खेळ मांडीयेला.....

 

   खेळ मांडीयेला.....


ऑलिम्पिक....खेळांचा महाकुंभ...जपानमध्ये झालेल्या या जागतिक खेळ महोत्सवात आपल्या देशाच्या खात्यात सात पदकं जमा झाली.  खेळाडूंच्या या यशाचे तमाम भारतीयांनी कौतुक केले.  भारतीय खेळांडूंचे स्वागत मोठ्या जोशात झाले...खरतर या खेळाडूंच्या स्वागताच्या बातम्या बघतांना डोळ्यात अश्रू आले...आनंदाचे अश्रू... ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचे नेतृत्व करुन पदक मिळवून देणे ही खूप मोठी गोष्ट आहे.  आपल्या देशाची लोकसंख्या किती, देशातर्फे ऑलिम्पिकमध्ये जाणारे खेळाडू किती...आणि आपल्याकडे येणारे मेडल किती हा काहींसाठी चेष्टेचा विषय असेल...पण इथपर्यंत जाण्यासाठी खेळाडूंनी किती संघर्ष केला असतो...किती मेहनत घेतली असते...हे जाणून घेतले की ही चेष्टही हवेत विरून जाते.  अर्थात अजून काही दिवस ऑलिम्पिक गाजवलेल्या भारतीय खेळाडूंचे कौतुक होईल,  त्यांच्या...त्यांच्या परिजनांच्या....त्यांच्या प्रशिक्षकांच्या मुलाखती येतील...पण साधारण महिन्याभरात हे वातावरण निवळून जाईल...पुन्हा येरे माझ्या मागल्या...क्रिकेट शिवाय कुठलाही खेळ मोठा नाही असं वातावरण होऊन जाईल...देशासाठी खेळलेल्या या ऑलिम्पिकविरांसमोर स्वतःसाठी (नावापुरते देशासाठी) खेळणारे खेळाडू मोठे होतील.  आपल्या देशाला ऑलिम्पिकसारख्या खेळाच्या मोठ्या व्यासपीठावर अशी हातावर मोजता येतील एवढी मेडल का मिळतात, याची सर्व मेख इथेच आहे.  आपल्याकडे अन्य खेळ आहेत  आणि चांगले खेळाडूही आहेत.  मात्र जागतिक स्तरावरील होणा-या स्पर्धेसाठी जी तयारी करावी लागते, त्यासाठी मेहनतीची आणि तेवढ्याच पैशांचीही गरज लागते.  ब-याचवेळा स्वतंत्र प्रशिक्षकाचीही गरज असते.  सराव करण्यासाठी मैदान,  पोषक आहार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व करतांना आर्थिक स्वातंत्र्य लागते.  कारण एकदा मेडल मिळालं की करोडोंची बरसात होते.  पण त्याआधी काही वर्ष अत्यंत कमी पैशामध्ये या खेळाडूंना गुरजरण


करावी लागते.  यादरम्यान त्यांना आर्थिक मदत जेवढी लागते तेवढीच मानसिक मदतही लागते.  गेली काही वर्ष या सर्वांकडे झालेलं दुर्लक्ष,  अगदी आयत्या वेळेत मिळालेल्या सुविधा यामुळे जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धेत आपले खेळाडू फारसे यशस्वी झाले नाहीत.  पण अलिकडे काही वर्षात या सगळ्या चित्रात चांगली सुधारणा होत आहे.  त्याचाच परिणाम म्हणजे यावेळच्या ऑलिम्पिकमध्ये अगदी सामान्य घरातील मुलांनी जागतिक स्तरावर साधलेली लक्षणीय प्रगती.

कुठल्याही क्रीडा प्रकारात यश लगेच मिळत नाही.  त्यासाठी मेहनत...सातत्य...गरजेचे असते.  सरावासाठी मैदान आणि त्या क्रीडा प्रकारातील सुविधाही गरजेच्या असतात...मात्र दुर्दैवानं आपल्याकडे या सुविधा


