थंड काश्मिरचं धगधगतं मन....
पहिल्यांदाच असं झालं असेल...पिक्चर संपल्यावर बहुतेक सर्वच प्रेक्षक आपापल्या जागेवर बसून होते...माझ्यासह अनेक जण हादरले होते. एवढे दिवस जे ऐकले होते...वाचले होते...ते पडद्यावर बघितले होते...डोळ्यातले पाणी पुसत सावकाश एक-एक जण उठले...कुठलीही घाई नाही...दबक्या आवाजात चर्चा...जड मनानं थेअटरच्या बाहेर आलो...आणि घराच्या वाटेला लागलो...आम्ही दोघेही अबोल....आपल्याच लोकांच्या बाबतीत किती टोकाचा अत्याचार झालेला...आत्तापर्यंत फक्त ऐकलेला....आज एका चित्रपटानं तो समोर उभा केला....काश्मिर फाईल चित्रपट बघून मी अजून हादरले, कारण होतं माझी एक मैत्रिण...नाशिकला शिक्षणासाठी गेल्यावर तिथे हॉस्टेलमध्ये रहात होते. तिथेच काश्मिरची एक मुलगी होती...अनिता...उंच, गोरी पान, मजबूत अंगाची अनिता एरवी मजेत असायची...गप्पा मारायची...गाणी गायची....पण एकदा अचानक टीव्ही बघतांना ती ओरडायला लागली होती...हमारा घर...हमारा घर...बंद करो टिव्ही...तिचा आरडाओरडा बघून आम्ही वैतागून टिव्ही बंद केला होता...एकतर हॉस्टेलवर ठराविक वेळेत टिव्ही बघता यायचा...बरं तोही खूप खटपट करुन चालू व्हायचा...त्यामुळे तेव्हा अनिताचा त्रागा आम्हाला त्रासदायक वाटला होता...पण नंतर हिच अनिता उलगडत गेली...काश्मिरमधलं हवेलीसारखं घर सोडून दिल्लीमध्ये कुठेतरी तिचं कुटुंब निर्वासीतांसारखं रहात होतं...आईवडीलांनी काश्मिरपासून जेवढी दूर जाशील तेवढी सुरक्षित रहाशील म्हणून नाशिकमध्ये शिक्षणासाठी पाठवलं होतं...पण तिच्या मनात अजूनही काश्मिरचं होतं...
हॉस्टेल लाईफच्या अनेक आठवणी आहेत. त्यातलीच ही अनिता एक. तेव्हा ती मोठं कोडचं वाटायचं. जणू एका नाण्याच्या दोन बाजू तसा तिचा स्वभाव होता. एका क्षणी आनंदी तर दुस-या क्षणी घराच्या आठवणीनं कुढत बसायची. कधी कधी हाताच्या बुक्की आपल्या छातीवर मारुन घ्यायची...तुमको क्या पता हमने क्या खोया है...अब तो तबेले में रहते है...अरे हम तो हवेलीमें रहते थे....वो अब किसी और के पास है...असं अनेकवेळा बोलायची...नंतर नंतर ही अनिता चांगली मैत्रिण झाली. तेव्हा कळलं, तिचं काश्मिरमध्ये खूप मोठं घर होतं. तिच्या भाषेत मोठी हवेली. मोठी सफरचंदाची बाग. या दोघी बहिणी होत्या. संपन्न कुटुंब. पण अचानक वातावरण बदललं. त्यांच्या कुटुंबाला काश्मिर सोडावं लागलं. दिल्लीमध्ये आल्यावर एका छोट्याश्या घरात रहावं लागलं. अनिताच्या भाषेत तबेला...काश्मिरच्या थंड वातावरणाची सवय असलेल्या त्यांच्या कुटुंबाला दिल्लीच्या गरमीचा त्रास व्हायचा...पण त्याही पेक्षा त्रास मानसिक होता...तो आपलं घर सोडून आल्याचा...
अनिताचे वडील वर्षातून एकदा आपल्या घरी, काश्मिरला जायचे...सफरचंदाची बाग कोणाला तरी दिलेली असायची...तो जे पैसे हातावर देईल तेवढे पैसे घेऊन यायचे....पण वडील तिथे जाणार म्हटल्यावर आई काळजीनं अंथरुण पकडायची...घरात रडारड...काळजी...आणि वडील परत आले की सर्वांचा पहिला प्रश्न असायचा....हमारा घर देखा...कैसा है...अनितानं हे मला अनेकवेळा सांगितलं होतं...तेव्हा काश्मिर आणि तिथल्या परिस्थितीची माहिती फक्त पेपरमधून मिळाली होती. त्या वाचिक ज्ञानाच्या आधारे आम्ही मैत्रिणी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करायचो. सगळं निट होईल, अशी आशा तिला दाखवायचो...पण नंतर नंतर आम्हाला कळायचे...ती तसंच काहीतरी बोलत रहायची....मग त्या क्षणाला तिला एकटं सोडून द्यायचो...त्या क्षणी तिचं दुःख काय होतं ते कळलं नाही. आता एवढ्या वर्षानंतर कश्मिर फाईल पाहिल्यावर
अनिताची आठवण पहिली झाली. आपल्या छातीवर हाताच्या मुठी मारुन रडणारी अनिता एका क्षणात समोर आली...आणि तिच्या मनातलं दुःखही.
