वदनि कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे ||

 

वदनि कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे || 


नव-यानं हसत माझ्याकडे बघितलं.  छान जेवलीस.  आज बरं वाटलं.  म्हणत नव-यानं त्याच्या पुढे असलेल्या चकचकीत ताटाला नमस्कार केला.  मी पण तसंच केलं.  हसतच मी समोर असलेल्या ताटाकडे बघितलं.  स्टिलचं मोठ्ठ ताट आणि त्यात असलेल्या तशाच लख्ख झालेल्या चार वाट्यांकडे समाधानानं बघितलं, आणि समाधानानं हात जोडले.  अन्नदेवतेला नमस्कार केला, आणि समोर असलेल्या प्रसन्न चेह-याच्या व्यक्तिला.  ते होते, सचिन श्रीकांत सोमण.  नृसिंहवाडीच्या सोमण भोजनालयाचे सर्वेसर्वा.   नृसिंहवाडीच्या सोमण भोजनालयाची ख्याती मी अनेकांकडून ऐकली होती.  मात्र यावेळच्या वाडीच्या भेटीत प्रत्यक्ष या भोजनाचा अस्वाद घेता आला.  अस्सल महाराष्ट्रीयन.  बेताचं तेल, तिखट.  उगाच कुठल्या भाजीवर तेलाचा तवंग नाही, की आमटी प्यायलावर होरपळणारी जीभ नाही.  ताटात सगळे पदार्थ.  पण सर्वांची चव अगदी वेगळी.  प्रत्येक पदार्थाची चव जिभेवर रहाणारी.  त्यातही ताटातील दोन पदार्थांचं कॉम्बेनेशन होणारं.  म्हणजे, पुरीसोबत भाजी नाही, तर बासुंदीच.  मसाले भातासोबत आमटी.  असल्या भन्नाट समिकरणाचं हे जेवण जेवतांना माझ्यासारखा आखडता हात घेणाराही कधीतरी जेवतानाचे नियम बाजुला ठेवतो.  तसेच सोमण भोजनालयात जेवतांना माझ्याबाबतीत झाले होते.  सोमण काकांनी जेवण वाढता वाढता आपल्या जेवणाच्या ताटाबद्दल, त्यातील पदार्थाबद्दल आणि त्याच्या


सात्विकतेबद्दल एवढी माहिती दिली, की पुन्हा पुन्हा तो पदार्थ खावासा वाटत होता.   भरपेट जेवल्यावर ताटासमोरचे पान तोंडात टाकल्यावर बोलायची सोय नव्हती.  फक्त तृप्तीचा वेगळा आनंद घेऊन आम्ही दोघं त्या सोमण भोजनालयातून बाहेर पडलो.  

