ती चव...त्या आठवणी...आणि मैत्री...

 

ती चव...त्या आठवणी...आणि मैत्री...


दुपारचं जेवण झालं...सर्व आवरुन झालं...बाहेर दिवस की रात्र हा प्रश्न पडावा असं वातावरण...पावसाचे रंग चालू झालेले...त्यात मध्येच होणारा लखलखाट...बघता बघता पावसाचा जोरही वाढला...खरंतर अशा कुंद वातावरणात मस्त झोप काढण्याची इच्छा होती...पण विजांच्या आवाजानं पेंगुळलेले डोळेही भेदरले...लेक आणि नवरा त्यांच्या लॅपटॉपसमोर बसले...आता पुढचे चार महिने पावसाचे...त्यात असा पाऊस पडणारच, हा त्यांचा सरळ हिशोब...मी मात्र नव्यानंच पाहते आहे, असं बाहेरचं चित्र बघत होते.  काचेआडूनही त्याचा धो धो आवाज कुठेतरी घेऊन जात होता...दरवर्षीची आठवण...गावची...गावातल्या पावसाची...पावसाळ्यातल्या तिथल्या धुंद वातावरणाची आणि त्यासोबत बनणा-या वेगवेगळ्या पदार्थांची...ही आठवण येताच मनात आनंदाचा लखलखाट झाला.  किचनमध्ये गेले आणि एका कोप-यात ठेवलेली बरणी बाहेर काढली...त्यात वर्षभराचा मोठा खजिना साठवून ठेवला होता.  ती बरणी काढली आणि एक रिकामी कुंडी घेतली...थोडी खटपट केल्यावर कुंडीतील सुकी झालेली माती काढता आली...आता या कुंडीत बरणीतला खजिना रिता केला...वरुन माती टाकली...पाण्याची झारी धरली...आत्ताही बाहेर पावसाचा जोर होता...पण सध्या या कुडीतील खजिन्यासमोर तो पाऊसही फिका झाल्यासारखाच होता...आता रोज सकाळ-दुपार-संध्याकाळचे काम मिळाले...त्या कुंडीकडे बघत बसायचे...दोन दिवसातच

वरची माती दूर होईल आणि त्या खजिन्याची फळं अर्थात आमच्या चौल-रेवदंड्याच्या लोकांचं आवडतं पालेबिरडं बाळसं घेईल...या विचारानंच चेहरा खुलला...या सर्वांकडे लेक आणि त्याचा बाबा कौतुकानं बघत होते...डोळ्यांनी खुणा चालू होत्या....गेली गावाला....असा त्यातला भावार्थ...पण माझी कळी खुलली होती...जिभेवर पालेबिरड्याची चवही येऊन विसावली...आणि मनात गावच्या ब-याच सा-या आठवणी...

पहिला पाऊस झाला की रेवदंडा-चौल-आलिबाग भागात राज्य असतं ते पालेबिरड्याचं.  या भागात वालपावट्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते.  या वालपावट्याच्या शेंगा काढतांना काही राहतात...त्यातील दाणे पहिल्या पावसात भिजतात आणि गरम-ओल्या जमिनीतून ही पालेबिरड्याची अप्रतिम भाजी म्हणून समोर येतात.  अगदी हाताच्या बोटाच्या उंचीएवढी असलेली पा


लेबिरड्याची भाजी सकाळी माळणी बाजारात विक्रीसाठी आल्या की त्यावर घेणा-यांची झुंबड उडते.  ब-याच घरात वर्षभर कडवे वाल सोलून जे चाडे, म्हणजेच जे न भिजलेले वाल रहातात ते साठवून ठेवतात. यांना चाडे का बोलतात हे माहित नाही...पण हे चाडे साठवायची पद्धत मी इकडे शहरातही ठेवली आहे.  आता कुंडीत हेच चाडे रोवले.  गावाला एक छोटासा वाफा करुन त्यावर हे चाडे आई रोवायची.  मग त्यातून फुटलेल्या पालेबिरड्याला अलगद, नाजूक हातानं उपटायचं.  विहीरतलं बालदीभर पाणी काढून पालेबिरड्याची भाजी साफ करायची.  साफ करायची म्हणजे त्याच्या फक्त मुळांना लागलेली माती धुवून काढायची  आणि ते करतांना ही फक्त मुळे नखानंच खूरडून टाकायची.  मग हातात मावेल तेवढा लसूण,  भरपूर कांदे,  चार मिरच्या यांच्यावर भिडाच्या तव्यावर ही भाजी परतायची आणि चांगलं कवडभर खोबरं टाकायचं की भाजी तयार.  लहानपणी अगदी मान खाली घालून निमूटभर कुठली भाजी खाल्ली असेल ती ही पालेबिरड्याची भाजी.  त्यामुळेच की काय गाव सोडलं तरी या भाजीची साथ कधीही सोडली नाही.  दरवर्षी एखाद्या डब्यात, कुंडीत हे चाडे रोवायचे आणि जेवढी येईल तेवढी भाजी काढून प्रेमानं करायची.....आणि मग गावची आठवण काढत ती प्रेमानं खायची.  पालेबिरड्याची भाजीची चवच अशी.  लहानपणी अगदी टोपलीभर भाजी घेतली तरी ती कमी पडणारी...आत्ता अगदी घासभर झाली तरी ती शेवटच्या घासापर्यंत पुरणारी.  आता ही कुंडीमध्ये तयार होणारी पालेबिरड्याची भाजी म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे आहे.  त्याला ना गावच्या पाण्याची चव ना हवेची...पण तरीही या भाजीनं समाधान

मात्र मोठं होणार होतं. 