फार अभावानं मिळतात...काही वर्षापूर्वी क्रीडा स्पर्धा आणि त्यादरम्यानचा अनुभव मलाही आला.  माझा लेक धावण्याच्या सरावाला जात असे.  अगदी छोट्या गटासाठी म्हणजे आठ वर्षाचा असतांना त्याची निवड राज्यस्तरावर धावण्याच्या स्पर्धेसाठी झाली.  स्पर्धा पुण्याला.  बालेवाडी क्रीडासंकुलात.  मुलाची राज्यस्तरावर निवड झाल्यावर पहिल्यांदा खूप आनंद झाला.  मात्र स्पर्धेदरम्यान काही व्यथित करणारे अनुभवही आले.  या स्पर्धेसाठी जातांना काही अनुभवी मैत्रिणीही होत्या.  त्यांच्याही मुलांची निवड झालेली...त्यांनी या आधीही अशा स्पर्धांना हजेरी लावली होती.  त्यामुळे त्यांचे अनुभव महत्त्वाचे होते.  त्यातला एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे,  जेवणाचे डबे.  स्पर्धेदरम्यान खेळाडूंना जेवणाची सुविधा होती.  असे असले तरी आपल्या घरचे जेवण सोबत घ्यायचे, यासाठी त्या मैत्रिणी आग्रही होत्या.  स्पर्धा पुण्याला असल्यामुळे अगदी पहाटेची बस पकडायची होती.  स्पर्धा एक दिवसाची आणि कदाचित दुसरा दिवसही तिथे रहायला लागणार होता.  त्यामुळे दोन दिवस पुरतील एवढा खाऊ सोबत घेतला.  पहिलाच अनुभव असल्यानं उत्साह जास्तच होता.  तसेच खाऊचे डबेही जास्त झाले.  स्पर्धेच्या ठिकाणी गेल्यावर तिथे खेळाडूंसाठी जेवणाचे कुपन देण्यात आले.  आम्ही आमचा डबा आणला होता, त्यामुळे मी कुपन परत देण्याचा प्रयत्न केला.  पण सोबतच्या मैत्रिणीनं थांबवलं.  स्पर्धेच्या ठिकाणी राज्याच्या कानाकोप-यातून खेळाडू आणि त्यांचे पालक आले होते.  प्रत्येकालाच डबे आणणं शक्य नसेल,  अशांना कुपन देता येईल असं तिनं सुचवलं...जेवणाच्या वेळेपर्यंत त्याचा अनुभव आले.  गावखेड्यातून आलेले अनेक खेळाडू तिथे भेटले.  अशापैकीच काहींना आम्ही आमचे कुपन दिले.  आमच्या क्रीडा प्रकाराची वेळ सांभाळत आम्ही सोबत नेलेल्या डब्यातून जेवण केले.  मात्र येवढ्या मोठ्या स्पर्धा होतांना खेळाडूंना काय जेवण दिले असेल, याची उत्सुकता होती.  पण ते जेवण पाहिल्यावर अत्यंत निराशा पदरी पडली.  या जेवणात कडक पु-या,  पातळ डाळ असा मेनू होता.  आमच्या आसपास काही अगदी खेड्यातून आलेले खेळाडू बसले होते.  ते या जेवणावर चर्चा करत होते,  त्यातून कळलं, या कडक पु-या त्यांनी पातळ डाळीमध्ये भिजवून खाल्या होत्या.  सोबत एक पिकलेलं केळं

मिळालं.  त्यांच्यावर त्यांनी भूक भागवली होती.  दुपारच्या जेवणानंतर पुन्हा स्पर्धा सुरु झाल्या.  तेव्हा तिथे काही सरकारी कार्यालयातील कर्मचारी आले होते.  त्यांच्या जेवण किती छान होतं,  पनीरची भाजी थोडी तिखट पण छान होती...अशा त्यांच्या गप्पा चालू होत्या.  या गप्पा ऐकतांना,  या कर्मचा-यांचे हास्यविनोद ऐकतांना खूप मनात खूप चिडचिड झाली होती.  ज्या खेळांडूमुळे हा स्पर्धांचा उत्सव होत होता, त्यांची बोळवण साध्याशा जेवणावर झाली होती.  आणि ज्यांचा काही संबंध नव्हता त्यांच्यासाठी मात्र जेवणावळी झाल्या होत्या.  पुढे माझ्या लेकाचीही स्पर्धा झाली.  त्यात तो विजयी झाली.  मात्र त्याचवेळी तापानं फणफणला.  त्यावेळी पुण्यात तापाची साथ होती.  पारितोषिक समारंभ दुस-या दिवशी होता.  पण लेकाची अवस्था बघून निघण्याचा निर्णय घेतला.  आमचं मेडल आणि प्रमाणपत्र घेण्याची जबाबदारी अन्य एका मैत्रिणीवर सोपवली.  पण या मैत्रिणीकडेही आमचे मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले नाही.  काही दिवसांनी हे प्रमाणपत्र आम्हाला मिळालं. मेडल मात्र अद्यापही गायब आहे.  या अनुभवानंतर मात्र जेवढ्या स्पर्धांना गेलो,  तिथून सर्व प्रमाणपत्र आणि मेडल ताब्यात आल्याशिवाय ते स्पर्धास्थान सोडायचं नाही हा पक्का नियम केला.

