परिपक्व मैत्रीची गोष्ट.....
दुपारच्या जेवणासाठी आम्ही दोघांनीही खानावळीत नंबर लावला होता. दुपारचे दोन वाजून गेलेले, तरीही खानावळ फुल्ल होती. आमच्यामागेही आणखी वेटींग होती. शेवटी पंधरा मिनिटांनंतर आम्हाला बसायला जागा मिळाली. तीसुद्धा कोणासोबत तरी शेअर करायची होती. आमच्या समोरच दोन वयस्कर महिला बसल्या होत्या. त्यांच्याच ग्रुपमधील आणखी चार महिला आमच्या बाजुच्या टेबलावर बसल्या. बसल्या बसल्या या सर्वांची लिस्ट चालू होती. आमची खिचडी गरम हवी...एकीला सोबत ताक हवं होतं...तर दुसरीला दुध....एकीनं वाटीभर कोशिंबीरीची मागणी केली. तर आणखी एकीनं सोबत आणलेला पेरु कापण्यासाठी सुरी मागितली आणि मिठही...साठी-पासष्ठी पार केलेल्या या सहाजणी वाढणा-या महिलांना सतत सूचना करीत होत्या...हे हवं...ते दे...त्यामुळे त्यांचं झाल्याशिवाय आम्हाला आमची ताटं मिळाली नाहीत. बसल्यानंतर पंधरा मिनिटांनी आमच्यासमोर जेवणाची ताटं आली, तेव्हा मला कडकडून भूक लागली होती. समोरच्या महिलांमुळे हा उशीर होतोय, याची जाणीवही सोबत होती...त्यामुळे माझी चिडचिड चालू झाली...एव्हाना त्या त्यांची खिचडी खाण्यात मग्न झाल्या होत्या...थोड्यावेळानं माझ्या पोटातही ताटातलं चविष्ट जेवण गेलं आणि माझी भूक थोडी शांत झाली सोबत चिडचिडही...मग चवीचवीनं जेवायला सुरुवात केली. माझ्याच समोर बसलेल्या त्या महिलाही तसंच करत होत्या....दूध, ताक, पेरु, कोशिंबीर आणि राजगि-याच्या लाडवासोबत त्या आरामात खिचडी खात होत्या. मध्येच वाढणा-या महिलांसोबत गप्पा चालू होत्या आणि संध्याकाळी काय मेनू हवा याचीही चर्चा चालू होती. मध्येच आमची नजरानजर झाली. एव्हाना समोरासमोर बसलेले आम्ही एकमेकांपासून अलिप्तच होतो...आता पोटातली भूक शमल्यावर आता गप्पा चालू झाल्या...तेव्हा समजलं की या सहाजणी आठवड्यासाठी नरसोबाच्या वाडीमध्ये आल्या होत्या...एका भागवत सप्ताहासाठी...वर्षातून असाच एक आठवडा त्या स्वतःसाठी देतात...आणि आपल्या आपल्यात रमतात....
पुण्यात रहाणा-या या सहा मैत्रिणी....प्रत्येकीची वयाची पासष्ठ ओलांडून गेलेली. सर्वांचं कुटुंब. मुलं, सुना, नातवंडांसोबत काहीजणी रहातात. तर दोघीजणी मुलगा परदेशात असल्यामुळे लेकी आणि जावयासोबत रहात आहेत. पुण्याला एका मंदिरात त्यांची काही वर्षापूर्वी भेट झाली. आता त्याला जवळपास सात-आठ वर्ष झाली. सर्वजणी देवदर्शनाच्या निमित्त एक झाल्या...नंतर अनेक माध्यमातून त्या एकमेकींबरोबर जोडल्या गेल्या.