पालेबिरड्याची भाजी आणि पर्यायी गावाच्या आठवणीतून बाहेर येणं शक्य नव्हतं.  कुंडीत वर्षभर साठवलेले कडव्यावालाचे चाडे खाली झाले.  आणि आठवणींचा एकएक फुलोरा बहरु लागला.  बाहेर पाऊस चांगलाच वाढला.  चार दिवस असाच धो-धो पडणार होता, म्हणून बातम्यांमध्ये सांगितले जात होते.  या सर्वातून बाहेर पडण्यासाठी पु्न्हा गावचाच आधार घेतला.  एव्हाना संध्याकाळ झालेली लेकाची संध्याकाळच्या नाष्ट्यासाठी चुळबूळ सुरु झालेली...मी त्याचं भागवून माझ्यासाठी कडक फिल्टर कॉफी विथ जायफळ तयार केली.  ही जायफळंही आमच्या गावातील....लॉकडाऊनमध्ये नवराही कॉफीचा चाहता झालेला...ब्रेक घेऊन तोही कॉफी टाईममध्ये सामिल झाला.  गप्पांमध्येही पुन्हा तोच विषय...जरा हे कोरोना प्रकरण कमी झालं की नक्की एक फेरी मारुन येऊया, म्हणून दोघांचीही सहमती झाली.  निदान श्रावण महिन्यापर्यंत तरी जायचंच हे नक्की झालं.  नवरा पुन्हा त्याच्या ऑफीसमध्ये जॉईन झाला, आणि मी माझ्या आठवणींमध्ये...

दोन दिवस आधीच आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस होता...वॉटसअपवर त्याचे बरेच मेसेज साठले होते.  काही फोटोही होते.  अनेकांनी वैयक्तीक मेसेज पाठवून शुभेच्छा दिल्या होत्या.  त्यांना रिप्लाय देण्याचं काम सुरु झालं....त्यात बरेचसे मेसेज आमच्या शाळेच्या ग्रुपमधल्या मित्रपरिवाराचे होते...झालं, म्हणजे तो दिवस पूर्णपणे गाव आणि गावच्या आठवणींमध्ये गेला.  हे मेसेज चाळतांना पुन्हा मन गावाभोवती फिरायला लागलं.  दरवर्षी शाळेच्या म्हणजे एसआरटी हायस्कूलच्या ग्रुपचे गेटटूगेदर होते.  त्यानिमित्तानं का होईना दिड


दिवसाच्या गणपतीसारखी गावाला धावती भेट होते.  पण या कोरोनामुळे त्याला ब्रेक लागला.  सलग दोन वर्ष हे गेटटूगेदर चुकलेय.  तेही या पालेबिरड्याच्या भाजीसारखं जमवता आलं असतं तर किती बरं झालं असतं हा विचार मनात आला.  मध्यंतरी संकेत या शालेय मित्राचा फोन आला होता,  ते कोरोना बिरोना राहूदे...आपलं गेटटूगेदर करुया.  किती दिवस झाले तुम्हा कोणाला बघितलं नाही...या गावाला लवकर....अशी त्यानं जेव्हा फोनमधून साद घातली, तेव्हा नकळत डोळे पाणावले होते.  कालपरवा असाच आमच्या डॉक्टर केदारला फोन केलेला....तेव्हा त्याचाही सूर असाच,  आता गेटटूगेदरसाठी मे महिन्याची वाट नको बघायला...नाहीतर पुन्हा वर्ष जायचं.  त्यापेक्षा सप्टेंबर पर्यंत तरी सर्वजण भेटूया म्हणून तोही आग्रहानं सांगत होता.  त्याच्या त्या बोलांनी पुन्हा आठवणी जाग्या झाल्या होत्या...आत्तासारख्याच...

गावाला राहणारा ही सर्व मित्रमंडळी गावच्या


पदार्थांसारखी....साधी...सरळ...खुसखुशीत...आणि सतत जिभेवर स्वाद ठेवून जाणारी.  एरवी शाळेत असतांना आम्ही कधी एकमेकांशी धड बोलायचोही नाही....अनेकवेळा रुसवे फुगवे असायचे....पण आता या वयात मैत्री या शब्दाचा अर्थ कळतो...आणि मित्रपरिवाराचेही महत्त्व त्यामुळेच जास्त वाटायला लागलंय...अगदी या पावसाळी भाज्यांसारखे...जेव्हा त्या भरपूर मिळत होत्या, तेव्हा त्यांची चव आणि गोडी होती, पण किंमत कळली नव्हती...मैत्रीही तशीच...ही मित्रमंडळी जेव्हा आसपास होती, तेव्हा त्यांची किंमत नव्हती...पण आत्ता कुठेतरी त्यांना भेटावेसे...भरपूर गप्पा माराव्याश्या वाटतात...समोरासमोर भांडावसं वाटतं...आणि भरपूर हसावसंही वाटतंय...पण हे काही कुंडीतल्या भाजीसारखे घरात कंपोज करता येणार नाही, याचीही जाणीव आहे...आता या वातावरणात एकमेकांपासून दूर आहोत ते एका काळजीनं...सर्वांच्या सुरक्षीततेसाठी...हा करोना लवकर जावो आणि आमची पुन्हा पूर्वीसारखी भेट होऊदे हेच मागणं आहे....

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments