राजे.....
राजे....महाराज....हे
दोन शब्द आले की, आपल्या महाराष्ट्रात प्रत्येकाच्या नजरेसमोर एकच व्यक्तीमत्व
येतं...छत्रपती शिवाजी महाराज....या नावापुढे सर्वच नतमस्तक होतात...गरीब-श्रीमंत
हा भेद नसतो. जाती-पातीच्या भींती
नसतात...ते राजे...महाराज...छत्रपती...शिवबा...आणि आपण सर्व त्यांचे मावळे...फक्त
मावळे....
महाराज आज आपल्यात नाहीत...ते जाऊन किती वर्ष झाली हे मला मोजायचे
नाही...कारण महाराज आज आपल्यात शरीराने नसले तरी ते प्रत्येक मावळ्याच्या मनात
आहेत...आणि कायमचे राहणार आहेत....काय जादू
आहे त्यांची कुणास ठाऊक...महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी आणि मुख्य म्हणजे त्यांनी
आपल्यावर, आपल्या मातीवर केलेले उपकार...याची परतफेड कदापी होऊ शकत नाही.
आमचा शाळेचा ग्रुप रायगड किल्ल्यावर महाराजांच्या दर्शनाला गेला, त्याला आता पंधरा दिवस झाले. पण अजूनही तो गड मनातून जात नाही. शिवाय एक वेगळी रुखरुख लागली. आपल्या स्वराज्याच्या या वैभवाला एवढ्या उशीरा
का पाहिलं, ही खंत मनाला लागली. मध्यंतरी
माझा परिचय चेतन राजगुरु आणि त्याच्या मित्रपरिवाराबरोबर झाला. हा खरा मावळा.
स्वतः इंजिनीअर. चांगली नोकरी,
कुटुंब...पण गडी शनिवार-रविवारी कुटुंबासह भटकंती करायला कुठल्या मॉल-बिल मध्ये
जात नाही. तर ही मंडळी जातात थेट
किल्ल्यावर...सोबत मित्रपरिवार. तोही
शिवभक्त. बरं ही मंडळी नुसता सैरसपाटा
करायला जातात का, तर नाही. हे सर्वजण जमेल तशी किल्ल्यांची साफसफाई
करतात. किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्या
स्वच्छ करतात. किल्ल्याच्या आसपास राहणा-या आदिवासी, कातकरी वाड्यांमध्ये सुविधा
देण्याचा प्रयत्न करतात. कपडे वाटप,
वह्या-पेन वाटप, शाळांमध्ये संगणक प्रणाली लावणे आणि तिची काळजीही घेणे, एका विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करण्यासाठी वर्गणी गोळा
करणे...असे एक ना दोन उद्योग ही मंडळी करतात.
मी ब-याच वेळा त्यांना विचारलं...काय मिळतं यातून तुम्हाला....त्यांचं
उत्तर तेच...आपले महाराज....
आपले राजे होतेच असे. अजूनही त्यांची भूरळ, दरारा जनमानसात आहे. आणि तो शेकडो वर्ष अबादीत राहील. माझी आणि वरदची पहिलीच रायगड फेरी होती. त्यामुळे आम्ही हौसेने चढून गेलो. अर्थात, तासभरातच रायगडाची ताकद कळली. किती उंच. सह्याद्रीचा राजा. उभ्या कपारी.
पण मग किल्ल्याचा एक एक भाग दिसायला लागला. किल्ल्याची भव्यता नजरेत यायला लागली. खुबलढा बुरूज, नाना दरवाजा, मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा, महादरवाजा, चोरदिंडी...एकएक नजरेत यायला
लागलं....काय भक्कम बांधकाम. आणि प्रत्येक
बांधकामात महाराजांनी केलेली भक्कम किल्ल्याची तटबंदी....आम्ही मित्रपरिवार किल्ला
चढेपर्यंत रात्रीचे तब्बल आठ वाजून गेले होते.
पौर्णिमेची रात्र असल्याने काळोख नव्हता...गडावरही ब-यापैकी गजबज
होती. त्यातील काही मंडळी अशा रात्री किल्ला
उतरत होती. सोबत लहान मुलं...एकाकडे तर
अगदी महिन्याचं बाळ होतं. गोधडीत
लपेटलेलं. माझ्या मनात धस्स झालं. आता किल्ला उतरणार म्हणजे साधारण नऊ
वाजतील....शिवाय ब-याच ठिकाणी उतारही होता.
न राहून मी त्यांना विचारलं, एवढ्या लहान बाळाला घेऊन आता कसं उतरणार...तर
ती मंडळी सहज म्हणाली अहो, महाराजांच्या दर्शनाला आलो होतो. बस्स...काय ताकद असेल ना महाराजांच्या
आशीर्वादामध्ये....
