नको रे बाबा....
लेकाला आणि नव-याला गरम-गरम जेवण वाढणे...हे माझ्यातरी सर्वात आवडते
काम...सध्या तर या लॉकडाऊनमुळे दोघेही घरात...त्यामुळे कधी नाही ते दोघं दुपारी
अगदी एकच्या ठोक्याला जेवायला बसतात.
लॉकडाऊन आणि आसपासची परिस्थिती यामुळे साग्रसंगीत जेवण नाही. त्यामुळे साधं जेवण बनवायला लागतो तेवढाच
वेळ...अगदी तीस-पस्तीस मिनीटे आधी मी जेवण बनवायला सुरुवात करते. सर्व काही छान जुळलेलं असतं. पण नेमकं त्या फोडणीपर्यंत आले की मात्र सगळं
गणित बिघडतं...एरवी भल्याभल्या सवयी या कोरोनामुळे बदलल्या...पण माझी एक सवय मात्र
अद्यापही बदलायला मागत नाही...ती सवय झालीय हाताला....आणि झणझणीत चवीची चटक
लागलेल्या जिभेला....
मंडळी, गेल्यावेळी डाळभातावर ब्लॉग लिहीला....त्यावर अनेक जणांचे
वैयक्तिक फोन आले. आणखीही छान, सोप्या,
सहज होणा-या आणि सुटसुटीत रेसिपी समोर आल्या...डाळभात गरजेचा आहेच. पण भाताबरोबर असेच काही सहजसोप्पे
पदार्थ...किंबहुना आमट्या सरस ठरतात. साध्या
डाळीला तिखटमिठाची फोडणी दिली आणि वरुन गूळ आणि एक आमसूल टाकलं की आपली गोड-तिखट
डाळ कुठल्याही फाईव्हस्टारमधल्या रेसिपीला मागे टाकेल अशीच होते. या आणि अशा अनेक रेसिपी मागच्यावेळी थेट फोन
वरुन मिळाल्या...मग अशा रेसिपी मिळाल्यावर स्वस्थ थोडं बसता येतं.
बरं एरवी माझा हात तिखटाला थोडा अखडता होता. फार जळजळीत काय हलकेच तिखट लागलं तरी त्रास व्हायचा...पण
हे माझ्यापुरतं...पुढे लेकाची आवड...टेस्ट डेव्हलप झाली. मग रोज मागणी असायची, आई जरा तिखट झालं तर मजा येईल...ही त्याची मजा
वाढत वाढत आता चांगल्या झणझणीत चवीपर्यंत गेलीय.
त्यामुळे जेवणाचे...मसाल्याचे सर्व प्रमाण बदललं गेलं आहे. आता या तिखटाची मला आणि नव-यालाही सवय
झाली. परिणामी माझा हात तिखटावर बसला. दरवर्षी मसाला करायला गेले की अगदी थोडा तिखट
करा...गरम मसाल्याचा मारा फार नको...पण
तिखटाचं प्रमाणं थोडं वाढवा...अशी माझी
मागणी असते. त्याप्रमाणे यावेळीही मसाला
थोड्याप्रमाणात तिखट आणि लालसर रंगाचा झाला आहे.
नाही म्हणायला मसाला आणल्याबरोबर एक-दोन वेळा त्याची चव बघता आली. मग साग्रसंगीत हा मसाला हिंगाचे खडे टाकून
डब्यात भरुन ठेवला. त्याच्यावर पांढरा
शुभ्र कॉटनचा रुमाल बांधून घट्ट बांधून ठेवला...अगदी त्याचा कणभरही वास बाहेर
जायला नको. आता मागच्या आठवड्यात बाकीचा
सर्व मसाला साफ झाला. नवीन मसाल्याची वेळ
आली. छोट्या डब्यात मसाला काढून ठेवला
होता. हा छोटा डबा मांडणीतून ओट्यावर
आला. आता एकच भाजी होते. त्यामुळे मिसळीचा बेत होता, सोबत भाक-या....मग काय तयारी
झाली, आणि मस्त झणझणीत फोडणी
झाली...आणि...आणि मंडळी इथेच सर्व संपलं..मी भानावर आले...सगळं घर जागं झालं...
