तृप्त... अतृप्त...


तृप्त...
अतृप्त...

काही ठिकाणी गेल्यावर जाणवतं, की इथे आपण उगीचच आलोय...आजूबाजूला सर्व असतात...छान गप्पा...चौकशी चालू असते...पण या वातावरणात आपण स्वतःला शेअर करु शकत नाही.  कधी या वातावरणातून बाहेर पडतोय, असं होऊन जातं...असंच काहीसं झालं...दोन दिवसांपूर्वी माझ्या बाबतीत...अर्थात काहीतरी सबब सांगून मी त्या ठिकाणाहून निघाले, पण दिवसभर आपण तिथे गेलोच कशाला, ही भावना माझ्या मनातून काही काढू शकले नाही. 

एक परिचीत वजा नातवाईकांच्या घरी असा नकोसा प्रसंग आला.  अगदी जवळपास रहाणारं हे कुटुंब...काही वर्षापूर्वी माझा आणि त्या कुटूंबाचा परिचय झाला.  काका, काकू, दोन मुलं आणि मुलगी..तसं पाहिलं तर मोठं कुटुंब...मुलगी मोठी..तिचं लग्न झालेलं.  आमच्या भागात हे कुटुंब रहायला आलं तेव्हा त्यांच्या मोठ्या मुलाचं लग्न नुकतच झालेलं...तेव्हा माझा लेक लहान...त्याला शाळेत सोडतांना, आणतांना आणि बाहेर नेतांना नेहमी त्या घरातील मोठ्यांशी भेट व्हायची.  कधी भाजी घ्यायला आम्ही एकत्र असायचो.  हळूहळू परिचय झाला.  आणि मग चांगली ओळख झाली...घरातील सर्व सदस्यांचा परिचय झाला.   मग कळलं की हे कुटुंब आमच्या दूरच्या नात्यातील आहे.  मग काय, हक्काचे घर भेटल्यासारखे झाले.  नवीन काही पदार्थ केला की त्याचे डबे भरुन जाऊ लागले.  त्यांच्या घरात काकू परंपरागत पदार्थ करण्यात हुशार...त्यामुळे लेकाला आवडतात म्हणून आमची चंगळ चालू झाली.  त्यात त्यांची नवी सून गावाहून आली.  एकदम अबोल...पण आमच्याकडे ब-याचदा रेंगाळायची.  हे कसं केलं...असं चालतं का...हे काय...ते काय...अशाच चौकशा भारी असायच्या तिच्या...खूप साधी...कधीही घरी गेलं तरी घरच्या कामात व्यस्त...दिवस-रात्र, मी तिला कधीही बघितली ती साडीमध्येच...लग्नानंतर ती फार कुठेही फिरायला गेली नाहीच.  मला वाटतं माझ्याच घरी जास्त आली असेल...आली की निवांत असल्यासारखी सोफ्यावर बसून रहायची...मग चौकशी करायची...कॉफीला कधीही ना नसायची...सोबत जे दिलं ते आवडीने खायची...ब-याच वेळा ती एवढी निवांत बसायची की मला बाहेर जायचं असायचं...मग तिला नाईलाजाने सांगायला लागायचं...मग बाई काहीशा नाराजीने उठायच्या आणि घराकडे जायची...काहीवेळा काकू फोन करायच्या..अग कितीवेळ झाला...किती गप्पा मारतेय...पाठव तिला...वास्तविक आम्ही कधी फार गप्पा मारल्या नाहीतच...एक तर ती वयाने तशी लहान...गावाकडून आलेली...शामळू स्वभावाची...कोणी सांगितलं की हो म्हणत ते काम करायचं...स्वतःचं मत कधी सांगायचं नाही.  मी तिला तिच्या या स्वभावाबद्दल अनेक वेळा बोलले...चुकीचं वाटलं तर मला सांग असं सांगून झालं...पण फरक पडला नाही....लग्नानंतर दिड-दोन वर्षांनी तिला मुलगी झाली...चांगली सहा महिने गावी राहिली.  वास्तविक तिच्या गावी दवाखानाही फार दूर होता.
  हॉस्पिटल तर नदिपार आहे, हे काकंकडूनच कळलं.  त्यामुळे तिने इथेच रहावं म्हणून मी काकूंना सांगितलं...तर त्यांनी पहिल्या बाळंतपणाचं कारण पुढे केलं.  सहा महिन्यांनी छोट्या बाऴासह ती आली.  आता बाळ झाल्यामुळे माझ्या घरी तिचं येणं कमी झालं.  लेकाच्या मागे धावता धावता माझंही त्यांच्या घरी जाणं थोडं कमी झालं....काकूंकडे नातीची पार्टी मागितली...त्यांनीही हसून हो म्हटलं...ब-याचवेळा काकू भेटत...त्यांच्याबरोबर बोलणं होई...सुनेची-नातीची चौकशी केली की छान म्हणून त्या मार्गी लागायच्या...