मी....तो....आणि किचनमधली लूडबूड
येस...झाली...वास मस्त आहे...लूक छान झालाय...टेस्ट बघू का...ओके...थांब तू....प्लेटमध्ये ठेऊन फोटो काढूया...पहिल्यांदाच काहीतरी केल्यावर जी उत्सुकता होती तिच त्याच्या चेह-यावर होती...माझा लेक...पहिल्यांदा बनवलेली भाजी आणि सगळी उत्सुकता...परीक्षा संपली. निकाल लागला. आता घरात अँडमिशन प्रोसेस...फॉर्म भरणं...आणि आपल्या कटऑफमध्ये येणा-या कॉलेजचे व्हिडीओ बघायचे...त्यासोबत ऑनलाईन चेस...याशिवाय काहीही काम नसलेला लेक आता किचनमध्ये घुसलाय. बाहेर रहातांना स्वतःला कसे तयार करायचे....काय काय आले पाहिजे, अशा आशयाचे व्हिडीओ बघायला त्यानं सुरुवात केलीय...त्यात कुठेतरी उल्लेख आला, हॉस्टेलवर राहिल्यावर सर्वात मीस होतं ते म्हणजे आपल्या घरचं जेवण...आईच्या हातची भाजी-चपाती...त्यामुळे घरी वेळ असतांना थोडी जेवण करायची प्रॅक्टीस करा...पुढे हॉस्टेल कॅन्टीनमध्ये मग कधीतरी मस्का लावून आपल्या आवडीची आणि आईच्या पद्धतीचे पदार्थ करता येतात...ही टीप ऐकल्यापासून त्याची किचनची लूडबूड वाढलीय. कुणी मदतीसाठी आलं म्हणून मला आनंद झाला. पहिले दोन दिवस वरकामाला त्याच्याकडून मदत घेतली...खरचं मदत करायची आहे का, की टाईमपास म्हणून करतोय हे चेक केलं...पण या दोन दिवसात भाज्या कापायला मदत झाली...भांडी घासायलाही लागला...मग दोन दिवसानंतर त्याला राष्ट्रीय भाजी शिकवली....आपली बटाट्याची भाजी...या भाजीपेक्षा करायला सोप्पी अशी भाजी नाही...आणि चवीलाही या भाजीपेक्षा चविष्ट अशी दुसरी कुठलीच भाजी नाही...करायला सोप्पी आणि केल्यावर संपायलाही....त्यामुळे पहिला धडा बटाट्याच्या भाजीपासून सुरु झाला...आणि तो यशस्वीही झाला...
माझं लग्न झालं तेव्हाची गोष्ट...वीस वर्ष होऊन गेली. लग्न झाल्यावर स्वप्नरंजनासारखे वाटणारे दिवस संपून संसार म्हणजे काय याची जाणीव होऊ लागली होती. सकाळी धक्के खात ट्रेन पकडायची...ऑफीसचं काम...संध्याकाळ होत आली की घड्याळ्याकडे एक डोळा ठेऊन होत असलेली धावपळ...पुन्हा घराकडे परतण्यासाठी पकडलेल्या गर्दीच्या ट्रेन...तसेच धक्के...शनिवार रविवारच्या सुट्ट्यांमध्ये इतर दिवसांसाठी सुकर होईल अशी भाजी, खाऊ, वाटण, अशी तयारी...राहीलाच वेळ तर साफसफाई आदी...या सर्वांमध्ये नव-याची मदत आणि पाठिंबा सोबत होता...मात्र एकदा गम्मतशीर अनुभव आला...जेवण आटोपलं होतं...मी भांडी घासायला किचनमध्ये गेले...नवरा जेवणाचं टेबल आवरत होता...तितक्यात एक परिचित महिला आल्या...नव-याला टेबलावरची आवराआवर करतांना पाहून आल्याआल्या त्या भडकल्या...हे काय...काय करताय तुम्ही...बायको कुठाय...म्हणून त्यांचा पारा चढला...त्यांचा चढलेला आवाज पाहून मी हातातली भांडी तशीच ठेऊन बाहेर आले...त्यांना नमस्कार केला...काय झालं म्हणून विचारलं...