मुळात मुलाला खेळायला नेणं हेच कसोटीचे होते.  अनेक जणांनी धावण्यात काय ठेवलंय,  त्याला क्रिकेट किंवा बॅडमिंटन सारख्या खेळाकडे वळव म्हणून सल्ला दिला.  यामागे एक कारणही होतं, ते म्हणजे मैदान.  आम्ही धावण्याचा सराव करायला जिथे जायचो त्या आमच्या क्लबचे सर्व खेळाडू पालिकेच्या मैदानावर सराव करायचे.  हे मैदान म्हणजे खेळ कम सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न यासाठी वापरले जायचे.  ब-याचवेळा या मैदानावर होणारे लग्न समारंभ खेळाडूंसाठी डोकदुखी ठरायचे.  कारण मैदानावर होणा-या लग्नांसाठी भव्य असा सेट उभारण्याची स्पर्धा असायची.  अशामुळे लग्नाआधी आठवडाभर त्या सामानांनी मैदान अडवले जायचे.  त्यात मिळेल त्या जागी धावण्याचा सराव...पण लग्नाच्या दिवशी तर ती जागाही पाहुण्यांच्या गाड्यांनी व्यापून जायची.  मग या समारंभांनंतर दुस-या दिवशी आम्हा सर्व आयांना एक काम लागू व्हायचं.  ते म्हणजे ग्राऊंडवर पडलेले खिळे उचलायचे.  लग्न किंवा अन्य समारंभासाठी उभारण्यात येणा-या सेटसाठी खिळे वापरले जातात.  हा समारंभ झाल्यावर सेट काढून टाकतांना हे खिळेही कुठलाही विचार न करता मैदानावर टाकण्यात येत असत.  अनेकवेळा मुलांच्या शुजमधून ते आरपार होत असत.  त्यामुळे मुलांना दुखापत होऊ नये म्हणून


आम्ही आया हे खिळे गोळा करायच्या कामाला लागायचो. याशिवाय लग्नात राहिलेलं जेवणही ब-याचवेळा तिथेच टाकून देण्यात येत असे.  हे अन्न खाण्यासाठी कुत्र्यांची गर्दी व्हायची...शिवाय काही दिवसानंतर त्याच्या दुर्गंधीचा सामनाही करावा लागायचा.  असाच वाईट अनुभव लांब उडीच्या पिटबाबतही होता.  लांब उडी मारण्यासाठी स्वतंत्र जागा बनवण्यात आली होती.  समुद्राची वाळू टाकून ही जागा लांब उडी मारण्याच्या सरावासाठी वापरली जायची.  मात्र त्याआधीही ती जागा काळजीपूर्वक साफ करावी लागायची.  अनेकवेळा या जागी रात्री अपरात्री दारुच्या पार्ट्या व्हायच्या.  दारु पिऊन झाल्यावर रिकाम्या बाटल्या याच जागी फोडणारे महाभाग आपण कुठे काय करतो हे विसरुन जायचे.  पण त्यांच्या या कृतीमुळे अनेकवेळा खेळाडूंना लांब उडी मारतांना काचा लागल्याच्या घटना व्हायच्या.  अनेकवेळा स्पर्धैसाठी बाहेर गेल्यावरही बरेच अनुभव यायचे.  यात मुख्य म्हणजे स्वच्छतागृहांचा अभाव.  काही ठिकाणी स्वच्छता गृहांची अवस्था दयनीय असायची.  पाणी, दरवाजे गायब...मग सकाळी त्या मैदानात गेल्यावर पहिल्यांदा स्वच्छतागृहांचा वापर करुन घ्यायचा....आणि नंतर थेट मैदान सोडतांना...अशावेळी मासिकपाळी आली असेल विचारु नये अशी कुचंबणा व्हायची...