किल्ल्यावर आम्ही घालवलेला सर्व वेळ आगळा होता....भारावलेला
होता....आमचा गाईड
असलेला सुनील शिंदे हा अवघा पंधरा वर्षाचा...नुकतीच दहावीची परीक्षा संपलेली. रोज किल्ल्यावर
सकाळी सहाच्या सुमारास येतो...गाईड म्हणून किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांना माहिती
देतो. पण या पंधरा वर्षाच्या मुलाचा
इतिहास ऐकून आम्ही चाट पडलो. महाजांवरचे
पोवाडे, शेर, गौरवगाथा...काय-काय त्यांनी नाही सांगितलं. खड्या आवाजात त्यांनी राजांची गौरवगाथा
सांगितली...अंगावर काटा आला...डोळे पाणावले....प्रत्येक बुरुजाची...तलावाची
माहिती....हत्ती तलाव, स्तंभ पालखी, मेणा दरवाजा, राजभवन, खलबतखाना, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, ‘होळीचा माळ’, शिरकाई देऊळ, जगदीश्वर
मंदिर, महाराजांची समाधी, कुशावर्त तलाव, वाघदरवाजा, टकमक टोक, वाघ्या कुत्र्याची समाधी प्रत्येक स्थळाची परिपूर्ण माहिती...सोबत मराठ्यांच्या
इतिहासावर पोवाडे...शेरो-शायरी....मंडळी किल्ल्यावरचे हे क्षण कायम ह्दयात कोरले गेले आहेत....
इथेच काही अवलीया मंडळी भेटली....शैलेश कदम हे
त्यापैकीच एक...शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते...महाराजांवर रोज अभिषेक करण्यात
येतो. आम्ही रायगडावर होतो, तेव्हा हा मान
शैलेश कदम आणि त्यांच्या सहका-यांना मिळाला होता.
अभिषेक, आरती, जयजयकार झाल्यावर त्यांच्याबरोबर बोलता आले. तेव्हा समजले, हा मान मिळवण्यासाठी त्यांनी
तब्बल दोन वर्ष प्रतीक्षा केली होती. कदम
यांच्यासारखेच महाराजांचे मावळे गेल्या अनेक वर्षापासून महाराजांची सेवा करत
आहेत. त्यासाठी ही मंडळी आदल्या दिवशी
सांगलीहून निघतात. सोबत पुजेचे सर्व
सामान...बस...खाजगी वाहन असे जे साधन मिळेल त्यांनी रायगडाच्या पायथ्यापर्यंत
येतात. आणि भल्या पहाटे गड चढायला सुरुवात
करतात. ऊन, वारा, पाऊस, वादळ, थंडी काहीही
असो, ही मंडळी गड चढतातच...प्रत्येक दिवसाचा गट तयार असतो. या मावळ्यांमध्ये अनेक नोकरदार, शिक्षक,
इंजिनीअर, डॉक्टर, शेतकरी यांचा समावेश आहे.
कदम गेल्या पंचवीस वर्षापासून या सेवेशी जोडले गेले आहेत....महाराजांची
सेवा करण्याची संधी मिळते, याचा अभिमान असल्याचं ते सांगतात.
असे लाखो मावळे आजही महाराजांसाठी रायगडावर
जातात. तिथल्या मातीला कपाळी लावतात. आता आमचेच बघा, आमचा मित्र प्रफुल्ल. थेट दुबईहुून आला. कुटुंबासह. का...तर मुलींना आपला राजा समजला पाहिजे म्हणून...आमची मैत्रिण हेमांगी...हिची प्रवासाच्या दगदगीने
तब्बेत बिघडली होती. रोपवेने जा...असा
आग्रह तिला केला...पण बाई तयार झाल्या नाहीत...रायगड चढल्याच...तशीच गोष्ट
राणीची...राणीचा उपवास होता. तिलाही
प्रवासाचा त्रास झालेला...पण याबाईही गड चढणारच अशा जिद्दीच्या...गड चढल्यावर उत्साहाने जिजाईंची महती सांगणारे एक नृत्यही सादर केलं...ही जिद्द...हा उत्साह म्हणजे महाराज....त्यांचे नाव काढले तरी किती स्फुरण येतं. मग सगळी दुखणी...थकवा मागे पडतो. काही वर्षापूर्वी ठाण्यात शिवाजी महारांजांची
मिरवणूक पहातांना एका व्यक्तीने सहज विचारले,
येवढ्या मोठ्या राजाच्या एक..दोन..तीन जयंत्या साज-या करता...मिरवणुका
काढता...अशा जयंत्या साज-या करण्यापेक्षा एकच जयंती साजरी का नाही करत....त्याच्या
या प्रश्नावर मी सहज उत्तर दिले होते की, महाराजांचे या मातीवर एवढे उपकार आहेत
की, रोज जरी महाराजांची जयंती साजरी करुन मिरवणूक काढली तरी हे उपकार फेडता येणार
नाहीत...
