सोना कितना सोना है....

 

  सोना कितना सोना है....


एखादा दिवस असा येतो की आपलं नक्की मत काय असावं....यातच गडबड होऊन जाते...गेल्या आठवड्यात असाच एक अनुभव मला आला.  गोष्ट सोन्याबाबतची....सोनं...गोल्ड...अगदी ग्रॅमभर सोनं जरी घेतलं तरी अंगावर मणभर मास चढल्याचा भार होतो...सोन असतच तसं...त्यामुळेच आपल्या भारतीयांमध्ये या सोन्याची हौस खूप आहे.  असाच सोन्याबाबतच अनुभव मला घेता आला.  अर्थातच हे दोन्ही अनुभव एवढे भिन्न होते, की सोन्याबाबत नेमकं माझं मत काय याचाही मला पुन्हा विचार करावा लागला.  गेल्या शनिवारी मॅच्युअल फंड...शेअर्स यासंदर्भातील एका व्याख्यानाला गेले...या विषयापासून  मी लांब असायची...पण  आता  घरी नव-यानं शिकवणी चालू केल्यानं थोडी फार आवड निर्माण झालेली...त्यातूनच हे व्याख्यान ऐकायला मिळालं....त्यातल्या मतानं भारावून बाहेर पडले आणि घरी येतांना रिक्षा चालकाने या सर्व भारावलेल्या वातावणातून एका क्षणांत बाहेर काढले...


काही विषय आपल्याला आवडत नाहीत, पण निट समजून सांगितले तर त्यातील क्लिष्टता कमी होते.  शेअर्स...मॅच्युअल फंड...हे असेच विषय.  यातलं आपल्याला काहीच आणि कधीच समजू शकणार नाही, या मतापर्यंत मी आले होते.  मात्र नवरा या सर्वातला जाणकार.  मुख्य म्हणजे मी कितीही वेड्यासारखे प्रश्न विचारले तर त्यावर न रागवता न चिडता शांतपणे उत्तरं देणारा.  त्यातून सकाळचा सर्व वेळ बिझनेस न्युजनी व्यापलेला.  या सर्वांचा परिणाम म्हणजे मी सुद्धा या विषयातलं थोडं वाचन सुरु केलं...आणि आपण समजतो एवढं काही अवघड नाही या मतापर्यंत आले.   मग नव-याबरोबर चर्चा होऊ लागल्या....त्याचा परिणाम म्हणजे याबाबत असलेल्या व्याख्यानांला नव-यानं चक्क मला यायला सांगितलं.  एरवी दोन तास काय करायचं म्हणून मी नकार दिला असता...पण आता अधिक थोडं जाणून घेऊया म्हणून मी सुद्धा व्याख्यानाला गेले.  व्याख्याता खरचं जाणकार आणि अभ्यासू होता...त्यानं  सर्व बारकावे सांगितले...विषय सोन्याच्या गुंतवणुकीवर गेला.  आपल्याकडे बहुसंख्य लोक सोनं घेऊन ते नंतर बॅंकामध्ये साठवून ठेवतात....त्याऐवजी अन्य कशात गुंतवणूक करता येतील याच्या पर्यांयावर चर्चा झाली.  मला विषय पटलाही...त्या व्याख्यात्याचे विचार ऐकून आम्ही पुढच्या कार्यक्रमाला गेलो. 

तिथून परत येतांना रात्रीचा एक वाजून गेला.  रिक्षा मिळायचीही मारामारी.


