सेल्फीश.....


सेल्फीश...
गेल्या आठवड्यात क्रोनिक सेल्फाइटिस या नव्याने दाखल झालेल्या रोगाच्या काही रोग्यांना मी भेटले...भेटले म्हणण्यापेक्षा बघितलं, म्हणणं जास्त बरोबर ठरेल.  कारण या नव्या, अगदी फ्रेश असलेल्या रोगाबद्दल मी नुकतच काही मासिकात आणि पेपरमध्ये वाचलं होतं.  पण हे रोगी कसे दिसतात याबाबत मात्र मला कल्पना नव्हती.  त्यांना बघण्याची माझी हौस डोंबिवली ते ठाणे रल्वे प्रवासात पूर्ण झाली.  काही कामानिमित्त नवरा ऑफीसवरून बाहेरगावी जाणार होता.  त्याच्या सामानाची बॅग घेऊन मी रात्री नऊच्या सुमारास ठाणे स्थानकात जाण्यासाठी निघाले.  डोंबिवलीहून गाडी पकडली.  रात्रीची वेळ असल्याने एरवी ओसंडून वाहणारी रेल्वे बरीच शांत होती.  मला थेट विंडो सीट मिळाली.  पुढच्या, कोपर स्थानकावर एक कॉलेजवयीन युवतींचा ग्रुप गाडीत चढला.  या पाच जणी बहुधा त्यांच्या एका मैत्रिणीच्या बहिणीच्या लग्नाला आलेल्या....छान सजलेल्या या मुलींनी डब्यात असलेल्या प्रत्येक महिलेचे लक्ष वेधून घेतले.  पण या मुलींचे मात्र कोणाकडे लक्ष नव्हते.  त्या डब्यात चढल्याबरोबर मोबाईलबरोबर त्यांचा संवाद सुरु झाला.  पहिल्यांदा एकमेकींचे फोटो काढले...अर्थात सेल्फीच...पाऊट करुन...नंतर मात्र प्रत्येकीने आपापले सेल्फी काढायला सुरुवात केली.  अनायसे ट्रेन खाली होती... त्यामुळे दोघींनी एक-एक खिडकी पकडली...एक उभ्या उभ्या सेल्फी काढायला लागली...बाकीच्यांनी मिळेल तिथून सेल्फी काढायला सुरुवात केली....दिवा स्टेशन आलं आणि गेलं...तसंच मुंब्रा..कळवाही आलं..गेलं...या पोरींचं समाधान काही होईना...थो़डावेळ थांबून एकमेकींचे सेल्फी कसे आलेत हे दाखवण्याचा कार्यक्रम सुरु झाला.  मला वाटलं झालं आता, तर मध्येच पुन्हा कळव्याचा बोगदा लागला...पुन्हा बोगद्यातला सेल्फी...शेवटी ठाणे स्थानक आलं...त्यांच्या बोलण्यातून मला समजलं होतं की त्यांना ठाण्याला उतरायचंय.  पण फोन, सेल्फी पुराण आवरेनात...मला उगाच काळजी वाटायला लागली...पण स्टेशनमध्ये गाडी शिरताच सराईतासारख्या सर्वजणी उभ्या राहिल्या आणि पुन्हा एक सेल्फी काढून माझ्या मागोमाग उतरल्याही....