निमित्त फक्त वेगवेगळं होतं. कधी मुलाच्या लग्नाची धावपळ तर कधी कोणाच्या नव-याचं आजारपण. त्यांच्यापैकीच दोघींच्या पतींचेही निधन झालेले. अशावेळी या मैत्रिणींना सर्वांनी मिळून आधार दिला. एकाकीपणाची भावना वाटू दिली नाही. मुलांच्या आणि नातवंडाच्यासोबत रहातांना या सर्वजणी स्वतःला विसरुन गेल्या होत्या. पण गेल्या पाच वर्षापूर्वी एका भागवत सोहळ्यात त्यांना आयुष्याचा वेगळा रंग दिसला. आठवडाभर चाललेल्या या भागवत सोहळ्यानंतर झालेल्या समारंभात प्रवचन करणा-या महाराजांनी पुढच्यावर्षी नरसोबाची वाडी येथे होणा-या भागवत सोहळ्यासाठी सर्वांना आमंत्रण दिले. तेव्हा या सर्वांनी एकदम नकार दिला. कारण कुटुंबाला सोडून कसं जायचं हा प्रश्न. आठवडाभर वेगळं रहाण नको वाटलं. पण या भागवत सोहळ्याला येणा-या एका प्रवचनकर्त्याचं वाक्य त्यांच्या मनाला लागलं...वर्षातला एखादा आठवडाही तुम्ही तुमच्यासाठी देऊ शकत नाहीत...तुम्हाला नका देऊ पण देवाला तर देऊन बघा...तल्लीन व्हा...मग बघा...आयुष्यातील गोडी अधिक वाढेल.
काही दिवस या सहाजणी यासर्वांवर विचार करत होत्या. प्रत्येकीनं घरातही आठवडाभर भागवत सोहळ्यासाठी
जाणार असल्याचं सांगितलं. तेव्हा काही
घरातून विरोध झाला...आठवडाभर कशाला...या वयात जमणार का...इथे नाही का होत भागवत
सप्ताह...आठवडाभर इथे सगळ्या अडजेस्टमेंट कराव्या लागणार...आजारी पडलात तर काय
होणार...असे अनेक प्रश्न समोर आले. या
सर्वजणी कधी एकट्यानं बाहेर पडल्याच नव्हत्या...त्यामुळे असे प्रश्न निघाल्यावर
त्यांचाही त्यांच्यावरचा विश्वास डळमळला.
या सर्वात वर्ष कधी संपले हे कळलंच नाही.
पुढच्यावर्षी भागवत सप्ताह नरसोबाची वाडी येथे असल्याचा निरोप आला. तेव्हा मात्र त्यांची चुळबूळ सुरु झाली. जाऊया की नको, ही चर्चा सुरु झाली. मग यापैकी दोघींच्या सुनां आणि नव-यांनी पुढे
येऊन चौकशी केली. हॉटेलची शोधाशोध
केली. तेव्हा चांगले वाटणारे एक हॉटेल बुक
केले. जाण्याची व्यवस्था केली. बरोबर आवश्यक अशी औषधं दिली...आणि या सहा
मैत्रिणींना निरोप दिला.
घरापासून आठवडाभर कसं दूर राहू शकतो, याची पहिल्यांदा त्यांना काळजी
वाटत होती. शिवाय काही झालं तर...हा मोठा
प्रश्न प्रत्येकीला होता. पण पहिल्या दोन
दिवसातच या सर्व प्रश्नांना विराम मिळाला.
भागवत सोहळ्यात त्या चांगल्या रमल्या.
सकाळी नऊ ते बारा आणि संध्याकाळी चार ते सात असा हा प्रवचन सोहळा
होता. पहिल्या दोन दिवसातच त्यांचे
टाईमटेबल आखून झाले. सकाळी छानसा नाष्टा
करुन भागवताला जायच्या...पुन्हा दुपारी जेवण, नंतर थोडा आराम मग संध्याकाळचा चहा
आणि संध्याकाळी भागवत सोहळा झाल्यावर कृष्णा काठचा फेरफटका...अगदी
बोटींगही...भरपूर चालल्यावर रात्री उशीरा जेवण आणि घरी एक फोन केला की शांत
झोप...पहिल्याच वर्षी या सर्वजणी एवढ्या खूष झाल्या. त्यांना ना कधी या आठवड्यात गुडघ्याचे दुखणे
जाणवले, ना सर्दी खोकल्याचा त्रास झाला.