तेव्हा त्यांनी माझी खड्या आवाजात शाळाच घेतली...आमच्यात ही अशी कामं पुरुष करत नाहीत...तू बरं नव-याला कामाला लावलं आहेस...नव-याचं काम आहे का हे...तुला काही शिस्त आहे की नाही...मला पहिल्यांदा त्या काय बोलत आहेत हे कळलंच नाही...असली कामं म्हणजे कुठली कामं हे समजायलाच मला खूप उशीर लागला. जेवण झाल्यावर टेबलवरची आवराआवर तो नेहमी करायचा...फारकाय जेवण करतांना सुरुवातीला माझी खूप धावपळ व्हायची...तेव्हाही त्याची बरीच मदत झाली...ही मदत केली तर कुठली परंपरा तुटत असेल असं चूकूनही मनात आलं नाही. दोघांचा संसार...दोघंही नोकरी करणारे...पगारात असमानता असेल...पण दोघंही तेवढीच मेहनत घेत होतो...धावपळ करत होतो...अशात दोघांनीही घरातली कामं शेअर करणं काहीच चुकीचं नव्हतं....अर्थात हे माझ्या मतानुसार...
त्यावेळी आलेल्या त्या बाई माझ्यावर भयंकर भडकल्या होत्या. नवरा शांत
बसला...पण मी त्यात काय झालं म्हणून त्यांना विचारलं...हे अजून चुकीचं ठरलं...काय झालं...म्हणत पुन्हा त्यांचे बोल सुरु झाले...मी हताश होऊन त्यांच्याकडे पहात होते...त्यातच तोंडातून बाहेर पडलं की, बाहेर तर शेफच असतात...पुरुषच जेवण बनवतात...ते चालतं ना...आणि आपल्याच घरात बायकोला थोडी मदत केली तर काय होतं...या माझ्या स्पष्टीकरणावर तर या सर्वांत तेल टाकल्यासारखं झालं...मला त्या बाईंनी झापझाप झापलं...बाजुला नवराही मोठे डोळे करुन मला गप्प बस अशी खूण करीत होता...पण त्याचे डोळे बघायच्या आत मी बोलून गेले होते...आणि त्यावरची बोलणी खात होते...या सर्व उच्च शिकवणीचा कोटा संपल्यावर त्या बाई निघाल्या...जातांनाही मला त्यांनी सुनवलंच..आणि माझ्यावर खूप मोठे संस्कार केलेत अशा थाटात त्या घराबाहेर गेल्या...दरवाजा लावल्यावर मी पहिल्यांदा नव-यावर ओरडले...काय हे...काय त्यांचे विचार...तू त्यांना थांबलस का नाही...मध्ये बोलला का नाहीस....तो कमालीचा शांत होता...माझ्या हातात पाण्याचा ग्लास दिला...आणि म्हणाला तू शांत हो...पाणी पी, मी माझं काम करतो...त्यांनी टेबल आवरण्याचं काम पूर्ण केलं...माझा बिघडलेला मूड बघून कॉफी केली...एक मग माझ्या हातात देऊन म्हणाला प्रत्येकाची मत सारखी नसतात...आणि असावी हा हट्टही नसावा...मान्य त्या बाई तुला बोलल्या तेव्हा मी मध्ये बोललो नाही....पण त्यांचे विचार बघ, जर बोललो असतो, तर त्या आणखी भडकल्या असत्या, आणि शब्दाला शब्द लागून अजून भडका झाला असता...त्यापेक्षा त्या काय बोलल्या हे ऐकून घेतलं आणि दुस-या कानानं ते डिलीटही केलं...आणि मदतीचं म्हणशील तर ते काही मी तुझ्यावर उपकार करत नाही...हे घर आपलं आहे...आणि बायकोला मदत केल्यानं काहीही कमी
होत नाही...कोणाचंही कमी होत नाही...आणि या काकूंच्या विचारांचं म्हटलं तर त्यांच्यारख्यांची अशी मतं बदलण्यासाठी काही वर्ष तरी जावी लागतील...