मंडळी हे वर मी जो नवा क्रोनिक सेल्फाइटिस नावाचा रोग म्हटलं आहे, तो म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून सतत सेल्फी काढणा-यांना लोकांना होतो, तो हा रोग आहे.  आहे की नाही गम्मत...काही दिवसांपूर्वी शिकागोमध्ये झालेल्या `अॅन्युअल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स`च्या बैढकीत या अती सेल्फी वेडाची चर्चा करण्यात आली.  सतत सेल्फी काढणं हा एक `मेन्टल डिसऑर्डर`चा भाग असल्याचं यात स्पष्ट करण्यात आलं.  या डिसऑर्डरला सेल्फायटीस `selfitis` असं म्हटलं जातं. सेल्फायटीसच्या तीन लेव्हल्स आहेत.
बॉर्डरलाईन सेल्फाइटिस म्हणजे  एका दिवसात कमीत कमी तीन सेल्फी क्लिक करणं परंतु, त्याला सोशल मीडियावर शेअर न करणं.
एक्यूट सेल्फाइटिस म्हणजे दुसरी लेव्हल...त्यात एका दिवसात कमीत कमी ३ सेल्फी क्लिक करणं आणि तिन्ही सोशल मीडियावर शेअर करणं. त्यातली शेवटची लेव्हल म्हणजे
क्रोनिक सेल्फाइटिस...यात दिवसभर स्वत:चीच सेल्फी क्लिक करत राहणं आणि सोशल मीडियावर त्याला सहापेक्षा जास्त वेळा शेअर करणं.  या मेन्टल डिसऑर्डरचा सध्या तरी काहीच इलाज नसल्याचे स्पष्ट झालंय.  मला ट्रेनमध्ये भेटलेल्या तरुणींनी पहिली-दुसरी स्टेज नक्कीच पार केली होती...त्यांची तिसरी स्टेजही बहुधा धोक्याच्या रेषेवर असणार...
अशी फोनच्या आणि सेल्फीच्या आहारी गेलेली मंडळी आपल्याला जागोजागी दिसतात.  अगदी चालतांना वॉटस्अप व्हिडीओ कॉल करणा-या लोकांचीही संख्याही वाढती आहे.  ही मंडळी या जगात मी एकटाच आहे, अशा अविर्भावात चालत, बोलत आणि वागतही असतात.  अनेकवेळा  अपघात होतात,  काही वेळा गंभीर हानीही होते.  आपण सर्वजण त्याबाबत वाचतोय...सेल्फीच्या मोहापायी तरुणांनी आपला जीव गमावल्याच्या बातम्या येतात.  हळहळ व्यक्त होते...पण तरीही ही सेल्फी क्रेझ कमी झालेली नाही, हे मान्य करावे लागेल. 
या वाढत्या सेल्फी क्रेझचे स्वरुपही व्यापक होत आहे.  त्यामुळेच अनेक मान्यवर मानसोपचारतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.  या व्यापक स्वरुपामध्ये आता व्यक्तीचे दिसणे,स अर्थात त्याचा लूकही महत्त्वाचा ठरतोय.  आपला सेल्फी कसा चांगला येईल,  त्यात आपण कसे दिसू, आपले हास्य अधिक चांगले कसे दिसेल, ते पाऊट क काय करतांना ओठ कसे चांगले दिसतील.. यासाठी चक्क प्लॅस्टीक सर्जरी करणा-यांचे प्रमाण वाढले आहे.  हे जितके मजेशिर तितकेच चिंतेत टाकणारे आहे. ही मंडळी म्हणजे आ बैल मुझे मार प्रकारातील आहेत.  मी जेव्हा यासंदर्भात लेख वाचले तेव्हा जाणवले की असे सेल्फी दिवाने आपल्या आसपासच किती आहेत ते....
काही दिवसापूर्वी माझ्या वाचनात एक अनोखा मजकूर आला. त्यात म्हटले होते की, देशातील चार शहरांमध्ये एक सर्व्हे घेण्यात आला. यामध्ये परफेक्ट सेल्फी लूक  मिळण्यासाठी चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करणार का असा प्रश्न विचारण्यात आला.  मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि हैद्राबाद अशा चार शहरांमधील 18 ते 40 वयोगटातील जवळजवळ 300  लोकांना हा प्रश्न विचारण्यात आला.  यामध्ये परफेक्ट सेल्फी मिळत नाही म्हणून 74 टक्के स्त्रियांचा तर 59 टक्के पुरुषांचा आत्मविश्वास कमी झाल्याचे दिसून आले. यामुळे 62 टक्के पुरुष तर 75 टक्के स्त्रिया चांगला सेल्फी येत नाही म्हणून प्लास्टिक सर्जरी करून घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले. मुंबईतल्या 63 टक्के पुरुष आणि 75 टक्के स्त्रियांमध्ये सुंदर नसल्याने नैराश्य आल्याचेही दिसले.
हे वाचल्यावर काय हा बिनडोकपणा असा विचार मनात येतो.  सेल्फी काढतांना चेहरा चांगला दिसत नाही म्हणून नैराश्य येणे हे मला तर बिनकामाच्या माणसांनी मागून घेतलेला रोग असल्याचे वाटते.  आता जे आपल्या दिसण्यावर आपल्याबरोबर मैत्री करतात, त्यांची मैत्री किती कुचकामी आणि दिखावू आहे हे सांगायची गरज नाही.  अशा लोकांना खूष करण्यासाठी प्लॅस्टीक सर्जरी पर्यंत प्रयत्न करायचे, आणि नंतर हे कृत्रिम सौदर्य सोबत घेऊन आपण मैत्रीच्या नात्याची सुरुवात करायची...आणि तसे झाले नाही तर निराश व्हायचे....हे कशासाठी...सौदर्य...लूक म्हणजे काय...ते मोजण्याचे काही मापदंड असतात का...नक्कीच नाही.
सेल्फी आणि रेकॉर्डींगमुळे आपण जीवनाचा आनंद घ्यायला विसरलो आहोत.  कालपरवा एका गुलाबपुष्प प्रदर्शनाला गेले होते.  काही मंडळी तयारच होती.  मोबाईल आणि ते...दिसले फुल की काढ फोटो...कधी सेल्फी...मग लाईव्ह नावाचा प्रकार...अरे यापेक्षा ते जे समोर गुलाबाचे फुल आहे, त्याला निट बघा ना...त्याचे नाव वाचा...त्याचा हलका सुवास घ्या...त्याच्या रंगाचे...रुबाबाचे कौतुक करा...रेकॉर्डींग करणारे किती वेळी ती रेकॉर्डींग पुन्हा बघतात, हे त्यांचे  तेच जाणो...असेच उरी चित्रपट बघायला गेल्यावर सेल्फी दिवाणे भेटले...थेअटरमध्ये मिट्ट काळोख झाल्यावर मोबाईल सुरु झाले. मला कळेना शेजारी बसलेली मुलगी आता फोन कशाला वापरतेय...पण नंतर जेव्हा स्क्रीनवर उरी नाव झळकलं तेव्हा तिने त्यासोबत सेल्फी काढतांनाची केलेली झटपट पाहिली...ती माझ्यासाठी अरे देवा...या गटातली होती...मी इथे आहे,  मी हे पाहिलं हे दाखवण्याची नको तेवढी घाई म्हणजे सेल्फी अशी मी तरी सेल्फीची व्याख्या केलीय.  पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांच्या अंत्ययात्रेत हे सेल्फी दिवाने टीव्हीवरुन पाहिले...आपण कुठे आलोय...कशाला आलोय हे साधे कळूही नये...
आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे वागतो हे मह्त्त्वाचे असते.  फोनमुळे संवाद कमी झालाय... मुलांना फोन गेमींगची सवय लागलीय....हे आपण ऐकून आहोत..बघतही आहोत..पण सेल्फीसाठी चाललेली धडपड त्याही पुढची वाटते.  सेल्फी चांगली येत नाही म्हणून आत्महत्या केल्याची बातमी बघितली की वाईट वाटतं.  आपलं आयुष्य फक्त सेल्फीपुरतच मर्यादित झालं आहे का...पुढे घरातल्या घरात बसून एकमेकांना व्हिडीओ कॉलिंग कसे करतो, अशी बातमी आली नाही म्हणजे मिळवलं....