माझ्या मैत्रिणीच्या अंगाचा होणारा दाह हा फक्त अंगाचा नव्हता...तो
मनाचा होता...मनात रुतलेल्या एका ओल्या जखमेचा होता...आपलं एका राजवाड्यासारखं
घर...वाडवडीलांपासून आलेल्या मोठ्या सफरचंदांच्या बागा...आणखी कितीतरी वस्तू,
संपत्ती यावर पाणी सोडून ती आणि तिचं कुटुंब दिल्लीत कुठेतरी रहात होतं...तो फ्लॅट
असेलही....पण तिच्या लेखी तो तबेलाच का होता याची जाणीव झाली.
कधी कधी वाटतं आपण काय शिकलो की आपल्याला काय शिकवलं गेलं...येवढ्या
मोठ्या अमानवीय गुन्ह्याचा साधा उल्लेखही कुठल्या पाठ्यपुस्तकात नाही. हिटलरनं काय केलं...मुसोलीननं काय केलं...हे
शिकवलं गेलं...पण आपल्या देशातील नागरिकांनी काय भोगलं हे माहीत नाही...नेहमी
काश्मिरचं चित्र दाखवलं गेलं त्यामागचं दुःख,
वेदना मात्र दिसली नाही.
मी सहसा गंभीर विषयांचे चित्रपट टाळतेच....आपल्या खिशातले पैसे भरुन
उगाचच दुःख पदरात का घ्या....पण काश्मिर फाईल्सनं आपल्याकडे खेचून घेतलं....आपण
आपल्याच देशातील नागरिकांनी भोगलेल्या दुःखापासून, वेदनेपासून किती दूर राहू
शकतो....तिकडे युक्रेनवर मिसाईल पडल्यावर तेथील नागरिंकांचा आक्रोश दिसला...एकट्या
चालणा-या लहानग्याचे रडणे ऐकू आले....पण शरीरावर आणि मनावर असंख्य वेदना झेलणा-या
आमच्याच देशातल्या बहिणींची वेदना आपल्याला कधी कळली का नाही...याचीच बोच होती...चित्रपट
बघितला...आणि भरपूर रडून घेतलं...बरं नेहमी चित्रपट बघायला जाणं ही चंगळ
असते...मधल्या इंटरव्हलला खाऊ काय, कॉफी काय...पण यावेळी तसंही नाही....पोटात,
मनात, ह्दयात फक्त वेदनाच होती....त्याच्यापुढे ही सगळी चंगळ वाया वाटत
होती....चित्रपट संपल्यावरही एखाद्या हॉटेलमध्ये ताव मारायला न जाता थेट घर
गाठले...
आज ती अनिता नावाची मैत्रिण संपर्कात नाही. कुठे आहे याचीही माहिती नाही...जवळपास पंचवीस वर्ष झाली असतील तिला भेटल्याला....पण आज ती जिथे असेल तिथून तिनंही हा चित्रपट नक्की बघितला असेल...आपल्या हद्याची वेदना कोणीतरी आपल्याआधी व्यक्त केली, याचे तिला समाधान असेल नक्की....
पुस्तकात जे शिकलो ते किती तकलादू होतं हे गेल्या दोन वर्षात स्पष्ट झालं. कोरोना आल्यावर WHO म्हणजे काय हे समजलं. शाळेत असतांना रेटून या WHO ची व्याख्या पाठ केलेली...फक्त मार्कांसाठी...पण जेव्हा कोरोनानं अख्या जगाला व्यापलं तेव्हा WHO ची भूमिका काय होती...एवढी मोठी आरोग्य संघटना...पण एखाद्या साथीला अटोक्यात आणण्यासाठी काळजी घ्या, या सल्ल्याशिवाय त्यांच्याकडे काहीही उपाय नव्हते. फारकाय ज्या चीनमधून कोरोनाचा उगम झाला त्यांना साधा जाब विचारायची तसदीही या जागतिक संघटनेने घेतली नाही. तिकडे ते रशिया आणि युक्रेन युद्ध...अवघं युक्रेन बेचिराख झालं. तरी त्या NATO नावाच्या संघटनेची काय भूमिका असते हे समजलं नाही. शाळेत असतांना NATO म्हणजे काय, त्यांची कार्य, भूमिका...हे सर्व पाठ केलं...कशासाठी फक्त गुणांसाठी...पण यासर्वात गुणात्मकता कुठे हरवली गेली. काश्मिर फाईल पाहिल्यावर पुन्हा जाणवलं...पुन्हा नव्यानं काही घटना पहायला हव्यात...त्यांच्यावर टाकलेला पडदा बाजूला करुन त्यातली सत्यता बघण्याचा प्रयत्न केला तरी खूप झालं....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि नाटो यांच्या बद्दल खरच आता संभ्रम निर्माण झाला आहे
ReplyDeleteनक्कीच....एवढ्या मान्यवर संघटना....मात्र ऐन मोक्यावर त्यांची भूमिका शून्य
DeleteWho & NATO या लेखाच्या निमित्ताने नवीन व्याख्या माहिती झाली खरंच आपले दुर्दैवम्हणजे काय
ReplyDeleteहो दुर्दैवानं हे खरं आहे....
Deleteतुमच्या लेखातून भावना व्यक्त झाल्या आहेत
ReplyDelete