आली तूर चला भूर्र
लॉटरी लागणे या शब्दप्रयोगाचा अर्थ तुम्ही कसा लावता....अचानक भरपूर पैसे मिळणे...बरोबर आहे. पण फक्त पैसे मिळाले की आनंद होतो का...अर्थातच नाही. आता गेल्या आठवड्यात मला पण लॉटरी लागली. या लॉटरीमुळे मला किती आनंद झाला हे शब्दात सांगता येणार नाही. झाले असे की, सकाळी आठा साडेआठचा मुहूर्त काढून आम्ही बाजारात गेलो होतो. नोव्हेंबर महिना सुरु झाला की, बाजारात चांगला वेळ काढून फिरायला जाणं यासारखा दुसरा आनंद नाही, असो, याच आनंदामध्ये भर घालणारी एक गोष्ट तेव्हा झाली. मी ज्या मावशीकडून नेहमी भाजी घेते, तिच्यासमोर तुरीच्या शेंगांचा मोठा डोंगर होता. तुरीच्या शेंगा खायला जेवढ्या गोड लागतात, तेवढ्या त्या सोलायला त्रासदायक असतात. त्यामुळेच ती मावशी खूप आग्रह करत असली तरी मी फक्त पाव किलो दे, म्हणून अडून बसले. पण ती मावशी थोडीच ऐकतेय. तिनं एक गोड ऑफर दिली, तू बाजार फिरुन ये, मी तुरीच्या शेंगा सोलून ठेवते, जे दाणे असतील, ते सगळे तुझे....हे तर सोनेपे सुहागा....यालाच लॉटरी लागणे म्हणतात...मी तिच्या या ऑफरला जोरात हो...म्हणत अवघा बाजार फिरुन आले. एक तासाच्या कालावधीत इकडे या मावशीनं चांगले अर्धा किलोहून अधिक तुरीचे दाणे सोलून ठेवले होते. तिला दहावेळा धन्यवाद
म्हणत, तिनं दिलेले हे दाणे घेतले आणि घर गाठलं. किलोभर मटार, मेथी, पालक, माठ, कोथिंबीर आणि अन्य भाज्यांची साफसफाई होईपर्यंत पुढचे अवघे दोन तास गेले. एव्हाना दुपारचा एक वाजत आलेला...अशात जेवणाची काहीही हालचाल नाही, म्हटल्यावर नव-याची चुळबूळ सुरु झाली. मी मात्र निर्धास्त होते, कारण माझा भरवसा त्या तुरीच्या दाण्यांवर होता.
बाजारात तूर दाखल झाली की ख-याअर्थानं थंडी सुरु झाली आहे, हे मानले
जाते. यावर्षी हवामानाचे वेळापत्रक बिघडले असले तरी, तुरीनं मात्र आपली येण्याची
वेळ तंतोतंत पाळली आहे. ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी ही सगळ्यात सहज आणि सोप्पी
असते. अगदी फक्त ठेचलेल्या लसणीवर तुरीचे दाणे फोडणीला दिले आणि त्यावर मुठभर
खोबरं, लाल तिखट, मिठ, हळद टाकून रस्सा भाजी केली तरी त्याची चव भारी लागते. या
सर्वात फक्त एकच अडचण असते, ती म्हणजे, तूर सोलणे. यावेळी मात्र मला लॉटरी लागली.
आयते तुरीचे दाणे हाती आले. आता या संधीचे सोनं करत मी अवघा आठवडा तूर वीक म्हणून
साजरा केला. त्यातील काही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. पहिल्यांदा केला तो
तुरीच्या दाण्यांचा ठेचा. मी माझ्या जसई या चॅनेलमध्ये यासंदर्भात व्हिडिओही शेअर
केला आहे. तुरीच्या दाण्यांचा ठेचा साधारण आठवडाभर टिकतो. प्रवासात काही चटपटीत
हवं असेल तर हा तुरीच्या दाण्यांचा ठेचा चांगला पर्याय ठरतो. यासाठी सुरुवातीला
तुरीचे दाणे हळद घातलेल्या गरम पाण्यातून एक वाफ देऊन उकळून घेतले. तुरीच्या
दाण्यांचा कुठलाही पदार्थ करतांना मी ही काळजी नेहमी घेते. माझ्या एका मैत्रिणीनं
यासंदर्भात सूचना दिली होती. तुरीच्या दाण्यांमध्ये बारीक किडी असतात, काहीवेळा या
किडी इतक्या बारीक असतात, की त्या आपल्याला दिसतही नाहीत. अशावेळी तुरीचे दाणे हळद
घातलेल्या पाण्यात एक उकळी येऊन काढले तर ते साफ होतात.