नृसिंहवाडीची भेट ही आमच्या वार्षिक डायरीमधील हक्काची नोंद असते.  याच वाडीमध्ये अनेक भोजनालये प्रसिद्ध आहेत.  त्यातील सोमण भोजनालयाबद्दल मी अनेकांकडून ऐकले होते.  गेल्यावेळी वाडीला गेल्यावर कुठले नेमके सोमण असा प्रश्न पडला.  पण यावेळी जातांना निट पत्ता समजून घेतला होता.  नृसिंहवाडीत विठ्ठल मंदिराजवळील सोमण भोजनालाय.  एवढीच ओळख त्या व्यक्तीनं सांगितली.  दुपारी तीनपर्यंत कधीही जा.  बाहेर वेटींग असेल.  नंबर लावून बसलेली माणसं दिसली की समज आपण बरोब्बर ठिकाणी आलो आहोत, अशी अजब शब्दात माहिती त्या व्यक्तींनी आम्हाला दिली.  शिवाय सकाळीच जा, कारण सोमण भोजनालय रात्री बंद असतं, असा सल्लाही मिळाला होता.  त्यामुळेच या भोजनालयाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली.  यावेळी नेमकं वाडीला जातांना महालक्ष्मी एक्सप्रेस लेट झाली.  आम्हाला तब्बल दिड तास उशीर झाला.  जयसिंगपूरहून वाडीला येईपर्यंत सकाळचे आठ वाजून गेले होते.  एरवी आम्ही सकाळी आठ वाजता मंदिरात पोहचलेलो असतो.  अर्थात, यावेळी सगळे वेळापत्रक बिघडले.  मंदिरात जाईपर्यंत सकाळचे साडेदहा वाजले.  तिथून पुजा वगैरे करतांना दुपारचे दोन कधी वाजले हे समजलेच नाही.  मंदिरातून सोमण भोजनालयापर्यंत पोहचेपर्यंत आणखी पंधरा मिनिटं
गेली.  आता दुपार झाली, सगळ्यांची जेवणं झाली असतील, गर्दी नसेल अशी आमची चर्चा लगेच संपली.  कारण आम्ही पोहचल्यावरही सोमण भोजनालयात वेटींग चालूच होतं.  एक गृहस्थ पुढे आले, किती जणं....म्हणून त्यांनी विचारलं.  नव-यानं हातानंच दोन म्हणून खूण केली.  त्यांनी ठिक आहे, म्हणत, बाजुच्या खोलीकडे खूण केली.  तिथे बसण्याची व्यवस्था होती.  पंधरा-वीस मिनिटं बसायला लागेल, असं सांगून ते गृहस्थ निघून गेले.  आणखी पंधरा मिनिटं, असा विचार करुन मला अधिक भूक लागली.  एव्हाना अडीच वाजले होते.  बरोबर पंधरा मिनिटात ते गृहस्थ पुन्हा आले, चला तुम्ही दोघं, तुमचा नंबर आला, म्हणून मोठ्या आवाजात घोषणा केली.  आम्ही दोघंही घाईघाईनं आमच्या जागेवर जायलो लागलो.  तेव्हा त्या गृहस्थांनी आम्हाला अडवलं.  आत्ता काय, म्हणून आम्ही दोघेही त्यांना विचारणार इतक्यात लक्षात आलं, की सर्वांनी चप्पला बाहेर काढल्या आहेत.  आत जेवण्याची साधीच व्यवस्था होती.  बाकडे होते, शाळेत असतो तसेच टेबल.  एकावर ताट ठेवण्याची व्यवस्था तर दुस-यावर बसण्याची.  आम्ही चप्पला बाहेर ठेऊन जेवणाची ताटं मांडली होती, त्या खोलीत गेलो.  समोर रिकामं ताट होतं, आणि दोन वाट्या ठेवलेल्या.  माझ्या मनात हिशोब सुरु

झाला, म्हणजे, अजून पंधरा मिनिटं तरी जाणार.   जेवण वाढायला वेळ लागणार. 

पण तेवढ्यातच आमच्या समोर ते गृहस्थ आले.  त्यांच्या हातात वाफाळत्या भाताचे ताट होते,  त्यांनी अगदी चार घास भात ताटात वाढला.  त्यापाठोपाठ डाळ वाढणा-या मावशी होत्या.  डाळीपाठोपाठ चमचाभर तुप त्या भातावर आले.  सोबत ताटात दोन भाज्या, आणि आमटीही आली.  चटणी, कोशिंबीर, लोणचं, ताटाला लावलं गेलं.  एवढं झाल्यावर त्या गृहस्थांनी चालू करा, म्हणून आम्हा सर्वांना सांगितले.  एवढंच जेवण, फक्त भातच, म्हणत मी नव-याकडे बघितलं.  माझ्यासमोरच ते गृहस्थ उभे होते.  त्यांनी माझा चेहरा वाचला.  ताई, तुम्ही सुरुवात करा.  पहिला घ्यास भाताचा घ्यावा.  तो घ्या बरं आधी.  म्हणत मला प्रेमानं दटावलं.  ते होते, सचिन श्रीकांत सोमण. 

