शॉपिंग...शॉपिंग...आणि शॉपिंग...
काय सांगतेस....अजून तुला त्या शॉपिंगमॉलबद्दल माहित नाही...कधी नाही गेलीस तू तिथे...अग घरातल्या बारीक सारीक सर्व गोष्टी आहेत तिथे...साधे चमचे घेतलेस तरी त्यातले दहा-बारा प्रकार मिळतात...कमाल आहे तुझी, तुला माहिती नाही...नाहीतर जगभराची महिती असते, आणि याची माहिती नाही...माझ्यासमोर माझी एक मैत्रिण बोलत होती...आणि मी चेहरा पाडून तिचं म्हणणं ऐकत होते. मी तिच्या घरी गेले होते. कॉफीचा मग तिनं माझ्यासमोर ठेवला....एकदम वेगळा होता....मी तो मग, बघूनच हरखून गेले. सोबत तिने ज्या डिशमधून खाऊ दिला होता ती डिश आणि चमचाही खूप वेगळा....छान डिझाईनचा होता....मी तिला त्याबद्दल दाद दिली. तेव्हा तिनं हे सामान कुठून घेतलं त्याबद्दल सांगितलं. माझ्यासाठी हे शॉपिंग सेंटर नवीन होतं...म्हणून तिला आणखी विचारलं...मग तिनं या शॉपिंग सेंटरचं जे कौतुक सुरु केलं ते काही थांबेचना...हे कमी की काय...तिनं तिथून
घेतलेल्या एक-एक वस्तूंचा ढिगच माझ्यासमोर उभा केला. यासोबत तिच्या बागेत असलेल्या छान-छान झाडांच्या कुंड्याही यायला लागल्या....अगदी इलेक्ट्रीक टूलचा छानसा डबाही माझ्यासमोर आला....माझ्या हातातली कॉफी संपली तरी त्या वस्तू संपेना आणि माझ्या मैत्रिणीचा कौतुक सोहळाही....असं झालं की काय करायचं असतं....तेच मी केलं...नवरा ऑफीसमधून आल्या आल्या मी त्याच्यापुढे मैत्रिणीकडे झालेला प्रसंग सांगायला सुरुवात केली. त्यावर त्यानं या शॉपिंग सेंटरची माहिती असल्याचे सांगितले. झालं....हे काय...याला माहित आहे...आणि मला नाही ...मग काय...हट्टच धरला....शनिवारी तिथे जायचे म्हणजे जायचेच...
ठरल्याप्रमाणे शनिवारी आम्हा दोघांची मोहीम सुरु झाली. नवरा हुश्शार...त्यानं घरातून निघतांनाच त्याच्या शब्दात मला समज देण्याचा प्रयत्न केला....आपण फक्त बघायला जातोय....फार खरेदी करायची नाही...उगाच तू खरेदीच्या नादात नको त्या वस्तू घेतेस, आणि नंतर त्या तशाच पडून रहातात...अर्थात,
मी तेव्हा हो म्हणाले....नको तेव्हा रिक्स नकोच...दुपारी बाराच्या ठोक्याला आम्ही त्या मॉलमध्ये दाखल झालो. बाहेरुन अगदी साध्या असलेल्या या ठिकाणी आत काय असेल याचा अंदाज येत नव्हता...पहिल्यांदा कुठे गेल्यावर होतं तसंच माझं झालं होतं....थोडं बावरायला झालं...भव्य म्हणजे अतीभव्य....कुठून सुरुवात करायची त्याचा अंदाजच येत नव्हता. घरातील प्रत्येक खोलीची सजावट कशी असेल, आणि ती सजावट करतांना त्यातील फर्निचर, आवश्यक गोष्टी आणि शोभेच्या वस्तू लावून सॅम्पल रुम सारखे रुम आमच्या समोर होते....एकएक भाग बघायला सुरुवात केली. फर्निचरचे अनेक प्रकार समोर होते....मला घरातून निघतांना दहावेळा सूचना देणारा माझा नवरा या पहिल्याच भागात स्वतःच्या सूचना स्वतःच विसरुन गेला...सोफा सेट भारी आहे, आपल्याला घ्यायचा आहे....तू पसंत कर...हो म्हणालीस तर घेऊया...म्हणून तोच सुरु झाला....हा माझ्यासाठी शुभशकून होता....त्यामुळे आधी सर्व बघून घेऊ, नंतर ठरवूया म्हणून मी त्याच्यासमोर प्रस्ताव ठेवला...मग काय, काय-काय घेता येईल याची पहाणी सुरु झाली. खूप मोठा परिसर....आपल्याला काही गोष्टी माहित नसतात त्याही तिथे होत्या...आणि विशेष म्हणजे त्या हाताळताही येत
होत्या...त्यांचे फोटोही काढता येत होते. सोफा सेट, त-हेत-हेच्या खुर्च्या, पडद्यांचे कितीतरी प्रकार, ते पडदे लावण्यासाठीचे वेगवेगळे रॅक, लहान मुलांच्या अभ्यासाचे टेबल, त्यांची खोली सजवण्यासाठीची साधनं...आणि सर्वात आवडलेला भाग म्हणजे आपलं स्वयंपाकघर....किती प्रकारची सजावट होती....अगदी मोठ्या आकाराचे स्वयंपाकघर ते अगदी छोटेखानी स्वयंपाकघर...ते कसे सजवता येईल...त्यात किती सामान राहू शकेल...मांडणी कशी असावी...त्याचे रॅक कसे असावेत...सर्व अगदी वेगळं होतं...हे असं करता येईल....हे बघ...हे तर नवीनच आहे...हा असा रॅक करुया का...अरे किती छोटी जागा आहे, यात असा रॅक लावला तर किती सामान राहील...आदी आदी डायलॉग आमचे सुरु झाले होते. आसपास बघितलं तर सर्वांचीच अशी परिस्थिती होती...विशेष म्हणजे या विभागात काही होम सायन्स आणि आर्किटेक्चरचा अभ्यास करणारे विद्यार्थीही भेटले. फोटो काढून घेत होते....त्यांच्या प्रोजेक्टसाठी या सर्वांचा खूप उपयोग होतो म्हणे....
