स...सफाईचा....

 

        स...सफाईचा....


दुपारी खालून मोठ्यानं कोणाचा तरी आवाज येत होता...सहज म्हणून डोकावून बघितलं तर एक झाडू विक्रेता जोरात ओरडत होता...झाडू घ्या...मोठ्या दांड्याचे झाडू घ्या...ताई....दिवाळी जवळ आलेली...त्यामुळे वातावरण कसेही असले तरी प्रत्येकजण आपापल्या परीनं तयारीला लागलेला.  आत्ताशा आसपासच्या घरातून भाजणीचा वा बेसन भाजल्याचा सुगंधही यायला लागलेला...पण या सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे साफसफाई...दिवाळी म्हणजे साफसफाई...हे समीकरण कुठून दृढ झाले माहित नाही.  पण दिवाळीच्या दिवशी घर लख्ख करण्यासाठी प्रत्येक गृहिणी दक्ष असते.  येथे गरीब-श्रीमंत असा भेदभाव रहात नाही.  एकवेळ फराळ नसेल तरी चालेल पण साफसफाई व्हायलाच हवी.  स्वच्छ, साफ घर आणि त्याच्यासोबत एक मातीची तेवणारी पणती...एवढं असेल तरी दिवाळी साजरी होते.  एकूण काय दिवाळीच्या आधी साधारण पंधरा दिवस या साफसफाईच्या निमित्तानं गृहिणींचा चांगलाच घाम निघतो...खाली आलेल्या झाडू विक्रेत्याला बघून मलाही याचा अंदाज आला.  कॅलेंडर घेऊन दिवस मोजले...कुठल्या दिवशी काय करावं याचा साधारण अंदाज घेतला.  फराळाचा फार घोळ नाही...एक किंवा दोन रात्री छान ओ पी नय्यरची गाणी ऐकतं तो होतो...टेन्शन असतं ते दिवसभर चालणा-या साफसफाईचं आणि कपाट आवरण्याचं...


अखेर कॅलेंडरमध्ये खूण केल्याप्रमाणे दिवस ठरला...साफसफाईचा मुहूर्त काढला.  आता नवरा आणि मुलगा घरात.  हाही एक नवीन अनुभव.  कारण आत्तापर्यंत केलेल्या स्वच्छता मोहीमांमध्ये सफाईच्या दिवशी या दोघांनाही सकाळी लवकर डबा करुन दिला की काम व्हायचं.  मग सायंकाळ पर्यंत मी माझी मोकळी असायचे.  शिवाय रात्री येतांना नवरा आठवणीनं काहीतरी पार्सल घेऊन येणार...त्यामुळे साफसफाई करुन कितीही थकवा आला तरी रात्री दोन घास रेडीमेडचे मिळणार याची खात्री होती.  पण यावर्षीचं सगळंच गणित वेगळं.  दोघांनाही दोन दिवसांपासून आधी सांगून झालं होतं...मी या दिवशी साफसफाई करणार आहे...त्यामुळे सकाळचा नाष्टा डब्यातील खाऊ आणि दुपारी साधी भाजी-चपाती यावर भागवून घ्यावं लागेलं.  विशेष म्हणजे दोघांनीही स्वतः वाढून नंतर सर्व आवरुनही ठेवावं लागेल...या सर्वांची दोन दिवसात दहावेळा आठवण करुन दिली.  त्या दोघांनीही त्यांचं नेहमीचं म्हणणं रेटण्याचा प्रयत्न केला.  आपलं घर कुठे खराब आहे,  स्वच्छ तर आहे...अगदी लख्ख....आता अजून किती स्वच्छ करणार म्हणून कौतुक करुन झालं...अर्थात दरवेळच्या साफसफाई आधी हेच डायलॉग असतात...त्यामुळे सरावानं तिकडे दुर्लक्ष करत बाकीची आवराआवर सुरु केली. 

पहिली सुरुवात होते ती किचन पासून...का कोण जाणे पण किचन साफ करायला किती वेळ लागेल याचा अंदाज कधीच येत नाही.  कारण किचन म्हणजे अगदी किचकट काम...कितीही साफ केलं...तरी या अशा सफाई मोहिमेमध्ये सर्वाधिक वेळ किचनमध्येच जातो.  मुळात दरवेळी काहीतरी बदल म्हणून मांडणीत बदल करण्याची माझीच हौस या वेळेसाठी कारणीभूत ठरते.  यावेळीही तसंच झालं.  अंदाज केला होता त्यापेक्षा अधिक वेळ किचनमध्ये गेला.  बाकीच्या रुमही अशाच आवरायला घेतल्या.  दुपार टळून गेली. 


