काय
जातंय....
रात्री अकरा वाजता फोनची रिंग वाजली...अकरा
वाजता आमच्या घरी निजानीज होत नाही...लेक अभ्यासामध्ये...मी घरातील कामामध्ये आणि
नवरा त्या शेअरच्या चॅनेलमध्ये...अशी आमची विभागणी झालेली असते...फोनची रिंग
वाजल्यावर एवढ्या रात्री कोण म्हणून तिघंही एकत्र आलो...फोन माझाच...माझी मैत्रिण
वनिता, हिचा...अगदी शेवटच्या रिंगला फोन उचलला...मला काळजी वाटली...कारण एवढ्या
रात्री तिनं कधीच फोन केलेला नव्हता..फोन उचलल्यावर हॅलो म्हणायच्या आत, वनिताची
सॉरीची गाडी सुरु झाली...झोपली होतीस का...पुन्हा सॉरी...ती शांत झाल्यावर मग माझी
बोलायची टर्म सुरु झाली...घरातलं काम करत होते...हात ओले...पुसेपर्यंत वेळ
झाला...हे कारण सांगितल्यावर मग तिला एवढ्या रात्री फोन करायचं कारण
विचारलं...तेव्हा वनिता दबक्या आवाजात विचारु लागली, तुझ्याकडे या आठवड्यात कोणी
पाहुणे येणार आहेत का...किंवा तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात का...मी तिच्या या
प्रश्नांनी बुचकळ्यात पडले.
वनिताचा मुलगा आणि माझा लेक शाळेमध्ये एकाच
वर्गात होते. दहावीनंतर दोघांनीही
वेगवेगळे प्रवेश घेतले. माझा लेक जेईई परीक्षेची
तयारी करु लागला तर वनिताचा मुलगा, विनीत नीटची...त्यामुळे दोघंही वेगळ्या
वाटांवर...पण शाळेपासून असलेली त्यांची मैत्री कायम...तसंच माझं आणि वनिताचंही...फक्त
आठवड्यांनी होणारं बोलणं थांबलं...महिन्याभरात फोन किंवा घरी जाऊन भेट आणि गप्पा
नक्की...विनीतही एकुलता एक...अभ्यासात हुशार...पहिल्यापासून त्याचं डॉक्टर
होण्याचं ध्येय. शाळेत असतांनाही
शाळाबाह्य अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये तो वरदसोबत असायचा. साधारण आमच्या घरासारखंच तिच्याकडेही
वातावरण...आईवडील दोघंही मुलासाठी सर्वतोपरी करत होते. वनिताही लेकाच्या मागे आणि मागे...अगदी
दहा-पंधरा दिवसांपूर्वी ठिक होतं सगळं...आमचं बोलणं झालं होतं...आता काय
झालं..तेही इतक्या रात्री...मी तिला विचारलं...म्हणाली, लग्नाचा मौसम सुरु झालाय
ना...आमच्या घरातलीच एक नाही तर चार लग्न आहेत...लागोपाठच...अगदी जवळची...गावचे
नातेवाईक आमच्याकडेच रहायला यायचं म्हणतात...विनीतची नक्की परीक्षा कधी ते सांग
म्हणतात...आता ते कसं सांगू ना... दर रविवारची क्लासची परीक्षा...शिवाय कॉलेजचे
पेपरही सुरु होणार आहेत...त्यांनी नीट म्हणजे कॉलेज असचं वाटतंय...दर आठवड्याला
कशी परीक्षा होते...त्यांना मी मुलाच्या परीक्षेचं खोटं कारण पुढे करतेय असं वाटलं. आता सर्वजण आमच्याकडेच आठवडाभर रहाणार
आहेत...साधारण बारा ते पंधराजण आहेत...उद्यापासून यायला सरुवात होणार आहे. त्यात विनीतचा नीट परीक्षेसारखा पेपर क्लास
घेणार आहे...मला काय करावं ते सुचत नाही...मिस्टरांनी तुझं नाव सुचवलं...विनीतही
तयार झालाय...तुझ्याकडे आठवडाभर रहायला आला तर तुला चालेल का...माझं तर डोकंच चालत
नाही...तुझी अडचण होणार नाही ना...वरदचं बघ...वनिता सुरु झाली होती...मलाही क्षणभर
काही सुचेना...मी तिच्या जागी मला उभं केलं...माझा लेकच दिसायला लागला...मग तिला
थांबवलं...लगेच पाठव लेकाला असं सांगितलं...तिथे तिने फोनवर हायसं वाटल्यासारखा
एवढा मोठा उसासा घेतला की इकडे मला जाणवलं...मग पुन्हा थॅक्युची गाडी...उद्या
सकाळी त्याचं सामान आणि पुस्तकं घेऊन येते म्हणून फोन ठेवला...