हे सर्व बघता बघता दुपार टळून गेली होती...मी तिथे गेल्या गेल्या सामान घेण्यासाठी एक ट्रॉली सोबत घेतली होती...त्यात कपडे ठेवण्यासाठीचा कापडी रॅक घेतला होता. बांगड्यासाठीचा एक डबा मिळाला, तो त्या ट्रॉलीमध्ये जमा
झाला...आता मॉलच्या पहिल्या मजला फिरायचा बाकी होता...तो तासाभरात उरकूया आणि संध्याकाळी सहापर्यंत घरी पोहचूया, म्हणून नव-याचा सल्ला आला...मी उपचारादाखल हो, म्हटलं...हा आमचा संवाद लिफ्टमधला...लिफ्ट पहिल्या मजल्यावर थांबली...दरवजा उघडला...आणि खूल जा सीम सीम म्हणजे काय हे मला समजलं...समोर काय काय होतं....अगदी पहिली नजर गेली ती शेवंतीच्या रॅककडे...मोठ्या रॅकमध्ये लाल आणि पिवळ्या शेवंतीची झाडं होती....अगदी डवरलेली....फक्त एकच घेऊया...म्हणून मी सुरु झाले...या कुंड्यांच्या रॅकच्या आसपास बागेसाठी लागणारी सर्व उपकरणं ठेवली होती...अगदी झाडाला पाणी घालयची छोटी झारी खूप वेगवेगळ्या आकारातली आणि रंगातलीही....अगदी पुढे किचनचा विभाग...मग काय विचारता...मला तिथे गेल्यावर तर कोण आनंद....कायकाय वस्तू होत्या...ब-यावेळा टिव्हीवर कुकींग शो मध्ये दाखवतात ती आधुनिक भांडी....माझी नजर एका वेगळ्या वस्तूवर गेली...मोमोजचा स्टिमर... बांबूचा...तो लगेच घेतला....नव-यानं कशाला म्हणून विचारलच...तेव्हा यात आपले उकडीचे मोदक आणि अळूवड्याही छान होतात, हे सांगितलं...पुढे एक ट्रे चा सेक्सन होता...त्यातला एक ट्रे हातात धरुन नवरा विचारत होता...हा कशासाठी आहे, त्याच्यावर लावलेल्या स्टिकरवरुन समजलं...भांडी धुतल्यावर त्यात ठेवायची...पाणी निथळलं की ती रॅकमध्ये
लावायची...एकूण भांड्यांचा ट्रे...नव-याला मी हे समजून सांगतांना आणखी एक मुलगी माझं बोलणं ऐकत होती...बहुधा नवीन लग्न झालेलं...दोघंही घरासाठी जोरदार शॉपिंग करत होते...तिनं तो ट्रे हातात घेतला...घेऊ की नको या विचारात...मी विचारलं...घरी बास्केट आहे का...ती हो म्हणाली...मग म्हटलं याची गरज नाही...तिनं लगेच ऐकलं...मग आम्ही दोघीही मिळून सुरु झालो...पुढेच कॉफीचे टेबल लागले...कॉफी मेकरचे प्रकार...कॉफीच्या मगचे प्रकार आणि मुख्य म्हणजे भाजलेल्या कॉफीच्या बिया...मग काय माझ्या चेह-यावर मोठं हसू आलं...तसंच तिच्याही...आमच्यातला एक समान धागा पुढे आला...ती सुद्धा कॉफी लवर...आणि आमच्या दोघींचेही नवरे चहाचे चाहते...तेव्हा त्या दोघांना बाजुला ठेऊन आम्ही कॉफीच्या टेबलावर बराचवेळ घुटमळलो...आमची खरेदी झाली...आणि नवरे कुठे आहेत, म्हणून नजर टाकली, तर ते दोघं ग्लासची खरेदी करत होते... हे शॅपेंनचे ग्लास आहेत, म्हणत नव-यानं माझ्यासमोर अगदी निमुळत्या आकारले काचेचे ग्लास धरले...त्यावर घेताय का...म्हणून त्या नव्या झालेल्या मैत्रिणीच्या नव-यानं विचारलंही...या प्रश्नावर नव-यानं लगेच उत्तर दिलं....नाही...ही खूप धडपडी आहे....असले नाजूक ग्लास दोन दिवसातच फुटतील आमच्याकडे....झालं...पण त्याच्या त्या टिप्पण्णीकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता...ब-याच दिवसांपासून मी काचेच्या डिश ठेवण्यासाठी आटोपशीर स्टॅड शोधत होते, तो मिळाला. इतक्यात मॉलमधील एक सूचना ऐकू आली...अनेक वस्तूंवर ऑफर होती...ऑफर, शब्द ऐकून आम्हा बायकांचे कान टवकारले...माझ्या मनात लगेच शिंगचँगची आई, मिस्कीची विचार