एखादा खेळाडू घडवायचा असेल तर सर्वात मोठी असते ती समाजाची मानसिकता.  एकदा का कुठला खेळ खेळायला सुरुवात झाली की त्यात त्या मुलाला लगेच पारितोषिक मिळालेच पाहिजे ही खुडी मानसिकता.  कुठल्याही खेळात लगेच यश मिळत नाही.  त्यासाठी मेहनत, त्या खेळातील बारकावे महत्त्वाचे असतात...हे सर्व काही दिवसांचं, आठवड्यांचं किंवा महिन्याचंही गणित नसतं.  त्यासाठी वर्षनवर्ष मेहनत घ्यावी लागते.  ही मेहनत घेणारे अनेक खेळाडू आपल्या आसपास असतात....त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं असतं.  कुठल्याही स्पर्धेत भाग घेतल्यावर यश मिळालं नाही तर त्याची अवहेलना करण्यापेक्षा कसा खेळलास....तुझं बेस्ट दिलस का...काय कमी वाटली...काय सुधारणा झाली...नवीन काय शिकता आलं...याची चौकशी केली पाहिजे...त्यातून या खेळाडूला प्रेरणा मिळेल. 

मैदानावर जाणं आणि खेळणं हे प्रत्येक खेळाडूसाठी नित्यपुजेसारखं असतं.  मैदानावर पहिलं पाऊल टाकल्यावर त्याला वाकून नमस्कार करणारे कितीतरी खेळाडू दिसतात...ही तिथली संस्कृतीच आहे.  एकदा त्या ट्रॅकवर प्रवेश केल्यावर त्याला नमस्कार करायचा आणि तिथून बाहेर पडतांनाही तसाच नमस्कार करायचा...हे करतांना प्रत्येक खेळाडूच्या मनात आपल्या या मैदानाप्रती आदराची भावना असते.  इथे सर्व समान असतात...कुणी आपल्या राज्याचं किंवा देशाचं नाव असलेला ट्रॅकसूट घालून इथे आलं तर अन्य खेळाडूंच्या नजरेत तो एखाद्या हिरोपेक्षाही मोठा ठरतो.   त्याचा खेळ सरस असतोच...पण त्यानं घातलेला ट्रॅकसूट आपल्यालाही मिळवायचाच ही जिद्द ठेवून मग त्यांचा सराव सुरु होतो.  इथे स्पर्धा असते...पण ती खेळीमेळीची...खेळाडूंची फारशी अपेक्षा नसतेच...आपल्या खेळासाठी योग्य मैदान मिळालं तर त्यांना कोण आनंद मिळतो.  हा आनंद प्रत्येक खेळाडूला मिळाला तर  जागतिक स्तरावरील कुठल्याही स्पर्धेत यश संपादन करतील


अशी क्षमता आपल्या खेळाडूंमध्ये नक्कीच आहे. 

हे सर्व असले तरी अडतं कुठं हा प्रश्न आहे.  मुळात खेळासंदर्भातील सर्व संघटना आणि त्याचे कर्तेधर्ते खेळाप्रती किती जागरुक असतात...आणि आहेत...हा प्रश्नही विचारला पाहिजे. ट्रॅकवर गाड्या फिरवण्याची मानसिकता असलेले राजकारणी आणि त्यांची हुकमत जेव्हा या क्रीडा संघटनातून कमी होईल तेव्हाच खेळ संस्कृतीला पदकांची किनार मिळेल.   क्रीडा संघटनांचे अध्यक्षपद आणि इतर कार्यकारिणीमध्ये कुठलंही पद भूषवण्यासाठी किमान राज्यस्तरावरील स्पर्धेतील यशाचा मापदंड ठेवला तरीही सुधारणा होईल.  मध्यंतरी नेमबाज सुमा शिरुर बरोबर भेट झाली होती.  त्यांनी खेळ ही संस्कृती...आणि त्याबद्दलची मानसिकता याचे खूप उत्तम विश्लेषण केले होते.   गेल्या काही वर्षात खेळाडू म्हणून मान मिळतोय.  काही समस्या असल्यास त्या सोडवल्या जातात.  आवश्यक साधनं मिळत असल्याचा त्यांनी उल्लेख केला. 

आज ऑलिम्पिकच्या निमित्तानं खेळाबाबत सकारात्मक चर्चा होत आहेत, ही जमेची बाब आहे.  हीच सकारात्मकता कायम राहीली तर भविष्यात होणा-या कुठल्याही जागतिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम राहील हे नक्की...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. सई लेख मार्गदर्शक तर आहेच . आलेले अनुभव पण पोटतिडीकेने लिहीले आहेत. स्पर्धकाना जेवण चांगले द्यायलाच हव ? नेहमीच्या सरावाच्या मैदानावर सापडणारे खिळे ;काचा . आपल्याला सामाजिक जाणीव नाही हेच खरे !

    ReplyDelete

Post a Comment