भानगडी आणि क्लब 99

 

   भानगडी आणि क्लब 99


लोकं एवढी लफडी का करतात....सरळ का जगत नाहीत....डोक्याला हात लावून माझी एक मैत्रिण बडबडत होती.  खूप वैतागली होती...आमच्या दोघींच्याही लेकांच्या परीक्षा होत्या गेल्या आठवड्यात...मुलांना परीक्षांना सोडून आम्ही दोघी समोरच्याच मॉलमध्ये महिन्याची खरेदी करायला गेलो...एका हातात सामानाची यादी आणि दुस-या हातानं ट्रॉली ढकलत आम्हा दोघींच्या गप्पा चालल्या होत्या...माझ्या मैत्रिणीचा नवरा एका चॅनेलचा वार्ताहर...अत्यंत व्यस्त वेळापत्रक...चोवीस तासातील चार तास फक्त घरात...एरवी नवरा नेहमी टीव्हीत दिसतो म्हणून  आनंदात असणारी ही मैत्रिण गेल्या वर्षी पार कोमेजली.  कोरोनाचा वार तसाच होता.  त्या सुरुवातीच्या काळात या कुटुंबाची कसोटी लागली.  पण त्यातूनही हे सर्व पार पडले.  पण अलिकडे कोरोना परवडला पण हायप्रोफाईल भानगडी नको असं म्हणण्याची वेळ आली आहे.   अर्थात या भानगडीमुळे पत्रकार असणा-या मैत्रिणीच्या नव-यावर अधिकच कामाचा ताण वाढला आहे.  पर्यायानं हा ताण आता त्यांच्या कुटुंबात पसरला होता.  मुलाची महत्त्वाची परीक्षा म्हणून त्या बिचा-यानंही सोबत येण्याचा प्रयत्न केला.  पण त्याला सुट्टी मिळाली नाही.  त्यामुळे मैत्रिण धाकट्या मुलाला सासूबाईंकडे सोपवून एकटीच आली.  नव-यानं गाडी करुन दिली....मुलाला शुभेच्छा दिल्या....मुलानंही आपल्या वडीलांना शुभेच्छा दिल्या आणि दोघंही आपपल्या परीक्षांना रवाना झाले.  हे सर्व सांगतांना ती मैत्रिण चांगलीच कावली होती.  माहित आहे मला माझ्या नव-याचं कामच आहे ते,  पण कधी तरी वाटतं...ही मोठी माणसं कशाला एवढ्या भानगडी करतात...घरात यांच्या सर्व काही आहे.  मग खाऊन पिऊन गप्प का बसत नाहीत...यांच्या भानगडीमुळे आम्हाला फुकटचा त्रास....


मी या माझ्या मैत्रिणीच्या त्र्याग्याला फक्त बघत आणि ऐकत होते.  ती ठाण्याला रहाणारी...आमच्या दोघींची ओळख मुलांच्या स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसमुळे झाली.  मी सुद्धा काही वर्ष पत्रकार म्हणून काम केलेलं.  त्यामुळे या क्षेत्रातली दगदग...माहीतीतील...काही वर्षापूर्वी लक्षात आलं की मुलगा खूप चिडचिड करतो.  मला मीस करतोय...मी नोकरीसाठी बारा-बारा तास बाहेर असायचे...पण नंतर मात्र मुलासाठी या सगळ्याला रामराम केला. ही माझी मैत्रिण बोलत असतांना मी नकळत माझ्या भूतकाळात हरवले होते.  पण इथे गोष्ट वेगळी होती.  मी नोकरीचा राजीनामा सहज दिला कारण माझ्या मागे माझा नवरा भक्कम उभा होता.  पण माझ्या मैत्रिणीचा घरी तिचा नवराच पत्रकार म्हणून काम करत होता.  तो घरी बसून कसं चालणार...आई, बायको आणि दोन शिकणारी मुलं.  या सर्वांसाठी त्याला कितीही अडचण असली तरी कामावर जावचं लागणार होतं.  त्यातच पत्रकार म्हणून फक्त मिरवण्यात त्याला स्वारस्थ नव्हतं.  तो खरच हाडाचा पत्रकार होता.  आपल्या कामाबद्दल कमालीचा जागरुक आणि प्रामाणिकही.  चॅनेलचा पत्रकार म्हणजे सतत अलर्ट असायला लागतं.  नेहमी ब्रेकींग न्यूजचा पाठलाग करावा लागतो.  ज्याला खरोखर या पेशाची आवड आहे, तोच ही धावपण करु शकतो.  माझ्या मैत्रिणीचा नवराहा त्यापैकीच एक होता. 

