विळी.....
वापर झाला तर होतो...बाकी किचनच्या ओट्याखाली एका कोप-यात ती विळी बसलेली असते. नव-याच्या आदेशानं या विळीला बाहेर काढलं...धुवून पुसून ती नव-याच्या ताब्यात दिली. पुजेच्या निमित्तानं का होईना खास तयार करुन घेतलेल्या या खास विळीनं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
लग्न झाल्यावर पहिल्यांदा मुंबईकर विळी बरोबर गाठ पडली. अतिशय नाजूक...आमच्या गावाला, रेवदंड्याकडे विळी आणि खोवणी असे दोन प्रकार असायचे. विळीमध्ये खोबरं खोवण्यासाठी काट्याची पाती असली तरी त्यावर अगदी क्वचितच खोबरं खोवलं जायचं. कारण तिथे कधी वेळेला दोन किंवा तीन नारळ एकदम खोवले जायचे. माशांचा वार असेल तर कधी कधी चार-पाच नारळ सुद्धा खोवायला लागायचे. यात पाहुणे आले तर ही नारळांची संख्या डबल व्हायची. एरवीही सकाळी एक नारळ फोडला की तो संपूर्ण खोवायचा. फ्रिजमध्ये ठेवा वगैरे भानगडच नाही. पण मुंबईत
आल्यावर खोब-याच्या सढळ वापरावर नको तेवढी बंधनं आली. पहिलं बंधंन आलं ते या विळीमुळेच. गावाला वापरणा-या खोवण्या मजबूत असतात. अगदी दिवसभर त्यावर खोबरं खोवलं तरी पातं खराब होणार नाही. पण इथे आल्यावर काही दिवसातच विळीचे स्क्रू हलायला लागले. त्यात खोबरं खोबल्यावर ती पाती चक्क मान टाकायला लागली. नवरा सुरुवातीला मस्करी करायचा...मग दर रविवारचा फिक्स कार्यक्रम झाला, ग्रील करणा-या दुकानात जाऊन हे विळीच्या दुरुस्तीचे काम करायला लागायचे. त्या शेजारीच आमचा इस्त्रीवाला होता, त्यानं एकदा सुचवलं, एक मजबूत विळी तयार करुन घ्या...या असल्या साध्या विळीला कायम दुरुस्त करावे लागणार. मग त्यानीच ही जबाबदारी उचलली. काही दिवसांनी अगदी मजबूत आणि मोठी अशी विळी तयार करुन आणली. त्यावर असलेलं खोबरं खोवण्याचं पातंही मजबूत...मी अगदी खूष...पहिला मुहूर्त म्हणून अख्खा नारळ खोवून त्याचे नारळदास लाडू बनवले...आणि विळी बनवून आणणा-या आमच्या इस्त्रीवाल्याला धन्यवाद म्हणून पाठवून दिले.
आमच्या गावात, रेवदंड्यात खोब-याच्या सढळ वापराची एवढी सवय लागलेली की पोह्यावर तर खोबरं घेणार पण चिवडा खायला घेतला तरी वर खोबरं लागणार...पण मुंबईत आल्यावर सगळ्यावरच बंधंन पडली. मुळात प्रत्येकवेळेला विळी काढा...ती धुवा आणि वापरा...मग वापरुन झाल्यावर पुन्हा धूवून ठेवा...या सर्वांमध्ये वेळ जायला लागला...त्यात खाली बसा आणि उठा...यातही वेळ जायला लागला. मग हळूच सुरीचा वापर सुरु झाला. ओट्यावर पटापट कांदा-भाजी कापायची आणि फोडणी करायची...एकाचवेळी दोन भाज्या करायच्या असल्या तर सुरीमुळे काम पटापट होऊ लागलं. त्यात हौशेनं तयार करुन घेतलेली विळी अगदी कोप-यात बसली तरी बसलीच. मध्यंतरी नव-यानं हौशेनं भाजी कापण्यासाठी कटरही घेतलं. पण असलं काही वापरण्याचा माझा स्वभावच नाही ना...दोन दिवसातच या कटरनं भाजी कमी पण माझी बोटं जास्त कापली. अखेर तिस-या दिवशी अख्खा तळवा चांगलाच सोलपडला...डॉक्टरकडे धावावं लागलं मग ते कटर गायब झालं. अशीच गोष्ट मिक्सर ग्रायंडरची...खोबरं जेवणात खूप लागतं आणि त्यासाठी सारखी खवणी काढावी लागले, म्हणून एक ग्रायंडर घेतला. त्यात खोबरं किसण्याची व्यवस्था होती....फक्त बटन चालू करुन वर नारळाची कवड पकडायची....पण त्यातही तसाच घोळ. पहिल्याच दिवशी कवड पकडली पण ग्रायडंरचा वेग ऐवढा होता की कवड बाजुला झाली आणि माझी बोटं सोलपटून निघाली...डॉक्टरांनी पाच बोटांना बॅडेंज गुंडाळलं आणि नव-याला सल्ला दिला यांना साधी सुरी वापरायला द्या...मग ते नवं
कोरं मिक्सर ग्रायंडर परत गेलं.