एव्हाना रात्रीचे साडेअकरा होऊन गेले
होते...लेक आणि नवरा माझ्याकडे बघत होते...त्यांना पुसटसं कळलं...पण पूर्ण माहिती
हवी होती...मी प्रथम लेकाला सांगितलं, उद्यापासून विनीत काही दिवस आपल्याकडे
राहील...त्याची काही हरकत नव्हती...विनीतही त्याच्यासारखाच...स्वतःचा अभ्यास स्वतः
करणारा...दोघेही शाळेपासून एकमेकांना ओळखत होते...तो ओके बोलून आत गेला. नवरा गप्प होता...त्याला अंदाज आला...हळूच
म्हणाला बरं केलंस...हल्ली मुलांना अभ्यास किती असतो...या प्रवेश परीक्षांचा लोड
किती असतो हे ज्यांना माहित नाही त्यांना कधीच कळणार नाही...तू तिच्या जागी
स्वतःला बघितलंस ना...हे सहजपणे बोलून तो झोपायला गेला...मी वरदच्या सोबतीला गेले...त्याचा
अभ्यास चालू होता...मनात वनिताचा विचार...कोणाच्या अध्यात नाही की मध्यात
नाही...हाच तिचा स्वभाव ब-याचवेळा आड येतो...तिचा स्वभाव थोडा बुजरा...घरचा
गोतावळा फार...बहुधा सर्व गावाकडे रहाणारे...त्यांची अभ्यासाची समजूत वर्षानुवर्ष
आखीव रेखीव असते तशीच...जून महिन्यात शाळा चालू...मग गौरी-गणपती ते दिवाळीपर्यंत मध्ये
येणा-या अनेक
सुट्ट्या...मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा...मग जवळपास अडीच महिने
सुट्टी...सुट्टी म्हटलं की अभ्यास नाहीच...तो थेट पुढच्या वर्गात...पण स्पर्धा परीक्षा
आणि अशा प्रवेश परीक्षांच्या मागे जी मुलं लागतात, त्यांच सर्व वेळापत्रकचं बदललेलं असतं...दहावी
झाली की, पुढच्या अभ्यासाचा खरा आवाका समोर यायला सुरुवात होते...प्रवेश परीक्षांमधील
अभ्यासक्रम हा शाळेच्या अभ्यासापेक्षा वेगळा असतो...तो समजून घेतांना, त्याचे नियम
समजून घेतांना दमछाक होते...पण पुढचं ध्येय निश्चित झालेले विद्यार्थी झपाटून
तयारीला लागतात...हातात इनमीन दोन वर्ष असतात...आणि ज्यांनी या परीक्षांचा अभ्यास
केला आहे, ते जाणतात, या दोन वर्षातील प्रत्येक मिनीट न मिनीट महत्त्वाचा असतो...अशावेळी
बाकीचे कार्यक्रम बाजुला सारले जातात...अगदी घरच्या स्नेहसोहळ्यालाही दांडी मारली
जाते...फक्त अभ्यास
दुस-या दिवशी सकाळी आठच्या सुमारास वनिता,
विनीतचे कपडे आणि काही पुस्तकं घेऊन आली.
बाकीची पुस्तकं विनीत आल्यावर आणणार होता. अपेक्षेप्रमाणे तिचा पहिला प्रश्न होता...वैतागली
होती...काही पाहुणे
रात्रीच आलेले...आल्या आल्या त्यांनी काय किती परीक्षा असतात...आता
लग्नांमध्ये ये, अभ्यास बाजुला ठेव...असं बोलून हैराण केलं होतं...घरी आलेल्या
पाहुण्यांना कसं बोलणार म्हणून त्या तिघांचीही कोंडी झालेली...पाहुणचार करायला तिची ना नव्हती. पाहुणे चालतील, पण त्यांनी मुलाला असे सल्ले देऊ नयेत, अभ्यास त्याच्या आवडीचा आहे, त्याच्यावरुन त्याला बोलू नये येवढीच तिची अपेक्षा होती. पण पाहुण्यांनी आल्याआल्याच विनीतला अभ्यासावरुन बोल लावले होते...त्यामुळे वनिता वैतागली होती...त्याच भरात बोलली,
त्यांच्या काकाच काय जातंय, माझा लेक अभ्यासच करतोय ना...मी चमकून तिच्याकडे
बघितलं...असं बोलणारी वनिता नव्हतीच...मी समजावलं...जाऊदे...मी आहे, तू काळजी करु
नकोस...नातेवाईकांना दुखवू नकोस...प्रत्येकाची मतं असतात...सर्वांची
ऐकायची...आपल्या सोयीची तेवढी ठेवून घ्यायची...बाकी आपल्या व्याख्येत बसत नाहीत, त्यांना
सोडून द्यायचे...वनिताला बहुधा पटलं...हायसं झाल्यासारखी बोलली, मी संध्याकाळची
येत जाईन ग...लेकाचा अभ्यास बुडायला नको, म्हणून ही धावपळ...तुला त्रास होईल...मी
हसून म्हटलं..काही सॉरी बिरी नको, तुझा लेक डॉक्टर झाला की वसूल करेन...याबरोबर
वनिता मोकळी झाली...हसली...आणि घरी आलेला गोतावळा सांभाळण्यासाठी गेली.....
सई बने
डोंबिवली
----------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा




Khup chhan lekh.
ReplyDeleteKhoop Chhan
ReplyDelete