आपले राजे आहेतच तसे. शाळेत विद्यार्थ्यांची जीवशास्त्र,
रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र यांची प्रॅक्टीकल घेतली जाते. त्याचे गुण मुलांना देण्यात येतात. मला नेहमी वाटतं की इतिहासाची आणि भुगोलाचीही
प्रॅक्टीकल व्हायला हवी. दरवर्षी या दोन
विषयाच्या प्रॅक्टीकलचा भाग म्हणून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना
एखाद्या गड-किल्यावर न्यावे. त्यांना या
किल्ल्याची माहिती गोळा करायला सांगायची.
किल्ल्याची रचना, स्वराज्यात त्याचे महत्त्व, भौगोलिक रचना, गड बांधताना केलेली पाण्याची व्यवस्था आदी अनेक बाबींवर
अभ्यास करायला सांगायचा. किल्ल्याची
भटकंती करतांना विद्यार्थ्यांनी किल्ल्याची स्वच्छताही करावी. मग किल्ल्यावरच्या दौ-याची माहिती
विद्यार्थ्यांनी आपल्या प्रोजेक्टमध्ये लिहायची.
त्यावर त्यांना गुण द्यायचे....अगदी दहावीच्या वर्षीही...महाराष्ट्रातल्या तमाम
शाळांनी हा उपक्रम दरवर्षी करायचा. पहिली नको,
पण पाचवीपासूनच्या प्रत्येक मुलांना आवर्जुन किल्ल्यावर न्यावे. दहावीच्या वर्षी स्वराज्याची राजधानी, म्हणजेच
रायगड दर्शन मुलांना करावे. यातून किती गोष्टी साध्य होतील, मुलांना महाराजांचा
इतिहास पुस्तकातून शिकवण्यापेक्षा प्रत्यक्ष बघता आणि शिकता येईल. महाराजांनी हे राष्ट्र घडविण्यासाठी किती मेहनत
घेतली याचा प्रत्यय त्यांना येईल. आणि
मुख्य म्हणजे, आपले महाराज कोण नव्हते...महाराज शेतकरी होते, इंजिनीअर होते,
आर्किटेक्ट होते, डॉक्टर होते, उत्तम शिक्षक होते, योद्धा होते, परकीय नितीचे जाणकार
होते....आज आपली मुलं यातील एखादी शाखा निवडतात.
आणि उज्ज्वल भविष्याचे स्वप्न बघतात.
त्यामुळे महाराजांच्या बहुरंगी व्यक्तीमत्त्वामधून त्यांना प्रेरणा
मिळेल. या मुलांना किल्ल्याची सफर घडवली
तर त्यांच्यावर योग्यच संस्कार होतील.
शिवाय किल्ल्यावर स्वच्छताही राखली जाईल.
आता गडावर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा होतोय...रायगडावर
६ जून इ.स. १६७४
रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या
सोहळयासाठी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनविण्यात आले होते. या सिंहासनाला वितळवून इंग्रज त्याचे सोनं घेऊन
गेले. पण सोन्यापेक्षा अमुल्य असणा-या आपल्या
महाराजांच्या आठवणींचा खजिना इंग्रज कधीच लुटू शकले नाहीत. आज या स्वराज्याच्या राजधानीला पुन्हा
पूर्वीसारखे वैभव देण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत. 32 मण सोन्याचे सिंहासन करण्याचा संकल्पही झाला
आहे. किल्ल्याची अनेक ठिकाणी झालेली पडझड
दुरुस्त होतेय. हे सर्व चालू आहेच...पण
मंडळी आपण काय करतोय हेही पाहिले पाहिजे.
अनेक जण पर्यटन आवडते म्हणून देश-विदेश पालथे घालतात. विमानाने फिरलो म्हणून अभिमान बाळगतात. पण माझ्यामते रायगड किल्ल्याचे दर्शन घेतले
नसेल, तर हा मान-अभिमान खूप फिका आहे. ज्या
राजामुळे आपले अस्तित्व आहे, त्या राजाला, त्याच्या राजधानीला जाऊन प्रत्येकाने
वंदन करायला हवे. शैलेश कदम, चेतन राजगुरु,
सुनील शिंदे असे महाराजांचे हजारो मावळे त्यांच्या सेवेत सदैव आहेतच...त्यांना
त्यांची प्रसिद्धी कधीच नको असते. पण
मंडळी हे मावळे काय करतात...शिवबा नावाची कुठली नशा त्यांना साद घालते, हे जाणून
घ्यायचे असेल तर नक्की एकदा गडावर जा....बघा तुम्हालाही गडाच्या पुढच्या भेटीची ओढ
लागेल....माझ्यासारखी....
सई बने
डोंबिवली
------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा






राजांची आठवण खुप जणांकडे आहे आणि ते आपाल्या पाल्याच्या मनात रुजऊ पाहात आहेत.
ReplyDelete