आता गेल्या काही वर्षात विळीची सवय तुटल्यात जमा आहे. लेकाची शाळा सुरु होती तेव्हा जेवण म्हणजे मल्टीटास्क असायचा. दोन डबे...नाष्टा वेगळा...नव-याचे डबे वेगळे हे सर्व करतांना किमान चार ते पाच पदार्थ एकाचवेळी करायला लागायचे...अशावेळी खाली बसून आरामात भाज्या कापायला जमायचे नाही. मग ओट्यावर पटापट सुरीने भाज्या कापायची सवय लागली. सोयीस्कर अशी ही सवय आता अंगवळणी पडलीय...परिणामी विळी ओट्एयाखालच्या कोप-यात गेली ती कायमचीच. त्यातही अलीकडे खोब-याच्या वापरावरही कसली कसली बंधनं आली आहेत. त्यातले प्रमुख म्हणजे कोलोस्ट्रॉल नावाचा प्रकार...खोबरं जास्त वापरलं तर कोलोस्ट्रॉल वाढतं म्हणे रक्तातलं...मग काय जिथे आम्ही दिवसाला एक नारळ संपवायचो तिथे आता आठ-पंधरा दिवसांनी एक नारळ संपवला जातो. नारळ फोडून फ्रीजमध्ये ठेवला तर ती कवड कधी कधी पिवळसर पडते. म्हणून मग एकदाच खोबरं खोवून ते फ्रिजमध्ये साठवून ठेवलं जातं. त्यातही विळी काढण्याचा कंटाळा आला तर खोब-याचे मोठे तुकडे सुरीनं काढून मिक्सरमध्ये फिरवून खोबरं तयार करते...अगदी नारळदास लाडू करतांनाही असाच शॉर्टकट...कधी आई आली आणि तिला नारळदास बनवायला सांगितलं तर ती मात्र खोवणीनंच नारळ खोवणार...मिक्सरच्या खोब-यानं चव येत नाही सांगून ती माझा हा शॉर्टकट
कायम टाळते. माझा लेकही आजीसारखाच...पोहे केले तर त्यावर खोबरं हवं आणि तेही खोवणीनं खोवलेलंच हवं, हा त्याचाही हट्ट असतो. पण ही दोन्ही माणसं आता पाहुण्यांसारखी आहेत...त्यामुळे विळी आमची रुसल्यासारखी झालेली. आता पुजेच्या निमित्तानं का होईना ती बाहेर आलीय. तिला तिच्या जागी पुन्हा ठेवतांना त्या पातीमध्ये तेल-पाणी करायला हवं...म्हणून मी मनात खूण बांधली...काही वस्तूंचा वापर झाला नाही तरी त्यांचे महत्त्व काही कमी होत नाही, त्यातलीच एक वस्तू म्हणजे विळी....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा






रसाळ लेखन
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteअगदी साध्या गोष्टीही लिखाणाचा विषय करण्यात तू खरोखर कमाल करतेस!! विळी फार आवडली!!
ReplyDeletewa..chan lihaley
ReplyDeleteविळी .. ब्लाॅग खूप आवडला. विळीला आता खूप पर्याय उपलब्ध आहेत पण विळी ती विळी ! स्टिलचा पाट असलेली विळी दिसते चकाचक , स्वच्छ करायला सोप्पी पण तरी लाकडाच्या पाटाची विळी सरस ! विळी आणि खोवणी पूर्वी घराघरात 'मस्ट' असत ! आता मात्र तिची अनेक फॅन्सी रूप पाहायला मिळतात.
ReplyDeleteसई छान लिहिता तुम्ही.छोट्या विषयावर पण किती छान लिहले आहे.।खरे आहे विली आता वाप्रताच राहिली नाही पण एक आहे काढून टाकली नाही.काही जुन्या गोष्टीना तितकेच जपले पाहिजे.आता उभे राहून जास्त काम होत नाही म्हणून सूरी व कटींग तर बारा पडतो खुर्चीवर बसून कापणे सोईचे झाले आहे त्या मुळे विली बंद.
ReplyDelete