माझा लेक जेव्हा मला स्वयंपाक शिकायचाय म्हणून हट्ट करु लागला तेव्हा
ही घटना आम्हा दोघांनाही आठवली...हसू फुटलं...तेव्हा लेकानं कारण विचारलं...आम्ही
ही किस्सा त्याला सांगितला...त्यावर मुलांनी जेवण केलं तर काही बिघडतं का...म्हणत
त्यांनीच आम्हाला उलटा प्रश्न केला...त्याचा हा प्रश्न आणि पहिल्या दोन दिवसांची
छोटी परीक्षा झाल्यावर खरी परीक्षा सुरु झाली ती बटाट्याच्या भाजीपासून...फोडणी
देण्यापासून ते कांदा, मिरची, बटाटे, कोथिंबीर कापेपर्यंत सर्व तयारी त्यांनी
केली. थोड्या लांबून पण फोडणीही त्यांनी
घातली. पिवळी धम्मक बटाट्याची भाजी
परतांना येणारा वास त्या भाजीची पावती देत होता...तो हे सर्व करत असतांना मी
एकीकडे चपातीचं पिठ मळलं...त्याला गोळे करुन दिले...थोड्या सूचना आणि मोजक्या
प्रॅक्टीकलनं लेकांनं चपात्याही तयार केल्या....अद्याप तव्याची भीती
होती...त्यामुळे शेकायला मी मदत केली...ताटात वाढलेली ही भाजी आणि चपाती खातांना
आम्हा दोघांच्याही चेह-यावर अनोखं समाधान होतं...
नशीबानं लेकाचं किचनचं वेड थांबलं नाही...तो अधिक उत्सुक झालाय...झटपट
आणि आवडणा-या रेसिपींचा शोध सुरु आहे. त्यात केकचा नंबर लागला...अगदी मोजमाप न घेता वीपक्रीमसह परफेक्ट कसा होईल हे त्याला थोडक्यात सांगितलं...मला थोडं लांब थांबवून सर्व बेसिक कामं त्यांनी केली...क्रीमही तयार केलं...केक तयार झाला...नंतर या यादीत पनीर बुर्जी आणि पावभाजीचा नंबरही लागला...आणि लागणारही आहे...सध्या तो काय बनवतोय याचं कौतुक आहेच...पण सोबत आमच्या पुढची पिढी थोडे वेगळे विचार घेऊन तयार होतेय याचंही वेगळं समाधान आहे....बाकी जेवण करायला प्रत्येक घरातील स्त्री ही सक्षम असते...पण ते तिचच काम...ही मानसिकता मात्र नसावी...ती बदलण गरजेचं आहे....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
अगदी बरोबर.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूपच छान लेख.घर दोघांचं असतं एकानी पसरलं की दुसऱ्याने आवरायचं असतं वगैरे आता काल सुसंगत नक्कीच नाही. आता दोघांनीही आवरायचं... आणि ही शिकवण लहान असल्या पासुनच मुली आणि मुलग्यांना ही देणं हे आधुनिक पालकांचं कर्तव्य आहे.
ReplyDeleteएकदम बरोबर....आता मुलीही मुलांसारख्याच शिकतात...आणि ऑफीसमध्येही तेवढीच जबाबदारी पार पाडतात...त्यामुळे मुलांची कामं आणि मुलींची कामं या मानसिकतेतून बाहेर पडायला हवं....त्याची पहिली जबाबदारी पालकांवर नक्कीच आहे.
Deleteधन्यवाद प्रिया...
ReplyDeleteखूप छान विचा र
ReplyDelete