उलट या आठवड्यात त्यांना भरपूर आनंद मिळाला. पहिल्यावर्षी जाणवणारा भीती पुढच्या सर्व
वर्षात नावालाही उरली नाही. कोरोनामध्ये
एकच वर्षाचा खंड केला. नंतरही आवश्यक
तेवढी काळजी घेत हा सप्ताह या सहाजणींनी केला.
वाडीमध्ये आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, तिथेच या सर्व मैत्रिणींचा
मुक्काम होता. अगदी शेजारची रुम....दोन दिवस दोन्ही वेळेला जेवायला आम्ही एकत्र होतो. त्यामुळे या सर्वजणींबरोबर माझ्या भरपूर गप्पा मारुन झाल्या. प्रत्येकवेळी त्यांच्या साड्या बदललेल्या आणि छान गजरे माळलेले. मी त्याबद्दलही विचारले. तेव्हा म्हणाल्या, अग पहिल्यांदा नव्या साड्या ठेऊन द्यायचो...नंतर घालू...सणाला घालू...समारंभात घालू...पण आता विचार करतोय, हा नंतर आपल्या आयुष्यात आलाच नाही तर...त्यापेक्षा आताचा क्षण महत्त्वाचा...त्यामुळे साडी नवी घेतली की ती लगेच नेसायलाच काढतो...कपाटात खास कप्प्यात ठेवतच नाही. आता भागवत सप्ताहाच्या समाप्तीला पैठणी आणि बनारसी साड्याच घालणार. मी त्या सहा जणींच्या मोहातच पडले होते. त्या मैत्रिण होत्या. पण प्रत्येकीच्या आवडी निवडी वेगळ्या. पण कोणीही कोणावर माझ्यासारखं कर...म्हणून आग्रह करत नव्हतं. या काही वर्षात फोन बॅंकीगही या सर्वजणी करु लागल्यात. एकीला नाही आलं तर दुसरी शिकवते...अगदी कृष्णाकाठावर फिरतांना लाईव्हही करतात...
दोन दिवसांच्या मुक्कामात आमची छान ओळख झाली. फोन नंबरचीही देवाण घेवाण झाली. आम्ही पुढे कोल्हापूरला जाणार होतो. हे समजल्यावर या सर्वजणींनी एकच सल्ला
दिला....खूप गर्दी असेल, देवीच्या दर्शनासाठी अगदी दोन-तीन तास लाईनीत जातील. त्यापेक्षा मुखदर्शन कर आणि शांतपणे एका बाजुला
जाऊन देवीचे नाव घे...आणि बाकीचा वेळ मंदिराच्या भोवती असलेल्या दुकांनांमध्ये
फेरफटका मार...छानशी साडी घे...कोल्हापूरचे दागिने बघ...चप्पल घे...त्या छान छान
खरेदीचा सल्ला मला देत होत्या...नव-यानं पुढचा धोका ओळखून मला जवळजळ हाताला धरुन
ओढतच गाडीत बसवलं...आम्हाला निरोप देणा-या त्या सहा जणींना मी बघत होते...फक्त
वयाची पासष्ठी ओलांडलेली...पण या वयानेच
परिपक्वता दिलेली...विचारांची आणि आचाराचीही....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
.jpg)


खूप छान लेख!! असं स्वतः साठी वेळ देणं महत्त्वाचं असतं. सई, तू छोट्या छोट्या गोष्टीतलं मोठेपण अचूक ओळखतेस आणि लिहीतेस!!
ReplyDeleteKoop Chan Lekh Ahe 🙏
ReplyDeleteछान लेख....जेष्ठ नागरिक झालेल्या प्रत्येकांनी असं केलं पाहिजे....ह्या नंतरचं जीवन स्वतः साठी...
ReplyDeleteमस्तच
ReplyDeleteखूप सुंदर सई
DeleteKhup chhan lekh
ReplyDelete