कपड्याच्या नव्या लेबलचा स्पर्श...
यावर्षी नवे कपडे घ्यायचेत का दिवाळीला...आधीच बोला...दुकानात नको जायला...ऑनलाईन बुक करुया...दिवाळीला चांगले पंधरा-वीस दिवस होते तेव्हा नव-यानं विचारलं. पण कोरोनामुळं सर्व गरजा बदलल्यात...एरवी शॉपिंग हा शब्द काढला की मी अवघ्या काही मिनिटात तयार होऊन बाहेर पडायच्या तयारीत असते...त्यामुळे नवराही हा शब्द जरा जपून वापरतो...पण आता बदललेल्या परिस्थितीची त्यालाही जाणीव आहे. त्यामुळे एवढ्या खुल्यापणे त्यानं ऑफर दिली. अर्थात, आता गरजा बदलल्यात...बाहेर जाणे फार कमी...लेकतर दिवसभर त्या लॅपटॉपसमोर बसून...त्यामुळे त्याचा आणि माझाही या खरेदीसाठी अगदी पहिल्यांदाच नकार आला...नव-यानं हुश्श म्हणत...अगदी पहिल्यांदाच नाही म्हटलंस...म्हणून कौतुक केलं...कौतुक होतं का ते...काय माहीत...पण दिवाळीला नवीन कपडे घेणे हा सोहळा असतो. प्रत्येकाला या प्रकाशसणाला अशा नव्याची आस असते...दिवाळीला येणा-या पै पाहुण्यांमसोर आपली नव्या कपड्यांची खरेदी दाखवतांना कसला भारी आनंद होतो...पण प्रत्येकाला हा आनंद मिळतो का...आमचा ई खरेदीचा प्लॅन रद्द झाल्यावर बराच वेळ याबाबत विचार करण्यात गेला. आणि काही आठवणींना उजाळा मिळाला.
कॉलेजमध्ये शिक्षण चालू असतांना काही वर्ष धुळ्याला आम्ही रहात होतो. आई-पप्पा आणि मी...तेव्हा आई जवळच्याच बालकाश्रमात काम करण्यासाठी जायची. धुळ्याच्या आसपास असलेल्या गावातील मुलं तिथं शिक्षणासाठी आलेली असायची. या मुलांच्या व्यवस्थापनाचं काम आईकडे होतं. बहुधा सर्व मुलं शेतक-यांची...शिक्षणासाठी आईवडीलांनी आपल्याला घरापासून दूर ठेवलंय याची जाणीव मुलांना असायची. अगदी पहिली पासूनची मुलं होती तिथे...सामान्य परिस्थितीतून आलेली. त्यामुळे फार काही अपेक्षा नाहीत. जेवणात रोज काहीतरी वेगळं हवं...स्पेशल हवं अशीही मागणी नाही. जे असेल ते आनंदानं स्विकारणारी...अगदी चाटून पूसून खाणारी...सण असेल तेव्हा या मुलांचा चेहरा फुलायचा...कारण तेव्हा जेवणात आपसूक एखादा गोड पदार्थ यायचा. तसंच कपड्यांच्या बाबतीत. एरवी त्या सर्वांचे कपडे सारखे असायचे. बालकाश्रमाची मुलं ओळखली जावीत म्हणून असावं बहुधा. पण या मुलांना कधीतरी दिवाळीत कोणी नवे कपडे पाठवले होते. त्यापैकी काहीजण ते कपडे पकडून बसले होते. मी आईबरोबर तिथे जायचे. ज्या मुलांनी कपड्यांची पिशवी पकडून ठेवली होती, त्यांना सांगितलं अरे ते घालून बघ तुझ्या मापाचे आहेत का ते...तेव्हा तो म्हणाला होता...ताई थांबा...कपडे नाही बघत, पहिलं त्यावरचं नवीन लेबल बघतो...कपड्यांचं लेबल काय बघण्यासारखं असतं...म्हणून मी त्याला तेव्हा चिडवलं...पण नंतर जाणवलं, या मुलांना शक्यतो नवीन कपडे मिळत नसत. घरून कपडे मिळायचे पण ते मोठ्या भावानं वापरलेले...किंवा कोणी आणून दिलेले...कधीतरी कोणीतरी आणून दिलेले आणि मुख्य म्हणजे मापात बसतील असे मिळालेले कपडे त्यांच्या वाट्याला यायचे. त्यामुळे कधीकाळी मिळालेले नवीन कपडे...त्यांच्यावरचं लेबलं त्यांना महत्त्वाचं वाटत होतं....
नवीन कपड्यांचा स्पर्श, त्यांचा कोरा वास हे त्या मुलांसाठी समाधनाचे साधन होतं.
त्यानंतर त्यांचे ते समाधानानं हसणारे चेहरे कायम लक्षात राहीले..आज खूप दिवसानंतर त्या समाधानी चेह-यांची आठवण झाली. ही मुलं दिवाळीची वाट पहायची ते या कपड्यांसाठी....त्यांच्या गरजा, आनंद वेगळा होता. फराळ...गोडधोड यापेक्षा त्यांना नव्या कपड्यांची...विशेषतः त्यावरच्या लेबलची आस असायची. हे आपल्यासाठीचेच कपडे आहेत...ते आपणच पहिले वापरणार आहोत, हा सुप्त आनंद त्यात असायचा. दिवस सरले...पुढे धुळ्यातील आमचा मुक्काम हलला. पण त्या मुलांचे समाधानी चेहरे मात्र कायम लक्षात राहीले.
आता कपडे घेण्यासाठी कुठल्याही सणाची वाट पहावी लागत नाही. कुठे फिरायला जायचं ठरलं तर आधी कपड्यांची हौशेनं
खरेदी होते. ब-याचवेळा गरज नसतांनाही ही
खरेदी होते. पण या कोरोनानं आणलेल्या
परिस्थितीत या सर्वावर रोख लागली आहे. आता
पाहुणा म्हणून आलेला कोरोना चांगलाच स्थिरावलाय.
पुढच्या महिन्यात या कोरोनाला वर्ष पूर्ण होईलं...या सर्व काळात बाहेर
हौशेनं फिरायला जाणं दुरापस्त झालं. कुठे
जायचं नाही की कुणी आपल्याकडे येणार नाही.
मग नवे कपडे हवे कशाला...म्हणत कपडे खरेदी जणू थांबलीच...कपड्यांपेक्षा
अन्यही वस्तू गरजेच्या आहेत याची जाणीव झाली.
चार नवे टीशर्ट घेण्यापेक्षा मास्क गरजेचे ठरले.
पण या सर्वात अशीही काही मंडळी आहेत, की ज्यांनी भर कोरोना काळात आपल्यासाठी खस्ता खाल्यात...आज दिवाळी साजरी करतांना त्यांची जाणीव पहिली ठेवायला हवी. खरं तर कोरोनानं आपल्यातल्या आसपास वावरणा-या ख-या माणसांना शोधलं...या माणसांनी प्रसंगी रोगाची पर्वा न करता, समाजाची, समाजाच्या आरोग्याची काळजी घेतली. या सर्वांच्या सहकार्यांमुळेच आज आपल्याला दिवाळी साजरी करता येतेय. त्यामुळेच आपल्या सणामध्ये या सर्व मंडळींना सहभागी करुन घेतले पाहिजे...असाच एक प्रयत्न आमच्याही घरी झाला.
दिवाळीपूर्वी खरेदीसाठी बाहेर गेलेला नवरा नव्या कपड्यांच्या बॅगा घेऊन आला तेव्हा त्याला अनेक प्रश्न विचारुन मी भंडावून सोडलं होतं. एवढे कपडे कशाला घेतलेस...गरज आहे का...घरात काय आता नवे कपडे घालणार का...ऑफीस सुरु झालं का...एक ना दोन...माझे प्रश्न संपल्यावर त्यांनं शांतपणे हे कपडे कोणासाठी आणले आहेत, याची कल्पना दिली. एरवी दिवाळी म्हणून आपल्या ख-या गरजा पूर्ण करणा-यांच्या हातावर काही पैसे दिले की खूप मोठं काम केल्याचा भाव असायचा....पण कोरोनानं हिच मंडळी खरी असल्याची जाणीव करुन दिली आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचं मोल पैशात होणारं नाही. या अशा आपल्या आसपास असणा-यांसाठी नवे कपडे आणले तर...हिच कल्पना नव-याला सुचली...त्यांनी मग वेळ न घालवता...प्रत्येकाला त्यांच्या शर्टांची मापं विचारुन घेतली...आणि नवे शर्ट आणलेही....दुस-यादिवशीपासून वाटप सुरु केलं. पहिले सोसायटीचे वॉचमन झाले. नवीन शर्ट पाहून त्यांची कळी खुलली. धन्यवाद...बहोत अच्छा है...दिवाळीच्या दिवशी घालणार...म्हणत तो कितीतरी वेळ ती शर्टाची पिशवी धरुन बसला होता. या मंडळींना कपड्यांच्या बॅगा पकडतांना त्यांच्या चेह-यावरचे समाधान माझ्या ओळखीचे होते. त्या बालकाश्रमातल्या मुलांच्या समाधानाची आठवण झाली. नव्या कपड्याचा स्पर्श...त्यावरचे लेबल पहातांनाची उत्सुकता...हे सर्व पुन्हा आठवले...कोरोनामुळे सर्वच काही वाईट झालं नाही. काहीतरी चांगलंही झालंय...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा





खुप छान सई स्तुत्य उपक्रम
ReplyDelete