विश्वासाची परीक्षा



विश्वासाची


परीक्षा
वॉटस्अपच्या माध्यमातून येणारे विनोद म्हणजे ब-याचवेळा डोकेदुखी असते.  कोण कुठल्या गोष्टीची मस्करी करेल हे सांगता येत नाही.  आणि कधी करेल हेही सांगता येत नाही.  त्यातच ते पाठवणारे म्हणजेच, इकडून तिकडे ढकलणारे स्वतः किती वाचक आहेत हा प्रश्नही आहेच.  ब-याच वेळा महिलांवर असणारे विनोद महिलाच आपल्या दुस-या मैत्रिणींना सहज म्हणून पाठवतात...नव-याच्या वॉटस्अपवर आलेले विनोद बायका आपल्या मैत्रीणींना पाठवतात तेव्हा त्यांना फोन करुन सांगावसं वाटतं, बायानो आधी वाचा गं, मग पाठवा....आपणच आपली मानहानी होणारे संदेश पाठवू तरी नका...असो...या अशाच एका मेसेज मधून माझ्या डोक्याला नवीन खाद्य मिळाले....

मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे निकाल जाहीर झाले...यंदा आमचे चिरंजीवही दहावीला असल्यामुळे मी अर्लर्ट होते...त्यात पहिल्यांदा सीबीएसईच्या बारावीचे निकाल आधी जाहीर झाले...अशावेळी पहिलं कोण आलं, त्यांनी कसा अभ्यास केला, त्यांना पुढे काय करायचं आहे, याच्या बातम्या येऊ लागल्या...आजकाल तर युट्यूबवर या विद्यार्थ्यांच्या छान मुलाखतीही आल्या...त्या बातम्या वाचणे आणि हे व्हिडोओ बघणे माझे आवडते काम...बारावीमध्ये  हंसिका शुक्ला आणि करिष्मा अरोरा या दोन मुली देशात पहिल्या आल्या....एकूण 500 गुणांपैकी त्यांना 499 गुण मिळाले...आहे की नाही कौतुकास्पद कामगिरी...
ही निकालाची बातमी आली आणि दुस-याच दिवसांपासून यातील हंसिका शुक्ला या मुलीवर वॉटस्अपच्या माध्यमातून विनोद येऊ लागले.  499 गुणांवर या मुलीचं समाधान नव्हतं...तर तिला तिचा एक गुण कसा आणि कुठे गेला हे जाणून घ्यायचं होतं.  त्यासाठी हंसिका पेपर पुन्हा तपासणीसाठी अर्ज करणार होती...या एका गोष्टीतू या  मुलीवर विनोद केले जात होते.  एवढे गुण मिळाले, अजून समाधान झालं नाही का...असा एकूण त्यांचा आशय होता....मला हे मेसेज बघून हंसिकाबाबत उत्सुकता वाढली.  तिच्याबद्दल आलेल्या बातम्या शोधल्या. व्हिडीओ बघितले.  आणि पहिल्यांदा सांगितलं पाहिजे की या मुलीच्या आत्मविश्वासावर मी फिदा झाले.  किती विश्वास.  तिच्या बोलण्यात तिने घेतलेल्या मेहनतीबाबत विश्वास होता.  हंसिका दिल्ली पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे.  तिचे वडील डॉ. साकेत कुमार उच्चपदस्य अधिकारी आहेत. तर आई डॉ. मीना शुक्ला गाझियाबाद महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. नियमीत अभ्यास हे तिच्या यशाचे सूत्र...परीक्षा झाल्यावर या मुलीने आपल्या गुणांची पडताळणी स्वतःच्या पद्धतीने केली होती.  त्यात तिने पैकीच्या पैकी गुण मिळतील हे निश्चित केले होते.  मात्र निकाल लागल्यावर ती देशात पहिली आली याचे समाधान मिळाले, पण तिच्या पैकीच्या पैकी गुण या स्वप्नाला तडा गेल्याचेही लक्षात आले. त्यामुळेच तिने ज्या विषयात एक गुण कमी आहे, तो पेपर पुन्हा तपासणीसाठी पाठवण्याचे निश्चित केले.  याबाबत तिने तिच्या मुलाखतीतही माहिती दिली.  आणि यावरुनच ती सोशलमिडीयावर एक विनोदाचे साधन बनून गेली.
