खेकडे आणि खेकडेच...
काही गोष्टी या खूप खटपट करुन मिळवाव्या लागतात...जिभेचे चोचलेही त्यातलेच. याच जिभेसाठी अशीच एक खटपट करावी लागली. सकाळी सात वाजता घर सोडलं...साधारण तासाभरात गाडी ठाण्याला पोहचली...ज्या कामाचं निमित्त करुन जवळपास तीन-साडेतीन महिन्यांनी ठाणं गाठलं होतं, ते बाजुला ठेऊन या खरेदीसाठी सज्ज होते. अर्थात सोबत नवरा होता. त्याचे नेहमीचे आस्ते कदम...काय घाई असते तुझी...कुठे काय पळून जाणार आहे का...हा नेहमीचा शाही थाट...पण माझी पावलं मार्केटमध्ये पळत जात होती. गेली कित्ती वर्ष हा बाजार महिन्यातून दहावेळा तरी पालथा घातला आहे. पण कोरोना म्हणजे काहीच क...रो...ना...असं झालंय...त्यामुळे या बाजाराची साथ काही वेळेसाठी तरी सुटलीय. त्याबरोबरच एका मोठ्या खजिन्याला भेट देण्याची संधी हुकल्याची हुरहुर मात्र मनात राहीली आहे. याच ठाण्याच्या बाजारातला एक चविष्ट खजिना म्हणजे भरलेल्या चिंबो-या...ठाण्याच्या बाजारात खाडीतील चिंबो-या विकायला येतात. ठाण्याच्या आसपास असलेल्या खाडी परिसरातून पकडलेल्या या चिंबो-या किंवा खेकडे लाल लाखेनं भरलेल्या असतात...सकाळी भाजीसाठी या बाजारात आल्यावर छोट्या पाटीमध्ये मिळणा-या या चिंबो-या मी अनेकवेळा घेतल्या आहेत. आता ही भाजी खरेदी बंद झाल्यामुळे चिंबो-या आणि खेकड्यांवरही पाणी सोडावे लागले...पण
अचानक ठाण्याला जाण्याचा बेत ठरला.
सकाळी नऊ-साडेनऊच्या आसपास पोहचायचे होते. मी याच संधीचा फायदा घेतला...पहिली लेकाला
कल्पना सांगितली...तो एक नंबर खवय्या...त्यानं त्याच्या बाबांची अर्थात माझ्या
नव-याची समजूत काढली...आणि नाही नाही म्हणत तोही सकाळी सात वाजता घर सोडायला तयार
झाला...असं सर्व साधल्यावर मार्केट पाहिल्यावर माझी खरेदीसाठी होणारी धावपण फक्त
मी आणि मीच जाणू शकत होते. करोनामुळे अनेक
बंधनं होती. त्यामुळे बाजार आहे की नाही ही
शंका होती...आणि बाजार असल्यावर चिंबो-या किंवा खेकडे मिळतील का ही आणखी एक शंका होती...पण
बाजार भरला होता. भाज्या आणि फळांची गर्दी
झाली होती...माझी नजर मात्र त्या काळ्याभोर टोपल्यांना शोधत होती...अखेर नेहमीच्या
जागेवर पोहचेले...आणि छोट्या छोट्या जाळीदार टोपल्यात मोठे मोठे नांगे बाहेर काढून
घाबरवणा-या चिंबो-या नजरेस पडल्या आणि हुश्श केले.
काळ्याभोर चिंबो-या म्हणजे पावसाळ्यातला उत्तम आहार...या चिंबो-यांचं सार म्हणजे सर्दीवरील रामबाण औषध हे लहानपणापासून आमच्या मनावर बिंबवले गेलंय. त्यातलं खरे खोटे माहीत नाही. पण या चिंबो-यांच्या झणझणीत रस्स्याची चव कश्याला नाही...आत्ता पावसाळ्यात खेकडे काय किंवा चिंबो-या काय यांचे एवढे फोटो सोशल मिडीयावर शेअर व्हायला लागले तेव्हापासूनच घरात दर वाराला, म्हणजेच बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी आज खेकडे आणायचे का...हा लेकाचा प्रश्न होता. दरवेळी काहीना काही कारण सांगून हा खेकडा रश्याचा बेत होत नव्हता...पण नेमकं ठाण्याचं ठरलं आणि खेकडे घरी आणण्याचा मुहूर्तही ठरला. लेकाच्या क्लासमध्ये त्याचे पेपर आणि प्रोजेक्ट देण्यासाठी सकाळची ठराविक वेळ देण्यात आली होती. त्यावेळेआधी एक तास ठाण्याला पोहचून खेकडे खरेदीचा बेत केला. लेक
लहान असतांना त्याचे सामान ठेवण्यासाठी छोटी छोटी बास्केट घेतली होती, त्या बास्केटचा आता या खेकडे खरेदीसाठी उपयोग होतोय. त्यातलेच एक बास्केट घेऊन मी त्या खेकड्यांच्या टोपलीसमोर उभी राहीले. जवळपास दीड वर्षांनी ही मोलाची खरेदी होत होती. खेकडे विकणा-या बाईनं बहुधा त्या बास्केटवरुन ओळखलं असणार...ताई, ब-याच टायमानं आलीस...म्हणत एक मोठ्या खेकड्यांची पाटी समोर ठेवली. एरवी या डझनावर या खेकड्यांची किंमत ठरते...त्यांचा आकारही महत्त्वाचा असतो. माझ्यासमोर असलेले खेकडे सर्वात मोठे, अगदी हातभर मोठे होते. त्यामुळे त्या टोपल्यात सहा खेकडे होते. नव-यानं एकदा त्यांच्याकडे जाणत्या नजरेनं पाहिलं...दोघांनी ओके केल्यावर किंमत ठरली. आता खरी कसोटी होती, ती म्हणजे ते खेकडे पकडून आमच्या बास्केट मध्ये ठेवायची...या मोठ्या खेकड्यांचे नांगे खतरनाक...चुकून त्यात बोट सापडलं तर संपलंच...जन्माची आठवण राहील एवढा तो डंख वेदनाकारक असतो. एरवी घराजवळच्या मासे विक्रेत्यांकडून खेकडे विकत घेतले तर त्यांचे हे मोठे नांगे तोडूनच घेत. पण आता घर गाठायला तीन तास तरी लागणार होते. त्यामुळे अख्खे खेकडे घेतले. ते त्या बाईनं सहजपणे उचवून आमच्या बास्केटमध्ये ठेवले...आणि नांगे काढतांना पक्कड वापर असा सल्ला दिला.
