की बात....
मुंबईची ट्रेन...म्हणजेच लोकल. ही लोकल लाखो लोकांची आधार...तिच्या
येण्याजाण्यावर अनेकांचे संसार उभे...अनेकांचे करिअर या लोकलच्या वेळेवर
अवलंबून....या लोकलमध्ये गर्दीच्या मा-यात रोज नवीन घटना होतात....रोजची नवीन
कहाणी...प्रत्येकाला वेगळा अनुभव...असे या लोकलमधून प्रवास करणारे लाखो प्रवासी
रोज वेगळा अनुभव घेतात....काही मनाला भावतात तर काही डोळ्यातून पाणी काढतात...काल-परवा
केलेल्या प्रवासात मला असाच अनुभव आला.
लोकलवर अवलंबून असणा-यांपैकी मी सुद्धा एक...फार नाही पण ठाण्यापर्यंत
प्रवास अगदी आठवड्यातून चार वेळा तरी होणारच...लोकल म्हटलं की कायमचीच
गर्दी...तरीही सकाळचा गर्दीचा लोंढा थोडा कमी झाला, की मी गाडी पकडते...डोंबिवलीहून
सकाळी 10.45 ची ट्रेन पकडली. ट्रेन
नेहमीप्रमाणे होत्या...म्हणजेच लेट...त्यात त्या आगोदरची डोंबिवली लोकलही उशीरा
येणार म्हणून घोषणा होत होती. त्यामुळे
त्या गाडीची गर्दीही याच गाडीला. कितीही
टाळा गर्दीही असणारच म्हणून गाडी पकडण्यासाठी सज्ज झाले. गाडी उभी रहाण्याच्या आधी काही सेकंद चढता आले,
तर किमान उभं तरी निट रहाता येतं, म्हणून सर्वांचीच धडपड....गाडी उभी रहाते ना रहाते
तोच पकडण्यासाठी धावपळ सुरु झाली. सोबत
असलेली बॅग पोटाशी घट्ट, मोबाईल आणि ओढणीही तशीच पकडून एकदाची चढले...माझ्यासोबत
अशाच अनेक जणी चढल्या...समोरच्या दरवाज्या बाजुला असलेली जागा पकडणे हेच आमचे लक्ष...पण काही तरी बिनसले...चालत्या
गाडीत पहिली चढलेली महिला चढल्या चढल्या पडली....अर्थात ते पहाण्यासाठी आणि ते
पाहिल्यावरही थांबण्यासाठी वेळ कोणाकडे असतो....आपल्या समोर कोणीतरी पडले
आहे, हे समजत असूनही तिच्यापाठोपाठ
अनेकजणी गाडीत चढल्या आणि जी कोणी धडपडली होती तिच्या अंगावर धडपडल्या...अर्थात या
सर्वात मी सुद्धा होते. बरं हे सर्व
एवढ्या कमी वेळात होतं की कोण पडलं, कसं पडलं..का पडलं...या सर्वांसाठी वेळ
नसतोच....गाडीही सुरु झालेली...आता पुढचं स्टेशन यायच्या आत उभं राहून आपापली जागा
पकडायची...एवढं समजत होतं...पुन्हा आम्ही उभ्या राहीलो...बघतो तर एक बाई मुलाला
घेऊन दरवाज्यातच बसलेली. सोबत चार
बॅगा...त्याही मध्येच ठेवलेल्या....तिच्या या ऐसपैस पसा-यामुळे आम्ही पडलो
होतो. सहाजीकच सर्वजणींचा राग तिला सहन
करावा लागला....बाई
जवळ लहान मुल...आणि एक पाच-सात वर्षाची मुलगी....सर्वजणी
तिच्यावर उखडल्या...समजत नाही का...रस्त्यात बसलीस...सामान ठेवायची ही जागा आहे
का...मुलाला घेऊन आत बसायचं...वगैरे वगैरे...डायलॉगवर डायलॉग....या सर्वात कोपर
येऊन गेलेलं....आता दिवा येणार...आणि दिव्याची गर्दीही....त्यामुळे या बाईला
सर्वांनी तिच्या सामानासह आत जायला सांगितले...तिच्या बॅगा दिव्याला उतरणा-यांना
आणि चढणा-यांनाही अडचणीच्या ठरल्या असत्या....त्यामुळे काही जणींनी त्या बॅगा
उचलून आत ठेवायला सुरुवात केली....तितक्यात बाजुलाच उभी असलेली एक म्हातारीही हळूच
पुढे आली...ती त्या बाईची सासू....तिच्यासोबत तिची पंधरा सोळा वर्षाची नातही
होती...डोंबिवलीला चढलेली गर्दी...आणि नंतर उडालेला गोंधळ यामुळे त्या घाबरल्या
होत्या...त्यामुळे गपचूप बाजुला उभ्या राहील्या...आता बाकीच्या बायका आपल्या बॅगा
आत ठेवायला लागल्या म्हणून त्या बॅगा पकडण्यासाठी पुढे आल्या...मग कोणी
विचारले...कुठे उतरायचे आहे...परळ...अरे देवा परळला...मग इथे कशाला....आत
जा....म्हणून सर्वांनी परत घोषा लावला...साहजीकच त्या नवीन होत्या....मग काही जणी
पुढे आल्या...त्यांनी त्यांच्या चार बॅगा उचलून आत बाकड्याखाली सरकवल्या...या बॅगा
वर ठेवण्याचाही प्रयत्न झाला...पण त्या एवढ्या जड की सरळ बाकड्या खाली ढकलून
दिल्या....मग त्या बाळ असलेल्या बाईलाही आता घेतलं...तिच्या लहान मुलीला आणि आजी
आणि नातीलाही आत दोन बाकड्यांमध्ये असलेल्या जागेत बायकांनी उभं केलं...
यापैकीच काही बायका या बाईमुळे धडपडल्या
होत्या...तिच्यावर चिडल्या होत्या...पण ते काही क्षणांपुरतं राहीलं....या
कुटुंबाला बडबडत का होईना, पण प्रत्येकीने आपापल्यापरीने मदत करायला सुरुवात
केली. दिवा यायच्या आगोदर त्यांना
गाडीतील जागेचं गणितही समजावून सांगितलं...त्यांना ते कितपत समजलं, हे माहित
नाही...पण एकीला मुलुंडची जागा...दुसरीला विक्रोळीची जागा...आणि तिसरीला घाटकोपरची
जागा मिळवून दिली....एवढ्यात दिवा आलं...एक हलका लोंढा उतरला...आणि त्यामानाने
बरीच गर्दी चढली...गाडी गच्च भरली...त्या गर्दीत या नवख्या पाहुण्या गोंधळून गेल्या...आधीच्या
मानाने त्या थोड्या आत उभ्या राहिल्याने या लोंढ्यापासून दूर होत्या...मग एकेकीने
सल्ले सुरु केले. एवढ्या गर्दीत प्रवास
करायचा नाही...सामानासह तर नाहीच नाही...थोडं दुपारी बाहेर पडायचं होतं...मग
त्यातल्या आजीनं सांगितलं...भुसावळ मधून त्या आल्या होत्या...चुलत्याच्या मुलाचं
लग्न अचानक ठरलं....त्यासाठी त्या आलेल्या...त्या आजीचा लहान मुलगा मुंबईत टॅक्सी
चालवतो...तो परळ स्टेशनला त्यांना न्यायला येणार होता...बाजुला पुरुषांच्या डब्यात
मोठा मुलगा होता...त्याच्याजवळही सामान होतं...कसा-याला ट्रेन पकडली...पहिल्यांदा
खाली डबा म्हणून सर्व पहिल्या वर्गाच्या डब्यात चढले....त्यातल्या बायकांनी बडबडून
पुढच्या स्टेशनला उतरवलं...आजी सांगत होती...आम्हाला काय माहीत...डबा खाली ना
म्हणून चढलो...केवढ्या बायका बोलल्या आम्हाला...सिटांवर नव्हतो बसलो...साईडला उभं होतो...तरीसुद्धा
उतरवलं....हे ऐकल्यावर काही बायकांना चेव आला...आजी तो फस्टक्लास...त्यात नाही चढायचं....त्या बायका
भारी असतात...असं कोणीही चढलं तरी त्या भांडायला उठतात....मग काहींनी त्या
कुटुंबाला परळ कुठल्या बाजुला येणार ते सांगितलं...दादर गेलं की बॅगा घेऊन उभ्या
रहा म्हणून सल्ला मिळाला. त्यातल्या
दोनजणी परळला उतरणा-या...त्यामुळे त्यांनी पुढे येऊन, आम्ही आहोत...म्हणून दिलासा
दिला....एवढ्यावेळेत...मुंब्रा...कळवा पार झालंलं...मला दारवाज्याच्या आड एक जागा
मिळालेली...ठाणे येणार म्हणून पुन्हा बॅग, मोबाईल, ओढणी, केस पकडून उतरण्यासाठी
सज्ज झाले होते. पुन्हा तेवढीच गर्दी
चढणार होती....कळव्याला आलेल्या गर्दीचा
लोंढा मोठा होता...त्यामुळे वर हॅन्डल घट्ट पकडलेलं...सर्वांचीच अशीच
अवस्था...एकदाचं ठाणे स्टेशन आलं...उतरायला फार त्रास झाला नाही...कारण सरळ सरळ
धक्काबुक्की करायची असते...फक्त उतरल्यावर आपला तोल सावरत जिन्याकडे धाव घ्यायची...ते
कसंतरी करुन जीना चढायला सुरुवात केली...मागे वळून बघितलं तर तेवढ्याच बायका
डब्यात चढण्यासाठी झुंझत होत्या...त्याच्या मागे असलेल्या पहिल्या वर्गाच्या
डब्याचीही तिच हालत होती....
मी मनात पहिल्या आणि दुस-या डब्यातून प्रवास
करणा-या महिलांचा विचार करु लागले.
दोन्हीकडे सुविधांच्याबाबत आनंदी आनंदच आहे. मागची काही वर्ष मी सुद्धा पहिल्या डब्यातून
प्रवास करत होते. डब्यात अगदी मोजक्या
जागा. त्याही भरलेल्या असल्या तर उभ्यानेच
प्रवास...बहुतांश वेळेला तृतीयपंथी, भिकारी अगदी दारुडेही आपलाच डबा म्हणून
बसलेले. मला दुपारी प्रवास करतांना तर हा
अनुभव बहुधा नेहमी यायचा....मग 182 या सेवेला नंबर लावायचा...ती मंडळी पुढच्या
स्टेशनला येऊन त्यांना ताब्यात घ्यायचे...तेवढाच दिलासा...पण यात बसण्यासाठी जागा
आणि आरामात प्रवास व्हायचाच नाही. मग
दुस-या डब्याच्या मानाने तिप्पट पैसे देण्यात काय अर्थ आहे...हा प्रश्न पडला आणि
सरळ दुस-या वर्गाच्या डब्याचा पास काढला....दुस-या वर्गाच्या डब्यात बसायला जागा
असते यातला भाग नाही...निट उभं रहायला मिळालं तरी बस्स...दुस-या डब्यातल्या महिला
तर सहनशिलता या शब्दात पार पोळून निघालेल्या...चौथी सीट म्हणून एक लहानसा कोपराही
बसायला मिळाला तरी खूप झालं, या समाधानात त्या असतात...डब्यात चढतांना हाता-पायाला
काही लागलं नाही...की हायसं मानून घेतात...एकूण काय दोन्हीही वर्गाच्या डब्यात
आनंदी आनंद असतो. पहिल्या वर्गाच्या
डब्यात प्रवास करतात म्हणून त्या बायका सुखी, असा समज केला तर तोही मला चुकीचा
वाटतो...कारण रग्गड पैसे खर्चूनही तिथे बसायला जागा मिळेल याची खात्री नसते...फक्त
कधीतरी निट उभं रहाता येतं एवढंच समाधान आणि दुस-या डब्याची तर बातच नको...अर्थात
हे क्लास-क्लास चे वादंग नेहमीच सुरु असतात...पण त्याची फिकीर रेल्वे प्रशासनाला
कितपत आहे, याबाबत शंकाच आहे....आतापर्यंत लाखो तक्रारी झाल्या असतील....पण सुविधांबाबत
विचार करायला वेळ कोणाला आहे. एखादी
अप्रिय घटना घडली की नावापुरती चर्चा....तक्रारी...किंवा मोर्चा...बस्स...मग येरे
माझ्या मागल्या....
सई बने
डोंबिवली
---------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा




शेवटी मुंबई मेरी जान......
ReplyDeleteहो ना...काही झालं तरी मुंबई मेरी जान....आणि ट्रेन है हमारी शान.....
DeleteKhup chhan lekh
ReplyDeleteधन्यवाद.....
Delete