अंगणातील दुर्गेचा विचार कोण करतो...
काय करु बाई. गेल्या चार-पाच महिन्यापासून त्रास सुरु आहे. लघवीला सुरुवातीला जळजळ व्हायची. मग पोटात दुखायला लागलं. डॉक्टरनं सांगितल, तुम्ही पाणी कमी पिता, त्यामुळे तुम्हाला हा त्रास सुरु झालाय. आता किडनीला सुज आलीय म्हणाला. औषधं किती दिलीत विचारु नकोस. डॉक्टर सांगतात, औषधं नकोत तर पाणी प्या तासातासाला. आता असं पाणी प्यायलं तर लघवीला जायची सोय हवी ना. आम्ही इथे बसतो. तिकडे पार कुठेतरी सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. तिथे ही घाण. या बाजुला सोसायटी आहे ना, तिथल्या वॉचमनच्या बाथरुममध्ये जातो, सकाळी आल्यावर. मग दुपारी आणि मग घरी निघतांना. त्याचेही त्याला पैसे द्यावे लागतात. आपल्या बायकांची काही सोय नाही बघ. एवढी नवरात्र साजरी करतात, हे मोठे मंडप घालतात. ते दांडिया क काय खेळतात पण बायकांच्या आरोग्याची काळजी नाही बघ. हातात अळूची जुडी पकडून आम्ही दोघी बोलत होतो. माझी नेहमीची भाजीवाली. दरवर्षी नवरात्रामध्ये तिला साडीची ओटी देते. यावेळी चारवेळा फेरी मारली तरी बाई गायब. ऐन नवरात्रीमध्ये कुठे गायब झालेली. शेजारी बसणा-या, तिच्या गावातल्याच महिलेला विचारलं, तर म्हणाली, तब्बेत बरी नाय बाय तिची. येईल चार दिवसात, तेव्हा भेट. मग नवरात्र संपल्यावर गेले. तर बाई आलेल्या. मला बघताच, अळूच्या पानांची जुडी समोर केली. पण माझा पारा चढलेला. गेलीस कुठे ते आधी सांग, मग हे अळूचं बोलूया, म्हणत मी तिला ओरडले होते. तेव्हा तिनं सांगितलेलं कारण ऐकल्यावर मात्र मी निशब्द झाले.
नवरात्राचे नऊ दिवस आले आणि गेलेही. देवीची उत्सव. या उत्सवानिमित्त अवघं शहरं जणू नव्या नवरीसारखं नटलं होतं. गल्लोगल्ली लायटींग आणि मोठे मंडप. देवीची उपासना होणा-या या सणातून आपल्या घरातील देवीला नेमकं काय मिळालं हा प्रश्न मला या दरम्यान आला. त्याच्यासाठी पहिल्यांदा कारण ठरली ती माझी भाजीवाली. नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे, तिच्या अर्थानं चांगल्या धंद्याचे दिवस. अळूची पानं आणि पातीचा चहा ती नेहमी विकायला आणते. या नऊ दिवसात अळूच्या पानांना चांगली मागणी असते. अष्टमीपासून गोंड्याची फुलं, त्यांचे हार आणि भाताच्या लोंब्याही ती विकायला आणते. पण ही नवरात्र तिच्यासाठी त्रासदायक ठरली. गेले काही दिवस तिला लघवीला सतत जळजळ होत होती. त्यानंतर पोटातही दुखायला लागलं. पण ताप आला तेव्हा डॉक्टरकडे गेली. त्यांनी पाणी प्या, म्हणून सांगितलं. आता ही बाई, रस्त्याच्या कडेला भाजीविक्रीचा व्यवसाय करते. सकाळी सात वाजता आपलं घर सोडते. साधारण साडेसाठच्या सुमारास आपल्या नेहमीच्या जागेवर येऊन बसते. आल्यावर पहिल्यांदा चपात्या, भाक-या यांचा नाष्टा होतो. मग दुपारी दोन पर्यंत काही नाही. दुपारी पुन्हा घरातून आणलेले डबे खायचे. थोडावेळ आराम मग पुन्हा भाजीची टोपली लावून बसायचे. या दरम्यान भाजी संपली तर सोबत आलेल्या भाजीविक्रेत्या मैत्रिणींना मदत करायची. त्यांची भाजी विकून मग एकत्र घराकडे निघणार. ती आणि तिच्यासोबत येणा-या महिलांची असाच दिनक्रम असतो. या मध्ये आपली भाजीची टोपली काहीवेळ एकमेकींकडे सोपवून त्या नैसर्गिक विधीसाठी जातात. अगदी मोजक्याचवेळा या महिला नैसर्गिक विधीसाठी जातात. याचाच परिणाम म्हणजे, माझ्या या भाजीवाल्या मैत्रिणींला किडणीला सूज आल्याचे सांगण्यात आले. मग चार दिवस घरी बसली. कारण सारखं पाणी प्यायल्यावर लघवीलाही होणार, तेव्हा कुठे जाणार. सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या नेमकी. त्यापेक्षा घरी बसून राहिली. माझ्याबरोबर बोलतांना ती म्हणाली, एवढे सर्व देवी देवी करतात, पण तुला सांगते, बायकांसाठी काय सुविधा नाहीत. आपण आपल्या चार दिवसांच्या देवीच. नंतर आपल्याला कोण
विचारत नाही. ती हे बोलतांना तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं, आणि माझ्या मनात कालवाकालव चालली होती. कारण तिचा शब्द न शब्द खरा होता.
