मामाचे हरवलेले पत्र....

 

 मामाचे हरवलेले पत्र....


दिवाळी चार दिवसांची आहे...हे चारही दिवस तुमच्याकडे भरभरुन आनंदात्सोव साजरा होऊदे....दिव्यांच्या रोषणाईत सर्व राग, द्वेष आणि नकारात्मक विचार विरुन जावूदे...फरांळाच्या सोबतीने आपल्या सर्वांना आरोग्याचे वरदान लाभू दे....दिवळीच्या भरभरुन शुभेच्छा....अगदी दोन दिवसांपूर्वी असा गोड मजकूर लिहिलेलं एक पोस्टकार्ड माझ्या हातात पडलं.  आमच्या एका परिचितांनी पाठवलेलं...पत्रात अजून छान शब्दात शुभेच्छा होत्या...कुटुंबाची चौकशी केली होती. अगदी पोस्टकार्ड असते केवढे...त्याचा पुरेपूर वापर करत गोड शब्द या पत्रात पेरले होते...लिहिणा-यांनी शेवटी आपलं पूर्ण नाव आणि पत्ता लिहिला होता...मी बराच वेळ आटलटून पालटून ते कार्ड बघितले....तेच तेच शब्द नव्यानं वाचलं...तरीही कार्ड हातातून खाली ठेवता येत नव्हतं...याला कारण म्हणजे कित्तेक वर्षांनी माझ्या नावांनी असं पोस्ट कार्ड आलं होतं....काही वर्षापूर्वी माझे आजोबा अशा पद्धतीनं पत्र पाठवायचे...पण त्यांच्यानंतर अशी पत्र दुर्मिळ झाल्यागत होती.  शेवटी हे पोस्टकार्ड पाठवणा-यांना फोन केला...कार्ड पाठवणारे आमचे नातेवाईक...दोघांनीही पासष्ठी पार केलेली...मी फोन केल्यावर त्यांचा मोठ्यानं हसण्याचा आवाज आला...त्यांचं हसून झाल्यावर त्यांचे पहिल्यांदा आभार मानले...तेव्हा पुन्हा ते हसायला लागले...म्हणाले हा तुझा दहावा-बारावा फोन असेल...आम्ही मोजून पन्नास जणांना तरी अशी शुभेच्छांची पोस्टकार्ड पाठवली आहेत.  आणि ज्यांना


ज्यांना पोस्टकार्ड मिळत आहेत, ते आभार व्यक्त करत आहेत.  तुला काय वाटतं....सर्वजण शुभेच्छा मिळाल्या म्हणून फोन करत आहेत की, शुभेच्छा पोस्टकार्डवर मिळाल्या आहेत म्हणून सर्वजण फोन करत आहेत....आम्हा दोघांना वाटतंय की शुभेच्छांपेक्षा त्या पोस्टकार्डाची गरजच जास्त होती...म्हणत ते काका-काकू मोठमोठ्यानं हसायला लागले....आणि मी सुद्धा इकडे ते पोस्टकार्ड नव्यानं वाचायला लागले...

पोस्टकार्ड आणि आंतरदेशीय पत्र ही काही वर्षापूर्वी आपल्या जीवनाचा अविभाज्य असा भाग होती.  कालपरवा मला आलेल्या पत्रांनं पुन्हा या दोन महत्त्वाच्या पत्रांच्या आठवणी आणि त्यातून नातेवाईकांच्या आठवणी जाग्या झाल्या...मला ज्या काका-काकूंनी पत्र पाठवलं होतं, त्यांना मी विचारलं...तेव्हा ते म्हणाले आम्ही रिटायर्ड माणसं....भरपूर वेळ आहे आमच्याकडे...शिवाय दिवाळीला फराळ बनवायची भानगडही आमच्याकडे नाही...दिवाळीचा फराळ आणि साफसफाई करण्यासाठी सूनबाईंना एका मावशींची नेमणूक केली आहे. 