छोटं बाळ वर्षाचं झालं तेव्हा मी आठवणीने सकाळी त्यांच्या घरी गेले.  तर घर शांत...आज बाळाचा पहिला वाढदिवस ना...म्हणून मीच जास्त आरडोओरडा करत होते.  ती शांतपणे घरातील कामं करत होती...बाळाचे बाबा कामावर गेले.  बाळ रडत होतं म्हणून मी त्याला खेळवतं होते...नंतर जाणवलं घरात विचित्र शांतता आहे.  कोणी फार बोलतच नव्हतं.  काहीवेळानं घरी  निघाले, तेव्हा काकूंनी सांगितलं...बाळाला आता छोटा भाऊ येणार आहे.  बापरे त्यांची सून वर्षभरात परत गरोदर राहिली होती.  आणि आता मुलगाच होणार हे काकूंनी जाहीरच केलं होतं.
  मला हळूहळू त्या शांतपणाचं कोडं सुटत होतं. 
दोन महिन्यांनंतर एक दिवस या सुनेची आई-वडील थेट दारात आले.  आधी एक-दोनवेळा माझी भेट झाली होती.  गावावरुन हे दोघं आले ते थेट माझ्या घरीच...मलाही काय बोलावे ते सुचेना...चहा-पाणी झाल्यावर त्यांनी सरळ मुलीचा विषय काढला.  काका-काकू म्हणे त्यांच्या मुलीला सासुरवास करत होते.  ती गावाची, साधी त्यात पहिली मुलगी झाली या सर्वांचा त्रास त्या  मुलीला होत होता.  काकू बाहेर कितीही मोकळेपणाने वागत असल्यातरी सुनेला त्यांनी धाकात ठेवलं होतं.  आपल्यात हे चालत नाही....ते चालत नाही...आपली परंपरा...आपलं घराणं...आदी मोठेपणाच्या पडद्याआड या सुनेला ठेवलं होतं.  सुनेचं पहिलं बाळंतपण माहेरी झालं...ती माहेरी सहा महिने होती.  पहिली मुलगी झालेली...काकू म्हणे मानपानावर अडून राहिल्या होत्या...शेवटी सहा महिन्यांनी आईवडीलांनी जावई आणि नातीला सोन्याची चेन केली आणि मुलीची पाठवणी केली.  आता ती पुन्हा आई होणार होती.  म्हणून आईवडील काळजीत होते.  त्यांनी थेट माझं घर गाठून मला कोंडीत पकडलं.  बरं मी तरी कशी...एरवी मला माणसं ओळखता येतात, म्हणून ऐटीत सांगायची...काकूंची ही दुसरी बाजू ऐकल्यावर मी गार झाले.  तिच्या आई-वडीलांसाठी पटकन जेवण बनवलं...संध्याकाळी ते लगेच निघणार होते.  फक्त निघण्यापूर्वी त्यांना काकूंना भेटायचे होते.  शिवाय आता दुसरं बाळंतपण इथेच करावं असा आर्जव ते त्यांच्याकडे करणार होते.  त्यासाठी कोणीतरी मध्यस्थ त्यांना हवा होता.  याबाबत त्यांचं आणि लेकीचं फोनवरुन बोलणं झालं होतं.  तिने हळूच माझं नाव सुचवलं होतं...देवा...एरवी फार न बोलणारी...कुतूहल डोळ्यात लपवणा-या काकूंच्या सुनेनं मला चांगलंच कोंडीत पकडलं होतं.
दुपारी जेवण झाल्यावर मी आणि आई-बाबा काकूंकडे गेलो.  दरवाजा काकूंनीच उघडला.  मला आणि आई-वडीलांना एकत्र बघून त्या काय समजायचं ते समजल्या...औपचारिक बोलणी झाली. आज तुला वेळ कसा मिळाला, म्हणून काकूंनी मलाच पहिलं घेतलं...लेकाची बस येईल आणि तु इथे काय करतेस...जा पटकन...म्हणून चालतंही केलं...मी गुमान बाहेर पडले...मन सुन्न झालं होतं...मी कशी या माणसांना ओळखण्यात चुकले होते, म्हणून मनाला बोचणी लागली होती...दिवसभर आपण चुकलो म्हणून अस्वस्थ होते.  संध्याकाळी नवरा घरी आल्याआल्या त्याला ही घटना सांगितली...त्यालाही धक्का बसला...पण त्यात तुझी काय चूक...म्हणून त्याने मला सावरलं...
पुढे काकू दिसायच्या...पण पहिल्यासारखं बोलण होत नव्हतं...मग एक दिवस त्यांची सून भेटली...घरी आली...सातवा महिना चालू होता.  दोन दिवसांत ती गावी जाणार होती...म्हणून काकूंची परवानगी घेऊन भेटायला आली होती.  नेहमीसारखी शांत...कॉफी दिली....खाऊ दिला...काय खावसं वाटतं म्हणून विचारलं...तर पुन्हा ती शांत...डोळ्यातलं कुतूहल तसंच...त्यादिवशी आई-बाबांना काकू काय बोलल्या हे विचारायचं माझं धाडस झालं नाही...बरी आहेस ना..असं विचारल्यावर, आता मुलगा झाला की सर्व निट होईल म्हणत निघाली...बस्स माझी तिझी तेवढीच भेट...