आला...कुठलीही ऑफर असेल तिथे ही मिक्सी धावत जाते...इथे मी तर गेलेच पण नव्या मैत्रिणीलाही सोबत घेतलं...तिला तवा हवा होता, तो झाला, काचेचे ग्लास, कप, छोट्या बरण्या ठेवायचा स्टॅड अशा वस्तूंची खरेदी झाली. मग ती नवी मैत्रिण प्लॅस्टिकच्या मोठ्या डब्यांच्या सेक्शनमध्ये गेली. आम्ही दोघंही पुढे इलेक्ट्रॉनिक विभागाकडे...तिथे बराच वेळ रेंगाळल्यावर पुढे गेल्यावर एक सुगंधी कॉर्नर लागला....घरात लागणा-या शोभेच्या वस्तूंचा हा कॉर्नर होता...किती प्रकार होते...बनवणा-याच्या कल्पकतेला खरोखरच सलाम...अगदी मेणबत्त्यांचे प्रकारही कितीतरी....वेगळ्या आकारातल्या आणि वेगवेगळ्या सुगंधाच्याही...इथून तर दूर व्हावसं वाटतंच नव्हतं...इथेही थोडी खरेदी झाली...काहींना भेटवस्तू घेतल्या गेल्या...घरातून मला शंभरवेळा सूचना देणारा नवरा आता बदलला होता...हे बघ खूप छान आहे, घ्यायचं का...म्हणून स्वतःहून विचारत होता...पण थोडं आवरतं घ्यायची गरज होती...कारण रात्रीचे आठ वाजत आलेले...कधी आणि कसा वेळ गेला ते समजलंच नव्हतं...
सोबतची सामानाची ट्रॉली भरली होती...बील करायला गेल्यावर भूकेची जाणीव झाली. दुपारी बाराच्या सुमारास आम्ही या शॉपिंग सेंटरमध्ये प्रवेश केला होता...बाहेर पडेपर्यंत रात्रीचे आठ वाजले....हातातल्या दोन बॅगा भरल्या...पर्समध्येही सामान कोंबून घेतलं...आता भूक लागली होती....बील सेंटरच्या समोरच खाऊघर होतं...कॉफीचा दरवळ सर्वत्र होता....एवढा वेळ जो जाणवला नव्हता तो थकवा जाणवत होता...पण कॉफीच्या सुगंधानं तो थकवाही दूर झाला....दोन मग कॉफी आणि बेक केलेले समोसे...हा मेनू घेतला आणि एक कोप-यातलं टेबल पकडलं...आमच्या पाठोपाठ ती नवी झालेली मैत्रिणही आली....आम्ही पुढच्या शनिवारीपण येणार हे आल्याआल्याच तिनं
जाहीर केलं...आम्ही जोरदार हसून त्यांना दाद दिली आणि शुभेच्छा देत निरोप घेतला...
घरी येईपर्यंत रात्रीचे दहा वाजत आले होते...सर्व आवरुन आधी आणलेल्या वस्तूंना त्यांची जागा दिली. नव्या स्टॅंडवर
बॉक्समध्ये ठेवलेल्या काचेच्या डिश लावून झाल्या....काचेचे कपही नव्या स्टॅडवर बसले. एकीकडे ज्वारीच्या भाक-या आणि मटारची उसळ तयार झाली...घर कितीही आधुनिक उपकरणांनी सजलं तरी या ज्वारी, बाजरीच्या भाक-यांना पर्याय नाही हे मात्र खरं....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा



.jpg)




.jpg)
Superb. एकदम ओघवत, मस्त शॉपिंग केल मी पण तुमच्या सोबत
ReplyDeleteधन्यवाद....
Deleteशाॅपिंगचा आनंद घेतलाय ते शब्दातून मस्त व्यक्त झालंय... छान लेख!!
ReplyDeleteधन्यवाद...
ReplyDeleteतुमचा वर्णन इतका अप्रतिम आहे की आता आम्हालाही तिकडे जाऊन भेट द्यावीशी वाटते आहे.. 💐💐💐💐👏👏👏👍👍
ReplyDelete