असेच तुरीचे दाणे साफ करुन घेतले आणि तव्यावर वाटीभर तुरीचे दाणे
आणि त्यापेक्षा थोडे कमी शेंगदाणे भाजण्यासाठी घेतले. तेल टाकून हे दोन्हीही जिन्नस खरपूस भाजल्यावर यामध्ये चमचाभर तीळ, हिरव्या मिरच्या, मुठभर लसणाच्या पाकळ्या, अगदी थोडं आलं, कोथिबींरीचे दांडेही टाकले. पाच मिनिटं हे सर्व चांगलं भाजलं, की ठेचा तयार झाला असे समजायचे. हे सर्व मिश्रण थंड झालं की मिक्सरमधून बारीक करुन घेतले मग त्यात मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घातली. या ठेच्यावर मग जिरं, राई, बडीशेप, कडीपत्ता आणि हिंग यांची खमंग फोडणी करुन टाकायची. त्याचवेळी थोडी कोथिंबीर आणि ओलं खोबर टाकून सगळं पुन्हा एकजीव केलं की हा तुरीचा ठेचा खायला तयार. हा ठेचा होत असतांना एकीकडे बाजरीची भाकरी करुन झाली आणि साधी मुगाची खिचडीही. जोडीला पोह्यांचा पापड. थंडीचं हे पहिलं ताट छान सजलं. मग संध्याकाळी पुन्हा याच ठेच्याबरोबर तुरीच्या दाणे टाकून थेपले केले. दुपारच्या ठेच्यासाठी जे तुरीचे दाणे हळद टाकून साफ करुन घेतले होते, त्यातले वाटीभर तुरीचे दाणे मागे ठेवले होते. रात्रीच्या जेवणासाठी थेपले करतांना हे तुरीचे दाणे आणि हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक केले. तेलावर फक्त जिरं, ओवा आणि हळद यांचा वापर केला. त्यावर बारीक केलेले तुरीचे दाणे परतून घेतले. याचवेळी त्यामध्ये थोडी मेथीही चिरुन टाकली. हे मिश्रण कोरडं होईपर्यंत परतलं आणि गॅस बंद करतांना त्यात मिठ टाकलं. मिश्रण चांगले थंड झाल्यावर त्यामध्ये गव्हाचे पीठ मळून घेतले. शक्यतो अगदी थोड्या पाण्याचा वापर करावा लागतो. पीठाचा गोळा तयार झाल्यावर त्यावर
तेलाचा हात लावला आणि त्याचे थेपले करुन घेतले. सकाळचा तुरीच्या दाण्याचा ठेचा चांगला आठवडाभर जेवणाच्या ताटात डाव्या बाजूला खंबीरपणे उभं राहिल असा माझा अंदाज होता. पण हंगामातील या पहिल्याच ठेच्यावर नव-यानं दोन्हीवेळा चांगला आडवा हात मारला. वरुन उद्याला पण तूरच का...म्हणून मला प्रश्न विचारला. आयत्या मिळेलेल्या दाण्यांवर माझा तूर वीक अशाप्रकारे सुरु झाला. याच आनंदात नव-यानं एक सहलीची घोषणा केली. ही बातमी सांगत, प्रवासात बाहेरचं काहीही नको, असेच थेपले, हा तुरीचा ठेचा आणि चारपाच सुरणाच्या कापा घेऊया....म्हणत, थेपले आणि ठेच्याचा मोठा घास घेतला. मी मात्र मनात मला लागलेल्या लॉटरीतील ठेव्याला जपायचे की आली तूर चला भूर्रर्र्....म्हणत आनंद व्यक्त करायचा याच संभ्रमात होते....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
याच ब्लॉगसोबत जसई युट्यूब चॅनेलची लिंकही शेअर
केली आहे. तुरीच्या दाण्यांचा ठेचा नक्की बघा...
https://www.youtube.com/watch?v=5TQ2cdTIanE




Comments
Post a Comment