मला या गोष्टीत कुठेही विनोद दिसला नाही.  उलट त्या हंसिकाचे कौतुक वाटले.  मी पुन्हा एकदा या मुलीची मुलाखत पाहिली.  किती आत्मविश्वास होता तिच्या बोलण्यात...आपण कसा आभ्यास केला आहे, किती केला आहे, आणि तो किती अचूक आहे, याची परिपूर्ण जाणिव तिला आहे.  त्यातूनच आपण केलेल्या मेहनतीचे फळ कसे असणार याचा अंदाज तिला होता. मग   आपल्याला शंभर टक्के यश मिळणार आहे, हे माहीत असतांना ती 99 टक्के कसे स्विकारणार....
अभ्यास करण्याची प्रत्येक मुलाची स्वतंत्र पद्धती असते. या वर्षी माझा मुलगाही दहावीला होता.  अशावेळी येणारे अनेक सल्ले आम्ही झेलले.  अगदी टीव्ही बंद करा...पासून ते नको नको ते गाईड वाचा आदी सल्ले मिळाले.  अर्थात आम्ही यातले कुठलेही ऐकले नाहीत हेही खरे.  सध्या अभ्यास करतांना मुलांची किती फरफड होते ते फक्त ही मुलेच जाणो.  कितीतरी बाह्य आकर्षणं या मुलांना खुणावत असतात.  मोबाईलला पर्याय नाहीच, एवढं महत्त्व आलेलं.  त्यातून सोशल मिडीया...फार काय त्या आयपीएलच्या मॅचेसही ऐन परीक्षेच्या काळात असतात. या अभ्यासातल्या हर्डल्सची यादी मोठी आहे.  काही मुले त्यात गुरफटतात.  तर काही त्यावर मात करुन आपलं नाणं किती खरं आहे याची समोरच्याला पावती देतात.  ही हंसिकाही या खणखणीत नाण्यासारखी आहे. 
दहावी-बारावीमध्ये खूप गुण मिळवले म्हणजे जीवनात यश मिळतं असं नाही.  हे वाक्य खूप खरं आहे.  पण यापलीकडे दहावी – बारावीच्या परीक्षेकडे पहायची गरज आहे असं मला नेहमी वाटतं.  दहावी संपली की माध्यमिक शिक्षणाचा एक टप्पा पार होतो.  तर बारावी संपली उच्च माध्यमिक शिक्षणाचा टप्पा पार होतो.  मग विद्यार्थी आपले आवडीचे विषय निवडून त्यात पुढील शिक्षण घेऊ शकतात.  बस, एवढंच महत्त्व आहे का या परीक्षांना...नक्कीच नाही. या परीक्षा,  याव्यतिरिक्त मुलांना अभ्यास करण्याची आणि आपण केलेल्या अभ्यासाची खोली तपासण्याची संधी देतात.  आपण फक्त भोकमपट्टी करतो, की त्या विषयाला जाणून-समजून घेतो ते या परीक्षांमधून समजते.  हंसिकासारखे विद्यार्थी या परीक्षेच्या माध्यमातून आपल्या बौद्धिक क्षमतेबरोबर आपल्या आत्मविश्वासाचीही परीक्षा देतात.  मला तर यात काहीही चूक वाटत नाही. 
मुलांनी अभ्यास करावा, चांगलं शिकावं ही प्रत्येक आईवडीलांची इच्छा असते.  पण यासाठी प्रयत्न करतांना अनेक पालक मुलांना अभ्यासाच्या ऐवजी नको ते पर्याय समोर ठेवतात.  सध्या मोबाईलचा वापर तर डोकेदुखी सारखा झाला आहे.  एका आजारात त्याचे रुपांतर झाले आहे. पण अद्यापही आपल्याकडे त्याची तेवढी दखल घेतली गेली नाही, हेही काळजी करण्यासारखे आहे.  मुलांनी फक्त चोवीस तास अभ्यास करावा असे नाही.  पण अभ्यास नाही म्हणून मोबाईल वा मोबाईल गेमच्या मागे लागावे असेही नाही.  मुलांचे शाळेचे वॉटस्अप ग्रुप असतात.  पण त्या ग्रुपमध्ये अभ्यासाला वगळून अन्य सर्वांवर चर्चा होते, हे मी स्वतः अनुभवलं आहे.  यात मुलांचा दोष आहे असं मी म्हणतं नाही.  मुलं कितीवेळ आणि कसा मोबाईल हाताळत आहेत, त्याचा मुलांच्या अभ्यासावर किती परिणाम होत आहे, याचा पालकांना पत्ताच नसतो. 
या सर्वांवर मात करुन ती हंसिका पुढे गेली.  तिनेच फक्त मात केली असे नाही तर तिच्या पालकांनीही हे अडथळे पार केले आणि आपल्या मुलीच्या यशात हातभार लावला.  मग अशा मुलीवर विनोद करण्यात कितपत शहाणपणा आहे.  हे विनोद करण्यापेक्षा तिची जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास आपण घेतला पाहिजे, असं मला तरी वाटतं...मंडळी तुमचं काय मत ते नक्की सांगा...

