वदनि कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे ||
नव-यानं हसत माझ्याकडे बघितलं. छान जेवलीस. आज बरं वाटलं. म्हणत नव-यानं त्याच्या पुढे असलेल्या चकचकीत ताटाला नमस्कार केला. मी पण तसंच केलं. हसतच मी समोर असलेल्या ताटाकडे बघितलं. स्टिलचं मोठ्ठ ताट आणि त्यात असलेल्या तशाच लख्ख झालेल्या चार वाट्यांकडे समाधानानं बघितलं, आणि समाधानानं हात जोडले. अन्नदेवतेला नमस्कार केला, आणि समोर असलेल्या प्रसन्न चेह-याच्या व्यक्तिला. ते होते, सचिन श्रीकांत सोमण. नृसिंहवाडीच्या सोमण भोजनालयाचे सर्वेसर्वा. नृसिंहवाडीच्या सोमण भोजनालयाची ख्याती मी अनेकांकडून ऐकली होती. मात्र यावेळच्या वाडीच्या भेटीत प्रत्यक्ष या भोजनाचा अस्वाद घेता आला. अस्सल महाराष्ट्रीयन. बेताचं तेल, तिखट. उगाच कुठल्या भाजीवर तेलाचा तवंग नाही, की आमटी प्यायलावर होरपळणारी जीभ नाही. ताटात सगळे पदार्थ. पण सर्वांची चव अगदी वेगळी. प्रत्येक पदार्थाची चव जिभेवर रहाणारी. त्यातही ताटातील दोन पदार्थांचं कॉम्बेनेशन होणारं. म्हणजे, पुरीसोबत भाजी नाही, तर बासुंदीच. मसाले भातासोबत आमटी. असल्या भन्नाट समिकरणाचं हे जेवण जेवतांना माझ्यासारखा आखडता हात घेणाराही कधीतरी जेवतानाचे नियम बाजुला ठेवतो. तसेच सोमण भोजनालयात जेवतांना माझ्याबाबतीत झाले होते. सोमण काकांनी जेवण वाढता वाढता आपल्या जेवणाच्या ताटाबद्दल, त्यातील पदार्थाबद्दल आणि त्याच्या
सात्विकतेबद्दल एवढी माहिती दिली, की पुन्हा पुन्हा तो पदार्थ खावासा वाटत होता. भरपेट जेवल्यावर ताटासमोरचे पान तोंडात टाकल्यावर बोलायची सोय नव्हती. फक्त तृप्तीचा वेगळा आनंद घेऊन आम्ही दोघं त्या सोमण भोजनालयातून बाहेर पडलो.
गेली. आता दुपार झाली, सगळ्यांची जेवणं झाली असतील, गर्दी नसेल अशी आमची चर्चा लगेच संपली. कारण आम्ही पोहचल्यावरही सोमण भोजनालयात वेटींग चालूच होतं. एक गृहस्थ पुढे आले, किती जणं....म्हणून त्यांनी विचारलं. नव-यानं हातानंच दोन म्हणून खूण केली. त्यांनी ठिक आहे, म्हणत, बाजुच्या खोलीकडे खूण केली. तिथे बसण्याची व्यवस्था होती. पंधरा-वीस मिनिटं बसायला लागेल, असं सांगून ते गृहस्थ निघून गेले. आणखी पंधरा मिनिटं, असा विचार करुन मला अधिक भूक लागली. एव्हाना अडीच वाजले होते. बरोबर पंधरा मिनिटात ते गृहस्थ पुन्हा आले, चला तुम्ही दोघं, तुमचा नंबर आला, म्हणून मोठ्या आवाजात घोषणा केली. आम्ही दोघंही घाईघाईनं आमच्या जागेवर जायलो लागलो. तेव्हा त्या गृहस्थांनी आम्हाला अडवलं. आत्ता काय, म्हणून आम्ही दोघेही त्यांना विचारणार इतक्यात लक्षात आलं, की सर्वांनी चप्पला बाहेर काढल्या आहेत. आत जेवण्याची साधीच व्यवस्था होती. बाकडे होते, शाळेत असतो तसेच टेबल. एकावर ताट ठेवण्याची व्यवस्था तर दुस-यावर बसण्याची. आम्ही चप्पला बाहेर ठेऊन जेवणाची ताटं मांडली होती, त्या खोलीत गेलो. समोर रिकामं ताट होतं, आणि दोन वाट्या ठेवलेल्या. माझ्या मनात हिशोब सुरु
झाला, म्हणजे, अजून पंधरा मिनिटं तरी जाणार. जेवण वाढायला वेळ लागणार.