सई बने
डोंबिवली
-------------------------------------------------------------------------------------
कृपया आपला अभिप्राय खाली नोंदवावा










Comments

  1. ह्या आभासी जगाचे अतिशय योग्य आणि अभ्यासपूर्ण वर्णन! मोबाईल वरचे फोटो हा खरंच काळजीचा विषय झाला आहे.

    ReplyDelete
  2. Very relevant and need of the hour.

    ReplyDelete
  3. अगदी योग्य विषय निवडला आहे. छान वर्णन केले आहे.

    ReplyDelete
  4. समाजमाध्यमांचा अति आणि चुकीचा वापर ही सध्या चिंतेची बाब बनली आहे. ' याला कसा / कशी आवरू ?' हा प्रश्न निरुत्तर करणारा आहे. लेखात सामाजिक वास्तव चित्रीत केले आहे.

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर शब्द रचनेत आपण वास्तवता मांडली आहे

    ReplyDelete
  6. एक चांगला विषय... सेल्फीचा शोध, या वेडाचे आदर्श कोणाकडून मिळाले... ही स्पर्धा थांबविण्यासाठी एक नवा पर्याय ... पुढील लेखातून आपणांकडून अपेक्षित आहेत

    ReplyDelete
  7. Today's reality of young generation
    Good initiative by Mrs Sai Bane.

    ReplyDelete
  8. AFTER LONG TIME
    WE ARE ALWAYS EAGER TO READ NEW BLOGS.
    SELFIE SO NICE
    AWARENESS IS ESSENTIAL.
    ALL THE BEST.

    ReplyDelete
  9. सेल्फी रोगाचा वास्तव छान मांडलंय स खरच सध्या या सेल्फी च्या रोगाने धुमाकूळ घातलाय...

    ReplyDelete

Post a Comment