म्हणून त्यालाही बोलवा...यालाही बोलवा...असं करत करत सोबत येणा-यांची यादी वाढली.

ही गोष्ट अर्चितला समजली आणि तो चांगलाच वैतागला. तो आणि त्याच्या होणा-या पत्नीनं खरेदी काय करायची, कुठून करायची...याचे काही प्लॅन तयार केले होते. आता खरेदीसाठी सोबत येणारी येवढी मोठी लिस्ट पाहून अर्चितनं आम्ही आमची खरेदी करतो, तुम्ही तुमचं बघा, म्हणून अपर्णाला सांगितले. त्यावरुन आता त्यांच्यामध्ये वाद सुरु होता. अर्चितचं म्हणणं साधं होतं. काय


आणि किती खरेदी करायची आहे, याची यादी तयार आहे. शिवाय त्याचे बजेटही ठरलेले आहे. असं सर्व असतांना आता सोबत वाढीव माणसं आली, की प्रत्येकाचं मत वेगळं आणि त्यांची आवडही, अशावेळी खरेदी करायची की सर्वांची मतं जाणून घ्यायची, हा अर्चितचा प्रश्न होता. त्यामुळे त्यानं त्याच्या होणा-या पत्नीला घेऊन तो खरेदीला जाण्यासाठी निघाला होता. आता नवरामुलगाच स्वतःच्या खरेदीसाठी गेला तर मग आलेल्या पाहुण्यांना काय सांगायचे, ही चिंता अपर्णा आणि तिच्या नव-याला लागली होती. त्यावरुन तू पहिल्यांदा पाहुण्यांना सांगायचेच नव्हते...तू सांगितलेस म्हणून मी....असा वाद त्यांच्यामध्ये सुरु झाला होता. लग्नाच्या खरेदीवरुनच एवढा घोळ आहे, तर पुढे काय होईल, असं बोलून दोघंही डोक्याला हात लावून बसले.

 अपर्णा मला हे सर्व सांगत असतांनाच अर्चित त्याच्या खरेदीसाठी निघूनही गेला.  त्याच्यामागे दरवाजा बंद करण्यासाठी अपर्णा उठली, तेव्हाच तिची बहिण आणि वहिनी आली. पाठोपाठ अपर्णाच्या सासरचे पाहुणेही आले. या सर्वांना घेऊन लग्नाच्या खरेदीसाठी जायचे होते. वास्तविक या सर्व पाहुण्यांच्या गर्दीत मी एकटी बाहेरची होते. पण गेली अनेक वर्ष अपर्णा आणि तिच्या कुटुंबासोबत घरोब्याचे संबंध, त्यामुळे या पाहुण्यांमध्ये मी नेहमी सहज असायचे. पण आत्ताची परिस्थिती वेगळी होती. नाही म्हणायला घरात थोडासा तणाव होता.  आलेल्या पाहुण्यांचे चहा-पाणी झालं, आणि निघायचं कधी अशी चुळबूळ सुरु झाली.  अपर्णा अस्वस्थ झाल्यावर मी तिच्या कानात कुजबुजले....तिनं माझ्याकडे हलकेच बघत आलेल्या पाहुण्यांबरोबर संवाद साधला. अर्चित आणि होणा-या सूनबाई, हे दोघंही आपल्या पसंतीचे कपडे घेण्यासाठी आधीच बाहेर पडले आहेत. आता आपले आणि अन्य काही देण्याघेण्याची खऱेदी आपण मिळून करुया, म्हणून तिनं आलेल्या पाहुण्यांना सांगितलं. यावर हे छान, मुलांची पसंती वेगळी असते, ते वेगळे गेले हे बरंच झालं, अशा स्वरुपाचे स्वर कानी आले, आणि अपर्णा आणि तिच्या नव-याला हायसं वाटलं. मग आम्हा पाहुणे मंडळींची वरात खरेदीसाठी निघाली. सुरुवातीला गाड्या घ्यायच्या की रिक्षा बोलवायची, यावर पंधरा-वीस मिनीटं गेली. मग ट्रॅफीक आणि पार्कींगचा त्रास नको, म्हणून रिक्षावर एकमत झालं,