पण
तेवढ्यातच आमच्या समोर ते गृहस्थ आले.
त्यांच्या हातात वाफाळत्या भाताचे ताट होते, त्यांनी अगदी चार घास भात ताटात वाढला. त्यापाठोपाठ डाळ वाढणा-या मावशी होत्या. डाळीपाठोपाठ चमचाभर तुप त्या भातावर आले. सोबत ताटात दोन भाज्या, आणि आमटीही आली. चटणी, कोशिंबीर, लोणचं, ताटाला लावलं
गेलं. एवढं झाल्यावर त्या गृहस्थांनी चालू
करा, म्हणून आम्हा सर्वांना सांगितले.
एवढंच जेवण, फक्त भातच, म्हणत मी नव-याकडे बघितलं. माझ्यासमोरच ते गृहस्थ उभे होते. त्यांनी माझा चेहरा वाचला. ताई, तुम्ही सुरुवात करा. पहिला घ्यास भाताचा घ्यावा. तो घ्या बरं आधी. म्हणत मला प्रेमानं दटावलं. ते होते, सचिन श्रीकांत सोमण.
बासुंदी हा नावडता प्रकार. तरीही मी काकांच्या आग्रहामुळे एक घास पुरी बासुंदीचा घेतला. आणि बाकीची बासुंदी नव-याच्या ताटात ठेऊन दिली. त्यावर काकांनी डोळे मोठ्ठे केले. मी नव-याला बासुंदी आवडते, मला नाही, असं सांगितल्यावर त्यांनी आणखी एक वाटी नव-याच्या ताटात ठेऊन दिली.
घेणार का, थोडी बासुंद घ्या. अहो डाळ-भात घ्या ना थोडा. असे म्हणत सर्वांना आग्रह करीत होते. मी आसपास बसलेल्या सर्वांच्या चेह-याकडे बघितले. सगळ्यांच्या चेह-यावर आगळे समाधान होते. बरं हे सगळं होतांना, म्हणजेच त्या वाफाळत्या जेवणाचा आस्वाद घेतांना लाईट नावाचा प्रकार नव्हता. पंखे बंद होते. सुरुवातीला आमचीही नाराजी होती. गरम होतंय म्हणून तक्रार होती. पण सोमणांचे जेवण आणि त्यांचा प्रेमळ आग्रह यावर भारी पडला. जेवण होईपर्यंत लाईट नाही, पंखे बंद आहेत, याची साधी जाणीवही झाली नाही. यातच त्या सात्विक जेवणाचा विजय होता. या भरपेट जेवणाचे मुल्य फक्त 150 होते. पैसे दिल्यावर काकांबरोबर गप्पा झाल्या. त्यांनी या भोजनालयाची माहिती दिली. पण ते करतांनाही काका पुढच्या पंक्तीची तयारी करत होते. पुढच्या पंक्तीला वाढतांना काकांनी आणखी एक पान नव-याच्या हातात दिलं. त्याची कळी आणखी खुलली. आम्ही भरल्या मनानं आणि पोटानं त्यांचा निरोप घेतला. दुपारचे साडेतीन वाजून गेले होते. सोमण काकांचे जेवण एवढे भरपेट होते, की सायंकाळच्या कॉफीसोबतही आणखी काही खायची इच्छा नव्हती. अन्नदाता सुखी भव: ही भावना सोबत ठेऊनच तशाच भरल्यापोटी आम्ही नृसिंहवाडीचा निरोप घेतला.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup Chan warnan super 🙏
ReplyDeleteधन्यवाद
Deleteझकास
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteवाचून भूक वाढली ना ग सई,😋👌🏻
ReplyDeleteजाऊन आलो की सांगतो 😀🙏🏽
नक्की जा पुुष्कर...
Deleteअनुभवाचे बोल खुप छान आहेत💐💐👍👍👌👌🌹
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteवस्तुनिष्ठ वर्णन. त्या ठिकाणी आपण आहोत असे वाटले.छान...कोकणातही अशी घरे आहेत जिथे आम्ही नेहमी भेट देत असतो.
ReplyDeleteवर्णनाचा चलत् चित्रपट डोळ्यासमोर आला. उत्तम मांडणी 👌
ReplyDeleteखूप छान लिहिता ताई तुम्ही आणि सोबतच आम्हाला नवीन रेसिपी सुद्धा कळते
ReplyDelete