लेकाचं आणि नव-याचं जेवण झालं.   मी मात्र साफसफाईच्या नावावर जुन्या डाय-यांमध्ये गुंतून गेले.  हॉलमधल्या सेल्फमधला एक टप्पा जुन्या डाय-यांचा....दरवेळी ठरवते या डाय-या काही कामाच्या नाहीत त्या रद्दीत टाकून द्यायला हव्यात...आणि इथेच फसायला होतं.  नाही नाही म्हणता त्या डाय-या उघडल्या जातात...आणि त्यासोबत अनेक आठवणींही बाहेर पडतात.  मग स्टोरी टेलिंगसारखा अनुभव येतो.  इथं दुसरं कोणीही स्टोरी सांगत नाही...आणि ती दुस-या कुणाचीही नसेत...ही स्टोरी माझीच असते आणि माझंच मन ती सांगत असते.  दरवेळी होणारी ही हवीहवीशी वाटणारी चूक मी यावेळीही केली.  तेवढ्याच निश्चयानं...यावर्षी किमान दोन डाय-या तरी काढून टाकायच्या आणि नवीन काहीतरी तिथं ठेवायचं...किती जुनं सामान साठवायचं...हा प्रश्न माझाच मला विचारुन  सुरुवात झाली...मग एकएक कप्पे उघडायला सुरुवात झाली.  एक खूप जुनं पुस्तक निघालं...अगदी चिंध्या झालेलं...त्या चिंध्यां सेलोटेपनं जोडलेलं...माझ्या आईचं भरतकामाच्या डिझाईन असलेलं पुस्तक...या पुस्तकावरुन मी थेट कार्बनपेपर ठेऊन कितीतरी डिझाईन रुमालावर किंवा कुठल्याश्या कव्हरवर उतरवल्या होत्या आणि यावरुन आईचा बराच ओरडा खाल्लेला...असंच एक अगदी जुनं विरळ झालेलं रांगोळीचं पुस्तक...वास्तविक या नेट जगात जुन्या काय हव्या तेवढ्या नव्या डिझाईन एक क्लिकवर हजर असतात.  आता जेव्हा साड्या किंवा ड्रेसवर पेंटींग करते तेव्हा या नेट डिझाईनचाच अधिक आधार मिळतो...तरीही ही जुनी पुस्तकं टाकाविशी वाटली नाही.  पुन्हा एकदा त्यावर नजर टाकली.  यातील प्रत्येक चित्र ओळखीचं...कधी ना कधी गिरवलेलं...त्यासोबत आता जुन्या आठवणी गिरवल्या आणि पुन्हा त्या दोन्ही पुस्तकांना गुपचूप आत ठेवून दिलं.  अशीच एक डायरी निघाली...जुन्या रेसिपींची...आईच्या अनेक रेसिपी खास आहेत.  त्या कितीही प्रयत्न केला तरी तिच्यासारख्या बनवता येत नाहीत.  म्हणून आठवणीनं लिहून घेतलेल्य़ा...अगदी व्हेज ते नॉनव्हेज सर्व पदार्थ त्यात पेन्सिंलनं लिहिलेले...त्या रेसिपी वाचण्यात किमान अर्धा तास गेला...अजून काही अशाच डाय-या निघाल्या...ज्यात फोन नंबर लिहिलेले...नवीन नवीन जेव्हा मोबाईल आला तेव्हाच्या...मोबाईलमध्ये एखादा

नवीन नंबर सेव्ह केला की तो लगेच या डायरीमध्ये लिहून ठेवायची सवय होती.  मोबाईलचा काय भरवसा म्हणत...आता त्या नंबरवर आणि त्या परिचितांवरुन नजर टाकली...काही जण आठवणीतून गेलेले...त्यांची नव्यानं आठवण आली...एकदा फोन करुन बघायला हवा म्हणून मनाशी खूणगाठ झाली...नाही नाही म्हणता चांगला दीडतासांचा वेळ या एका कप्प्यानं खाल्ला...नेहमीप्रमाणं त्यातील एकही डायरी किंवा पुस्तक टाकण्याचं धाडस झालं नाही.  फक्त त्यावरील धूळ साफ केली.  या वेळेत आणखी एक रुम साफ झाली असती...आता ते काम दुस-या दिवसावर सोडलं...पण मनाची मरगळ साफ झाली...आपल्याकडे खूप काही जुनं आहे, ते वरचेवर बघायला हवं...त्याची साफसफाई करायला हवी...उजळणी करायला हवी...याची जाणीव झाली...दिवाळीच्या साफसफाईचा मला वाटतं हाच उद्देश असावा...जुन्या सोन्यासह पुढे जायचं...नव्यानं...नव्या विचारानं....

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

Post a Comment