काय झालं कळलं का...नवीन मसाला चांगलाच झणझणीत...हा मसाला तेलावर छान
परतायला गेले. छान रंग चढू लागला आणि
त्याचवेळी त्याचा झणका घरात पसरला...एका मागोमाग एक शिंका सुरु झाल्या....पहिली
शिंक आल्यावर भानावर आले...त्या कोरोनामुळे शिंकायलाही चोरी झालीय की...हा विचार
करेपर्यंत दुसरी शिंक...तोंडावर हात धरुन बेसीनकडे पळाले...तोपर्यंत पुढच्या
शिंकेचीही तयारी झालेली...या सर्वांत नव-याची आणि लेकाचीही भर...मसाल्याच्या
फोडणीचा दरवळ अवघ्या घरात भरला गेला.
त्यामुळे त्यांच्याही शिंका सरु झाल्या.
एरवी अशी छान झणझणीत फोडणी झाली आणि घरभर त्याचा दरवळ पसरला की सर्वांना
काय कौतुक वाटायचं...व्वा...छान आज मस्तच बेत आहे...वगैरे...असे कौतुक व्हायचे...पण
आता मात्र हा झणझणीतपणा डोकेदुखी झाला आहे.
एव्हाना लेकानं घराच्या सर्व खिडक्या-
दारं उघडली...जोरात पंखे
लावले...जेणेकरुन फोडणीचा वास घराबाहेर जाईल...मग सर्वांनी कोरोना संस्कार
केले...म्हणजेच घड्याळ लावून वीस ते तीस सेकंद साबणाने हात स्वच्छ साफ केले...मग हे दोघंही आपापल्या कामाला लागले, आणि मी माझ्या...
किचनमध्ये गेले...गॅस बंद होता...फोडणी दिलेले भांड पार गार झालं
होतं. त्या थंड झालेल्या मिश्रणात बाकीचे
जिन्नस टाकले. सर्व ढवळून ठेवलं आणि मगच गॅस
लावला...आता चव-बीव कशीही असूदे पण त्या शिंका नको...मनात नाही नाही ते विचार...पाच-दहा
मिनीटात मिसळ तयार झाली...चवीत काही फरक नव्हता पण तिखटपणा थोडा जास्त
होताच...पुन्हा जेवतांना टेन्शन...नाकातून पाणी यायला लागलं...मग पुन्हा ते कोरोना
संस्कार...शेवटी लेकानंच कंटाळून सांगितलं...आता थोडं कमी तिखट झालं तरी
चालेल...पण या शिंका आणि ते सारखं हात धुणं नको...
आज बहुधा सर्वांच्या स्वयपाकघरात ही अवस्था आहे. याआधी जेवण बनवतांना येवढा विचार कधी करावा
लागला नव्हता. सध्या कोरोनाच्या वाढत्या
रुग्णांमुळे थोडा तणाव जाणवतो. काय होणार,
कसं होणार....हा प्रत्येकाच्या मनातला प्रश्न...उपलब्ध साधनसंपत्ती सर्वांनी जपून
वापरावी अशीच परिस्थिती आहे. नक्कीच
कुठल्याही वस्तूंची उपलब्धता नाही, असे नाही. पण या वस्तू, पदार्थ वापरतांना आपला हात थोडा
अखडता नक्कीच घ्यावा अशी परिस्थिती आहे.