त्यांच्या वडिलांनी, श्रीकांत सोमण आणि आई, ललिता सोमण यांनी 1984 मध्ये हे भोजनालय सुरु केले.  आता त्याचा सर्व कारभार सचिन सोमण यांच्याकडे आला आहे.  1984 पासून सुरु असलेल्या या भोजनालयानं महाराष्ट्रीयन पारंपारिक जेवणाचा वारसा जोपासला आहे.  समर्थ श्रीरामदासस्वामींनी अन्न हे पूर्णब्रह्म असल्याचे म्हटले आहे.  त्याची प्रचिती या सोमण भोजनालयात आल्यावर आणि तेथील जेवणाचा स्वाद घेतल्यावर आली.   जेवणाच्या ताटात डावा, उजवा भाग महत्त्वाचा असतो.  दोघेही एकमेकांना पुरक असतात.  पण कोणाचा किती स्वाद घ्यावा त्यानुसार त्याची बाजु ठरलेली असते.  तसेच त्याचा स्वादही त्यानुसार असतो.  सोमण भोजनालयात या डाव्या, उजव्या बाजु उत्तमपणे सांभाळल्या गेल्या आहेत.  ताटात काकडीशी कोशिंबीर होती,  मुळ्याचा चट्टा नावाचा माझ्यासाठी नवा असलेला पदार्थ आला.  मिरचीचे ताजे लोणचे.  मिक्स भाजी, चवळीच्या दाण्यांची भाजी आणि नृसिंहवाडीच्या प्रसिद्ध वांग्याची भाजी ताटात वाढली गेली.  तोपर्यंत आम्हाला वाढलेला भात संपला होता.  भात संपल्याबरोबर ताटात पु-या आणि चपाती आली.  सोबत तळलेले पापड आले.  पु-या आल्याबरोबर एका वाटीत बासुंदी आली.  कुठेही वेळ काढू पणा नाही.  ताटातला एखादा  पदार्थ संपत आला, की लगेच तो हजर होणार.  सुरुवातीला कडक वाटलेले सोमण काका, नंतर प्रेमळपणे सर्वांना आग्रह करुन वाढत होते.  कुठला पदार्थ कसा खावा, कोणासोबत खावा, हे सांगत आग्रह करुन करुन वाढत होते.  एवढ्या मोठ्या पंक्तीमध्ये कोण किती जेवतं यावरही त्यांची बारीक नजर होती.  मी फक्त एक पुरी आणि चपाती घेतली याची त्यांनी नोंद घेतली होती.  माझ्या ताटात त्यांनी टम्म फुगलेली एक पुरी दिली, आणि त्या बासुंदीसोबत पुरी खा बर असा मला दम भरला.  माझा
बासुंदी हा नावडता प्रकार.  तरीही मी काकांच्या आग्रहामुळे एक घास पुरी बासुंदीचा घेतला.  आणि बाकीची बासुंदी नव-याच्या ताटात ठेऊन दिली.  त्यावर काकांनी डोळे मोठ्ठे केले.  मी नव-याला बासुंदी आवडते, मला नाही, असं सांगितल्यावर त्यांनी आणखी एक वाटी नव-याच्या ताटात ठेऊन दिली.