दोन महिन्यांनी काकूंचा सकाळी फोन आला...थरथरत बोलत होत्या...सून आणि तिचं बाळ दोघेही गेले...गेले म्हणजे...देवाघरी गेले....काकूंचे सर्व कुटूंब गावी चालले होते...आठवड्यावर रहाणार होते...त्यांच्या घरी दिवसाआड जाऊन झाडांना पाणी घालायची जबाबदारी माझ्यावर त्यांनी दिली आणि फोन ठेवला...मी सुन्न झाले...ती गेली...एवढीच तिची आणि माझी ओळख...कधीही तिच्याबद्दल फार जाणण्याचा, तिला समजण्याचा आणि तिला होणारा त्रास विचारण्याचा मी साधासा प्रयत्न केला नव्हता...मला माहितं होतं ही बोचणी कायम सोबत रहाणार होती...
काही दिवसांनी काकू परत आल्या....छोटी नात त्यांनी सोयीस्कररित्या सुनेच्या माहेरीच ठेवली होती...थोडी रडारड झाली...मग शांत...मी सुनेच्या फोटोसमोर सॉरी बोलून निघाले...आज त्याच सुनेला जाऊन वर्ष झालेलं...काकूंनी पितृपक्षात करायचे ते सोपस्कार म्हणून घरी कार्य ठेवलं होतं...मलाही बोलवलं होतं...माझी जायची अजिबात इच्छा नव्हती...पण त्यांची नातही येणार होती...सोबत सुनेचे आई-बाबाही...त्यांना भेटायला  म्हणून गेले...तर काकूंनी मोठा बेत केलेला.  सर्व नातेवाईक...जेवणात पाच-सहा प्रकारच्या भाज्या...भजी...गो़डाचे चार पदार्थ...पापड..चटण्या...अगदी ताट पार भरेल असा बेत...काय तर हे सुनेला आवडायचे...ते तिला आवडायचे...त्या आठवणींने सर्वांच्या ताटात सर्व पदार्थ आहेत की नाही ते बघत होत्या...मी कोप-यात बसलेल्या तिच्या आई वडीलांना नमस्कार केला...नातीला चॉकलेट दिलं...ते तिघंही पाहुण्यांच्या घरी आल्यासारखे पार कोप-यात बसलेले...त्यांना घाई आहे...दुपारच्या गाडीने परत गावी जाणार
म्हणून काकूंनी आधीच सांगितलं...इकडे काकूंचे नातेवाईक आता त्यांच्या दुस-या मुलाच्या लग्नाची चर्चा करत होते.  मध्येच कोणीतरी काकूंनी पहिल्या मुलाचं पुन्हा लग्न करायचं असं सुचवलं...चर्चा चालू होती...गेलेल्या सुनेची फारशी आठवण कोणाकडे नव्हतीच...त्यामुळे तिचं साधं नावही निघत नव्हतं....मला ताटातले पदार्थ जड झाले होते...ताटात काही टाकू नये हा नियम बाजूला ठेवत मी उठले...त्या वातावरणापासून मला दूर जायचं होतं...
गपचूप घरी आले...डोळ्यासमोरून फोटीतील त्या सुनेचे डोळे...तिच्या आई वडीलांच्या डोळ्यातील दुःख...आणि त्या निरागस नातीच्या डोळ्यातील अजाणतेपणाचे भाव काही केल्या जात नव्हते....कशी असतात माणसं...जेव्हा चालता बोलता माणूस आसपास असतो, तेव्हा त्याच्या आवडीनिवडींना फाटा दिला जातो...आणि तो गेल्यावर त्याच पदार्थांच्या नावावर त्याला तृप्त केलं जातं...


सई बने
डोंबिवली

--------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment

Comments

  1. Replies
    1. नितीनजी असे अनुभव येतात, तेव्हा खारंच वाईट वाटतं...

      Delete
  2. काही शब्दच सुचत नाहीयेत, पण फार वाईट वाटतय.

    ReplyDelete
    Replies
    1. असे अनुभव आल्यावर सगळ्यांचाच राग येतो...जुन्या परंपरांना टाळं लावावंस वाटतं...

      Delete
  3. खूपच छान आणि मनाला स्पर्शून जाणारा लेख वाचला आवडला

    ReplyDelete
  4. अमित गावडे29 September 2019 at 00:47

    खूपच छान आणि खिळवून ठेवणारा लेख, पण वाईट अनुभव

    ReplyDelete
  5. Tears came from heart, no words,,,

    ReplyDelete

Post a Comment