कबूतर जा जा जा.....
घे एकदाची ही जाळी...आणि आता हवं काय ते कर...खिडक्यांसाठी ज्या जाळ्या लावतात त्या जाळ्यांची मोठी गुंडाळी माझ्या समोर उभी करुनत नवरा आत गेला...जवळपास माझ्याच उंचीची ती काळ्या रंगाची जाळीची गुंडाळी मी कशीबशी पकडली...गेल्या आठवड्यात कबुतरांनी अगदी नको केलं...गेली दहा वर्ष आम्ही रहात असलेल्या घराच्या खिडक्यांना मी खूप आग्रह झाला तरी या काळ्या जाळ्यांपासून वेगळं ठेवलं होतं...पण गेल्या आठ दिवसांत कबुतरांनी कोरफड, गुळवेल, कोथिंबीर, पुदीना या सर्वांची वाट लावल्यावर मी सुद्धा आता खिडक्यांना जाळ्या लावूया या मताची झाले...गेल्या दहा वर्षापासून नवरा या गोष्टीसाठी आग्रह करत आहे. पण मी त्याला विरोध करत होते...जाळ्या लावल्या तर सर्व बंदिस्त असल्यासारखे होईल, यावर मी अडून राहिले...शेवटी नव-यानं जाळ्यांचा हट्ट सोडला...गेल्या दोन वर्षात खिडक्यांमध्ये आणि ड्राय बाल्कनीमध्ये ब-यापैकी हिरवळ मी फुलवली आहे. कोरफड, पुदिना आणि कोथिंबीर हे त्यातले प्रमुख...पण गेल्या आठवड्यात आम्ही काही तासांसाठी घराबाहेर असल्याचा फायदा घेत कबुतरांनी पहिली कोरफड तोडली...त्यानंतर ड्राय बाल्कनीमध्ये असलेल्या पुदिना आणि कोथिंबीरीच्या कुडींवरही बसून त्यांची वाट लावली....आता मात्र माझी सटकली...आता जाळया लावायच्याच...नव-याला सांगितलं...त्यांनी दहा वेळा विचारलं...नक्की का...एकदा जाळ्या घरात आणल्या की, नाही म्हटलंस तर चालणार नाही...मी दहावेळाही हो म्हटल्यावर त्यांनी या जाळ्या आणल्या...आता या जाळीदार खिडक्या कशा दिसतील म्हणून मी विचार करत राहिले...
दहावर्षापूर्वी जेव्हा आम्ही आत्ताच्या रहात्या घरी आलो तेव्हा सोबत जुन्या घराच्या अनेक आठवणी होत्या. त्यातली प्रमुख म्हणजे घरी रोज सकाळी सहा वाजता येणारा पोपटांचा थवा. जुन्या घरात मोठी बाल्कनी होती. आसपास मोकळी जागा. त्यामुळे या बाल्कनीमध्ये सकाळी पोपट येत असत. त्यांचा वावर पाहून मी दाणे टाकायला सुरुवात केली. पाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे हळूहळू पोपटांची भीड चेपून पाच सहा संख्येत येणारे पोपट मोठ्या संख्येनं येऊ लागले. नंतर संध्याकाळीही घराकडे जातांना डोकावून जाऊ लागले. दुपारच्या वेळी साळुक्यांच्या सोबतीनं खारकुंड्याही येत असत. त्यामुळे आमच्या घरात बरीच चहलपहल असायची. कधी बाहेर जायचे असेल तर शेजारच्यांना आठवणीनं दाणे टाकायला सांगायचो....एवढी त्या पोपटांची सवय झाली होती. नवीन घर घेतल्यावर या पोपटांपासून होणारा दुरावा जास्त जाणवत होता. पण नवीन घराला चार खिडक्या...कुठल्या ना कुठल्या खिडकीत पक्षी येतील या आशेवर मी होते. पण महिना गेला तरी पक्षांची चाहूल नाही. कबूतर मात्र नको तेवढे यायला लागले. जुन्या घरापासून खिडक्या सताड उघड्या ठेवण्याची सवय होती. तिच सवय नवीन घरातही चालू राहीली. पण काही दिवसातच कबुतरांना या खिडक्या आपल्यासाठीच उघड्या आहेत असं वाटायला लागलं. आणि त्यांनी भिडभाड न ठेवता थेट घरात यायला सुरुवात केली. त्यांचे गुटरगू आणि त्यांनी केलेली घाण यामुळे खिडक्यांच्या काचा कायम बंद ठेवा हा धडा मिळाला. नव्या घरात हौशेनं कुंड्या घेतल्या....गुलाब, जास्वंदीची रोपं लावली. पण हाय रे
देवा...या कुंड्या आपल्यासाठी असल्यासारख्या त्या रोपांना बाजुला सारत कबुतरांनी आपला संसार तिथे थाटला. कुठूनतरी आणलेल्या काड्या-कुड्या त्यावर असेलेली अंडी पाहून आम्हीही डोक्यावर हात मारला. पहिल्यांदा अंडी पाहिल्यावर ती टाकून देण्याचं धाडस झालं नाही. यथावकाश ती अंडी फोडून पिल्लू कबूतर बाहेर आलं...आणि ते कधी उडतंय आणि आमची कुंडी कधी खाली होतेय याची वाट आम्ही पहात राहिलो...ते पिल्लू उडाल्यावर लगेच ती जागा साफ करायला घेतली....एक डस्टबीन भरेल एवढ्या काड्या, वायरी, पिसं असं काय काय निघालं...शिवाय मुंग्यांचा त्रास झाला तो वेगळाच.