खेकडे भरलेले ते बास्केट सांभाळत बाकीची खरेदी झाली. लेकाचं क्लासमधलं
काम अगदी पाच मिनिटात झालं. आता परतीचा प्रवास सुरु झाला. खेकड्यांना गाडीमध्ये माझ्याबाजुची मानाची जागा मिळाली. तास-दीडतासांचा प्रवास करुन घर गाठलं. खेकड्यांचं बास्केट आणि भाजी-फळांच्या चार पिशव्या, एवढं सामान सोबत होतं. लेकांनं पुढे येऊन नेमकं खेकड्यांचे बास्केट घेतले. बाकी पिशव्या मी आणि नव-याकडे....घरी आल्यावर भाज्या-फळांची साफसफाई...आमचं आवरणं...यात चांगले दोन तास गेले. एकीकडे कांदा-टोमॅटो-आलं-लसूण भाजून या खेकड्यांसाठी वाटणाची तयारी केली. तेल आणि मूठभर लसूण ठेचून हे वाटण मीठ, मसाल्यावर फोडणीला पडलं...वरुन ग्लासभर पाणी टाकून हे मिश्रण उकळी येण्यासाठी ठेवलं.
हे सर्व आवरल्यावर आता मोठा कार्यक्रम सुरु झाला. एक-एक खेकड्यांना पकडून त्यांच्या नांग्या मोडायच्या...ओट्यावर पकड, मोठा चमचा, एक नॅपकीन यांची तयारी झाली होती. लेक आणि नवरा तयार पोजिशनमध्ये...हळूच बास्केट उघडून पहिला खेकडा बाहेर काढला...नॅपकीनच्या सहाय्यानं त्याला घट्ट पकडून पक्कडीच्या सहाय्यानं नांग्या तोडायला घेतल्या...मोठ्या नांग्या तोडून वेगळ्या भांड्यात आणि मग छोट्या नांग्या हातानं मोडून दुस-या भांड्यात जमा झाल्या...इनमीन सहा खेकडे. तरी मोजून अर्धा तास लागला. एव्हाना खेकड्यांचा रस्सा चांगला रटरटला होता. त्यात खेकडे साफ करुन सोडले. आता या रस्स्यांचे खरे सत्व करायची वेळ. म्हणजे, बारीक नांगे साफ करुन मिक्सरमधून बारीक केले. त्याचे गुलाबी रंगाचे, थोडे जाडसर पाणी या रस्स्यावर टाकले. वरुन मोठ्या नांग्यां फोडून त्याही त्या रटरटत्या रस्स्यांमध्ये सोडल्या....आता खरा त्या रस्स्याला रंग येऊ लागला. अख्खं घर त्या वासानं भरुन गेलं. भुकेची जाणीव झाली. एरवी आमच्या घरात भात फारसा होत नाही. भाक-यांवरच सर्व जोर असतो. पण आता थकवा आला होता. लेकाला फक्त भात चालेल का म्हणून विचारलं...तोही हो म्हणाला...त्यामुळे एकीकडे भात तयार केला...त्याला पुदिन्याच्या पानावर परतून पुदीना राईस तयार झाला. खेकड्यांचा रस्सा हा बेतच एवढा मोठा असतो की त्यासोबत सॅलेड बिलेड शोभून दिसतच नाही....त्याच्यासोबत फक्त कांदाच हवा....ताटात नेहमीपेक्षा मोठ्या डीश आल्या....त्यात लालसर झालेला खेकडा, नांग्या आणि वरुन भरपूर रस्सा ओतून झाला. त्याच्यासोबत पुदीन्याचा भात आणि कांदा.
बस्स...ताटात आणखी कशालाही जागाच राहीली नाही. तीन ताटं तयार झाली. खेकडे करायला जेवढा वेळ लागला नसेल तेवढा वेळ ते संपवण्यासाठी लागला. लेकतर तासभर ताटावर होता...एरवी गप्पा होतात...पण आता काहीच नाही. खेकडे आणि त्यांचे नांगे खाण्यासाठी लागणारी धडपड...ते चोखून खाताना होणारा आवाज तेवढा सोबतीला होता.
एरवी जेवतांना प्रचंड शिस्त पाळणारा लेक आज मस्त ओरपून जेवत
होता...मध्येच बोटं चाटत होता...काही बनवलं की, कसं झालंय हा माझा नेहमीचा प्रश्न
त्याच्याकडे बघून त्या झणझणीत रस्स्यात विरून गेला. पावसाळ्यात एकदा तरी खेकडे खावेत....ही आमची
परंपरा...आणि ती परंपरा लेक मनलावून पाळतोय,
यापेक्षा यासारखं समाधान कश्यात नाही...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा





Hii सई, किती सुंदर वर्णन ...खरंच खेकडा खाण्याची मजा काही औरच...so tempting..
ReplyDeleteKhup chhan lekh
ReplyDelete