एरवी माझ्या मैत्रिणीला आणि आम्हा सर्वांना त्याचं खूप कौतुक...मात्र आता


या कौतुकात काळजीही जोडली गेली. गेल्या वर्षभर कोरोनानं जग थांबलं...पण या मैत्रिणीच्या नव-याला दुप्पट काम करावं लागलं.  क्षेत्रंच तस... काम तर केलच पाहिजे...घर कसं चालणार...त्यामुळे करोना सुरुवातीला आला तेव्हा नवरा कामाला बाहेर पडला की ही मुलांना पकडून एका कोप-यात बसून रहायची...खूप रडारड...शेवटी मुलांनी, सासूनी समजूत काढली.  मध्ये मध्ये आम्ही सर्व मैत्रिणी ठरवून फोन करायचो.  मग लॉकडाऊनच्या नवीन जीनवशैलाबरोबर जुळवून घेता घेता तिची धाकधूक थोडी कमी झाली.  नव-यानं आणि तो काम करत असलेल्या चॅनेलनंही खूप काळजी घेतली.  त्यामुळे त्याला या साथीचा त्रास झाला नाही.  आता तर लस आल्यावर त्यानं पहिला डोसही घेतला.  त्यामुळे मैत्रिणीच्या काळजीत थोडा खंड पडला होता.  पण आता पुन्हा कोरोना डोकं वर काढू लागलाय. 


त्यातच एक-एक नव्या भानगडी निघायला लागल्या....राजकीय भूकंप...एक वादळ संपलं की परत दुसरं.  या सर्वात पत्रकारांची धावपळ तर विचारु नका.  कोरोना काळ परवडला असं बोलयची वेळ आलेली.  गेल्यावर्षी घरातून दहा वाजता निघणारा हिचा नवरा आता म्हणे घरातूनच सात वाजता कामाला सुरुवात करतो.  घरी फोन करुन त्याच्याकडून टॉप न्यूजबाबत अपडेट घेतले जातात...कधी कधी लाईव्ह ही असतो.  पहिल्यांदा तो जेव्हा लाईव्ह असायचा तेव्हा मैत्रिण आठवणीनं मेसेज टाकायची...पण आता ते नव्या नवलाईचे दिवस संपले...आता सकाळी बाहेर पडणारा तिचा नवरा रात्री उशीर घरी पोहतचो.  मुलांच्या अभ्यासाची चौकशी....आईबरोबर थोड्या गप्पा...आणि आपल्या बायकोबरोबर घरच्या खर्चाबाबत जुजबी बोलणं...एवढचं त्याचं घरात अस्तित्व...दिवसभर कामासाठी कुठे होतात म्हणून विचारायचीही चोरी...कारण तो कुठे असायचा हे तिला टिव्हीमधूनच समजायचे.  एखाद्या नेत्याचा किंवा पोलीसांचा पाठलाग करताना त्याची होणारी दमछाक ती टीव्हीवरुन बघायला मिळायची...अलिकडे हा ताण जास्तच वाढलेला...नेहमीच्या ब्रेकींग न्यूजचा फेरा काही चुकवता येत नसे.  या सर्वात मात्र मैत्रिणीचीही चिडचिड वाढायला लागलीय..

गेल्या महिन्यातही आमच्या मुलांची परीक्षा होती.  पण वेळा वेगळ्या होत्या.  मुलांचे पेपर झाल्यावर आम्ही दोघी चांगल्या तासभर फोनवर बोललो होतो.  तेव्हाही बराचवेळ या मैत्रिणीच्या पत्रकार नव-याच्या धावपळीवर बोलणं झालं होतं.  याला कुठे तरी अंत आहे का ग...म्हणून तेव्हाही तिनं प्रश्न विचारला होता....आत्ताही तोच प्रश्न परत आला.  एव्हाना आम्हा दोघीचं सामान घेऊन झालं होतं.  दोघीही बिलासाठी ट्रॉल्या घेऊन रांगेत उभं राहिलो.  माझा नवरा सोबत होता.  पण तो शेजारच्या इलेक्ट्रीक शोरुममध्ये फिरत होता.  त्याला फोन करुन सामान भरुन झाल्याचं सांगितलं...दोघींच्या मिळून मोठ्या आठ पिशव्या झाल्या...तिघांनी मिळून त्या कशातरी उचलल्या...गाडीत भरुन ठेवल्या...आणि परत आम्ही दोघी बोलायला लागलो.   परीक्षा होती तिथं समोरच छोटी बाग होती.  त्या बागेत बरेचसे पालक मुलांची वाट पहात बसले होते.  आम्ही दोघींही त्या बागेत बसलो...आत्ता ती गप्प बसली...मी तिला हलकंसं म्हटलं...हे बघ आपण सर्वजणं त्या 99 क्लबचे सदस्य आहोत...त्यामुळे आपण सर्व काही करतो ते त्या क्लबमध्ये कायम रहाण्यासाठीच...तू, मी,  तूझा नवरा, आपली  मुलं...सर्वजणं ही 99 क्लबचे सदस्य आहोत...त्यामुळे कितीही मिळालं तरी त्या गेलेल्या एका टक्यासाठी कायम झगडत रहाणार...परिश्रम करत राहणार...ती माझ्याकडे बघत होती...तिला पहिल्यांदा काही समजलं नाही.  मी पुन्हा सांगितलं, बघ तुझ्या नव-याला दुसरी नोकरी मिळणार नाही का...नक्की मिळेल...पण त्याला ही त्याची नोकरी आवडते...कितीही धावपळ झाली तरी पहिल्यांदा ब्रेकींग न्यूज आपणच दिली ही गोष्ट त्याला सुखावते...आत्ता असंच उद्याही करायचं


म्हणून तो खूणगाठ बांधतो...म्हणजेच त्याला आज 99 टक्के गुण मिळतात...पण एक हरवतो...तो त्या 99 टक्क्यांचं कौतुक करत बसत नाही....तर हरवलेल्या एका टक्क्याच्या मागे रहोतो...आत्ता आपली मुलचं बघ ना...गेल्या परीक्षेत ब-यापैकी मार्क मिळाले...काही हातातून निसटले...आता पुन्हा काही निसटू नये म्हणून प्रयत्न करीत आहेत...आपण सर्वचजण या 99 क्लबमध्ये आहोत...हातात काय आहे, यावर समाधान मानण्यापेक्षा एखाद दुसरं हातातून निसटलं तर त्याचा पाठलाग करणारे...ते भानगड करणारेही तसेच...प्रत्येकाचा हरवलेला गुण वेगळा आहे.  काहींचा सकारात्मक तर काहींचा नकारात्मक...यावर वैतागून चालणार नाही....एवढ्यात परीक्षाही संपली.  मुलं बाहेर आली...यावेळी पेपर चांगला गेला...बघू नाहीतरी पुढची एक संधी आहेच....तिचा लेक आल्या आल्या हे वाक्य म्हणला....माझ्यानंही त्याच्या सूरात सूर लावला...याबरोबर आम्ही दोघीही हसायला लागलो...मुलांना काही कळलं नाही....पण क्लब 99 ची मात्रा लागू झाली होती हे नक्की....

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. 99 क्लबचा हव्यास बहुतांश सर्वांनाच 100 टक्के असतो , आणि घोडं तिथंच पेंड खातं...
    छान लिहिलंस ,अगदी प्रत्येकाच्या दुखऱ्या नसीवर बोट ठेवलंस..

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना...या प्रत्येकात मी सुद्धा आहे अजय....

      Delete
  2. हाव किंवा हव्यास जोपर्यंत थांबत नाही, सतत मलाच पहिलं आलं पाहिजे ही जिद्द जोपर्यंत, माझ्यापेक्षा कोणीही पुढे जाता कामा नये या उद्दिष्ट वर मात करत राहिल तोपर्यंत आपण सारे 99 च्या क्लबचे सभासदच राहणार.

    ReplyDelete
    Replies
    1. हे बरोबर आहे. आपण प्रत्येकजण या क्लब 99 चा भाग असतो. पण फरक एवढाच की प्रत्येकाचं उद्दीष्ट वेगळं असंत...

      Delete
  3. वरील कॉमेंट unknown नसून नलिनी पाटील यांनी केलेली आहे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद नलिनी ताई...

      Delete
  4. आदरणीय सई जी ९९% पर्यन्त पोहचन सर्वाना जमत..
    राहतो प्रश्न तो फक्त १%चा.....
    तोच १% तर खरा सूत्रधार असतो शेवटच्या निर्णयाचा!!
    असो...
    अपन अतिशय छान शब्द रचनेच वास्तव वर्णन केले आहे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद नितीनजी....

      Delete
  5. एक वेगळाच विषय वेगळ्याच पध्दतीने हाताळला आहे नावही साजेसं आहे
    आपण प्रत्येक जण यात मोडतोच

    ReplyDelete

Post a Comment