  अखेर एक रिक्षा थांबली.  नेहमीपेक्षा पैसे जास्त सांगितले...पण उपाय नव्हता...म्हणून नाईलाजानं रिक्षात बसलो...रिक्षाचालकांनं सांगितलं, ताई रात्रीच्या वेळी अधिकचे पैसे घेतात...एरवी मी जास्त पैसे घेत नाही...आम्ही बरं म्हटलं...आणि पुढच्या मिनिटाला रिक्षा बंद पडली...रात्रीची वेळ...पावसाची रिपरिप...आम्ही दोघंही दुसरी रिक्षा बघायची का या विचारात...पण त्या पावसात तो रिक्षावाला खाली उतरला...मागे जाऊन रिक्षाचे काही काम केले आणि रिक्षा चालू केली...आमची चलबिचल बघून तो सॉरी म्हणाला.  रिक्षाचा कुठलासा पार्ट गेला आहे, याची त्याला जाणीव होती...पण तो बसवायला पैसे कमी आहेत.   आज-उद्या अशीच रात्रीची जास्तवेळ रिक्षा चालवून ते पैसे गोळा करणार आणि मग रिक्षाची दुरुस्ती करणार असं त्यांनं सांगितलं...त्यावर मी सहज म्हटलं...भाऊ, अशी रिक्षा चालवलीत तर आणखी खराब होणार ना....त्यावर त्या रिक्षावाल्यानं  सांगितलेली माहिती ऐकून  आम्ही दोघांनी डोक्याला हात मारुन  घेतला.  या रिक्षावाल्या भाऊंची मुलगी बारावी पास झाली.  तिनं कॉलेजमध्ये  प्रवेश घेतला.  आता कॉलेजला जाणा-या  या मुलीनं वडिलांना आपल्या गळ्यात काहीच नसल्यानं नाराजी व्यक्त केली.  गळा मोकळा दिसतो बाबा....म्हणत नाराज झालेल्या लेकीला खूष करण्यासाठी या भाऊंनी त्यांच्याजवळचे 29 हजार रुपये घेऊन सोनार गाठला.  त्यातील दोन हजार बाजूला ठेऊन बाकीच्या 27 हजाराची सोन्याची चेन केली आणि लेकीला दिली.  लेक भलती खूष झाली.  आता ते दोन हजार कधीच खर्च करायचे नाहीत म्हणून त्यांनी बायकोला सांगून ठेवलं  आहे.  रोज सकाळपासून रात्रीपर्यंत रिक्षा चालवतात.  या रोजच्या पैशातून घरखर्च चालतो.  कधीकाळी जास्तीचे पैसे लागले, तर कोणाकडून तरी उसने  घ्यायचे आणि ते मग फेडायचे...आता रिक्षाचं काम आलं आहे,  त्याला अंदाजे दोन हजारापर्यंत खर्च येणार...त्यासाठी मग जास्तीचं काम म्हणून हा माणूस रात्रीही रिक्षा चालवतोय...आता अशीच पहाटे चारपर्यंत रिक्षा चालवणार...मग घर गाठणार...पुन्हा शाळेच्या पोरांना सोडायला  सकाळी निघणार...असं सांगत त्यांनी आमच्या बिल्डींगपुढे रिक्षा थांबवली....आम्ही दोघांनाही काय बोलावं हे सुचत नव्हतं...नवराच शेवटी म्हणाला...दादा बॅंकेत ठेवायचे पैसे दागिने करण्यापेक्षा...लेकीच्या पुढच्या शिक्षणासाठी मदतीला आले असते ना...त्यावर हसला...हो दादा...पण लेकीच्या गळ्यात सोन्याची चेन घातली...ही काय छोटी गोष्ट थोडी आहे.  शिक्षण काय होईलच...पण सोन्याची बात वेगळीच असते...आम्हाला नमस्कार करत तो रिक्षावाला पुढे गेलाही...रात्रीचे दिड वाजलेले...असाच तो पहाटे चार पर्यंत काम करणार होता...पावसाळी दिवस...त्यात पुन्हा सकाळची शाळेच्या मुलांची ड्युटी....पण या सर्वांचे त्याला काहीच वाटत नसावे...कारण त्याच्या डोळ्यात आणि मनात ती सोन्याची चेन आनंद देत होती...