आम्हाला दगदग नको म्हणून ही तजवीज...मग करायचं काय...मग खूप विचार करुन हा मार्ग काढला...सर्व नातेवाईकांची यादी काढली...पोस्टातून जाऊन साठ पोस्टकार्ड खरेदी केली...त्यांनाही आर्श्चय वाटलं...मग घरी आल्यावर दोघांनीही मिळून कोणाला काय काय लिहायचं, याचा मसूदा लिहून काढला.  आणि पोस्टकार्ड तयार करायलं घेतली...बरं हे सर्व करतांना आमच्या मुलाला आणि सूनेला पत्ता लागून दिला नाही.  त्या दोघांनाही असंच एक पोस्टकार्ड पाठवलं...आमच्याच पत्त्यावर हे पत्र आलंही....मुलगा आणि विशेषतः सुनेला शुभेच्छा दिल्या...त्यांची ही पहिलीच दिवाळी...सून आम्हाला लेकीची माया देते...त्याबद्दल तिचे कौतुक...असं सर्व होतं...ती तर ते पत्र वाचून हरखूनच गेली...ऑफीसला मैत्रिणींना दाखवायला गेलीय...आहे की नाही मजा...ही मजा सर्वांना आवडली.  ज्यांचे फोन येत आहेत, ते हेच म्हणत आहेत, हे सर्वाधिक छान असे दिवाळीचे गिफ्ट आहे म्हणून...या पोस्टकार्डांनी सर्वांच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या....तुलाही हेच म्हणायचं आहे ना...असा उलट प्रश्नच मला त्या काकांनी विचारला...

मी तेव्हा त्या काकांना हो म्हणलं...अगदी खरं होतं...त्या पोस्टकार्डानं माझ्या आठवणी जाग्या झाल्या होत्या...आंतरदेशीय पत्र आणि पोस्टकार्ड यांच्यासोबत अशा तुम्हा सर्वांच्याही अशाच अनेक आठवणी गुंफल्या गेलेल्या आहेत. 


 माझे आजोबा, म्हणजे आईचे बाबा हे पक्के पत्रलेखक होते.  आजोबांचे पत्र येणे हा एक मोठा खजिना मिळाल्यासारखा आनंद होता.  एकतर आजोबांचे अक्षर हे नितांत सुंदर होते...त्यात त्यांच्या सूचना या मोठ्या असायच्या...नंतर आई पुन्हा त्यांना उत्तराचे पत्र पाठवायची...त्या एका आंतरदेशीय पत्रात सर्व कुटुंबाची चौकशी व्हायची...आणि आमच्या सर्वांच्या खुशाल्या कळवल्या जायच्या....शिवाय आजूबाजुचे...नातेवाईक हे सर्वही त्यात सामावलेले असायचे....नेहमी हे आंतरदेशीय पत्र लिहितांना एक गडबड कायम व्हायची.  ती म्हणजे, पत्र लिहितांना सुरुवातीला अगदी सुटसुटीत, मसुदा लिहिला जायचा.  अगदी पेन्सीलनं ओळी आखल्या जायच्या.  मग मजकूर लिहिल्यावर त्या पेन्सीलच्या ओळी पुसल्या जायच्या.  कारण आमच्या आजोबांचं काम अगदी शिस्तबद्ध...जराही खाडाखोड केलेली त्यांना आवडायची नाही.  पण गम्मत तर पत्राच्या अखेरच्या पानात यायची.  कारण पत्र लिहायल्या घेतल्यावर ऐनवेळी बराच मजकूर लिहायचा रहायला आहे याची जाणीव व्हायची...मग त्या ओळी वगैरे विसरल्या जायच्या...अगदी जवळ जवळ शब्द लिहिले जायचे...आजोबा ओरडल्यावर मग बघू म्हणत अगदी पत्र फोल्ड करायची जागा असते, तिथेही काहीतरी लिहिले जायचे.  मामा-मावशीला निरोप...आमची खुशाली...काही माहिती सांगायची असल्यास ती माहिती...असं सर्व त्या छोटुश्या जागेत

लिहिले जायचे...अगदी कोंबून कोंबून शब्द बसवले जायचे...मग ते आंतरदेशीय पत्र काळजीपूर्वक फोल्ड केले जायचे.  गम लावून चिटकवले जायचे...त्यावर काळजीपूर्वक पत्ता लिहून पोस्टात पोस्ट केले जायचे.

हा प्रवास फक्त असा असायचा असे नाही.  असे पत्र पाठवले की पुन्हा काहीतरी आठवण व्हायची...मग त्याला जोडपोस्ट म्हणून पोस्टकार्डावर राहिलेला मजकूर लिहिला जायचा...आणि पुन्हा हे पोस्टकार्ड आंतरदेशीय पत्रापाठोपाट पोस्ट व्हायचे.  या दोन पत्रांचा प्रवास व्हायचा.  पत्र यशावकाश आजोबांच्या घरी जायचे...मग पंधरा-वीस दिवसांनी आम्हाला त्यांचे पत्र यायचे...आमचे पत्र मिळाल्यावर आलेले हे त्यांचे उत्तर असायचे...मग पुन्हा या उत्तरावर आमचे उत्तर...अशी साखळी चालू असायची...ती लहानपणी तर कधीही खंडीत झाली नाही.  त्यामुळेच की काय शाळेत कधी पत्रलेखन हा विषय शिकायची सवयच लागली नाही.  सप्रेम नमस्कार, विनंती विशेष....हे सगळे अंगवळणी पडले होते...हाताला सवय झाली होती.  काळाच्या ओघात ही सवय कुठेतरी हरवली....

काळाची एकएक पायरी असते....तसेच याबाबतीत झाले म्हणायचे...पत्र....मग फोन....पेजर...स्मार्टफोन...आता काय व्हिडीओ कॉलमुळे तर सातासमुद्रापार गेलेली माणसंही जवळ आहेत अशी वाटतात.  पण हे शुभेच्छांचे पोस्टकार्ड माझ्या हाती आले तेव्हा जाणवले, ही पत्र म्हणजे संवादाची पहिली पायरी होती....पायाच होता तो....आणि या भक्कम पायावरच पुढची सर्व संवादाची कमान उभी आहे.  आता म्हणूनच कुठेतरी संवाद हरवतोय असं


वाटतं...संवादाची सर्व आधुनिक साधनं हात जोडून उभी आहेत,  तरीही आपल्याला कुणीतरी सोबत हवीशी वाटते...कोणीतरी बोलावसं वाटतं...ही पत्र हे संवादाचं....सोबतीचं काम करत होती....पण ती हरवली...एक खेळ आठवतो ना...मामाचं पत्र हरवलं....तसंच या पत्रांबाबत झालंय...ही पत्रं जर हरवली तर कुटुंबातला...आप्तामधला संवादाचा दुवाच हरवून जाणार आहे....त्यामुळेच आमच्या काका-काकूंनी दिवाळी शुभेच्छा देण्याचा हा अनोखा उपक्रम मला खूप भावला....यंदाच्या दिवाळीत नाही, पण पुढच्या दिवाळीत आणि अन्य शुभदिनी असा पत्र शुभेच्छांचा सहारा नक्कीच घ्यायला हवा....याची खूणगाठ मी बांधत पुन्हा ते पत्र  वाचायला घेतले....

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. लेख वाचताना भुतकाळात गेले. माझे वडिल ही पक्के पत्रलेखक होते. अतिशय सुंदर अक्षरांत लिहिलेलं नीटनेटकं पत्र त्यांचं वैशिष्ट्य होतं. लेखामुळे अनेक आठवणींना उजाळा मिळाला.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद....आपल्या सर्वांच्या पालकांची हिच पत्रलेखन संस्कृती आणि त्याबरोबर आलेली वाचन संस्कृती हा मोठा ठेवा आहे आपल्यासर्वांसाठी....

      Delete

Post a Comment