त्यावेळीच सर्व खिडक्यांना जाळ्या लावून घेऊया म्हणून नवरा मागे लागला. पण जाळ्या लावल्या तर कुठलेच पक्षी येणार नाहीत. निदान चिमण्या तर येऊदे...म्हणून मी हट्ट पकडला. कारण मधल्या काळात मी प्रत्येक खिडकीवर चिमण्या दाणे खातील अशी व्यवस्था केली होती. आणि त्यावर काही चिमण्या यायलाही सुरुवात झाली. पोपट नाही पण चिमण्या तर आहेत म्हणून मी समाधान मानून घेतलं होतं. सर्व खिडक्यांना जाळ्या लावल्या तर या चिमण्याही येणार नाहीत म्हणून मी जाळ्या न लावण्यासाठी आग्रही होते. पण कबुतरांनी त्याचा चांगलाच फायदा घेतला. काही दिवस फिरायला गेल्यावर समस्त खिडक्या आणि त्यातील कुंड्या, एसीचा बॉक्स,
ड्राय बाल्कनी हे सर्व आपलंच असल्यासारखं कबुतरांनी वापरलं. घरी आल्यावर खिडक्या उघडल्यावर कबुतरांच्या पिल्लावळीनं आमचं स्वागत केलं. नव-यानं डोक्याला हात मारून घेतला आणि हे सर्व तुझ्यामुळं झालं, त्यामुळेच तूच साफ कर म्हणून मला सांगितलं...चूक माझीच होती...त्यामुळे घरी आल्या आल्या कबूतरांनी केलेली घाण साफ करण्यावाचून पर्याय नव्हता. पुढे बेडरुमच्या एका खिडकीत कायम स्वरुपी कबुतरांनी आपलं बस्तान मांडलं. त्याचा आवाज, त्यांनी केलेली घाण, या सर्वांमुळे येणा-या लाल मुंग्या याला मी सुद्धा वैतागले. पर्यायानं ड्राय बाल्कनीचा अर्ध्या भागाला आणि एका खिडकीला जाळी बसली. कोरोना काळात घरातलं बागकाम बहरलं. ड्राय बाल्कनीतल्या जागेचा फायदा झाला. घरातच पालक, कोथिंबीर, पुदिना व्हायला लागला. कारल्याच्या वेली झाल्या. त्याच्या पिवळ्या फुलांसाठी चिमण्या यायला लागल्या. वालपावट्याच्या पांढ-या फुलांवर फुलपाखरं दिसायलं लागली. टोमॅटो, मिरच्याही झाल्या. त्याचं कौतुक होत होतं...आणि एका बाजुला कोरफड छान झाली. त्याच्याच बाजुला गुळवेल भिंतीवर चढली...हे सर्व सांभाळण्यासाठी कोणीकोणी सांगितलेले कबूतर पळवण्याचे उपायही चालू होते. कोणी सिडी लावायला सांगितल्या...त्या चमकल्या की कबूतरं येत नाहीत म्हणे...मी सर्व जुन्या, खराब झालेल्या सिडी दोरीला अडकवून खिडक्यांना बांधल्या...दोन दिवस त्याचा उपयोग झाला पण पुन्हा कबूतरांचा वावर दिसू लागला. त्यामुळे दर दोन तासांनी खिडक्यांमध्ये डोकावून कबूतर दिसले तर त्याला
हाकलवून लावणे हाच मार्ग फायदेशीर ठरला. पण अलिकडे थोडं दुर्लक्ष झालं. लेकाची तयारी करण्यासाठी घराबाहेर फे-या वाढल्या आणि या कबूतरांना ते कसं कळलं कोण जाणे...गेल्या आठवड्यात छान झालेली कोरफड अक्षरशः कुरतडून काढली. त्याच्याच बाजुला असलेल्या गुळवेलीच्या पानांनाही टोचून खराब केलं. त्याच्या दुस-याच दिवशी ड्राय बाल्कनीत टबमध्ये झालेल्या कोथिंबीर आणि पुदिन्यावरच आपलं बि-हाड थाटलं. बाल्कनीचा दरवाजा उघडताच कबूतरांनी पळ काढला पण माना मोडलेल्या पुदिन्यांला पाहून मन खट्टू झालं. आत्ता बस्स झालं जाळी लावलीच पाहिजे म्हणत मी नव-याला माझा निर्णय सांगितला. मी निर्णय बदलण्याचा आधी तो या जाळ्या घेऊन आलाही. या जाळ्यांकडे बघत मला लहानपणी वाचलेली ती गोष्ट आठवली...एकीचे बळ...शिका-यांनी लावलेली जाळी घेऊन ऊडालेली कबुतरं....या जाळीच्या बाबतीत असं होऊ नये म्हणजे झालं, म्हणत मी जाळी लावायला सुरुवात केली.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Good pleasant write-up Sai
ReplyDeleteGood pleasant write - up Sai.
ReplyDeleteCA Jayshree Karve
धन्यवाद जयश्री मॅडम...
DeleteKhup chhan lekh
ReplyDeleteNice 👍
ReplyDeleteKhup chhan lekh sai
ReplyDeleteकबुतरांचा त्रास सर्वत्रच आहे...त्यात अनेक भाविक लोक दुकानातून अर्धा किलोची पिशवी भरुन चक्क रस्त्यावर व सोसातटीच्या आवारात सढळपणे सोडतात याला कांही तरी पर्याय काढावयासच पाहिजे...
ReplyDeleteआपला लेख छान महत्वपूर्ण आहे...धन्यवाद
अनिल नाईक, डोंबिवली