मला सहज म्हणून एका लग्नातली गोष्ट आठवली.  काही महिन्यांपूर्वी आमच्या परिचितांपैकी एकाच्या  लेकीचे लग्न ठरलं.  ती बातमी सांगितल्यावर आम्ही त्यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी गेलो.  काही काम असेल तर नक्की सांगा म्हणून सांगितलं...त्या गप्पादरम्यान मुलीच्या आईनं आमच्यासमोर नव्या दागिन्यांची आरास केली.  बांगड्या, तोडे,  गळ्यातला हार,  त्याचे मॅचिंग कानातले,  पैजण, नथ, मोठं मंगळसूत्र, नेहमीसाठी छोटंस मंगळसूत्र...असे बरेच सोन्याचे दागिने तयार करुन घेतलेले.  हे सर्व दाखवतांना सोन्याचा भाव....साठवलेले पैसे....सणानिमित्त एक-दोन ग्रॅम सोनं घेऊन केलेली साठवणूक आणि मुख्य म्हणजे बाबांच्या नावे असलेल्या एफडी...यांची चर्चा झाली. मुलीच्या वडीलांच्या नावे असलेल्या सर्व एफडी या सोन्याच्या दागिन्यांसाठी मोडल्या....आम्ही यावर त्यांच्याकडे बघितले...तर ते हसून म्हणाले, मुलीची हौस मोठी की एफडी...ती खूष, मग आणखी काय हवं...आम्हीही माना हलवल्या....नंतर लग्नात गेलो...मुलीनं पहिली पिवळ्या रंगाची नववारी घातली होती...त्यावर मोत्याचे दागिने घातलेले...बहुधा मला दाखवलेले दागिने नंतर घालेल असं वाटलं....नंतर ती आली घागराचोलीमध्ये...तेव्हा तर गळाभर कुंदनचे दागिने घातलेले होते...माझी काही उत्सुकता थांबेना...मी नव-याला बोलून दाखवलं...तर त्यानं गप्प रहा....असा सल्ला दिला...काहीवेळानं त्या मुलीची आईच बोलायला आली....सर्व ठिक ना म्हणून विचारलं...मग मी हळूच त्या दागिन्यांबद्दल विचारलं...तेव्हा त्या हसून म्हणाल्या...अहो ते दागिने मॅचिंग कुठे होतायेत...तिला सकाळी नऊवारीसाठी मोत्यांच्या दागिन्यांची हौस होती...आणि या घाग-यावर म्हणे सोन्याचे दागिने उठून दिसत नाहीत...म्हणून मग क्रॉफर्ड मार्केटवरुन हे आर्टिफिशल दागिने खरेदी केले....शेवटी हौस महत्त्वाची हो....असं त्यांनी म्हणताच मी पटकन विचारलं मग त्या एफडी कशाला मोडल्या...तर त्या मुलीची आई म्हणाली...आता त्या काय एफडी गळ्यात

दागिने म्हणून घालायच्या का...काहीतरीच...शेवटी नवरा मध्ये पडला...जेवण छान...व्यवस्था छान...अशा गप्पा मारल्या आणि ती नवरीची आई पुढच्या पाहुण्यांकडे बोलायला गेली....इथे मी विचारात पडलेले...सोन्याचे दागिने घालायचे नव्हतेच तर त्या एफडी आधीच कशाला मोडल्या...नंतर मोडल्या असत्या तर अधिक पैसे मिळाले असते...मी नव-याला विचारण्याचा प्रयत्न केला...पण तो माझा रोख ओळखून आधीच म्हणाला, एफडी त्यांच्या आणि दागिनेही त्यांचेच...तू उगाचच कशाला डोक्याला ताण देतेस....

त्यादिवशी सोन्याबाबतीलले दोन्हीही टोकाचे अनुभव घेतल्यावर हा लग्नातला किस्साही आठवला...सोनं आपण नक्की कशासाठी घेतो...समोरच्या व्यक्तीला माझ्याकडे किती सोनं आहे हे दाखवण्यासाठी की आपल्या समाधानासाठी...या प्रश्नाचं उत्तर कधीही मिळणार नाही...कारण सोना कितना नाही....भरपूरच सोना है....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

Post a Comment