मध्यंतरी माझ्याकडे दुस-या शहरात रहाणारी मैत्रिण आली होती. तिच्यासोबत खरेदीला बाहेर पडले. थोड्यावेळानं तिनं लघवीला जायचं आहे, असं
सांगितले. आम्ही ज्या दुकानात गेलो, तिथे
सोय नव्हती. मग जवळच सार्वजनिक
स्वच्छतागृह आहे, तिथे जाऊया म्हणून गेले.
तर तिथली अवस्था पाहून तिला आणि मलाही किळस वाटली. शेवटी सरळ घराचा मार्ग पकडला. माझी भाजीवाली बोलत होती, तेव्हा हा प्रसंग
डोळ्यासमोर तरळला होता.
याच नवरात्रोत्सवात मैत्रिणीकडे कार्यक्रमासाठी गेले होते. येतांना उशीर झाला. रिक्षा केली, तर त्यांनी नेहमीच्या पैशांपेक्षा दुप्पट पैशांची मागणी केली. मी पहिल्यांदा नाही म्हटलं, तेव्हा तो रिक्षेवालाच म्हणाला, ताई, रिक्षा मिळणार नाही तुम्हाला लवकर. शहरात जाम ट्रॅफीक आहे. शिवाय सर्व रस्ते बंद आहेत. तुम्हाला अर्ध अधिक शहर फिरवून न्यावं लागेल, म्हणून एवढे पैसे सांगतोय. रागवू नका. मी गपचूप रिक्षात बसले. मग माझ्या घरी जाण्यासाठी पंधरा ते वीस मिनीटं लागणार होती. त्याऐवजी चांगली पंचेचाळीस मिनिटं लागली. सर्व शहराचे दर्शन करुन घरी आले. का...तर दांडिया. सर्व रस्ते बंद केलेले. जे चालू होते, त्यात ही गर्दी. या पंचेचाळीस मिनिटात त्या रिक्षावाल्यांनी जे सांगितलं ते ऐकून मुलभूत सुविधांना आपण कसा टाटा केलाय याची जाणीव झाली. त्याची बायको आठ महिन्याची
गरोदर आहे. सरकारी दवाखान्यात तिला नेलं होतं, पण ते पलिकडे, याचे घर पूर्वेला एका कोप-यात. त्यातही सरकारी दवाखान्यात गेल्यावर तिथली अवस्था पाहून पत्नी घाबरली. मग नाईलाजानं एका खाजगी डॉक्टरकडे नाव टाकलं आहे. बायकोचं सिझर झालं तर काय करायचं हा प्रश्न त्याला पडला आहे. त्यामुळे आता दिवसरात्र रिक्षा चालवतो. पैसे जमा करतोय. मी जेव्हा भेटले, त्याच्या आदल्याच दिवशी शहरातील दांडियांच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी एक भाडं मिळालं होतं. त्या मार्गावर तुफान ट्रॅफीक . अर्धा तास लागला. तेव्हा त्या दांडिंयांसाठी जाणा-यांनी याच्याबरोबरच वाद घातला. शिवाय पैशांवरुनही भांडणं झाली. त्यामुळे आता रिक्षात कोणी बसण्यापूर्वीच ट्रॅफीकच्या सूचना देतोय आणि वाढीव पैशांचंही कारण सांगतोय. आम्ही आलो ते अगदी आतल्या रस्तानं. तिथे साधे पथदिपही नव्हते. तो म्हणाला, बघा ताई, त्या रस्त्यावर अगदी झाडांना पण लाईटी लावल्या. लाखो रुपये फक्त लाईटीसाठी जातात. बाकीचं विचारु नका. या पैशात एखादं चांगलं सुतिकागृह झालं नसतं का....काय बोलणार...खरचं काय बोलणार. नवरात्रीमध्ये आलेले हे दोन्हीही अनुभव निशब्द करुन गेलेत. नऊ दिवसात ज्या देवीची पुजा होते, तिचेच एक रुप प्रत्येक महिलांमध्ये आहे. या रुपाला काही नको असतं, फक्त माफक सुविधा अपेक्षित असतात. पण अंगणातल्या या दुर्गेला विचारतो कोण....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

.jpg)

.jpg)
छान लेख 👍👌...वेळीच उपाय योजना झाल्या पाहिजेत
ReplyDeleteMast
Deleteसत्य नेहमी कडू असतं ...लवकरच तोडगा निघायला हवा . लेख छानच आहे 👍👌
ReplyDeleteKhup chhan lekh
ReplyDeleteविषय चांगला निवडला,उत्सव व वास्तव एकमेकाशी निगडीत आहेत.विषयाची मांडणी उत्तम आहे."लक्षवेधी लेख आहे"
ReplyDeleteअगदी योग्य शब्दात स्त्रियांची व्यथा मांडली आहे.पैशांची वारेमाप उधळपट्टी करण्यापेक्षा स्वच्छता गृह,सूतिकागृह बांधले तर देवीची आराधना केल्याचे खरे समाधान मिळेल.
ReplyDeleteआजचे वास्तव मार्मिक शब्दात मांडले आहे.आज अश्या तऱ्हेने साजरे होणारे उत्सव बंद करायची वेळ आली आहे .भक्ती,समाज कर्यापेक्षा दिखाऊपणा यावर लाखो रुपये खर्च होत आहेत.अर्थात कालय तस्मै नमः
ReplyDeleteRelatable situation - very well expressed!!
ReplyDelete