एव्हाना मी चारवेळा कोशिंबीर आणि तो मुळ्याचा चट्टा साफ केल्याची नोंदही त्यांनी घेतली.  मला त्यांनी पुन्हा मुळ्याचा चट्टा वाढलाच, शिवाय तो करण्याची पद्धतही सांगितली.  दोन तास भिजवलेली चण्याची डाळ जाडसर वाटायची.  त्यात मुळा किसून टाकायचा.  मग दही, मिठ, चवीला साखर टाकून वरुन फोडणी टाकायची.  झाला मुळ्याचा चट्टा तयार.  हे सांगतानाच काकांच्या हातात वाफाळत्या मसाले भाताचे ताट आले होते.  खरं सांगायचं तर माझी विकेट पडली होती.  सारखं आपण भरपूर जेवलो, याची जाणीव होत होती.  पण त्या वाफाळत्या मसाला भाताचा पहिला घास घेतल्यावर पुन्हा भूक जागी झाली.  भातासोबत ताक आले.  मसाला भात खातांना पुन्हा सोमण काकांनी आणखी नवी माहिती दिली.  मसाले भात त्या आमटीसोबत खावा.   आमटी अगदी साधी.  पातळ.  आंबट गोड चवीची.  पण ती चवच अप्रतिम होती.  मग काकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा मसाले भात आणि आमटीचा डाव झाला.  त्या मुळ्याच्या चट्यासोबत खाण्यासाठी तिस-यावेळीही घासभर भात घेतला.  जेवणाचे आवरत आले आहे, हे लक्षात आल्यावर सोमण काका, लाल चेरी लावलेले पान वाढू लागले.  सोबत आणखी एक पुरी
घेणार का, थोडी बासुंद घ्या.  अहो डाळ-भात घ्या ना थोडा.  असे म्हणत सर्वांना आग्रह करीत होते.  मी आसपास बसलेल्या सर्वांच्या चेह-याकडे बघितले.  सगळ्यांच्या चेह-यावर आगळे समाधान होते.  बरं हे सगळं होतांना,  म्हणजेच त्या वाफाळत्या जेवणाचा आस्वाद घेतांना लाईट नावाचा प्रकार नव्हता.  पंखे बंद होते.  सुरुवातीला आमचीही नाराजी होती.  गरम होतंय म्हणून तक्रार होती.  पण सोमणांचे जेवण आणि त्यांचा प्रेमळ आग्रह यावर भारी पडला.  जेवण होईपर्यंत लाईट नाही, पंखे बंद आहेत, याची साधी जाणीवही झाली नाही.   यातच त्या सात्विक जेवणाचा विजय होता.   या भरपेट जेवणाचे मुल्य फक्त 150 होते.  पैसे दिल्यावर काकांबरोबर गप्पा झाल्या.  त्यांनी या भोजनालयाची माहिती दिली.  पण ते करतांनाही काका पुढच्या पंक्तीची तयारी करत होते.  पुढच्या पंक्तीला वाढतांना काकांनी आणखी एक पान नव-याच्या हातात दिलं.  त्याची कळी आणखी खुलली.  आम्ही भरल्या मनानं आणि पोटानं त्यांचा निरोप घेतला.  दुपारचे साडेतीन वाजून गेले होते.   सोमण काकांचे जेवण एवढे भरपेट होते, की सायंकाळच्या कॉफीसोबतही आणखी काही खायची इच्छा नव्हती. 
अन्नदाता सुखी भव:  ही भावना सोबत ठेऊनच तशाच भरल्यापोटी आम्ही नृसिंहवाडीचा निरोप घेतला. 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. Khup Chan warnan super 🙏

    ReplyDelete
  2. वाचून भूक वाढली ना ग सई,😋👌🏻
    जाऊन आलो की सांगतो 😀🙏🏽

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की जा पुुष्कर...

      Delete
  3. अनुभवाचे बोल खुप छान आहेत💐💐👍👍👌👌🌹

    ReplyDelete
  4. महेश टिल्लू11 November 2023 at 18:40

    वस्तुनिष्ठ वर्णन. त्या ठिकाणी आपण आहोत असे वाटले.छान...कोकणातही अशी घरे आहेत जिथे आम्ही नेहमी भेट देत असतो.

    ReplyDelete
  5. वर्णनाचा चलत् चित्रपट डोळ्यासमोर आला. उत्तम मांडणी 👌

    ReplyDelete
  6. खूप छान लिहिता ताई तुम्ही आणि सोबतच आम्हाला नवीन रेसिपी सुद्धा कळते

    ReplyDelete

Post a Comment