या अशा वातावरणात महिला वर्ग खरा टास्क करीत आहे. आधी बारा-पंधरा तास बाहेर रहाणारी मंडळी आता
चोवीस तास घरात आहेत. सर्व कुटुंब घरात
असल्यामुळे खाऊचीही तेवढीच मागणी...त्यामुळे महिलावर्गाची कसोटी लागत आहे. गेल्या आठवड्यातल्या आपल्या डाळभाताच्या
लेखानंतर अनेक मैत्रिणींचे फोन आले, तेव्हा त्यांचे हे म्हणणे की डाळभातच बरा...का...तर
करायला फार खटपट नाही...आणि वेळही फार नाही...या लॉकडाऊनमध्ये आम्ही किचनमध्येच
लॉक झाल्यासारखे झालो आहोत...अशी प्रेमळ तक्रार अनेकींनी केली.
पण जिभेच्या चोचल्यांचे काय करायचे...एकीकडे असलेल्या थोडक्या
जिन्नसांमध्ये स्वयंपाक करायचा..दुसरीकडे हे चवीचे गणित सांभाळायचे...मंडळी खरंतर
या अशा प्रसंगात आपण आपल्या भूतकाळात डोकावले पाहिजे. म्हणजे आपल्या आई-आजीच्या काळात बघितले
पाहिजे...फार कशाला आपल्याही लहानपणात डोकावून बघितले तरी या समस्येवर खूप उपाय
मिळतील...आत्ताच्या भाषेत बोलायचं तर अशा अनेक रेसिपी
आहेत, ज्या साध्या पण चवीला
भन्नाट आहेत...शिवाय त्यातील पोषक तत्वेही तेवढीच उपयुक्त आहेत. त्यातला एक म्हणजे कुळदाची पिठी. आता किती घरात
पिठी होते...किती मुलं ही पिठी आवडीनं खातात...या पिठी सारखा पोषक पदार्थ नाही. कुळदाचे शिंगोळे हा असाच त्या नूडल्सला मागे टाकणारा खाद्य प्रकार....मूग आणि डाळीचे सांडगे वाळवून ते वर्षभर भाजी आणि
आमटीच्या रुपात खाण्याची पद्धत आपल्या काही भागात आहे. आपल्या वाळवणाची परंपरा तर कितीतरी समृद्ध...आणि
करण्याची पद्धत एवढी उत्तम की हे पदार्थ वर्षभर अगदी व्यवस्थित रहातात...बरं ते
करण्यासाठी फार काही मोठी यादी नसते...कोकणात पावसाळ्यात कधी कधी आठ ते दहा दिवस
बाहेर पडता येत नाही...अशावेळी सुकी मासळी आणि जमिनीत एका गाडग्यात पुरलेल्या
फणसांच्या बिया कामाला येतात. दुर्दैवानं
आपण शहरी चौकटीत राहून या आपल्या सगळ्या खाद्यपद्धतीला दूर ठेवलं आहे. झटपट करण्यासाठी फक्त पाकीटातील नूडल्स आवडायला लागल्या...पण
आपल्याकडे नखुल्या, गव्हाणे काय कमी होत्या...पण त्याऐवजी पास्ता जवळचा वाटला...
मंडळी खरंतर प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक विचाराने घ्यायची असते. तसंच या कोरोनामुळे झालं आहे. आपल्याला उपलब्ध असलेल्या अन्नधान्याचा वापर
सढळ हातांनं करण्याची सवय लागली...ही सवय आता कमी करायला हवी...दोन घास कमी
खाल्यानं काही होत नाही...होत असेल तर वजन आणि अतिखाण्याचे आजारच कमी होतील. याशिवाय आपल्या परंपरा नव्या नजरेतून पहाण्याची
वेळ आली आहे. चमचमीत, झणझणीत फोडणीच्या
सवयीला मी आता आवर घातला आहे, शिवाय त्या
पॅकेट फूडच्या मोहातूनही बाहेर पडले आहे.
मंडळी तुमचं काय...नक्की सांगा...
सई बने
डोंबिवली
----------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा





Very true. Nice article
ReplyDeleteमारवाडी समाजासारखा कंजुषपणा सर्वांनी जिभेच्या चोचल्यामध्ये बाळगायला हवा
ReplyDelete