पण तोपर्यंत एक रिक्षाही थांबेना. शेवटी जी मिळेल ती रिक्षा थांबवून  नियोजीत खरेदीस्थळी रवाना झालो.  ज्या दुकानात पहिल्यांदा गेलो, तिथे फारशा साड्या पसंतीस पडल्या नाहीत. मग दुसरे दुकान, अपर्णाची यादी तयार होती, पण सगळ्यांना सांभाळून या यादीप्रमाणे खरेदी करतांना तिचीच जास्त दमछाक झाली. एक साडी काढली, की त्य़ावर पहिल्यांदा चर्चा, मग ती दुस-या रंगात कशी छान दिसेल यावर प्रत्येकीचं मत. यातील दोघी पक्क्या सिरीयल बघणा-या. त्या सिरियलमधील कोणा हिरोईनसारख्याच साड्या हव्या होत्या. शेवटी  दुपारी तीन वाजता ही खरेदी कशीतरी संपली. ते पाहून मी जायला निघाले, तर अपर्णानं थांबवून घेतलं. जेऊनच जा, म्हणून सर्वांच्या आग्रहाला बळी पडले. मग हॉटेलमध्ये पुन्हा गोंधळ. कुणाला पनीर नको, तर कुणाला दुसरी भाजी नको....अशा सगळ्या आवडी सांभाळून दिलेली ऑर्डर येईपर्यंत पाऊणतास गेला. जेवण झाल्यावर निघाले तितक्यात हसत अर्चित दाखल झाला. त्याच्या चेहरा पाहून त्याची खरेदी छान झाल्याचा आमचा अंदाज अगदी योग्य निघाला. अवघ्या तासाभरात दोघांची खरेदी झाली होती. अर्चितच्या होणा-या पत्नीनं अगदी बजेटपेक्षा कमी किंमतीच्या तीन साड्या खरेदी केल्या. एवढ्या भारी साड्या नंतर पडूनच रहातात, उगाच त्याच्यात गुतंवणूक कशाला, हा तिचा प्रश्न होता. मग अर्चितनंही लग्नातले साध्या पद्धतीचे घेतले. वॉर्डरोबमध्ये उगाच जागा अडून ठेवणार नाहीत, असेच कपडे हवे होते, हे यावर अर्चितचे स्पष्टीकरण. मग काय, दोघांनीही खरेदी झाल्यावर छान हॉटेलमध्ये जेवण केलं आणि अर्चित तिला तिच्या घरीही सोडून आला. आई-बाबा अजून खरेदी-खरेदी करत आहेत, हे त्याला फोनवरुन कळल्यावर तो आता त्यांच्या मदतीला आला होता. झाली का तुमची

हौस पूर्ण....म्हणून त्यानं हसत आईबाबांना विचारलं, आणि त्यांच्या हातातील बॅगा घेऊन चालू लागला. मी  त्याच्याकडे बघत होते. आलेल्या पाहुण्यांना त्यानं रिक्षा करुन दिली. माझ्यासाठीही एक रिक्षा थांबवली, आणि स्वतःच्या कुटुंबासाठीही. त्यात खरेदी केलेल्या बॅगा काळजीपूर्वक ठेवल्या आणि आई-बाबांना बसवलं. त्यानंतर त्याच्या बाईकवरुन तो फूर्रर्र...झाला....

या सगळ्यात मी घरी पोहचेपर्यंत सायंकाळचे साडेपाच होऊन गेले. दिवसभरच्या या धावपळीतून आलेला थकवा दूर करण्यासाठी कडक कॉफीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कॉफीचा मग हाती घेऊन निवांत बसले, तर लेकाचा फोन....कसा झाला आजचा दिवस, हा आमचा नेहमीचा प्रश्न. यावर त्याचे छान...हे ठरलेले उत्तर. मी मात्र दिवसभरातील सर्व रामायण सांगितले. यावर त्यानं मला एक प्रश्न विचारला....तू यातून काय शिकलीस...मी काय शिकायचं....हा माझा प्रतीप्रश्न....तेव्हा तो हसला....अर्चित दादाला हाय सांग, असे सांगून त्यानं हसत फोन ठेवला. आता माझ्या डोक्याला भूंगा लागलाय....मी काय शिकायचं....

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. हो ना बरोबर आहे.
    प्रत्येक प्रसंगातून शिकायचे च असते.

    ReplyDelete
    Replies
    1. आजच्या तरुण पिढीकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

      Delete
  2. लग्न खरेदी मोठे दिव्य

    ReplyDelete
  3. खुप सुन्दर. अनुभव घेऊन बदल करणे

    ReplyDelete
  4. ब्लॉग आवडला. अजूनही बऱ्याच बाबतीत ' सारे काही ते तसेच..' याची ग्वाही देणा-या या लेखाने पिढीतील वैचारिक अंतर दिवसेंदिवस कसे वाढत आहे हे स्पष्ट केले. इंग्रजीत असा वाक्प्रचार आहे -
    " many cooks spoil the food "
    आजची तरुण पिढी विचारपूर्वक आणि योग्य निर्णय घेते असा माझा अनुभव आहे. जुन्या आणि नव्या पिढीच्या थॉट प्रोसेसमध्ये तफावत असल्यामुळे असा गोंधळ होतो.
    खूप काही शिकवून जाणारा लेख मनापासून आवडला. अभिनंदन!!
    भारती मोरे

    ReplyDelete
    Replies
    1. आत्ताची तरुण पिढी ही स्वतंत्र विचारांची आहे. ब-याचवेळा यांना काय कळतं, असं म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना राग येतो....पण त्यांची मतं जाणून घेत, त्यांच्या आपल्या विचारांची सांगड घालणं सध्या गरजेचं आहे.

      Delete
  5. खूप छान अनुभव शेअर केला.अगदी खरं आहे

    ReplyDelete

Post a Comment