सई बने
डोंबिवली

------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा





Comments

  1. खूप छान आणि योग्य लिहिलंय

    ReplyDelete
  2. मोबाईलचा वापर आणि forwarded message ह्या दोन्ही गोष्टी खरोखर त्रासदायक ठरू लागल्या आहेत.त्यावरच तुझे विचार खरंच चांगले आहेत.
    तुझ्या लेकाबरोबर तुम्हां उभयतांचे पण अभिनंदन

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मॅडम...मोबाईलचा वापर कसा करावा हे त्या वापरणा-यावर आहे...पण कसाही होवो त्यासाठी वेळेची मर्यादा असावी हे मात्र नक्की

      Delete
  3. खूप छान लेख.

    ReplyDelete
  4. लेख विचार नक्कीच चांगले आहेत पण मोबाईल चा आजार आता जन्मजात होऊ लागला आहे लेखातील संदेश चांगला आहे पण कोणी कसा घायचा हा त्यांचा प्रश्न आहे नाहीतर पुन्हा व्यक्ती स्वांत्रताचे घोडे नाचेल

    ReplyDelete
  5. मुलांचा अभ्यास आणि त्या सोबत त्यांना खुणावणारे गैझेट्स आणि त्याचे मुलांच्या आभ्यासावर होणारे परिणाम हा खुप मोठा संशोधनाचा विषय आहे
    त्यातला मार्ग मला एकच दिसतो मुलांना भवितव्य बाबत जागृत करुण कशाला किती महत्व द्यायच् हे पालकाना मुलांपर्यंत अपले म्हणणे कसे पोहचवायच पटवून द्यायच हे उमगलना की बहुतांशी प्रश्न सुटतील अस माझे वैयक्तिक मत आहे...
    आदरणीय सई जी तुम्हास आणि तुमच्या पाल्यास हार्दिक शुभेछ्या
    धन्यवाद
    नित्तिन पाटिल

    ReplyDelete
  6. शिल्पा तुझा लेख वाचला थोडा उशीरच झाला वाचायला पण खुप छान आणि तुझे लेख वास्तववादी असतात पटतात पण बऱ्याचदा काय होतं आपल्याला कळत की असं नको व्हायला पण तसं होत वॉट्साप मुळे खुप फायदा होतोय पण अतिरेक सुद्धा होतोय अस वाटत कधी कधी वेळेचं भान विसरून जातो सकाळी उठल्यावर पाहिले अपडेट व्हायला लागतं तेव्हा आपला दिवस सुरू होतो चहाच्या अगोदर आपली priority Watts app la असते हे थोडं बदललं पाहिजे पण ओके ठीक आहे

    ReplyDelete

Post a Comment